प्रत्यक्षातील अद्भुत दुनिया

विवेक मराठी    26-Oct-2017
Total Views |

 

वाढत्या वयाबरोबर मैत्री झालेल्या कीबोर्डवाल्या ई गॅजेट्सनी जाणवून दिलेलं सत्य म्हणजे, बालपणीची ती चित्रविचित्र दुनिया झूट असून त्या साध्या बालमनास रमवणाऱ्या उत्तम कल्पना होत्या. बालपणीचा हा सुखाचा काळ संपल्यावर करियर म्हणून निसर्गात काम करताना जाणवलं की त्या परिकथा, ते चित्रविचित्र प्राणी, ती रम्य दुनिया आणि त्यातले अद्भुत जीव मागे टाकील अशी खरी दुनिया आपल्या आवतीभोवती नांदतेय. गरज आहे तिला डोळे उघडून पाहायची.

 लहान असताना शाळेत शारदीय नवरात्राची सूचना फळयावर लिहिलेली दिसली की मन आनंदून जायचं. दसरा, दिवाळी जवळ आलीय आणि सुट्टयांचा काळ सुरू होणार, याची चाहूल त्या सुट्टीच्या सूचनेद्वारे मिळायची. 'दसरा सण हसरा' म्हणतानाच दिवाळीचे वेध लागायचे. दिवाळीची सुट्टी म्हणजे फराळ, किल्ला, नवीन कपडे आणि भावंडांसोबत आनंदाने उपभोगलेली मोठी सुट्टी असं पक्कं समीकरण दर वर्षी ठरलेलं असायचं. या सुट्टीत आजोळी जायचे बेत असायचेच आणि काय काय घ्यायचंय याची उजळणी व्हायची. महिनाभर न चुकता खाद्य फराळाबरोबर बौध्दिक फराळही मिळायचा. वेगवेगळी पुस्तकं, कुमारांसाठी असलेली मासिकं, शास्त्रीय कथा वाचताना लोळण्यात दिवस कसा संपायचा, हे कळायचंच नाही. या संपलेल्या दिवसाला चार चांद लागायचे ते रात्री झोपताना आजी-आजोबांनी किंवा आत्याने सांगितलेल्या गोष्टींनी. काय नसायचं त्या गोष्टींमध्ये? दूर देशात उडणारे घोडे, पंखवाली माणसं, फत्ताडया पायाचे राक्षस, दोन डोक्याचे प्राणी आणि चित्रविचित्र पक्षी ठासून भरलेलं जादूचं राज्य तिथे असायचं. ते वयच असं होत की त्या सगळया गोष्टींवर विश्वास ठेवला जायचा आणि त्यात मन रमायचं. हे असले प्राणी आणि अशी दुनिया असेल का? असली, तर ती कुठे असेल? आपल्याला जाता येईल का त्या दुनियेत? वगैरे प्रश्न कधीतरी बालमनाला पडायचे नि लगेच विसरले जायचे. पुढे वय वाढलं आणि ही दुनियाही मागे पडली. 'शाळा सुटली पाटी फुटली' म्हणताना ह्या रम्य कथांनी धरलेलं बोट नकळत सुटलं आणि सुटलेलं ते बोट सररास कीबोर्डावर चालायला लागलं. वाढत्या वयाबरोबर मैत्री झालेल्या कीबोर्डवाल्या ई गॅजेट्सनी जाणवून दिलेलं सत्य म्हणजे, बालपणीची ती चित्रविचित्र दुनिया झूट असून त्या साध्या बालमनास रमवणाऱ्या उत्तम कल्पना होत्या. बालपणीचा हा सुखाचा काळ संपल्यावर करियर म्हणून निसर्गात काम करताना जाणवलं की त्या परिकथा, ते चित्रविचित्र प्राणी, ती रम्य दुनिया आणि त्यातले अद्भुत जीव मागे टाकील अशी खरी दुनिया आपल्या आवतीभोवती नांदतेय. गरज आहे तिला डोळे उघडून पाहायची.

