अधल्यामधल्या करडया छटा

विवेक मराठी    27-Oct-2017
Total Views |

 

पूर्वग्रहांमुळे आपण आसपासच्या जगाचं चित्रण काळं किंवा पांढरं या दोन रंगांमध्येच करू पाहतो. प्रत्यक्षात अशी काटेकोर विभागणी करणं अन्यायकारक असतं. कारण कोणतीही बाब किंवा कोणतीही विचारधारा संपूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. संपूर्णपणे विधायक किंवा विध्वंसक नसते. तिच्यात अधल्यामधल्या अनेक करडया छटांचा समावेश असतो. त्या नजरेआड केल्यानेच मग परिसराचं एक विकृत चित्रण मनश्चक्षूंसमोर उभं राहतं. त्यातला करडया छटांना पूर्वग्रहानुसार पांढराधोप किंवा काळाकुट्ट रंग फासण्यात येतो. तेच वास्तव आहे असं गृहीत धरल्याने मग त्यावरची प्रतिक्रिया व्यक्त होते. म्हणूनच केवळ काळया किंवा पांढऱ्या अशा दोनच टोकाच्या रंगांमध्ये जगाची विभागणी न करता तिथे अस्तित्वात असलेल्या अधल्यामधल्या करडया छटांकडे समाजाची नजर वळवावी लागेल. तरच त्याचं सम्यक चित्र उभं राहील आणि पूर्वग्रहाची तसंच असहिष्णुतेची धार बोथट करता येईल.

पण कॉलेजात जातो. विद्यापीठात किंवा आयआयटीसारख्या ख्यातनाम शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्यासाठी धडपडतो. कशासाठी? समाजाला आवश्यक असणारं आणि आपली व्यावसायिक कारकिर्द घडवेल असं एखादं कौशल्य आत्मसात करण्यासाठी. ते तर आहेच, पण त्याहीपलीकडे एक अधिक मौलिक उद्दिष्टही असतं. व्यक्तिमत्त्व विकास साध्य करण्यासाठी, एक व्यापक दृष्टीकोन अंगीकारण्यासाठी, ज्ञानसंपन्न होऊन जीवनाच्या अनेक अंगांची ओळख व्हावी आणि निरनिराळया विचारधारांचा परिचय व्हावा यासाठीही. त्यातली कोणती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची, याचा निवाडा चिकित्सक वृत्तीने करण्याची क्षमता अंगी यावी यासाठीही. म्हणूनच तर कॉलेजात काय किंवा विद्यापीठात काय, पायाभूत अभ्यासक्रमापलीकडील काही व्याख्यानांचं, कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. काही नावाजलेल्या वक्त्यांना, अभिनेत्यांना पाचारण केलं जातं. तर अशाच एका कॉलेजमध्ये एका सुप्रसिध्द वैज्ञानिकाला मानाचं आमंत्रण होतं. कॉलेजमधलेच एक वरिष्ठ प्राध्यापक त्यांची मुलाखत घेणार होते. मानववंशासंबंधीच्या त्यांच्या गाजलेल्या संशोधनाचं इंगित सर्वसामान्य श्रोत्यांना सहज समजावं, या इराद्यानेच त्या मुलाखतीचं आयोजन केलं होतं. पण त्यांचे विचार अनेक परंपरावाद्यांना न पटणारे होते. त्यांनी आयत्या वेळी तिथे येऊन निदर्शनं केली. त्यांनी हिंसक वळण घ्यायला वेळ लागला नाही. बघता बघता सभागृहाचं रणांगणात रूपांतर झालं. मायक्रोफोन, लाउडस्पीकर, खर्ुच्या यांची मोडतोड तर झालीच, तसंच जे प्राध्यापक मुलाखत घेणार होते, त्यांना जबरदस्त मारहाणही झाली. त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं. पोलिसांना बोलावलं गेलं. ते येईपर्यंत निदर्शन करणारे निघून गेले होते. एफआयआर दाखल झाला आणि तपास चालू आहे.

अशीच एक दुसरी घटना. अतिशय गाजलेला आणि सांस्कृतिक वारसा असा लौकिक प्राप्त झालेला एक जुना चित्रपट. दर वर्षी त्याचा एक तरी खेळ दाखवायचाच असा त्या शहराचा आणि तेथील एका चित्रपटगृहाचा परिपाठ. पण यंदा मात्र त्याच शहरातील काही संस्कृतिरक्षकांनी हा चित्रपट वंशविद्वेषी आहे अशी हाकाटी करून त्याचं चित्रण बंद पाडायला लावलं.

जिथे जीवनाकडे उघडया डोळयांनी पाहत जे जे उत्तम त्यांचं ग्रहण करावं अशा इराद्याने असे कार्यक्रम आयोजित केले जातात, तिथेच त्या कार्यक्रमांचा असा बोजवारा का पाडला जातो? बरं, या घटना आपल्याच देशातल्या जवाहरलाल नेहरू किंवा त्याच्यासारख्याच एखाद्या विद्यापीठातल्या किंवा सांगली-साताऱ्याकडच्या आहेत, असं वाटत असेल तर तोही समज चुकीचा आहे. अमेरिकेतील एका आघाडीच्या विद्यापीठातल्या कॉलेजमधली ही घटना आहे. दुसरी घटना तर अधिक खेदजनक आहे. तो प्रख्यात चित्रपट आहे 'गॉन विथ द विंड'. अमेरिकेतील यादवी युध्दाची वस्तुनिष्ठ चिकित्सा करून एक आख्खी संस्कृती कशी वाऱ्यासरशी उडून गेली, याची जाणीव करून देणारा तो चित्रपट. त्यातील अभिनयही उच्च पातळीचा आणि एकंदरीतच चित्रपट या कलेला एका शिखरावर नेऊन ठेवणारा. पण त्याच्याकडे उघडया डोळयांनी न पाहता विशिष्ट रंगाच्या चश्म्यातून पाहिल्यामुळे त्यातील संदेशाकडे दुर्लक्ष करत त्याला आक्षेप घेण्याची घाई करण्यात आली.

