थॉमस पेन आणि महात्मा फुले

विवेक मराठी    27-Oct-2017   
Total Views |

 

जोतिरावांना असलेली सामाजिक प्रश्नांविषयीची जाण, त्याविषयीचे त्यांचे आकलन, त्यांच्या मांडणीतील स्पष्टवक्तेपणा व आक्रमकता पाहिली, म्हणजे पेन आणि जोतिराव यांच्या भाषेतील व लेखनशैलीतील सारखेपणा सहज नजरेत भरतो. या लेखातील पूर्वार्धात आपण थॉमस पेन यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्य यांचा स्थूलमानाने आढावा घेणार आहोत आणि उत्तरार्धात पेन यांच्या सर्वंकष चिंतनाचा म. फुले यांच्या विचारांवर व लेखनावर कोणता व कसा प्रभाव पडला, याची दखल घेणार आहोत. थॉमस पेन यांच्या विचारांचा मागोवा घेतल्याशिवाय जोतिरावांच्या जीवनाचा व कार्याचा अभ्यास करता येणे अशक्य आहे.

 महात्मा जोतिराव फुले (1827 ते 1890) हे महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत व कर्ते समाजसुधारक होते. त्यांनी केलेले तत्कालीन समाजस्थितीचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म व वास्तवदर्शी होते. हा समाज असंख्य जाती-उपजातींत विखुरलेला असून जन्माधारित उच्चनीचता व अस्पृश्यता या विकृतींनी ग्रासलेला आहे, हे त्यांनी अनुभवले होते. खेडयापाडयापर्यंत पसरलेला शूद्रातिशूद्र, श्रमजीवी, निरक्षर आणि उपेक्षित समाज त्यांच्या डोळयांसमोर होता. येथील स्त्रीवर्गही मागासलेला व पिचलेला होता. अशा या समाजघटकांना विद्येचे महत्त्व पटवून देण्याचे महान कार्य जोतिरावांनी केले. या वर्गांमध्ये स्वतंत्र अस्मिता व जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम केले.

म. जोतिराव फुले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या पूर्व भागातील स्कॉटिश मिशनच्या शाळेत झाले. या कालखंडात - म्हणजे जोतिरावांच्या पूर्ववयात त्यांच्या मनावर ख्रिस्ती धर्म व ख्रिस्ती मिशनरी यांच्या शिकवणीचा व कार्याचा प्रभाव पडला. ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ बायबल याचा त्यांना परिचय झाला आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व कार्यपध्दती याची त्यांना चांगली ओळख झाली. ख्रिस्ती मिशन्स व मिशनरी सेवा, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात संस्थात्मक काम करीत असतात. धर्मांतरासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा त्यांच्या अनेक उद्देशांपैकी एक महत्त्वाचा उद्देश असतो. ख्रिस्ती मिशनरी हिंदू धर्मातील व्यंगे व दोष दाखवून ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे हे येथील ज्ञानी व अज्ञानी जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, पण ख्रिस्तांच्या बायबलमध्येही असंभाव्य व चमत्कारपूर्ण भाग आहे, हे जोतिरावांना व त्यांच्या मित्रांना अभ्यासाअंती ज्ञात झाले, म्हणून धर्मांतर न करता स्वधर्मात राहूनच लोकांची सेवा करायची, असे जोतिरावांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी ठरविले.

स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये शिकत असताना रेव्ह. जेम्स मिशेल, मिसेस मिशेल व रेव्ह. मरे मिशेल यांच्याशी जोतिरावांचा परिचय झाला. स्वत: मरे मिशेल हे अभ्यासू संशोधक होते. त्यांचे वाचनही अफाट होते. त्यांच्या निकट संपर्कात जोतिराव आले, तेव्हा त्यांच्या बुध्दिमत्तेचा मरे मिशेल यांना परिचय झाला. त्यांच्यामुळे जोतिरावांचा प्रो. विल्सन, प्रो. जेम्स, मॅक्स म्युल्लर यांच्या हिंदू धर्मावरील ग्रंथांचा परिचय व अभ्यास झाला. जॉर्ज वॉशिंग्टन व ख्रिस्ती धर्मसुधारक मार्टिन ल्युथर यांची चरित्रे जोतिरावांच्या वाचनात आली. पण या काळात थॉमस पेन या ब्रिटिश विचारवंतांच्या ग्रंथांचा व त्यातील विचारव्यूहाचा जोतिरावांच्या मनावर व विचारप्रक्रियेवर प्रभाव पडला, तो सर्वाधिक महत्त्वाचा होता. पेन यांच्या विचारांमुळे सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यांना मिळाली. खुद्द जोतिरावांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांनी समाजसुधारणेच्या क्षेत्रात केलेले कार्य यावरही पेन यांच्या ग्रंथांचा व त्यातून व्यक्त झालेल्या विचारसरणीचा खोलवर ठसा उमटलेला दिसतो. या लेखातील पूर्वार्धात आपण थॉमस पेन यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्य यांचा स्थूलमानाने आढावा घेणार आहोत आणि उत्तरार्धात पेन यांच्या सर्वंकष चिंतनाचा म. फुले यांच्या विचारांवर व लेखनावर कोणता व कसा प्रभाव पडला, याची दखल घेणार आहोत. थॉमस पेन यांच्या विचारांचा मागोवा घेतल्याशिवाय जोतिरावांच्या जीवनाचा व कार्याचा अभ्यास करता येणे अशक्य आहे.

 