या डोळे उघडून पाहायच्या जाणिवेतून कळत-नकळत निसर्गाकडे अभ्यासू नजरेने पाहायला सुरुवात केल्यावर अचानक जाणीव झाली, ती म्हणजे लहानपणी स्वप्नरंजनात पाहिलेल्या सृष्टीसारखीच रंजक दुनिया आपल्या आवतीभोवती नांदते आहे. दूरदूरच्या खंडाबद्दल माहिती शोधताना तिथली अजब माणसं आणि त्याहून गजब प्राणी नजरेस पडायला लागले. दूर हजारो मैलांवर पसरलेल्या आफ्रिका खंडातल्या काँगो नावाच्या चिमण्या देशात जिराफासारखा दिसणारा बैलाएवढा प्राणी झेब्रासारखाही दिसू शकतो, असा विचारच मी केला नव्हता. ओकापी नावाच्या प्राण्याने जणू लहानपणीच्या परिकथेतल्या प्राण्याला मूर्त स्वरूप दिलं आहे, असंच वाटायला लागलं. तोंड आणि धड जिराफासारखं, काळविटासारखी मान आणि झेब््रयासारखे पायावरचे पट्टे असं सुंदर ते ध्यान गेल्या शतकात नजरेस पडायला लागलं. असा प्राणी अस्तित्वात आहे, यावर याआधी कुणाचा विश्वास नव्हता. जिराफाच्या कुटुंबाशी साम्य सांगणारा आफ्रिकेतला हा ओकापी प्राणी जिराफाएवढा ताडमाड होत नाही, पण साधारण साडेसहा फुटाची उंची सहज गाठतो. साडेतीनशे किलोचं वजन कमावलेलं हे धूड पूर्णत: शाकाहारी असून अंदाजे वीस ते तीस वर्षांचं आयुष्य अखंड खाण्यात घालवतं. या सतत खाण्यात फळं, फुल, पानं, गवत आणि वेगवेगळी झाडं समाविष्ट असतात. शास्त्रज्ञांनी ओकापीच्या खाण्याचा सखोल अभ्यास केल्यावर मानवाला खाण्यास योग्य अशा शंभर वनस्पतींचा शोध लागला, हे विशेष. असे हे ओकापी आज अगदी जेमतेम काही शे अशा मोजक्या संख्येत उरले आहेत. पूर्वी जंगल झेब्रा म्हणून ओळखला जाणारा ओकापी वर्षभर आपलं प्रजनन सुरू ठेवतो. सव्वा वर्ष - म्हणजेच पंधरा महिने गरोदरपणात घालवून मादी ओकापी एका पिल्लाला जन्म देते. हे जन्म झालेलं पिल्लू दोन महिने झाडाझुडपाच्या लपणात लपवून त्याची काळजी घेण्याचं काम पालक करतात. गम्मत म्हणजे, बिबळया आणि इतर शिकाऱ्यांना स्वत:च्या लपण्याचा पत्ता लागू नये, म्हणून हे पिल्लू पहिले दोन महिने विष्ठा विसर्जन करणं टाळतं. एखाद्या सुरस रम्य कथेतल्या पात्रासारखं हे ओकापी आश्चर्यकारक आहे ना?