आपल्याकडे अलीकडच्या काळात, आणि वरचेवर, अशा अनेक घटना झाल्या आहेत. त्यांच्यामुळे असहिष्णुता वाढीस लागल्याचा जो निष्कर्ष काढला जातो, त्या पार्श्वभूमीवर जरा आसपास नजर टाकली, तर जगात सगळीकडेच अशा घटना घडत असल्याचं दिसून येईल. चार्ल्टसव्हिल इथे श्रेष्ठत्व मिरवणाऱ्या गोऱ्या समुदायांच्या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी जमलेल्या इतर नागरिकांबरोबर जी वादावादी  झाली, त्यांच्यावर गोऱ्या मंडळींनी जो हल्ला चढवला, तोही याच प्रकारचा होता. त्यावरची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मल्लीनाथी तर आगीत तेल ओतण्याचीच होती. त्यांची ही प्रतिक्रिया, जगभरच्या केवळ मतपेटीचं राजकारण करू पाहणाऱ्या उजव्या, डाव्या आणि अधल्यामधल्या सर्वच रंगांच्या राजकीय पुढाऱ्यांची असते, याची प्रचितीही आता अनेकवार मिळालेली आहे.

आपण सहिष्णू आहोत, पण आपल्या विरुध्द मतं धारण करणारी मंडळी असहिष्णू आहेत असा सगळयांचाच पवित्रा असतो. कर्मठ विचारसरणी धारण करणाऱ्या मंडळींना उदारमतवादी असहिष्णू ठरवत असतात. उलट परंपरावादी, काही वैज्ञानिक तथ्यांच्या आधारे त्यांची मतं खोडून काढणाऱ्यांना पाखंडी ठरवून मोकळे होतात. लसीकरणामुळे आत्ममग्नतेला - ऑॅटिझमला चालना मिळते, असा आरोप करत अनेक जीवघेण्या रोगांपासून हमखास वाचवणाऱ्या लशींना काही तथाकथित समाजप्रेमी विरोध करत राहतात. त्यांचं म्हणणं तर्कसंगत नाही हे पटवून द्यायला येणाऱ्या मंडळींवर असहिष्णुतेचा आरोप होतो. उलट हीच उदारमतवादी मंडळी परत एकदा समाजाच्या भल्यासाठीच जनुकसुधारित अन्नधान्याला विरोध करत राहतात. किंवा पर्यावरण संवर्धनाचे पाईक अतिरेक करत जवळजवळ सर्वच विकासकार्यांमध्ये आडकाठी आणत राहतात. त्यांचं वागणंही असहिष्णू आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातो. आपल्या विरोधकांना नावं ठेवण्यासाठी आता हा परवलीचा शब्द झाला आहे. ज्या घटनांच्या संदर्भात हा आरोप केला जातो, त्यांचं स्वरूप आणि पार्श्वभूमी पाहिली, तर असहिष्णुता ही केवळ एकाच विशिष्ट सामाजिक गटाची, राजकीय विचारधारेची किंवा धार्मिक संप्रदायाची मक्तेदारी आहे असं मानता येणार नाही. 

कोणतीही विचारधारा खुल्या मनाने न अजमावता पूर्वग्रहदूषित नजरेनेच तिची समीक्षा करण्याच्या या प्रवृत्तीला असहिष्णुता असं म्हटलं जातं. तिचा अंगीकार केल्याने ज्या विचारधारेला असा टोकाचा विरोध करायचा तिच्यात ज्या काही विधायक आणि ग्राह्य कल्पना असतात, त्यांनाही नाकारलं जातं. इंग्लिशमध्ये जो 'थ्रोईंग द बेबी विथ द बाथवॉटर' हा शब्दप्रयोग वापरला जातो, तो या वृत्तीचं चपखल वर्णन करणाराच आहे. घंगाळातलं पारोसं पाणी फेकून देताना, त्यात ज्याला नुकतीच आंघोळ घातली ते बालकही नाही ना? याची खातरजमा करून घेतली नाही, तर काय अनर्थ होईल हेच ही म्हण सांगून जाते. सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक असहिष्णुताही याच प्रकारात मोडते.

अशा परिस्थितीत दोन मूलभूत सवाल खडे होतात. असहिष्णुतेचा कायमचा बंदोबस्त करणं शक्य आहे का? त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आहे तो, असहिष्णुतेचं उच्चाटन करणं आवश्यक आहे का, हा. यापैकी मुळात असहिष्णू वृत्तीचा उगम कशातून होतो, याचा वेध घेत पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न चेताशास्त्रज्ञांनी आणि जीववैज्ञानिकांनी केलेला आहे.