-2-

थॉमस पेन (1737 ते 1809) हा अठराव्या शतकातील ख्यातनाम ब्रिटिश विचारवंत. त्याचा जन्म इंग्लंडमधील थेटफोर्ड परगण्यात झाला. त्याचे वडील व्यापारी नावांना लागणाऱ्या जाड दोरखंडांचे निर्माते होते. लहानपणी काही काळ आपल्या वडिलांच्या व्यवसायात थॉमस सहभागी झाला. त्याचे औपचारिक शिक्षण अगदी बेताचेच झाले. पण इंग्लंडमधील आपल्या सदतीस वर्षांच्या आयुष्यात बिनभिंतीच्या शाळेत तो बरेच काही शिकला. जीवनाच्या पूर्वार्धात त्याला आलेले व्यामिश्र अनुभव हेच त्याचे खरे गुरू. पुढे ब्रिटिश सहकारला कर संकलन अधिकारी म्हणून त्याने काही वर्षे काम केले. पण त्या कामात तो फारसा रमला नाही व यशस्वीही झाला नाही. पुढे त्याचा पारंपरिक व्यवसायही डबघाईला आला. त्याचे सांसारिक जीवनही फारसे समाधानकारक नव्हते. 1760 साली थॉमसच्या पत्नीच्या बाळंतपणातच तिचे व बाळाचे निधन झाले व तो एकाकी झाला. लहान वयातच असे विचित्र व गुंतागुंतीचे अनुभव त्याला येत गेले. असे असले, तरी त्याची निरीक्षणशक्ती तरल होती. बुध्दी धारदार होती व विचारशक्ती तीक्ष्ण होती. कर संकलन अधिकारी म्हणून त्याला जे अनुभव आले, त्यावरून कर संकलन अधिकाऱ्यांना अधिक वेतन मिळाले पाहिजे अशा निष्कर्षापर्यंत तो आला. एवढेच नव्हे, तर या मागणीचे समर्थन करण्यासाठी 1772 साली त्याने The case of officers of excise हा 21 पानांचा लेख लिहून प्रसिध्द केला. हे त्याचे पहिले राजकीय लेखन. हा लेख वस्तुस्थितीवर आधारित, विचारप्रवर्तक व प्रक्षोभक भाषेत लिहिलेला आहे. कारण तो स्वानुभवावर आधारित होता. तो जसा संवेदनाशील लेखक होता, तसा झोकून देऊन काम करणारा हाडाचा कार्यकर्ताही होता. आपल्या या पहिल्या लेखाचे राजकीय महत्त्व जाणून त्याने त्याच्या 4000 प्रती छापून घेतल्या व ब्रिटिश संसदेच्या सर्व सदस्यांना व गणमान्य नागरिकांना वाटल्या. त्याची ही कृती त्याला चांगलीच महागात पडली. त्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पण त्याचा एक आनुषांगिक फायदा म्हणजे एक विचारवंत व लढवय्या कार्यकर्ता म्हणून पेन उदयास आला. त्यानंतर त्याने अनेक पुस्तिका लिहिल्या. त्याने या पुस्तिकेतून इंग्लंडमधील प्रस्थापित सत्ताधारी वर्ग, उमराव, सरदार, सरंजामदार, मनसबदार यांच्या धोरणावर व वृत्तीवर प्रखर टीका केली. इंग्लंडमध्ये राजकीय व सामाजिक परिवर्तन घडून आले पाहिजे, सर्व माणसे समान आहेत व सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे अशा विचारांचा त्याने प्रसार केला. राज्यक्रांतीच्या विचाराला त्याचा सक्रिय पाठिंबा होता. त्याचे हे वादळी व्यक्तिमत्त्व व प्रक्षोभक विचार तत्कालीन ब्रिटिशांच्या पचनी पडण्यासारखे नव्हते. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश शासनाने त्या सर्व पुस्तिका जप्त केल्या व त्याला इंग्लंडबाहेर हाकलले. सुदैवाने याच सुमारास बेंजामिन फ्रँकलिन या अमेरिकन विचारवंताशी त्याची भेट झाली. त्यांनी थॉमसच्या लेखनातील ठिणगी व धग ओळखली व त्याला अमेरिकेत स्थलांतर करण्याचा सल्ला दिला. एवढेच नव्हे, तर नवस्वतंत्र होऊ घातलेल्या देशात स्थायिक होण्यासाठी थॉमसला परिचयपत्रही दिले. येथून त्याच्या जीवनाला वेगळे वळण लागले. अठराव्या शतकातील ऍंग्लो-अमेरिकन जगतातला एक क्रांतिकारक लेखक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाची व्यक्ती म्हणून यापुढे थॉमस पेन नावारूपास आला.

अमेरिकेतील फिलाडेल्फिया प्रांतात थॉमस नोव्हेंबर 1774मध्ये पोहोचला. तेथे 'पेनसिल्वानिया मॅगझीन' या नियतकालिकात साहाय्यक संपादक म्हणून त्याने काम सुरू केले. या नियतकालिकात त्याने टोपणनावाने किंवा निनावी अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले. स्वत:च्या नावाने लिहिलेला Justice and Humanity हा त्याचा पहिला लेख त्याच मासिकात प्रसिध्द झाला. या लेखात त्याने निग्रोंच्या गुलामगिरीचा प्रश्न उपस्थित केला. गुलामांच्या व्यापारातील अमानुषता ही अनैतिक व उद्वेगजनक आहे; एवढया मोठया जनसमूहाला आपल्याच देशात आपण अन्यायाने गुलाम म्हणून राबवतो, असे असताना आपल्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांना दोष देण्याचा काय अधिकार आहे? असा जळजळीत प्रश्न पेनने अमेरिकन जनतेला विचारला. आफ्रिकन गुलामांच्या अनैतिक व्यापारावर घणाघाती हल्ला करून त्याची निरर््भत्सना करणारा एक लेख Mexican Slavery in America या शीर्षकाने लिहिला. या दोन्ही लेखांनी अमेरिकेच्या विचारविश्वात चांगलीच खळबळ माजली. पेनच्या प्रचारात्मक विचारांना या लेखनातून आकार येत गेला. त्याच्या विचारांना धुमारे फुटत गेले.

याच काळात अमेरिकेतील स्थानिक वसाहती व ब्रिटिश राज्यकर्ते यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. अमेरिकेला आपली वसाहत समजून ब्रिटिश राज्यकर्ते अमेरिकेवर आपला अंमल गाजवीत होते. अमेरिकन क्रांतीचा तो आरंभीचा काळ होता. अमेरिकेने केवळ ब्रिटिश संसदेने लादलेल्या कर व्यवस्थेच्या विरोधात नव्हे, तर ग्रेट ब्रिटनपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा द्यावा, अशा युक्तिवाद पेन याने केला. याच संदर्भात क्रांती आणि अन्याय या संदर्भातील आपले ज्वालाग्रही विचार त्याने मांडले. या सर्व विषयाची त्याची मांडणी Common Sense या त्याच्या 50 पृष्ठांच्या पुस्तिकेत ग्रंथित झाली आहेत. या पुस्तिकेमुळे अमेरिकन जनतेची स्वातंत्र्यप्राप्तीविषयीची भावना स्पष्ट व तीव्र झाली आणि स्वातंत्र्याच्या उद्घोषणेत तिचे रूपांतर झाले.

या पुस्तिकेतील जोरकस युक्तिवादामुळे वसाहतवादाचे चटके सोसणारा अमेरिकन नागरिक संघर्षासाठी सिध्द झाला, रस्त्यावर उतरला. विषय गंभीर असून त्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे असे वातावरण अमेरिकेच्या विचारविश्वात तयार झाले. आजपर्यंत सर्वंकष उठाव करून ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवावे या संदर्भात अमेरिकन वसाहतवाद्यांचा निर्णय होत नव्हता. पेनच्या या पुस्तिकेमुळे अमेरिकेत सार्वजनिक चर्चेला सुरुवात झाली. कारण त्यात ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळण्यासाठी स्थानिक अमेरिकन जनतेला मार्ग दिसला. त्यांच्या स्वातंत्र्यलढयाला उत्तेजना व प्रेरणा मिळाली. 'अमेरिकन क्रांतिकाळातील सर्वात प्रक्षोभक परंतु लोकप्रिय पुस्तिका' असे Common Sense या पुस्तिकेचे वर्णन अमेरिकन इतिहासकार करतात. कोणताही स्वातंत्र्यसंग्राम ही त्या त्या देशातील लोकांच्या सत्त्वपरीक्षेची वेळ असते. अशा वेळी तेथील लोकांनी कच खाल्ली, तर जगाच्या इतिहासाला नवे प्रगतिपर वळण लावण्याची संधी त्या लोकांनी गमावली असे होईल, असे तत्त्वचिंतनही पेनने या पुस्तिकेत केले आहे. या पुस्तिकेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याला पेनने किंग जॉर्ज तिसरा याची राजसत्ताच नाकारली नाही किंवा इंग्लंडची वसाहतवादाची मानसिकताच धिक्कारली नाही, तर एकूण सम्राटशाहीच (Monarchy) नाकारली. प्रजासत्ताक लोकशाहीवर आधारलेल्या शासनसंस्थेचा त्याने पुरस्कार केला.