या ओकापी प्राण्याच्या विचित्र दिसण्यावरून मला लहानपणी माझ्याकडे असलेलं एक पुस्तक आठवलं, ज्यात रंगवायला वेगवेगळया प्राण्यांची चित्रं होती. यातले काही प्राणी खरे होते, तर काही कल्पित होते. या कल्पित प्राण्यांना मी यथेच्छ हव्या त्या रंगात कशीही रंगवायचे. गर्द रंगाच्या खडूने गिरबटवून रंगवलेले हे अगम्य प्राणी अतिशय बटबटीत आणि मजेशीर दिसायचे. वरच्या वर्गात जायला लागल्यावर हळूहळू माझं हे गिरबटवून रंगवणं कमी झालं आणि खरे सजीव, खोटे प्राणी, सस्तन प्राणी असे प्रकार आणि त्यातले फरक कळायला लागले. सस्तन प्राणी कधीच अंडी घालत नाहीत, हे वैश्विक सत्य बालमनावर शालेय जीवनात अगदी कोरून बिंबवलं गेलं. बालमनावर बिंबवलेल्या वैश्विक सत्याला पुढे मोठा धक्का बसला, जेव्हा ऑॅस्ट्रेलिया खंडातल्या प्लॅटिपस प्राण्याबद्दल सविस्तर माहिती कळली. बीव्हर या प्राण्यासारखी शेपटी आणि अंगावर केस आणि बदकासारखी चोच असलेला हा प्लॅटिपस नामक प्राणी जगातील एकमेव असा सस्तन आहे, जो अंडी घालतो. पाणवठयाच्या जवळ बीळ खोदून, घरटं बनवून त्यात अंडी घालून पिल्लांना जन्म देणारा हा प्लॅटिपस प्राणी सस्तन आहे, म्हणून पिल्लासाठी शरीरावर दुग्धनिर्मिती करतो. मात्र हे दूध पिल्लांनी ओढून प्यायला निसर्गाने त्याच्या अंगावर स्तनांची निर्मितीच केली नाहीये. अशा वेळी, मादी प्लॅटिपस अंगावर बनलेलं दूध पोटाजवळच्या खळग्यात जमवते आणि ही पिल्लं ते दूध चाटून फस्त करतात. आईने मातीच्या आणि पानांच्या साहाय्याने बनवलेल्या घरटयात चार महिने ही पिल्लं सुरक्षित राहतात आणि मग बाहेरच्या दुनियेत जातात. पिल्लांच्या संगोपनात त्यांचा बाबा अजिबात मदत करत नाही आणि तो आपला कार्यभाग साधून झाल्यावर आरामात मोकळा हिंडायला निघून जातो.

या प्लॅटिपसच्या अंगावर मातकट रंगाची फर असते. पाण्यात पोहताना स्वत:च्या शरीराचं तापमान उबदार ठेवायला त्याला तिचा उपयोग होतो. याच जोडीला, स्वत:च्या शेपटीचा उपयोग पोहोताना वल्ह म्हणूनही होतो. या वल्ह्यासारख्या शेपटीत चरबी साठवली जाते. गरजेच्या वेळी ह्या चरबीचा वापर केला जातो. प्लॅटिपस बाबा भले दिसायला बेढव असला तरी विषारी असतो, हे याचं आणखी एक वैशिष्टय. प्राण्यांच्या दुनियेत फारच थोडे सस्तन प्राणी विषारी असतात. प्लॅटिपस हा त्यापैकी एक समजला जातो. यांच्या मागच्या पावलांवर विषारी खुरांची एक जोडी असते. विणीच्या हंगामात प्रतिस्पर्धी नरांबरोबर सामना करताना या विषारी खूर जोडीचा उपायोग होतोच, तसंच इतर वेळी ह्या खुरांचा वापर स्वसंरक्षणार्थ केला जातो. या प्लॅटिपसचं विष मनुष्यप्राण्यासाठी जीवघेणं नसलं, तरी आपल्याला तात्पुरता बधिरपणा, जीवघेणा डंख जाणवेल अशा कळा येत राहतात. कुत्रा, रानमांजरं अशा शिकारी प्राण्यांनी प्लॅटिपसला पकडायचा प्रयत्न केल्यास या खुरांचा वापर करून हा प्राणी स्वत:ची सुटका करून घेतो आणि त्याला पकडण्याचं फळ म्हणून या विषारी खुराच्या डंखाने त्या प्राण्याचा चक्क जीव घेतो. लहान प्राण्यांसाठी ह्याचं विष प्राणघातक असतं ते असं. या प्लॅटिपसच सांगायचं आणखी एक भन्नाट वैशिष्टय म्हणजे, त्याच्या भक्ष्याच्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसारणातून तयार होणारी विद्युत कंपनं पकडण्याची खास व्यवस्था यांच्या चोचीजवळच्या त्वचेत असते. या कंपनांच्या दिशेने प्रवास करत ते शिकार करतात. अगदी थक्क व्हावं अशी ही निसर्गदत्त देणगी फार थोडया प्राण्यांना मिळालेली आहे. आपल्या दुनियेपेक्षा खूप वेगळी असलेली ही दुनिया खरंच थक्क करून सोडते, जेव्हा अशी आश्चर्य समोर येतात.