अमेरिकेत कृष्णवर्णीयांबद्दल गौरवर्णीयांमध्ये कमालीची असहिष्णुता आहे. याच प्रश्नावरून दीड शतकांपूर्वी त्या देशात यादवी युध्दांचा आगडोंबही उसळला होता. त्याचे निखारे अजूनही विझलेले नाहीत, याची ग्वाहीच चाल्टर्सव्हिल इथल्या घटनेने दिली आहे. दक्षिणेकडील आणि देशाच्या मध्यभागातील जनता अशा प्रकारची असहिष्णू वृत्ती धारण करून आहे, असा सर्वसाधारण समज आहे. तो तसा खराही आहे. कारण हे नागरिक उघडउघड वंशविद्वेशी भाषा वापरतात. कोणताही मुलाहिजा न बाळगता कृष्णवर्णीयांविषयीचा आकस प्रकट करतात. परंतु जे उघडपणे सहिष्णुतेचा आग्रह धरतात, वंशद्वेष त्याज्य मानतात, त्यांच्याही अंतर्मनात सुप्तपणे असहिष्णुता दडलेली असते, असा दावा अनेक चेताशास्त्रज्ञांनी केला आहे.

त्यांनी केलेल्या काही कल्पक प्रयोगांमधील निरीक्षणाच्या आधारेच ते या निष्कर्षाला पोहोचले आहेत. प्रयोग म्हटलं तर साधा होता. त्यांनी विद्यापीठातीलच काही विद्यार्थ्यांना त्यात सामील करून घेतलं होतं. त्यात गौरवर्णीय होते, कृष्णवर्णीय होते, युरोपीय वंशाचे होते तसेच आशियाई किंवा हिस्पॅनिक पूर्वपीठिका असलेलेही होते. या सर्वांना पडद्यावर काही शब्द दाखवण्यात आले. त्या शब्दांचं त्यांनी सकारात्मक - उदाहरणार्थ सुखी, अथवा नकारात्मक - उदाहरणार्थ भीती, असं वर्गीकरण करावं असं त्यांना सांगितलं गेलं.  ते करण्यासाठी अर्थात त्यांना फारच कमी वेळ दिला गेला. शब्द पाहिल्याबरोबर काही सेकंदात त्यांनी ही वर्गवारी करायची होती. म्हणजे त्यांचं वर्गीकरण उत्स्फूर्तपणे आणि फारसा विचार न करता व्हावं, असा उद्देश होता. ते शब्द दाखवण्यापूर्वी काही वेळा पडद्यावर एका व्यक्तीचा चेहराही चमकून जावा, अशी व्यवस्था केली गेली होती. तो चेहरा गौरवर्णीयाचा किंवा कृष्णवर्णीयाचा होता. इतक्या वेगाने तो चेहरा चमकून जात असे की त्याच्याविषयी विचार करायला वेळ मिळत नसे. फक्त तो गोऱ्याचा आहे की काळयाचा, हे स्पष्ट होण्याइतकाच अवधी असे.

प्रयोगकर्त्या वैज्ञानिकांना असं आढळून आलं की जर गौरवर्णीयाचा चेहरा दिसला, तर त्यानंतरचा शब्द सकारात्मक असल्याचा निर्णय झपाटयाने घेतला जाई. जर तो शब्द उघडउघड नकारात्मक असेल, तर मात्र तितक्या तत्परतेने त्याची रवानगी नकारात्मक रकान्यात केली जात नसे. याच्या उलट जेव्हा कृष्णवर्णीयाचा चेहरा दिसे, त्या वेळी नंतरचा शब्द नकारात्मक असल्याचं चटकन ओळखलं जाई. पण शब्द सकारात्मक असेल, तर त्याला तसं मानणं सोपं जात नसे. याचं कारण सोपं होतं. गौरवर्णीयांविषयी मुळातच मनात सकारात्मक भावना होती. तीच जागृत होत असे. उलट कृष्णवर्णीयांविषयी सकारात्मक प्रतिसाद देणं कठीण जात होतं. कारण मुळातच अंतर्मनात सुप्तपणे वावरणारा नकारात्मक पूर्वग्रह तसं करण्यापासून अडवत असे. अशा प्रकारचा पूर्वग्रह प्रकर्षाने गौरवर्णीयांमध्ये आणि, अहो आश्चर्यम्, आशियाई व्यक्तींमध्ये असल्याचंही या प्रयोगातून दिसून आलं होतं. ही मंडळी एरवी आपल्या वागण्याबोलण्यातून तशा असहिष्णुतेचा प्रत्यय देत नसले, तरी त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी ती दडून बसलेली असते, हे उघड आहे. परिस्थितीनुसार मग ती वर उफाळून येते. वरवर उदारमतवादाचा पुरस्कार करणारी थोर मंडळीही प्रसंगी असा वांशिक भेदभाव का करतात किंवा अप्रत्यक्षपणे त्याला पाठिंबा का देतात, याचं कारण या प्रयोगाने स्पष्ट केलं आहे.

दोष त्यांना देणं योग्य होणार नाही. कारण आपल्या मनात खोलवर असा आकस आहे, याची जाणीवही त्यांना होत नसते. नेणिवेच्या स्तरावर तो दडून बसलेला असतो. आणि ज्या वेळी तो प्रकट होतो, त्या वेळी इतरांनाच नाही, तर खुद्द त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहत नाही.