1776 ते 1783 या काळात पेनने The American Crisis या शीर्षकाखाली सोळा निबंध प्रसिध्द केले. निसर्गत: पेन जरी सैनिक नसला, तरी या निबंधाच्या माध्यमातून त्याने अमेरिकन नागरिकांत देशभक्तीची ज्योत पेटवली व सैन्याला स्फूर्ती दिली. या स्वातंत्र्ययुध्दकाळाचे वर्णन त्याने ‘These are the times that try men's souls’ अशा प्रेरक शब्दांत केले. 'माणसांच्या आत्म्याची सत्त्वपरीक्षा पाहणारे असे हे काळ असतात' असे भावनिक आवाहन त्याने या शब्दातून केले. वॉशिंग्टनचे सैन्य जेव्हा जेव्हा पराभूत मानसिकतेत जाई, तेव्हा तेव्हा त्यांच्यासमोर या निबंधांचे जाहीर वाचन केले जात असे. त्यातून त्यांच्या विजयाच्या आकांक्षा प्रज्वलित होत असत.

Common Sense आणि The American Crisis या दोन्ही पुस्तिकांच्या पाच लाख प्रती अमेरिकेत खपल्या. अतिशय अनलंकृत भाषा, तत्त्वज्ञानाची बैठक, वापरलेल्या लॅटिन भाषेतील संज्ञा आणि बायबलचे दिलेले संदर्भ यामुळे या पुस्तिकांनी अमेरिकनांच्या हृदयालाच हात घातला. या स्वातंत्र्यलढयात केवळ अमेरिकेचा प्रश्न गुंतलेला नाही, तर उभ्या मानवजातीचे भवितव्य त्याच्या यशापयशावर अवलंबून आहे, असे आवाहन पेनने केले होते. त्यामुळेच अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुध्दाचे श्रेय वॉशिंग्टनच्या तलवारीला व युध्दनेतृत्वाला दिले जाते, तितकेच ते पेनच्या लेखणीलाही आहे. 'लोकशाहीच्या मूलतत्त्वांचे विवरण' हेच त्याचे व्यापक स्वरूप आहे.

याच कालखंडात पेनने लिहिलेल्या एका युगप्रवर्तक लेखाचा उल्लेख करायला हवा. तो 'स्त्रीदास्य विमोचना'संदर्भात आहे. जगातील सर्व स्त्रियांना पुरुषांचा अहंगंड आणि असूया याचा शतकानुशतके जाच सहन करावा लागतो, असे त्याचे वास्तवदर्शी निरीक्षण आहे. 'अज्ञात स्थितीत राहून स्त्रीने निमूटपणे व निष्ठेने कर्तव्य करावे, घराबाहेर पडू नये, प्रसिध्दी व सामाजिक मानमान्यतेची हाव धरू नये' अशीच सर्वसाधारणपणे सर्वच पाश्चात्त्य व पौर्वात्य विचारवंतांची स्त्रीविषयक भूमिका होती, हे पेन स्पष्ट करतो. एका ग्रीक तत्त्ववेत्त्याचे वाक्य तो संदर्भात उद्धृत करतो. ‘‘The most virtuous woman is she, who is least talked of.’’ (जिच्याबद्दल कमीत कमी बोलले जाते, ती सत्त्वसंपन्न स्त्री होय.) या संकल्पनेला पेनने कडाडून विरोध केला. सुसंस्कृत स्त्रीची समाजात सर्व बाजूंनी कशी कुचंबणा होते, याचे चित्रण त्याने या लेखात केले व स्त्री-पुरुष समानतेचा आग्रह धरला. एका अर्थाने पेन हा स्त्रीमुक्ती चळवळीचा आद्य प्रणेता होता.

अमेरिकेतील वास्तव्याच्या पहिल्या तेरा वर्षांच्या टप्प्यात पेनने जे लेखन केले, त्याचा अमेरिकन जनतेच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम झालेला दिसतो. त्याच्या विचारांनी अमेरिकनांना स्वत:ची अशी स्पष्ट ओळख मिळाली. स्वातंत्र्याच्या उद्घोषणेचा मार्ग मोकळा झाला आणि 4 जुलै 1776 रोजी अमेरिका हे स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र जन्माला आले. अमेरिकन स्वातंत्र्यांच्या जाहीरनाम्यात पेनच्या अनेक क्रांतिकारक विचारांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या घटनेतच त्याचे श्रेष्ठत्व अधोरेखित झाले आहे.

पेन हा तत्त्वनिष्ठ विचारवंत होता. त्याने तत्त्वांसाठी मोठी किंमत मोजायची नेहमीच तयारी ठेवली. अमेरिकन काँग्रेसने परराष्ट्र व्यवहार समितीच्या सचिवपदी पेनची नेमणूक केली. काँग्रेसच्या एका सदस्याने अमेरिकेला फ्रान्सने दिलेल्या मदतीचा अपहार केला. हा घोटाळा पेनने उघडकीस आणला. त्यासाठी त्याने गोपनीय कागदपत्रातील माहितीचा वापर केला. त्याच्या या हालचालींमुळे 1779 साली पेनला त्या समितीतून हद्दपार करण्यात आले. पुढे सात वर्षे तो अमेरिकेत राहिला व अनेक प्रश्नांना त्याने वाचा फोडली. 1780 साली त्याने Public Good नावाची पुस्तिका लिहिली. त्यात त्याने शक्तिशाली केंद्र शासनाची भलामण केली. त्यासाठी करावे लागणारे संस्थात्मक बदलही त्याने सुचविले. 1787 साली पेन आपल्या मायदेशी इंग्लंडला परतला.

पेन इंग्लंडला परतला, तेव्हा फ्रान्समध्ये राज्यक्रांतीचे वारे वाहू लागले होते. पेनने या राज्यक्रांतीचे जोरदार समर्थन केले. फ्रान्समधील विचारवंत रुसो, माँटेस्क्यू, व्हॉल्टेयर आणि इंग्लंडमधील विचारवंत हॉब्ज आणि लॉक यांनी फ्रेंच राज्यक्रांतीला तात्त्वि बैठक पुरविली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीच्या आधारावर फ्रेंच राज्यक्रांती झालेली दिसते. मूलभूत मानवी अधिकार आणि जनतेचे सार्वभौमत्व ही राजकीय मूल्ये या राज्यक्रांतीने केवळ फ्रान्समध्येच नव्हे, तर जगभर प्रस्थापित केली. ही राज्यक्रांती 1789मध्ये आकारास आली.