पूर्वी गोष्टीच्या पुस्तकात उलटा लटकणारा वेताळ, मठ्ठ संथ कुबडया हमखास असायचा. उलटा वेताळ आणि तो मठ्ठ कुबडया असलेली ती गोष्टीची पुस्तकं कधीच गायब झाली, पण त्या पुस्तकांची आठवण ताजी करेल असा एक मजेशीर उलटा मठ्ठ प्राणी अमेरिकेच्या खंडात नांदतोय. स्लॉथ नावाने ओळखला जाणारा हा विचित्र जीव आपलं संपूर्ण आयुष्य झाडावर उलटं लटकण्यातच घालवतो. दक्षिण आणि मध्य अमेरिका भागात पाच जातीचे स्लॉथ नांदत असून दोन खूरवाले आणि तीन खूरवाले अशी यांची विभागणी केलेली आहे. हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेले स्लॉथ्स हत्तीच्या आकाराचे होते, असं शास्त्रज्ञ जेव्हा सांगतात तेव्हा खरंच अवाक व्हायला होतं. आजच्या घडीला फक्त अमेरिका खंडात सापडणारे स्लॉथ मध्यम आकाराच्या कुत्र्याएवढया आकारापासून जेमतेम हातभार अशा वेगवेगळया मापात दिसतात. लहान चप्पट डोकं असलेल्या या विचित्र प्राण्याचे कान अतिशय लहान असतात. नकटं नाक आणि मोठे मोठे डोळे असलेलं हे ध्यान पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर सुखेनैव विलसणाऱ्या मठ्ठपणाची दया येते. घट्टमुट्ट अंगाची आणि लांब हात असलेली ही स्लॉथ मंडळी बघितल्यावर मनात 'मठ्ठ' या शब्दाखेरीज दुसरा कुठलाही शब्द येत नाही. यातल्या तीन खूरवाल्या स्लॉथ्सना बोटभर आकाराची खुंटयासारखी दिसणारी मजेशीर शेपूटही असते. स्लॉथ कुटुंबातल्या वेगेवेगळया पाच जातींमध्ये आकारमानात फरक असला, तरी यांच्या बहुतांश गोष्टी सारख्या आहेत. दिवसातले पंधरा ते वीस तास झोपेत घालवणारा हा प्राणी आपली जेमतेम दहा टक्के ऊर्जा वापरत असतो. स्लॉथ निशाचर असून आपलं संपूर्ण आयुष्य झाडावरच घालवतो आणि जमिनीवरचा वावर शक्यतो टाळतो. गरज नसेल तर स्लॉथ स्वत:च्या शरीराची कुठलीही हालचाल करत नाही. जिथे असेल तिथे तसाच पडून राहणं हा जीव पसंत करतो. हे सगळं वाचल्यावर हा प्राणी आळशी आहे असा निष्कर्ष काढण्याची घाई तुम्ही करू नका. या हालचाल न करण्यामागे प्रचंड मोठं कारण आहे.