अशाच प्रकारचा एक थोडासा वेगळा प्रयोग न्यूयॉर्क विद्यापीठातील चेताशास्त्रज्ञ डेव्हिड अमोडिया{ यांनी केला होता. त्यांनीही त्यांच्या विद्यापीठातील 150 विद्यार्थ्यांची भरती या प्रयोगासाठी केली. त्यात पुरुष आणि स्त्री वर्ग समसमान होता. सर्वच वंशीयांची वर्णीही लागली होती. या विद्यापीठातील वातावरण उदारमतवादी आहे. त्याचा प्रभाव या विद्यार्थ्यांवरही पडलेला होताच. अमोडियो यांनीही त्या विद्यार्थ्यांना काही शब्द दाखवले व त्यांची आनंददायी किंवा क्लेशकारक अशी वर्गवारी करायला सांगितलं. दुसरेही काही शब्द होते, त्यांची वर्गवारी मानसिक किंवा शारीरिक अशी करायची होती. शांतता, स्वर्ग किंवा मानपत्र या शब्दांना आनंददायी मानता येतं. उलट कर्करोग, ओकारी किंवा गरिबी हे क्लेशकारक म्हटले जातात. गणित, बुध्दिमत्ता किंवा वैज्ञानिक या शब्दांची मानसिक वर्गात मांडणी करता येते, तर बास्केटबॉल, नृत्य किंवा चपळाई यांना शारीरिक म्हणावं लागतं. हे शब्द पडद्यावर उमटण्यापूर्वी अर्थात पूर्वीप्रमाणे क्षणार्धात गोरा किंवा काळा चेहरा चमकून जात होता. परत एकदा जेव्हा जेव्हा गोरा चेहरा दिसला, तेव्हा तेव्हा त्यानंतरच्या आनंददायी किंवा मानसिक शब्दांची यथायोग्य वर्गवारी करायला वेळ लागला नाही. उलट काळा चेहरा दिसताच नंतरच्या क्लेशकारक किंवा शारीरिक शब्दांना योग्य रकान्यात मांडण्याची घाई केली गेली. उलट परिस्थितीत मात्र लक्षणीयरित्या जास्त वेळ लागला होता. थोडक्यात, काळया रंगाच्या व्यक्तीची मानसिक किंवा आनंददायी शब्दांशी सांगड घालण्यात आडकाठी येत होती. उलट गोऱ्या कातडीचा क्लेशकारक किंवा शारीरिक शब्दांशी संबंध लावणं जड जात होतं. कातडीच्या रंगावरून त्या व्यक्तीविषयीचं एक प्रातिनिधिक चित्र त्या विद्यार्थ्यांचा मेंदू तयार करत होता आणि त्याचं प्रतिबिंब मग त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात उमटत होतं. अर्थात त्यापाठी अंतर्मनात खोलवर कुठेतरी दडून बसलेली अहिष्णुता मदतीला येत होती, यात शंका नाही.

अशा प्रकारचा भेदभावाचा प्रतिसाद केवळ उक्तीतूनच व्यक्त होतो असं नाही. काही वेळा तो कृतीतूनही प्रकट केला जातो. त्याचीही प्रचिती अमोडियो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अशाच एक आगळयावेगळया प्रयोगातून मिळाली.

या वेळी प्रयोगात सामील झालेल्या विद्यार्थ्यांना एक कामगिरी पार पाडायची आहे, असं सांगण्यात आलं. पण ती एकटयानेच नाही, तर त्यासाठी त्यांना एक साथीदारही मिळणार होता. त्या साथीदाराचं नावही सांगण्यात आलं. नावही असं होतं की त्यावरून तो गौरवर्णीय आहे की कृष्णवर्णीय याचा अंदाज बांधता यावा. त्यानंतर त्यांच्यापुढे कामगिरीचे दोन पर्याय ठेवण्यात आले. दोन्ही कामांमध्ये त्यांना काही प्रश्नांची उत्तरं शोधायची होती. एका प्रकारच्या कामासाठी शारीरिक बळाचा ज्यात वापर करावा लागतो अशासंबंधी प्रश्न असण्याची शक्यता होती, तर दुसऱ्या प्रकारच्या कामासाठी बुध्दिमत्तेचा जास्त वापर करावा लागणार होता. ज्यांनी पूर्वी सुप्त आकसाची जास्त प्रचिती दिली होती, त्यांनी या वेळी साथीदारासंबंधीच्या त्यांच्या अंदाजानुसार कामाची निवड केली. ज्यांना नावावरून तो साथीदार कृष्णवर्णीय असावा असं वाटलं होतं, त्यांनी शारीरिक कामाला पसंती दिली. उलटपक्षी गौरवर्णीय साथीदार मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यावर बौध्दिक कामगिरीचा पर्याय निवडला गेला. स्पष्ट होतं की त्यांच्या मनातल्या सुप्त पूर्वग्रहाची छाया त्यांच्या या निवडीवर पडली होती.

मामला इथेच संपला नव्हता. कामाला सुरुवात करण्याची वेळ झालीय असं सांगून त्या प्रयोगार्थींना दुसऱ्या खोलीत नेण्यात आलं. तिथे एक टेबल आणि काही खर्ुच्या ठेवल्या होत्या. पण साथीदाराचा अजून पत्ता नव्हता. त्याला यायला थोडासा उशीर होतोय असं सांगून तिथे एकटयालाच बसवण्यात आलं. थोडयाच वेळात साथीदार आलाय, पण बाथरूममध्ये गेल्याचं सांगून त्याचं सामान मात्र शेजारच्याच खुर्चीवर ठेवण्यात आलं. जेव्हा आपला साथीदार कृष्णवर्णीय आहे असा अंदाज होता, त्या वेळी त्या प्रयोगार्थीने इतका वेळ बसलेल्या खुर्चीवरून उठून सामान ठेवलेल्या खुर्चीपासून जरा दूरवर जाऊन बसण्याची घाई केली. थोडक्यात, त्या साथीदारापासून अंतर राखण्याची लगबग केली गेली होती. सुप्त पूर्वग्रह आता कृतीतूनही व्यक्त केला गेला होता. अनेक चाचण्यांमधून याच निरीक्षणाची पुष्टी झाल्यावर उघड उघड कोणतीही भूमिका असली तरी जेव्हा कसोटी लागते, तेव्हा हे सुप्त पूर्वग्रह उचल घेतात, हेच दिसून आलं होतं.