या क्रांतिकाळात फ्रान्समध्ये बरीच उलथापालथ झाली. अनेक दंगली, हाणामाऱ्या व जाळपोळी यांचे सत्र सुरू होते. त्या काळात फ्रान्समध्ये राजा व राजघराणे, धर्माधिकारी, सरंजामदार व उमराव यांच्या हाती सर्व सत्ता एकवटली होती. या राजसत्तेच्या अंमलबजावणीत कमालीचा बेजबाबदारपणा व उधळपट्टी यांचा अतिरेक झाला होता. त्यातून अन्यायकारी व अमानुषकारी परिस्थिती निर्माण झाली होती. बडयांची सर्वतोपरी चैन चालावी आणि गरीब जनता अक्षरश: भरडून निघावी, अशी करपध्दती, कायदेकानू व न्यायव्यवस्था फ्रान्समध्ये प्रचलित होती. स्वाभाविकपणे, अशा विपरीत परिस्थितीत सत्ताधीशांविरोधात बंड करण्यास तेथील जनता प्रवृत्त झाली होती. त्या काळात दंगली झाल्या, लुटालूट झाली, उमराव व धर्मगुरू यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. जीविताची व मालमत्तेची हानी झाली. फ्रान्समध्ये अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली. 14 जुलै 1789 रोजी संतापलेल्या जमावाने जुलमाचे व अन्याय-अत्याचाराचे प्रतीक असलेला बॅस्टिलचा तुरुंग फोडला. हा त्या उग्र जनशक्तीचा, लोकक्रांतीचा पहिला विजय मानला जातो. आजही तो दिवस 'फ्रेंच राज्यक्रांती दिन' म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटिश विचारवंत एडमंड बर्क हा मात्र फ्रेंच राज्यक्रांतीचा कट्टर विरोधक होता. या संदर्भात त्याची एक निश्चित भूमिका होती. राज्यक्रांतीचे सर्वश्रेष्ठ व मूलभूत तत्त्व असलेल्या 'स्वातंत्र्य' या संकल्पनेबद्दल बर्क म्हणतो, ''स्वातंत्र्य सर्वांनाच पेलता येण्यासारखे नाही. ते योग्य प्रकारे व्यवहारात आले नाही, तर ते अत्यंत धोक्याचे ठरते. स्वातंत्र्याला फार मोठे मोल असेल, पण सुरक्षितता आणि मालमत्ता यांनाही तेवढेच महत्त्व व मोल आहे.'' या सूत्राभोवती फ्रेंच राज्यक्रांतीसंबंधीचा आपला विचारव्यूह त्याने आपल्या Reflections on the French Revolution या ग्रंथात मांडला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या घटनांमधील अमानुषता त्याने अधोरेखित केली. त्यामुळे मानवी जातीचा संहार होईल असे त्याला वाटत होते. सामाजिक व आर्थिक बदल हवेत, शासन संस्थांही उत्क्रांत होत गेली पाहिजे, पण तिच्यात करावयाच्या सुधारणा क्रांतीच्या मार्गाने करू नयेत, असे त्याचे प्रतिपादन होते. बर्कच्या या विचारसरणीचे खंडन करणारा ‘The Rights of Man’ हा ग्रंथ थॉमस पेन याने 1791-92 या काळात लिहिला.

'द राइट्स ऑफ मॅन' हा ग्रंथ पेनने दोन भागात लिहिला आहे. पहिल्या भागात पेनने फ्रेंच राज्यक्रांतीवर बर्कने जो हल्ला केला, त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या आकलनात बार्कच्या ज्या चुका झाल्या आहेत, त्या तो दाखवून देतो. बर्कने त्याच्या ग्रंथात उपस्थित केलेल्या एकेका मुद्दयाचा पेनने प्रतिवाद केला आहे. त्यात ब्रिटनमधील सम्राटशाहीचा उगम आणि त्याचे झालेले परिणाम याची त्याने सविस्तर चर्चा केली आहे. विल्यम द काँकरर याने 1066 साली इंग्लंडवर लादलेली सम्राटशाही हा सम्राटशाहीचा उगम आहे, हे स्पष्ट करून मागील पिढयांनी घेतलेले निर्णय हे पुढील पिढयांवर बंधनकारक असू नयेत, जे जिवंत आहेत त्यांच्या कृती-अनुकृतींवर मृतांचे नियंत्रण असू शकत नाही, अशी भूमिका त्याने मांडली. सम्राटशाहीत उदयाला आलेल्या उमरावशाही, सरंजामशाही यामुळे राजेशाही अधिक बंदिस्त व बळकट झाली, असा निष्कर्ष त्याने काढला आहे.

या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात बर्कने शासन प्रशासनासंबंधी आपली जी मते/निरीक्षणे नोंदविली आहेत, त्याची समीक्षा पेनने केली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीत राज्यकारभारात वंशपरंपरेने आलेल्या परंपरागत सम्राटशाहीतून उद्भवलेल्या दहशतवादविरोधात व दमननीतीविरोधात ज्या तीव्र लोकभावना व्यक्त झाल्या, त्याचे पेनने समर्थन केले आहे. उलट या राज्यक्रांतीत होणाऱ्या अन्यायाच्या व अत्याचाराच्या तुलनेत लोकांनी संयत व विवेकी प्रतिक्रिया नोंदविली आहे, असा दावा पेनने केला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीला बळापेक्षा विवेकाचे अधिष्ठान लाभले असून विवेकशीलता हाच नव्या फ्रेंच सरकारच्या तत्त्वप्रणालीचा मार्गदर्शक आहे. पुढे फ्रेंच नॅशनल असेंब्लीच्या मानवी हक्कांच्या उद्घोषणेत या विवेकशीलतेचे प्रतिबिंब घडलेले दिसते, असा जो दावा पेनने या ग्रंथात केला आहे. तो यथायोग्य आहे, असे म्हणता येईल. याचे कारण असे की, ‘The Rights of Man’ या ग्रंथातील विचारांचेच प्रतिबिंब त्याचाच अंतर्भाव पुढे मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात पाहावयास मिळतो.

सर्व माणसे समान आहेत, राज्यकारभारात आणि इतर व्यवसायात सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, न्यायव्यवस्थेसमोर सर्व समान असावे, धनदांडग्यांना तो विकत घेता येऊ नये, माणसामाणसात कोणतेही भेद नकोत, कोणालाही बेकायदा अटक करण्यात येऊ नये, आरोप सिध्द झाल्याशिवाय कोणालाही गुन्हेगार समजले जाऊ नये, धर्मस्वातंत्र्य व अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे व्यक्तिस्वातंत्र्याचे अविभाज्य घटक आहेत, सरकार कोणाचीही मालमत्ता विनाकारण ताब्यात घेणार नाही आणि घेतलीच तर योग्य नुकसानभरपाई सरकारला द्यावी लागेल, कायदा हा लोकांनी, लोकांसाठी तयार करावयाचा असतो अशी देशाच्या राज्यकारभाराची तत्त्वप्रणाली पेनने येथे ग्रंथित केली आहे.