शाकाहारी असलेली ही स्लॉथ मंडळी ठराविक झाडांची पानं, कोवळे शेंडे, कळया खातात. यांच्या या हळू हालचालींचं कारण त्यांच्या चार कप्प्याच्या पोटात दडलंय. स्वत:च्या भयंकर संथ पचनशक्तीमुळे पोटातलं गेलेलं अन्न अनेक आठवडे हे स्लॉथ्स पचवू शकत नाहीत. यामुळे, पोटात शिरलेलं अन्न पचायला अनेकदा महिनाभराचा काळही लागतो. खाल्लेल्या पानांमधून येणारी वेगवेगळी रसायनं या पोटात साठवली आणि मग पचवली जातात. यांच्या खाण्यात फार उत्तम पोषणमूल्य असलेले घटक पदार्थ नसल्याने त्यातून मिळणारी ऊर्जाही अगदी नाममात्र असते. शरीरात मिळणारी ऊर्जा कमी असल्याने साहजिकच तिचा होणारा वापरही अत्यंत कमी असतो. शरीराची जास्त हालचाल करायला सजीवांना साधारण पंचेचाळीस टक्के स्नायू वापरावे लागतात. मात्र स्लॉथ्सना त्यांच्या हालचालींमुळे शरीरातले फक्त वीस ते पंचवीस टक्के स्नायू वापरावे लागतात.  याच गोष्टीमुळे हे स्लॉथ्स अतिशय संथ अशा हालचाली करतात. अतिशय संथ पचनशक्ती असल्यामुळे यांचं पोट कायम भरलेलं असतं. शरीरातलं तीस टक्के वजन तर यांच्या भरलेल्या पोटाचंच असतं. आश्चर्य वाटाव्या अशाच एकेक गोष्टी या स्लॉथच्या वर्तनाशी जोडलेल्या दिसून येतात. सगळंच संथ गतीने करणारा हा जीव साधारण सहा-सात दिवसातून एकदाच जमिनीवर येऊन मलमूत्र विसर्जन करून जातो. निसर्गाने फार थोडया सजीवांना 'हेटरोथर्मिक' म्हणजेच शरीराचं तापमान आवतीभोवतीच्या तापमानाप्रमाणे जुळवून घ्यायची देणगी दिलेली असते. स्लॉथ अशा मोजक्याच सजीवांपैकी असून सभोवतालात होणारे तापमानाचे बदल याचं शरीर पटकन स्वीकारतं आणि त्या तापमानायोग्य तापमान शरीरात करून घेतं. याचा दुष्परिणाम अनेकदा पिल्लांना दूध पाजणाऱ्या माद्यांवर होतो आणि त्यात त्यांचा मृत्यूही होते. स्लॉथ्सच्या अंगावर असलेल्या केसांमध्ये एक विशिष्ट प्रकारची बुरशी दीर्घकाळ तयार होऊन नांदत असते. किंबहुना ही बुरशी आणि हे स्लॉथ्स यांचं अगदी साटंलोटं असतं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. निम्म्याहून जास्त काळ यांना लटकूनच राहावं लागत असल्याने यांच्या केसांची वाढ इतर प्राण्यापेक्षा उलटी होत राहते. ह्या उलटया वाढणाऱ्या केसांमध्ये बुरशीचा रंग मिसळला जाऊन त्यांना निसर्गत: लपायला योग्य रंग प्राप्त होतो. या बुरशीबरोबर यांच्या अंगावर काही जातीचे लहान कीडेमकोडे नांदतात, जे बाहेर स्वतंत्रपणे जगू शकत नाही. थोडक्यात काय? स्लॉथच शरीर म्हणजे संथ हलणारी जिवंत जैविक परिसंस्था आहे, असं म्हणायला हरकत नाही. निसर्गात बहुतांश सस्तन प्राण्यांना मानेचे सात मणके असतात. तीन खूरवाल स्लॉथ ह्या नियमाला अपवाद म्हणावे लागतील, हे यांचं आणखी एक वैशिष्टय. तीन खूर असलेल्या स्लॉथसना मानेचे आठ किंवा नऊ मणके असतात. या जास्तीच्या मणक्यांमुळे त्यांना त्यांच्या मानेची जवळजवळ 270 अंशाची कमान करता येते. दोन खूरवाले आणि तीन खूरवाले अशी विभागणी झालेल्या पाचही जातींचं प्रजनन झाडावरच होतं. काही स्लॉथ्स प्रजातीच्या माद्या सहा महिने, तर काही साडे अकरा महिने गरोदर राहून एकाच पिल्लाला झाडावरच जन्म देतात. अनेक महिने हे पिल्लू आईच्या मानेला विळखा घालून उलटं लटकून राहतं. अनेकदा, निरीक्षकांनी नोंदवलेलं मजेशीर दृश्य म्हणजे, आई पिल्लासकट झाडाला उलटी लटकून झोपलेली असते. ही पिल्लं अनेक महिने आईचं दूध पिऊन राहतात. नंतर हळूहळू झाडाची कोवळी पानं खायला सुरुवात करतात. साधारण वर्षभराने हे पिल्लू आईपासून दूर होतं.