असा सुप्त आकस असण्याचं कारणही चेताशास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वग्रह बाळगण्याची शिकवण उपजतच मेंदूला मिळालेली असते. मेंदूचं सगळं काम - मग ते श्वासोच्छवासासारखं किंवा रक्ताभिसरणासारखं अनैच्छिक असो की नंतर प्रयत्न करून मिळवलेल्या ज्ञानाचा वापर असो - चेतापेशींच्या निरनिराळया जोडण्यांमधून होत असतं. या जोडणीतूनच या पेशींची निरनिराळी जाळी तयार होतात. ती जागृत झाली की ते काम करण्याची आज्ञा मेंदूकडून शरीराच्या विशिष्ट भागातल्या स्नायूंना दिली जाते. अनैच्छिक क्रियांविषयीच्या आज्ञावलींसंबंधीचं जाळं उपजतच तयार होऊन येतं. त्याची वेगळी शिकवण घ्यावी लागत नाही. अन्नपचन करण्याची क्रिया त्यामुळेच आपोआप होत राहते. त्यासाठी इच्छाशक्तीचा वापर करावा लागत नाही. पूर्वग्रह बाळगण्याची वृत्तीही अशीच उपजत तयार झालेल्या जाळयांची देणगी आहे. यालाच वैज्ञानिक भाषेत 'हार्ड वायरिंग ऑॅफ ब्रेन' असं म्हटलं जातं. आपल्या घरात कसं, वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून येणाऱ्या विजेचं पक्कं जाळं तयार केलेलं असतं. त्यात आपण आपल्या मर्जीनुसार काही बदल करू शकत नाही. पण त्या विजेवर कोणतं उपकरण चालवायचं, ते कुठे चालवायचं, हे आपण ठरवत असतो. मायक्रोवेव्ह ओव्हन आपण स्वयंपाकघरातच बसवतो. त्यासाठीचं जाळं मग त्यानुसार विणलं जातं. दिव्यासाठी, पंख्यासाठी, फ्रीजसाठी वेगवेगळी जाळी आपण बनवतो. त्यामुळे बटन दाबून ते जाळं कार्यान्वित केलं की तेच उपकरण चालू होतं. दिवा पेटवण्यासाठीचं बटन दाबून त्याच विशिष्ट जाळयातून विद्युतप्रवाह खेळतो. दिवा पेटतो. ते बटन दाबल्याने पंखा गरगरायला लागत नाही. थोडक्यात, बदल न करता येणारी जाळी आणि आपल्या इच्छेनुसार काम करणारी जाळी वेगवेगळी असतात. घरातून मायक्रोवेव्ह काढून टाकला, तर ते जाळं आपण उपटून टाकू शकतो. त्या जागी दुसऱ्या एखाद्या उपकरणासाठीचं जाळं बसवू शकतो. पण ते घर आपण सोडून गेलो, तरी वीजकंपनीचं जाळं तसंच शाबूत राहतं. मेंदूतही अशी उपजत आलेली जाळी तशीच टिकून राहतात. त्यात बदल होत नाही.

तरीही असं उपजत जाळं का तयार व्हावं? हा प्रश्न सतावत राहतोच. त्याचं उत्तर तसं सोपं आहे. तो एक आपल्या उत्क्रांतीचा वारसा आहे. माणूस जेव्हा कंदमुळं शोधून आणि शिकार करून आपली उपजीविका करत भटकी जीवनशैली बाळगून होता, तेव्हा तो कळप करून राहत होता. कारण एकटयाने शिकार करण्यापेक्षा ती कळपाने करणं सोपं होतं. शिवाय त्यात मूलभूत असलेल्या स्वसंरक्षणाच्या वृत्तीचीही जोपासना होत होती. कारण शिकारीने उलटा रोख धरत आपल्या दिशेने मुसंडी मारली, तर एकटयाने स्वत:चं संरक्षण करणं कठीणच नाही, तर अशक्यही असण्याची शक्यता होती. पण कळपाने शिकार करताना एक तर श्वापद अशी उलटी चाल करण्याची शक्यता कमी होते. आणि एखाद्याने जिवावर उदार होऊन केलीच, तर कळप त्याचा यशस्वी मुकाबला करू शकतो.

त्यामुळे कळप अधिक दृढ आणि बंदिस्त व्हावा, यासाठी त्याला एकत्र बांधून ठेवणं आवश्यक होतं. ते करायचं आणि स्वसंरक्षणाची मूलभूत भावनाही जोपासायची, तर मग शत्रू कोण आणि मित्र कोण हे एरवी वैयक्तिक पातळीवर ठरवण्याऐवजी आता सामूहिक स्तरावर ठरवण्याला प्राधान्य द्यावं लागत होतं. आपला कोण आणि परका कोण याची निश्चिती करण्यासाठी काही निकष ठरवणं आवश्यक होतं. त्यासाठी मग 'जो आपल्यासारखा दिसत नाही, आपल्यासारखा वागत नाही, आपल्या कळपाच्या नियमांनुसार आपल्या वर्तणुकीचा ढाचा बनवत नाही, तो शत्रू' असं ढोबळमानाने ठरवणं सोपं होतं. साहजिकच स्वकीयाशी दोस्ती आणि परकीयाचा तिरस्कार करण्याची शिकवण उपजतच अंगी रुजवण्याची गरज होती. तीच निसर्गाने पार पाडली. मेंदूत ती कोरून ठेवली गेली. पक्क्या झालेल्या चेतापेशींच्या जाळयात ती बंदिस्त केली गेली.