या ग्रंथाने इंग्लंडमधील व अमेरिकास्थित रिपब्लिकन पक्ष यांच्या चळवळीला गती व प्रेरणा दिली. ही प्रामुख्याने राज्यकारभाराच्या लोकशाहीकरणासाठी चाललेली चळवळ होती. या त्याच्या भूमिकेमुळे फ्रेंच नॅशनल असेंब्लीचा सदस्य म्हणून पेनची निवड करण्यात आली. पेनचे हे पुस्तक इंग्लंडमधील राजनीतीवर लेखनाच्या इतिहासातील गरिबांची बाजू गरिबांच्या दृष्टीकोनातून मांडणारे पुस्तक म्हणून मान्यता पावले आहे. म्हणूनच त्याला 'गरिबांचे बायबल' म्हटले जाते. या पुस्तकातील क्रांतिकारक विचारामुळे पेनवर इंग्लंडमध्ये देशद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. त्याने उघडपणे केलेले सशस्त्र क्रांतीचे व रक्तपाताचे समर्थन ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या पचनी पडणारे नव्हते. पेन म्हणतो, ''प्रस्थापित संस्था, विधिनियम व हितसंबंध यात बदल होणे व घडविणे अनेकदा अपरिहार्य असते. ते जर शांततेच्या मार्गाने झाले नाहीत वा घडू शकले नाहीत, तर तुंबलेल्या डबक्याप्रमाणे ते साठतील. त्यांचा बांध फुटणे मग अपरिहार्य होऊन जाईल. त्यासाठी प्रसंगी शस्त्राचा वापर आणि रक्तपात हेदेखील अपरिहार्य व न्याय्य असेल' अशा स्पष्ट शब्दात पेनने क्रांतीचे समर्थन या ग्रंथात परिणामकारकरित्या केले आहे.

पेनच्या मते फ्रान्समध्ये देशाभिमानाची परंपरा नव्हती व ती अजूनही पुरेशी व्यापक व दृढमूल झालेली नाही. तो असेही म्हणतो की, 'देश म्हणजे केवळ विशिष्ट भूप्रदेश नव्हे, तर त्यातील सर्व थरातील लोक, त्यांचे सुख, स्वातंत्र्य आणि मानवी अधिकार यासाठी प्रयत्नशील असणारे कार्यकर्ते हेच खरे देशभक्त आहेत. खालच्या जातीतील देशबांधवांना पशूपेक्षाही नीच समजणाऱ्या लोकांचा देशाभिमान हा अपवित्र देशाभिमान आहे. जुन्या धार्मिक परंपरांवर आधारलेल्या आपल्या राजकीय चळवळीपासून खेडयापाडयातील जनसमुदाय अजून लांब आहे. त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने वागण्याचे आपल्या देशभक्तांना अद्याप अगत्य का वाटत नाही?' असा खडा सवाल तो विचारतो. या ग्रंथात फ्रेंच राज्यक्रांतीचे समर्थन करतानाच इंग्लंडमध्येही प्रजासत्ताक राजवट आली पाहिजे अशी आग्रही मांडणी पेन करतो. राज्यघटनावाद हा व्हीग (Whig) या पक्षाच्या सुधारणावादाचा आधार आहे. तोच पेन स्पष्ट शब्दांत नाकारतो. कारण त्याच्या मते राज्यसरकार ही अशी यंत्रणा व साधन बनले आहे की, जेथे युध्दामुळे श्रीमंतांचा फायदा होतो आणि गरीब मात्र करांच्या ओझ्यापायी दबले व भरडले जातात.

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द व फ्रेंच राज्यक्रांती या अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या दोन महान घटनांचा पेन प्रत्यक्ष साक्षीदार होता. शिवाय विचारवंत आणि कार्यकर्ता म्हणून या दोन्ही  संग्रामात तो सक्रिय होता. त्याची वैचारिक बैठक मुख्यत: शुध्द व्यक्तिस्वातंत्र्यवादाची, लोकशाही निष्ठेची होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयीच्या जोडीला हे मानवी अधिकार त्याला जन्मत:च नैसर्गिकरित्या प्राप्त झालेले असतात, अशी त्याची तात्त्वि मांडणी होती. समाजातील सर्व व्यक्तींचे समानत्व या तत्त्वावर त्याची श्रध्दा असल्यामुळे त्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. राजाची सत्ता प्रजेवर लादलेली असते, म्हणून ती अनैसर्गिक असते. लादलेली सत्ता संस्कृती, व्यापार इत्यादींच्या विकासाला मारक ठरते. म्हणून राजाच्या वंशपरंपरागत सत्ता पध्दतीवर पेनने कडाडून टीका केली आहे. नैसर्गिक हक्कांची वैचारिक परंपरा विकसित करणाऱ्या विचारवंतांत पेनचे स्थान मोठे आहे.

पेन याची लोकशाहीवर अपार निष्ठा होती, पण समाजहिताकरता दीनदुबळयांसाठी धनिकांवर कर बसविणे त्याला न्याय्य वाटत होते आणि त्यासाठी शासनाने आपली सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली पाहिजे, या मताचा तो होता. या त्याच्या विचारात लोकशाही समाजवादाची बीजे आढळून येतात. तो लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असला, तरी तिच्या व्यावहारिक मर्यादांची त्याला जाणीव होती. शासन प्रातिनिधिक असावे, या मतावर तो ठाम होता; परंतु अशा शासनानेही कमीत कमी नियंत्रण करावे. लोकांना आपले व्यवहार जास्तीत जास्त त्यांच्या नैसर्गिक प्रेरणेनुसार करू द्यावेत. त्याच्या मते समाज स्वत:च्या व्यवहाराचे स्वत:हून बरेचसे नियंत्रण करील. पेन हा अराज्यवादी नव्हता किंवा राज्यहीन समाजाची कल्पनाही त्याला मान्य नाही. राज्यसंस्था नकोच असे तो मानीत नाही. उलट समाजाच्या भल्यासाठी राज्यसंस्थेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असा समाजकल्याणकारी विचार तो करतो. पेनच्या म्हणण्याचा आशय लक्षात घेतला, तर त्यात विरोधाभास जाणवणार नाही.