एवढं संथ, पळू न शकणारं, हलू न शकणारं स्लॉथ जॅग्वार आणि मोठे गरुड या दोन शिकाऱ्यांपासून स्वत:चा बचाव कसं करतं, हा पुढचा प्रश्न कुणाच्याही मनात येऊ शकतोच. याचा रंग ते राहत असलेल्या झाडाच्या पानाशी इतका सरूप होऊन जातो की त्याच वेगळं अस्तित्व जाणवतही नाही. जोडीला ती प्रसिध्द संथ हालचाल त्यांना जणू झाडाचा भागच बनवून टाकते. तसे हे निरुपद्रवी असतातच, पण खूपच त्रास दिला, तर अत्यंत कर्णकटू किंकाळया मारतात आणि आपल्या खुरांनी शक्य तेवढा हल्ला करायचा प्रयत्न करतात. ह्या स्लॉथ्सचं लक्षात राहणारं वैशिष्टय म्हणजे, यांना उत्तम पोहता येत. गम्मत अशी आहे की जेव्हा त्यांना पाण्यात पोहायचं असतं, तेव्हा ते जमिनीवर उतरून पोहायला नदीवर जात नाहीत, तर झाडाच्या शेंडयांवरून नदीत अंग फेकून देतात. मनुष्याला लाजवेल असं उत्तम बॅक स्ट्रोक पोहणारा स्लॉथ बघण्यासारखा असतो. हे पोहून झालं की परत धडपड करत स्लॉथ्स झाडावर चढून जातात आणि परत उलटे लटकायला सुरुवात करतात. निसर्गाच्या जादुई पुस्तकातला संथ हालचाल करणारा भावनाशून्य मठ्ठ कुबडया वाटावा असा हा जीव हळूहळू नामशेष होण्याकडे वाटचाल करतोय.

हे सगळं लिहीत असताना लहानपणी पुस्तकांमध्ये वाचलेल्या अनेक गमतीदार गोष्टी आणि त्यातले चित्रविचित्र प्राणी आठवायला लागले. राक्षसाने पळवून नेत असलेल्या राजकन्येच्या बोटातून तिची अंगठी गळून ती नदीच्या काठावर राहणाऱ्या माशाच्या तोंडात पडते. हा मासा नदीच्या काठाजवळ राजकन्येला शोधणाऱ्या राजपुत्राकडे चालत जातो आणि ती अंगठी त्याला देतो आणि राजकन्येचा पत्ता सांगतो, अशी एक गोष्ट कधीतरी वाचनात आली होती. पोहणारा मासा चालू शकतो, हे काल्पनिक दुनियेत सहज शक्य होतंच, पण आपल्या वास्तवाच्या दुनियेतही असा मासा आहे आणि तो चालू शकतो ह्यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. पोहणारे मासे असतात. पण चालणारे मासे असतात का? अगदी कल्पनेच्या राज्यात शोभतील असे जमिनीवर चालू शकणारे मासे भारतीय उपसागरात आढळतात. मडस्किपर नावाचे मासे आपल्या कल्ल्यांचा वापर करून जमिनीवर चालतात. जमिनीवर आणि पाण्यात लीलया वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी अशी सुंदर संज्ञा मराठीत वापरली जाते. मडस्किपर या उभयचर माशांचे जगभर पसरलेले जवळजवळ बत्तीस प्रकार असून आपल्याकडे खाडी आणि दलदलीच्या भागात आढळणाऱ्या मडस्किपर प्रकाराला मराठीत काही ठिकाणी 'निवळी' असंही उल्लेखलं जातं. चिखलात राहणारे, पाण्यात पोहणारे आणि पुढच्या कल्ल्यांच्या सहाय्याने