तरीही खरोखरीच ही उत्क्रांतीच्या प्रवासातील शिदोरी आहे याची खात्री करून घेण्यासाठी येल विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ नेहा महाजन यांनी जिथे वानरांचंच राज्य आहे अशा एका बेटावर जाऊन काही प्रयोग केले. वानर किंवा माकड हे उत्क्रांतीच्या प्रवाहातील आपले पूर्वज आहेत. तेव्हा स्वकीय आणि परकीय अशी काटेकोर विभागणी करण्याची वृत्ती या प्राण्यांमध्येही दिसून येते की काय, याचा शोध घेण्यासाठी हे प्रयोग केले गेले. हे प्राणीही कळप करून राहणारे आहेत. तेव्हा त्यांच्यातही ही भेदभावाची धारणा ठाम वसलेली असावी, असा तर्क करता येत होता. त्यातही नेहाने ऱ्हीसस जातीच्या माकडांची निवड केली. आपल्या रक्तगटांपैकी आरएच हा रक्तगट याच माकडांमध्येही आढळतो; किंबहुना आरएच हे या गटाचं नावही या माकडांच्या नावावरून घेतलेलं आहे. त्यामुळे माणसाचं आणि या माकडांचं तसं जवळचं नातं आहे, याची कल्पना होती.

'इम्प्लिसिट असोसिएशन टेस्ट' नावाची एक चाचणी पध्दत अनेक मानसशास्त्रज्ञ माणसांवर प्रयोग करताना वापरतात. दोन निरनिराळया बाबींमध्ये अनाहूतपणे आपण काही संबंध जोडतो का? याचा वेध या चाचणीत घेतला जातो. आपल्या अव्यक्त भावनांचं, अंतर्मनात दडून बसलेल्या सुप्त पूर्वग्रहांचं हे एक प्रकारचं प्रकटीकरणच असतं.

त्यासाठी नेहाने प्रथम आपल्या कळपातील प्राण्यांबद्दल सकारात्मक भावना आणि इतर कळपातील प्राण्यांबद्दल नकारात्मक भावना बाळगल्या जातात का, यासाठी हे प्रयोग केले. त्यासाठी त्यांनी या माकडांना इतर माकडांचे काही फोटो दाखवले. त्यातले काही त्याच कळपातले होते, तर इतर उघड उघड परकीय कळपातले होते. त्यांच्याच जोडीला त्यांनी काही चांगल्या वस्तूंचे - म्हणजे फळं किंवा शेंगदाणे यांचे - फोटो दाखवले. माकडं ज्यांना वाईट मानतात अशाही काही वस्तूंचे फोटो होते. उदाहरणार्थ, कोळी हा कीटकवर्गातील प्राणी किंवा साप यांच्याबद्दल माकडांना आत्मीयता नसते.

जेव्हा जेव्हा स्वकीयांच्या फोटोबरोबर फळांचा फोटो दाखवला गेला किंवा परकीयांच्या जोडीला कीटक-कोळयाचा फोटो दाखवला गेला, तेव्हा माकडांचा त्या फोटोंमधला रस क्षणार्धात संपला. एक नजर टाकून त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण याच्या उलट परिस्थिती होती, तेव्हा मात्र त्यांनी लक्षणीयरित्या अधिक वेळ घालवत त्या फोटोंचं निरीक्षण केलं. स्वकीयांबद्दल चांगली आणि परकीयांबद्दल तिरस्काराची भावना या माकडांच्या अंतर्मनात रुतून बसलेली होती, याचंच हे द्योतक होतं. पण जेव्हा स्वकीयांच्या फोटोशेजारी वाईट गोष्टीचा फोटो दिसला, तेव्हा त्यांचा गोंधळ उडाला. अव्यक्त भावनेशी विसंगत असणारं ते दृश्य होतं. तीच स्थिती परकीयांबरोबर चांगल्याची सांगड घातली गेली, तेव्हाही उद्भवली. या माकडांमध्ये स्वकीय आणि परकीय यांची स्पष्ट ओळख करण्याची क्षमता होती आणि स्वकीयांशी ते चांगल्या गोष्टीचीच सांगड घालतात, हे उघड झालं. माणसांमध्ये दिसून येणाऱ्या पूर्वग्रहांची रुजवात उत्क्रांतीच्या प्रवासातच झालेली आहे, याचाही पडताळा मिळाला.

आदिमानवाच्या काळातल्या जीवनशैलीपासून आता आपण फार दूर आलो आहोत. भटक्या जीवनशैलीचा त्याग करून एकाच जागी वस्ती करून राहत आहोत. पण कळप करून राहण्याची मूलभूत वृत्ती मात्र तशीच टिकून आहे. फक्त तिचं स्वरूप बदललेलं आहे. आता कळप होतो तो समानशीलांचा. मग तो एकाच जागी काम करणाऱ्यांचा असू शकतो, एकाच सामाजिक वर्गातल्या मंडळींचा असू शकतो, एकाच वंशीयांचा, एकाच धर्मीयांचा, एकाच जातिबांधवांचा, एकाच बिरादरीचा असू शकतो. हा गट किंवा कळपही बंदिस्त राहावा, अशी इच्छाही प्रबळ असते. त्यामुळे या गटाच्या व्याख्येत ज्यांचा समावेश होऊ शकत नाही, अशांना परकीय मानलं जातं. त्यापायी मग या परकीयांविषयी अनास्थेची भावना बाळगण्याची ऊर्मी जागृत होते. तरीही असली तरी परकीयांची ही व्याख्या नेमकी कशी करायची? कारण आदिमानवाच्या काळासारखी त्यांची लक्षणं  असणार नाहीत, हे तर स्पष्टच आहे. मग ती कशी निश्चित करायची काळया-गोऱ्यांमधला वर्णभेद भारतीयांना ओळखीचा नाही. मग ते तसा भेदभाव कसा करतील? किंबहुना केवळ नावावरून कोण गोरा आणि कोण काळा हे त्यांना ओळखताही येणार नाही. उलटपक्षी पाश्चात्त्यांना किंवा अमेरिकनांना आडनावावरून जातीचा पत्ता लागणार नाही. मग जातीपातींमधल्या तेढीची त्यांना कल्पना तरी का यावी? त्यावरून त्यांनी जातिबाह्य इसमापासून अंतर ठेवण्याची खबरदारी का घ्यावी? त्यांना बिरादरी या संकल्पनेचा थांगपत्ताही नसतो. मग केवळ आपल्या बिरादरीचा नाही, म्हणून एखाद्याला तोडून टाकायला ते का प्रवृत्त होतील?