सारांश - मानवतेची प्रतिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह आणि गुलामगिरीचा निषेध ही तत्त्वत्रयी पेन याच्या विचारांचा गाभा आहे. त्याच्या सर्व सुसंस्कृत विचारांवर अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स या तीनही देशांतील विचारवंतांचा प्रभाव आहे. अमेरिकेतील फ्रँकलिन, जेफरसन आणि रश, इंग्लंडमधील टूक (Tooke) गॉडविन आणि प्रिस्टले आणि फ्रान्समधील काँडरसेट आणि ब्रिसॉट हे ते विचारवंत होत. त्या पूर्वसुरींचे ऋण पेन मान्य करतो. या मर्यादित अर्थाने त्याने अस्सल राजकीय सिध्दान्तन केले नाही किंवा तो मूलगामी, चिंतकही नाही; परंतु त्याने आपले विचार व संकल्पना अतिशय मोकळया, प्रवाही व रसाळ भाषेत मांडून त्या लोकप्रिय केल्या. त्याची शैली, आक्रमक व वाचकांवर छाप पाडणारी होती. प्रस्थापित अशा नैसर्गिक संस्थांच्या कारर््याची परखड समीक्षा करण्यात त्याचे अस्सलपण दडले आहे. आपल्या विचारांवर ताबडतोबीने सहमती होणार नाही, याची त्याला जाणीव होती. म्हणूनच आपले प्रागतिक व विज्ञानपूर्ण विचार त्याने जहाल पध्दतीने मांडले. जसजसा काळ जातो आहे, तसतसे त्याच्या विचारांचे मर्म विचारवंतांना अधिकाधिक उमजू लागले आहे.

फ्रान्सच्या वास्तव्यात पेनने आणखी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. तो तीन भागात असून 1793-94 या काळात तो लिहिला गेला आहे. तो आहे ‘The Age of Reason.’ हा ग्रंथ म्हणजे पेनने परमार्थ ज्ञानाचा घेतलेला शोध आहे. त्याची धर्मविषयक मते त्यात ग्रंथित झाली आहेत. त्याला बायबलप्रणीत धर्म मंजूर नव्हता. अवतार आणि साक्षात्कार या कल्पना त्याला थोतांड वाटत. असे असले, तरी तो निरीश्वरवादी नव्हता. निसर्गातून प्रतीत होणारा, पण माणसापासून वेगळा असा परमेश्वर तो मानत होता.

The Age of Reason या ग्रंथाचे पूर्ण शीर्षक ‘The Age of Reason: Being an investigation of True and Fabulous Theology’ असे होते. दृश्य भ्रष्टाचार आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रस्थापित धर्मावर त्याने या ग्रंथात सडकून टीका केली आहे आणि बायबलच्या वैधतेलाच त्याने आव्हान दिले आहे. हे पुस्तक एवढे प्रक्षोभक व वादग्रस्त ठरले की, ज्यांनी कोणी हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे धाडस केले व वितरित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोर्टबाजीला तोंड द्यावे लागले. या पुस्तकाचे तिन्ही भाग प्रसिध्द झाल्यानंतर सन 1802मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेफर्सन यांच्या निमंत्रणावरून पेन अमेरिकेला गेला.

या ग्रंथात पेनची धर्ममीमांसा वाचायला मिळते. तो लिहिताना त्याची प्रेरणा धर्मसुधारणेची होती. धर्मभावना नष्ट करण्याची नव्हे. ईश्वराचे एकत्व आणि मानवी समता या दोन तत्त्वांवर त्याची नितांत श्रध्दा होती. धर्म ही जिव्हाळयाची, खाजगी व वैयक्तिक बाब आहे असे पेन मानतो. 'निर्माणकर्ता परमेश्वर आणि मनुष्य यात मध्यस्थ नको, म्हणून मी ज्यू, रोमन, ग्रीक, तुर्की, प्रोटेस्टंट किंवा अन्य कोणतेही धर्मशासन मानत नाही' अशी त्याची भूमिका आहे. ‘My own mind is my own church’ (माझे स्वत:चे मन हेच माझे धर्मशासन आहे.) असे तो स्पष्टपणे म्हणतो. धर्मसंस्था ही स्वतंत्र आणि स्वयंस्फूर्त असली पाहिजे, तिच्यावर कोणत्याही बाह्य संस्थेचे अधिराज्य वा नियंत्रण असता कामा नये, असे तो मानतो. एकदा का धर्माला संस्थात्मक रूप आले की दंडसत्तेच्या जोरावर - मग ती राजाची असो वा धर्माध्यक्षाची धर्माच्या मूलतत्त्वाच्या खुल्या चर्चेला वा चिकित्सेला प्रतिबंध केला जातो. माणसाची धर्मजिज्ञासा मारली जाते. जो धर्म त्यात अंतर्निहित असणाऱ्या तत्त्वांची वा सिध्दान्तांची समीक्षा वा चिकित्सा नाकारतो, तो धर्मच नव्हे असे पेनचे परखड मत आहे.

प्रचलित धर्मव्यवस्थेत विशिष्ट ग्रंथाचे प्रामाण्य हे धर्मनिष्ठेचे प्रथम लक्षण मानले जाते. स्वाभाविकच प्रेषित, पोप, धर्मपंडित वा पुरोहित यांना अकारण महत्त्व प्राप्त होते. (थॉमस पेन याला हिंदू धर्माची माहिती असती, तर कदाचित त्याने असे निष्कर्ष काढले नसते.) पेनने बायबलचे धर्मवर्चस्व नाकारले होते व तो अधिकार सदसद्विवेकबुध्दीला दिला होता. सदसद्विवेकबुध्दीला तर्काची जोड असावी, तर्कबुध्दी विज्ञानप्रवण असावी अशी मांडणी तो करतो. परमेश्वर एकच आहे, तो न्यायी व समदर्शी आहे म्हणून ईश्वरप्रणीत ग्रंथ कोणता असेल तर तो परमेश्वराने निर्माण केलेली सृष्टी हाच आहे. तो नित्य प्रकट आहे. सर्व काळातील सर्व देशातील लोकांना तो केव्हाही वाचता येतो व त्याचा अर्थही लावता येतो. जो खरा एकेश्वरी आहे, त्याचा धर्मग्रंथ सृष्टी हाच आहे. धर्मजीवनाच्या परिपूर्तीसाठी ईश्वरनिष्ठा आणि नैतिक सत्याचे अधिष्ठान या दोन गोष्टी आवश्यक असतात. नैतिकतेचे उगमस्थान प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकबुध्दीत आहे. त्यासाठी प्रमाण ग्रंथाची वा उपासनापध्दतीची आवश्यकता नाही, असे पेन म्हणतो.

पेनच्या मते मानवता हा खरा धर्म असून समता व बंधुभाव हा त्याचा आधार आहे. सर्व माणसे ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत. त्यांचे जीवनसत्त्व एकच आहे. दर्जाने ते तत्त्वत: समान आहेत. तर्कशुध्दी आणि सदसद्विवेकबुध्दी ही माणसाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. म्हणून माणसामाणसात देश, धर्म, पंथ, वर्ग, वर्ण, वंश, लिंग यासारख्या बाबींवरून भेदाभेद करणे गैर आहे. ते ईश्वरी योजनेशी विसंगत आहे. सृष्टी व्यापाराचे जे नियम आहेत त्यांचा जनक ईश्वर आहे. विश्वातील यच्चयावत घडामोडींचे नियम शोधून काढण्याचा विज्ञानाचा प्रयत्न असतो. या नियमांद्वारे ईश्वरी इच्छेचा वा योजनेचा मागोवा घेता येतो, असे पेनचे प्रतिपादन आहे. ‘Age of Reason’ लिहिताना पेन एका द्वंद्वाला सामोरे जात होता. एकीकडे लोकांची फसवणूक करणाऱ्या धर्मसत्तेवर त्याला हल्ला चढवावा लागत होता, तर दुसरीकडे नास्तिकतेशी त्याला मुकाबला करायचा होता. कारण निशुध्द धर्मभावनेचा आशय त्याला लोकांच्या गळी उतरवायचा होता.