जमिनीवर चालणारे हे निवळी मासे उभयचर प्रकारात मोडतात. पाण्यात आणि जमिनीवर राहण्यास योग्य अशी निसर्गदत्त शरीररचना लाभलेले हे मासे साधारण वीस ते तीस सेंटीमीटर लांबीचे असतात. बेडकांच्या डोळयांशी साम्य असणारे आणि गॉगल कपाळावर ठेवल्यासारखे दिसणारे डोळे, पायासारखे बनलेले कल्ले, लांबुळकं शरीर ही निवळीची वैशिष्टय आहेत. पाण्यापासून, दलदलीपासून कोरडया जमिनीवर काही अंतरापर्यंत सहज जाऊ शकणारे निवळी आपल्या कल्ल्याच्या मागे असलेल्या मोकळया कप्प्यांत हवा भरून घेऊन घट्ट बंद करून ऑॅक्सिजन सिलेंडरसारखा त्यांचा वापर करतात. यामुळे जमिनीवर त्यांना श्वसनाला त्रास होत नाही आणि पाण्यातही सहज पोहता येत. आपल्या तोंडाने हे मासे ओलसर जमिनीत पन्नास सें.मी. अंतरापर्यंत बीळ खोदतात आणि त्यात बसून राहतात. बहुतांश निवळया लहानसहान कीटक आणि पाण्यातल्या शेवाळसदृश पदार्थावर जगतात. हे निवळी मासे अनेकदा चक्क दलदलीतल्या झुडपांच्या फांद्यांवर चढून बसलेले दिसतात, ही आणखी एक गम्मत आहे. पाण्याबाहेर जगणं हे वैशिष्टय असणाऱ्या या निवळीचं दुसरं वैशिष्टय म्हणजे निवळी नर आपापल्या हद्दीच्या बाबतीत अतिशय आक्रमक असतात. त्यांच्या हद्दीत खाणं शोधत किंवा मिलनाच्या काळात मादीच्या जवळ दुसरा निवळी नर आल्यास पाठीवर असलेल्या ऍंटिनासारखे कल्ले ताठ उभा करून अतिशय आक्रमकपणे त्यावर ते हल्ला करायचा प्रयत्न करतात. मिलनाच्या काळात हे नर चमकदार रंगाचे होतात आणि अंग फुलवल्यावर अतिशय रंगीबेरंगी व आकर्षक दिसतात. निवळी धड मासा नाही की धड बेडूक नाही, ह्यामुळे यांना खाण्यासाठी कुणी पकडत नाही. अशा ह्या निवळीला पाण्याबाहेर चालणारा मासा म्हणावं तर 'क्लायम्बिंग पर्च' नावाचा मासा चक्क जमिनीवर आपले कल्ले वापरून चालतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या नदीतही जातो. पाण्याबाहेर काढलेला मासा काही क्षणात तडफडून मरतो हेच आपल्याला माहीत असतं. पण इथे हा क्लायम्बिंग पर्च मासा पाण्याबाहेर चक्क पाच ते सहा दिवस राहतो. एका पाणवठयाहून दुसऱ्या पाणवठयाकडे फडफडत चालत जाताना हा मासा अनेकदा दिसून येतो. ह्याला खाण्यासाटी जेव्हा पाणपक्षी गिळतात, तेव्हा फडफडून हा पक्ष्यांच्या तावडीतून सुटतो आणि चक्क झाडांच्या शेंडयांवर आणि फांद्यांवरही काही काळ राहतो. चविष्ट म्हणून आशिया खंडात या माशाला आवडीने खाल्लं जातं. अनेकांना ह्याची चव माहीत असते, पण हे वैशिष्टय माहीत नसतं. समुद्रात इतके चमत्कारिक मासे नांदत असतात नि आपल्याला ते माहीतच नसतं, हे दुर्दैवच ना?