म्हणजे मग कोणाविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगायचा किंवा स्वकीय म्हणून कोणाची गणना करायची आणि कोणाची परकीय, हे ज्या कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय पर्यावरणात आपण वाढलो, त्यानुसार निश्चित होतं हेच खरं. म्हणून तर एरवी काळा आणि गोरा यांच्याविषयी कोणताही दूषित पूर्वग्रह नसलेला भारतीय जेव्हा अमेरिकेत स्थायिक होतो, तेव्हा तिथल्या समाजात वावरताना, त्याच्याशी एकरूप होताना नकळत का होईना तो त्यांच्या पूर्वग्रहाचा अंगीकार करतो. कृष्णवर्णीयांविषयी नकारात्मक दृष्टीकोन बाळगण्यात गौरवर्णीयांइतकेच आशियाई अमेरिकनही आघाडीवर असल्याचा जो अनुभव अमोडियो यांना आला होता, त्याचं मूळ इथे सापडतं.

आज समाज अठरापगड झाला आहे. युरोपमध्ये काय, अमेरिकेत काय किंवा आपल्याही महानगरांमध्ये काय, वेगवेगळया धर्माचे, जातीचे, शैक्षणिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र नांदताहेत. काही प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळून गेलेले आहेत. आजवर ज्यांना परकीय मानलं, अशांशी विवाहसंबंधांनीही जोडले गेलो आहोत. त्यामुळे ज्या सामाजिक गटाचे आपण सदस्य आहोत, त्या गटाला तथाकथित परकीयांकडून काही धोका आहे, अशी परिस्थिती राहिलेली नाही. तरीही तो आहे असं मानून त्यांच्याविषयी भेदभाव केला जातो. कारण तर्कविसंगत विचार आणि नेणिवेत रुतून बसलेले पूर्वग्रह यांचा पगडा आपल्या वृत्तीवर पडतो. प्रसारमाध्यमांमधली खळबळजनक आणि भडक वर्णनं त्यात भर घालतात आणि एरवी आपल्याला जाणीवही होत नसलेली अहिष्णुता उफाळून वर येते. झुंडशाहीचं मानसशास्त्र त्याचा ताबा घेते आणि त्याचीच परिणती मग काही हिंसक घटनांमध्ये होते. ज्यांनी त्यात भाग घेतला, त्यांना एकेकटयांना बाजूला करून त्यांना नेमका कोणता धोका दृग्गोचर झाला असं विचारलं गेलं, तर त्याचं स्पष्ट उत्तर देणं त्यांना कठीणच जाईल. पण पूर्वग्रहदूषित विचारसरणी आणि मेंढयाच्या झुंडीप्रमाणे वागण्याची सहजप्रवृत्ती अशा वेळी बळावते.

पूर्वग्रहांमुळे आपण आसपासच्या जगाचं चित्रण काळं किंवा पांढरं या दोन रंगांमध्येच करू पाहतो. प्रत्यक्षात अशी काटेकोर विभागणी करणं अन्यायकारक असतं. कारण कोणतीही बाब किंवा कोणतीही विचारधारा संपूर्णपणे चांगली किंवा वाईट नसते. संपूर्णपणे विधायक किंवा विध्वंसक नसते. तिच्यात अधल्यामधल्या अनेक करडया छटांचा समावेश असतो. त्या नजरेआड केल्यानेच मग परिसराचं एक विकृत चित्रण मनश्चक्षूंसमोर उभं राहतं. त्यातला करडया छटांना पूर्वग्रहानुसार पांढराधोप किंवा काळाकुट्ट रंग फासण्यात येतो. तेच वास्तव आहे असं गृहीत धरल्याने मग त्यावरची प्रतिक्रिया व्यक्त होते. अव्यक्त प्रतिसादाचं प्रकटीकरण होतं.

आदिमानवाच्या काळापासून मेंदूत खोलवर रुतलेले हे पूर्वग्रह जर अहिष्णुतेला कारक आहेत, तर तिचं समूळ उच्चाटन कसं करता येईल?  या पूर्वग्रहांच्या रेटयापायी कोणत्याही विचारधारेकडे, घटनेकडे खुल्या मनाने पाहत तिची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणं अशक्य होऊन बसतं. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार या प्रकारच्या चिकित्सक वृत्तीला चालना देत असतो. ज्याला लिबरल एज्युकेशन म्हणतात, त्या उदार दृष्टीकोनाची प्रतिष्ठापना करणारं शिक्षण देणं, समाज अधिकाधिक सुशिक्षित करणं हा एक उपाय होऊ शकतो. पण तेवढंच करून भागणार नाही. अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित मंडळीही असहिष्णुतेला थारा देत असल्याचं आपण पाहतो. उलट या शिक्षणाचा वापर ते असहिष्णुतेची भलावण करणारे युक्तिवाद करण्यासाठी वापरतात, हेही दिसून आलं आहे. कित्येक अतिरेकी संघटनांचे म्होरके उच्च तंत्रज्ञान शिक्षणाने विभूषित असल्याचे अनेक दाखले आहेत. तेव्हा लिबरल एज्युकेशन हा एक, पण एकमेव नव्हे, असा उपाय झाला. असहिष्णुतेला थारा न देणारी अभेद्य तटबंदी त्यापायी बांधली जाऊ शकत नाही. 