या ग्रंथात पेनने धर्मस्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. व्यक्ती वा लोकसमूह यांना आपापल्या श्रध्देप्रमाणे, ईश्वराची उपासना करण्याचे स्वातंत्र्य हवे. शासन वा अन्य कोणत्याही संस्थेची त्यात ढवळाढवळ नको. मात्र कोणाच्याही धर्मस्वातंत्र्याला इतरांच्या असहिष्णुतेमुळे धोका उत्पन्न झाला, तर त्याला संरक्षण देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे तो बजावतो. Religion of Humanity - मानवतेचा धर्म ही संज्ञा त्यानेच प्रथम उपयोगात आणली. त्यालाच तो Religion of Inner Light किंवा अंत:प्रकाशातील धर्म असेही म्हणतो. व्यक्तीची प्रतिष्ठा, आत्मप्रामाण्य, स्वातंत्र्य, समता, न्याय, मनुष्याचे नैसर्गिक हक्क व जबाबदारी, विवेकशीलता, बुध्दीनिष्ठा या तत्त्वांचा त्याने पुरस्कार केला आहे. The world is my country, to so good is my religion (जग हाच माझा देश, सर्वांचे भले करणे हाच माझा धर्म) इतके विशाल तत्त्वज्ञान त्याने धर्मचर्चेत मांडले आहे. सृष्टीविज्ञान आणि सदसद्विवेकबुध्दी यांच्याद्वारे ईश्वराच्या अस्तित्वाची ओळख पटते आणि नैतिक प्रश्नांचा निर्णय करता येतो, असा त्याचा विश्वास आहे.

थॉमस पेन यांच्या राजकीय, सामाजिक आणि धर्मविषयक चिंतनाचा आवाका व परीघ किती मोठा आहे, याची स्पष्ट कल्पना यावी म्हणून त्यांचा इतका विस्ताराने आढावा घेतला. अठराव्या शतकात युरोपात अनेक विचारवंत होऊन गेले. थॉमस पेन हे त्या मालिकेतील एक महत्त्वाचे नाव. त्यांच्या विचारांचा प्रभाव थेट भारतातील म. फुले या समाजसुधारकांवर पडला, हे विशेष!

 

-3-

महात्मा जोतिराव फुले यांचे चरित्र सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्याचा आढावा घेण्याची आवश्यकता नाही; परंतु प्रागतिक व कृतिशील विचारवंत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, हे पाहणे उद्बोधक ठरेल. जोतिरावांचे शिक्षण पुण्याच्या स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये झाले आणि याच काळात रेव्हरंड जेम्स मिश्चेल व त्यांच्या पत्नी, तसेच रेव्ह. मरे मिशेल यांच्याशी त्यांचा दाट परिचय झाला होता, याचा उल्लेख मागे आलेला आहे. त्यापैकी मरे मिशेल हे अतिशय विद्वान व बहुश्रुत होते. त्यांचे वाचनही चौफेर होते. त्यांच्या सान्निध्यात जोतिराव आले, तेव्हा त्यांनाही या युवकांच्या बुध्दिमत्तेचा परिचय झाला. त्यांच्यामुळे जोतिरावांचा प्रो. विल्सन, प्रो. जेम्स, मॅक्स म्युल्लर यांच्या वाङ्मयाचा - विशेषत: त्यांच्या हिंदू धर्मचिंतनाचा परिचय झाला. जॉर्ज वॉशिंग्टन यांचे चरित्र त्यांनी वाचले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे थॉमस पेन या ब्रिटिश विचारवंतांचे छोटेमोठे ग्रंथ त्यांच्या अभ्यासात आले. त्यांच्या विचारप्रक्रियेवर पेनच्या वैचारिक भूमिकेचा व तत्त्वचिंतनाचा खोलवर परिणाम झालेला दिसतो. त्या संस्कारक्षम वयात जोतिरावांना वाचनाची जी गोडी लागली ती कायमचीच. या वाचनामुळे जोतिरावांना विद्यार्जनाची व ज्ञानाची महती कळली. ज्ञानाच्या शक्तीचा आवाका त्यांच्या लक्षात आला. मात्र त्यांचे वाचन हे केवळ स्वान्तसुखाय नव्हते. केवळ कुतूहलशमन वा ज्ञानानंद ही त्यांच्या वाचनामागील भूमिका नव्हती. काही विशिष्ट हेतू व ध्येय उराशी बाळगून त्यांनी निवडक ग्रंथांचे चोखंदळपणे वाचन केले, असे दिसते.

त्यांच्या मनात वाचनाचे दोन हेतू होते. एक म्हणजे सामाजिक जीवनातील विविध प्रवाहांचा, प्रवृत्तींचा व सामाजिक प्रश्नांचा वेध घेता यावा, आपल्या अनेकपदरी व्यामिश्र अनुभवांचा सम्यक अर्थ लावता यावा. या साऱ्यांच्या आधारे गुंतागुंतीचे सामाजिक प्रश्न सोडवता यावे व सामाजिक बदल घडवून आणण्याची दिशा शोधता यावी म्हणून त्यांनी वाचन व ज्ञानोपासना केली. दुसरे म्हणजे आपण हाती घेतलेल्या कार्याचा व त्यामागील तात्त्वि भूमिकेच्या प्रसाराला मदत होईल अशा ग्रंथांच्या वाचनाचा त्यांनी पाठपुरावा केला. या वाचनात जॉन विल्सन या ख्रिस्ती धर्माेपदेशकाच्या मराठी व इंग्लिश ग्रंथांचाही समावेश होता. विद्वत्ता, कार्यकुशलता आणि ग्रंथकर्तृत्व या क्षेत्रांत विल्सन यांनी भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या ‘Indian Castes’ आणि ‘India : Three Thousand Years Ago’ या त्यांच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांचा यात समावेश होता. सुप्रसिध्द बंगाली लेखक प्रथमनाथ बोस यांची ‘A Short Essay on Aryan Civilization in India’ ही पुस्तिकाही त्यांच्या वाचनात आली होती. तिच्यातील आशयाने जोतिराव अतिशय प्रभावित झाले होते. या सर्व वाचनप्रक्रियेत पेन यांची सारीच ग्रंथसंपदा हा जोतिरावांच्या जिव्हाळयाचा विषय झाला होता. त्यांच्या ग्रंथरचनेवर पेनच्या विचारांचा खोल ठसा उमटलेला दिसतो. त्यांच्या ग्रंथांमुळे राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही या संकल्पनांचा खरा अर्थ जोतिरावांना उलगडत गेला. धर्माकडे पाहण्याचा पेनचा दृष्टीकोन आधुनिक व शास्त्रशुध्द आहे, हे जोतिरावांच्या लक्षात आले. खरा धर्म म्हणजे काय याचाही उलगडा होण्यास जोतिरावांना त्यांची मदत झाली. ते समजल्यानंतर ब्राह्मणशाहीविरुध्द बंड करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. विचार, प्रत्यक्ष व्यवहार आणि कार्य या सर्व क्षेत्रात पेनच्या विचारांची प्रेरणा कार्यरत होती, हे येथे स्पष्ट होते.