 

गोष्टीच्या पुस्तकांचा उल्लेख होतोय आणि जगप्रसिध्द सिंदबादच्या सफरी ह्या पुस्तकाची मला आठवण होणार नाही, हे अशक्यच आहे. त्या गोष्टींमधले ते माणसं आणि मेंढया पळवणारे अजस्र पक्षी कुठे राहत असतील? या विचाराने लहान असताना मला अनेकदा झोप लागायची नाही. पुढे परदेशात गेल्यावर एका महाकाय पक्ष्याला तिथल्या प्राणिसंग्रहालयात पाहिल्यावर, त्याची माहिती वाचल्यावर अचानक आठवलं की सिंदबादच्या त्या काल्पनिक कथेत उल्लेख केलेले अजस्र पक्षी असेच तर होते. उंचीवर उडू शकणारा जगातील सर्वात अजस्र पक्षी म्हणजे ऍंडियन काँडोर. गिधाडांच्या जातीतला हा पक्षी साधारण चार फुटांचं शरीर आणि साडेदहा फूट पसरले जाणारे पंख अशा आकारात वाढतो. पंधरा ते सोळा किलो वजन असलेला हा महाकाय पक्षी सोळा हजार फुटांवर वास्तव्य करतो. एवढं वजनदार शरीर आणि लांब पंख वापरायला तो प्रबळ हवेचे झोत असलेल्या ठिकाणी शरीरबलाचा वापर न करता पंख पसरून तरंगणं पसंत करतो. गिधाडांच्या कुटुंबातला सदस्य असल्याने काँडोर शंभर टक्के मांसाहारी असतात. गिधाड मंडळी निसर्गातले सफाई कर्मचारी म्हणून काम करत असल्याने काँडोरही या नियमाला अपवाद नाहीये. कुणाच्या खाण्यातून सुटलेलं, उरलेलं कुठलंही खाण यांना खायला आवडत. आपल्या अजस्रपणाचा फायदा घेऊन कधीकधी, नजरेच्या टप्प्यात आलेल्या हरणांना, मेंढयांना हा पक्षी आपल्या ताकदवान नख्यांनी उचलून नेतो आणि त्यांचा फडशा पाडतो. संपूर्ण काळं कुळकुळीत अंग आणि त्यावर पांढऱ्या पिसांची कॉलर आणि गुळगुळीत डोकं असलेला हा काँडोर ऍंडीज पर्वतात राहतो, म्हणून त्याला ऍंडियन काँडोर असं संबोधलं जातं. अनेक लोककथांचा आणि अचाट कथांचा हिरो असलेला हा पक्षी आज नष्ट होण्याच्या धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. वर्षातून एकदाच एक किंवा दोन अंडी घालणारा ऍंडियन काँडोर पेरू, चिली, अर्जेन्टिना, इक्वेडोर, बोलिव्हिया आणि कोलंबिआ या देशांचं राष्ट्रीय चिन्ह आहे. हा काँडोर साधारण सत्तर वर्षं जगतो, मात्र मेंढया पळवण्याच्या सवयीमुळे अनेक ठिकाणी यांच्या खाण्यात विष कालवून त्यांना ठार मारलं जात. यांना वाचवण्याचे प्रयत्न मोठया प्रमाणात सुरू झाले आहेत. काळाच्या ओघात सिंदाबादची पुस्तकं लुप्त झाली, तसा हा पक्षीही एखादवेळी नाहीसा होऊन जाऊ शकतो, हे भीषण सत्य आहे. आपण फक्त वाघ आणि सिंह वाचवण्याच्या गप्पांमध्ये अडकलेले असतो, कारण हे सगळं आपल्याला माहीतच नसतं किंवा आपण माहीत करूनच घेत नाही.

आज त्या परिकथा, चेटकिणी, बुटके, कुबडे, उडणारे पंखवाले प्राणी आउटडेटेड होऊन गेलेत. त्यांना परदेशी साज चढवून समोर ठेवलं की हाच आउटडेटेड माल तुफान खपतो. बालपण रम्य करणारी मातृभाषेतली ती पुस्तकं आज भलेही आवतीभोवती नसतील, पण त्यातल्या त्या अद्भुत कल्पना आणि ते प्राणिविश्व मनात रुंजी घालतंच. ह्या स्वप्निल दुनियेने दिलेली सर्वात मोठ्ठी देणगी म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना खुल्या मानाने स्वीकारायची करून दिलेली तयारी. काळाबरोबर मागे पडलेलं ते खुलं उत्सुक मन बरोबर घेऊन निसर्गाच्या अद्भुत दुनियेला शोधायचं ठरवलं, तर सिंदाबादच्या सफरी प्रत्यक्षात घडायला सुरुवात होतील. अशा सफरीमध्ये न जाणो कधी अगदी मोठया मेंढया आपल्या नख्यांमध्ये उचलून नेणाऱ्या ऍंडियन काँडोरसारख्या अजस्र पक्षाचा सामना होईल किंवा सांबर गिळणारा अजस्र अजगर आडवा येईल. कुठे गोल गोल मान फिरवणारं घुबड, तर कुठे भुंकणारं हरीण सहज भेटून जाईल, किंवा चवडयांवर चालत नदीतले मासे पकडून ते पुन्हा धुऊन खाणारा रकून प्राणी दिसेल आणि प्रत्येक सफर जणू सिंदाबादची यादगार सफरच बनून जाईल, याची खात्री आहेच. थंडीची चाहूल लागतेय, निसर्गाच्या जंगलबुकमधल्या खाणाखुणा शोधत, पक्ष्यांचे, प्राण्यांचे उमटलेले ठसे बघत जागोजागचा निसर्ग वाचत आश्चर्यचकित होत फिरायला लागायची हीच वेळ आहे.   

निसर्गास्ते पंथान संतु। 

रूपाली पारखे-देशिंगकर