त्याच्याच जोडीला इतरही अनेक उपायांची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. असहिष्णुतेला खतपाणी घालणारी विविध प्रकारची विषमता कमी करण्याने, अधिक समानता प्रस्थापित करण्याने तिची तीव्रता किंवा वारंवारिता घटवणं शक्य होईल. स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये अशा प्रकारची असहिष्णुता आजवर दिसलेली नव्हती. याचं कारणही तिथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आर्थिक किंवा सामाजिक विषमतेला थारा देणारी नव्हती. सामाजिक स्थैर्याचं, सुखासमाधानाचं मोजमाप करणारी 'वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स' नावाची जी मोजपट्टी युनायटेड नेशन्सने प्रस्थापित केली आहे, तिच्यानुसार हे देश नेहमीच अव्वल क्रमांकावर राहिलेले आहेत. त्यांचा नागरिकांमध्ये असहिष्णुतेच्या मूलभूत भावनेचं अंतर्मनातून समूळ उच्चाटन झालं आहे असं नाही. पण ती उफाळून वर येणार नाही, प्रकट होणार नाही असं पर्यावरण मात्र तिथे नांदत आहे. खरं तर 'होतं' असं म्हणायला हवं. कारण स्थलांतरितांचं तिथे आगमन झाल्यापासून काही प्रमाणात विषमता वाढीला लागलेली आहे. परिणामी अलीकडच्या काळात डेन्मार्कमध्ये व्यंगचित्रांच्या विरोधात जी काही निदर्शनं झाली किंवा नॉर्वेमध्ये ऍन्डर्स व्हेरिकसारख्या माथेफिरूने जो अंदाधुंद गोळीबार केला, त्यातून अहिष्णुतेच्या विषाणूने तिथे हातपाय पसरायला सुरुवात केल्याचं दिसून येतं.   

असहिष्णुता अशी मुळासकट उपटून टाकणं शक्य होणार नसलं, तर मग त्या भावनेला वेगळं वळण देणं शक्य आहे का? असा विचार आता होऊ लागला आहे. त्यातूनच मग असहिष्णुता संपूर्णपणे त्याज्य ठरवणं आपल्याच भल्याचं नाही, असं जॉन एचेमंडी यांना वाटत आहे. अनेक नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांची जननी असणाऱ्या अमेरिकेतील विख्यात स्टॅनफर्ड विद्यापीठाचे प्रोव्होस्ट असलेले एचेमन्डी परवापरवापर्यंत इन्फोसिसच्या संचालक मंडळाचे सभासद होते. पण तिथे संस्थापक आणि विद्यमान संचालक मंडळ यांच्यामध्ये जो असहिष्णुतेचा फड रंगला, त्यात त्यांची तिथून उचलबांगडी झाली. तरीही असहिष्णुता काही प्रमाणात आवश्यक आहे, असंच त्यांचं म्हणणं आहे. कारण मिथ्यविज्ञानाच्या किंवा तर्कदुष्ट विचारांच्या पाठबळावर अर्धसत्याचा किंवा धडधडीत असत्याचा प्रचार होतो, तेव्हा त्याबाबतीत सहिष्णू धोरण स्वीकारणं किंवा राबवणं कोणाच्याच हिताचं नसतं, असं त्यांचं ठाम मत आहे. ट्रम्प यांनी ज्या प्रकारची धोरणं राबवण्याचा सपाटा लावला आहे, त्यांच्याबाबतीत सहिष्णुता दाखवणं आत्मवंचनाच नव्हे, तर आत्मघात करण्यासारखंच आहे, हे पाहिल्यावर एचेमंडी यांचं मत पटू लागतं. आपल्याकडेही जी बाबा प्रकरणं एकापाठोपाठ एक उघड होत आहेत, त्यांच्यासंबंधी सहिष्णुता बाळगणं समाजाला परवडणारं आहे का, याचा वस्तुनिष्ठ आणि आत्मपरीक्षण करत विचार व्हायला नको का? दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाबाबत सहिष्णू वृत्ती धारण करणं योग्य ठरेल का? गोवधबंदीवरून जी हाणामारी होत आहे, तिच्याबाबतीत सहिष्णू वृत्ती धारण करणं कोणाच्या भल्याचं असणार आहे? अशा समाजधारांच्या बाबतीत तरी असहिष्णुता ग्राह्य ठरावी, असाच एचेमंडी यांच्या म्हणण्याचा रोख आहे.

असहिष्णू वृत्ती ही माणसाची उपजत धारणा असेल, तर मग तिला योग्य वळण देत तिचा रोख विधायक धोरणांकडे वळवणं हाच अंतिमत: या समस्येवरचा तोडगा असू शकतो. केवळ काळया किंवा पांढऱ्या अशा दोनच टोकाच्या रंगामध्ये जगाची विभागणी न करता तिथे अस्तित्वात असलेल्या अधल्यामधल्या करडया छटांकडे समाजाची नजर वळवावी लागेल. तरच त्याचं सम्यक चित्र उभं राहील आणि पूर्वग्रहाची तसंच असहिष्णुतेची धार बोथट करता येईल.

balphondke@gmail.com