पेन यांच्यासमोर असलेले सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रश्न आणि त्याच क्षेत्रातली जोतिरावांसमोरचे प्रश्न यांच्या स्वरूपात स्थल-काल-परिस्थितीनुसार महदंतर असणे अगदी स्वाभाविक होते. परंतु अशा प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी जोतिरावांना पेनच्या ग्रंथांतून मिळाली. पेनने ते प्रश्न सोडविण्यासाठी जे प्रत्यक्ष कार्य केले, जी जनजागृती केली, त्यातून जोतिरावांना आपल्या देशासमोर व समाजासमोर असणारे प्रश्न सोडविण्याची दिशा व प्रेरणा मिळाली, हे महत्त्वाचे.

समाजासमोर असलेले गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राच्यविद्या संशोधकांनी लिहिलेल्या वाङ्मयाचे - विशेषत: धर्मप्रधान वाङ्मयाचे स्थान तितकेच महत्त्वाचे असते. मात्र जोतिरावांना समाजाने संस्कृत शिक्षण नाकारले असले, तरी त्यामुळे ते खचून गेले नाहीत. त्यांनी प्राचीन संस्कृत ग्रंथांची मराठी भाषांतरे वाचली व अभ्यासली. त्यातून त्यांना या देशातील धार्मिक व सामाजिक गुलामगिरीचा उदय कोठून व कसा झाला हे उलगडले. त्या गुलामगिरीच्या विरोधात कशी मांडणी करावी वा कसा युक्तिवाद करावा याची दिशा सापडली. वेद, उपनिषदे, विविध स्मृती - विशेषत: मनुस्मृती, तसेच रामायण, महाभारत, भागवत या ग्रंथांतील विचारांची व कथाभागांची तपशीलवार माहिती त्यांना त्यांच्या मराठी भाषांतरानुसार मिळाली. हरिविजय, पांडवप्रताप, एकनाथी भागवत यासारखे जुने धार्मिक मराठी ग्रंथ त्यांच्या वाचनात आले. चार्वाक दर्शन, गौतमबुध्दाची अवैदिक परंपरा हेही त्यांच्या अवलोकनात आले. गौतम बुध्दाने मूर्तिपूजा, वर्णवर्चस्व व जन्मसिध्द उच्चनीचता यांच्या विरोधात आवाज उठविला, हे जोतिरावांना ज्ञात होते. मराठीतील संत वाङ्मयाकडे पारंपरिक भक्तिभावाने न पाहता जोतिराव ब्रिटिशकालीन आधुनिक दृष्टीकोनातून पाहत होते. त्यामुळे त्यातील आशयाला व दृष्टीकोनाला त्यांनी कडाडून विरोध केला व त्यावर ग्राम्य भाषेत सडकून टीकाही केली. सारांश, जोतिराव हे विलक्षण सापेक्षी, चोखंदळ व चिकित्सक वाचक होते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात जो आशय व्यक्त झाला आहे, त्यावरून हा निष्कर्ष सहजपणे काढता येतो.

जोतिरावांच्या विचारसरणीवर आणखी एका गोष्टीचा प्रभाव जाणवतो. त्यांनी संस्कारक्षम वयात बायबल वाचले होते व ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्यपध्दतीचे अवलोकन केले होते. स्वाभाविकच बायबलमधील चमत्कारांचा व असंभाव्य घटनांचाही भाग त्यांच्या वाचनात आला होता. असे असूनही ख्रिस्ती मिशनरी हिंदू धर्मातील व्यंगे उघडकीस आणून ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे हिंदू समाजातील अज्ञ आणि अल्पज्ञ घटकांना धर्मांतरासाठी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत. यातील विरोधाभास जोतिरावांच्या चांगलाच लक्षात आला आणि अनुभवान्ती त्यांनी व त्यांच्या मित्रांनी धर्मांतर न करता, स्वधर्मात राहूनच धर्मसुधारणा, समाजसुधारणा व लोकसेवा करावी असा निर्णय घेतला. हिंदू धर्मातील विकृतींवर व दोषांवर प्रखर टीका करणाऱ्या जोतिरावांना या वास्तवाचे भान होते, हे महत्त्वाचे. व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनातील धर्माचे स्थान व महत्त्व जोतिरावांनी कधीच नाकारले नाही, हे त्यांच्या धर्मविषयक क्रांतिकारक व प्रक्षोभक विचारांचा मागोवा घेताना लक्षात ठेवले पाहिजे.

जोतिरावांनी सामाजिक शास्त्रांचा म्हणजे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, आनुवंशशास्त्र यांचा स्वतंत्रपणे व साकल्याने अभ्यास केला होता, असे दिसत नाही. कदाचित त्यांनी आपल्या जीवितकार्यास उपयुक्त अशी जी वाचनाची संदर्भ चौकट आखून घेतली होती, त्यात हे बसणारे नव्हते. पण त्यांनी आपल्या वाचनाचा परीघ वाढविला असता आणि समाजशास्त्रीय विषयांचे वाचन केले असते, तर त्यांच्या सामाजिक प्रश्नांच्या आकलनात निश्चित फरक पडला असता, असे वाटते.

 

-4-

आता आपण थॉमस पेन यांच्या विचारांचा जोतिरावांच्या जीवनावर व विचारविश्वावर पडलेल्या प्रभावाचे स्वरूप पाहू. पेन यांनी ख्रिस्ती धर्मग्रंथ 'बायबल'वर सडकून टीका केली होती. तो स्वत: एकेश्वरी होता. व्यक्तीच्या व समाजाच्या नैतिक उन्नयनासाठी धर्माची आवश्यकता त्याला मान्य होती. पेनच्या या मताचा जोतिरावांच्या ईश्वरविषयक धारणेवर चांगलाच प्रभाव पडला होता. ते पेनप्रमाणे धर्माचे समाजजीवनातील स्थान मानणारे होते. त्यांनीही धर्मातील अनिष्ट बाबींवर सडकून टीका केली होती. जोतिराव एकेश्वरी होते. त्या ईश्वराचे वर्णन ते 'निर्मिक' या यथार्थ शब्दात करीत. बंगालमधील ब्राह्मो समाज, महाराष्ट्रातील प्रार्थना समाज व पुण्यातील परमहंस सभा हे एकेश्वरी पंथ होते. 'ईश्वर हा एकच असून तो सर्वांचा पिता आहे आणि सर्व मनुष्ये त्याची समान लेकरे आहेत, म्हणून समाजातील जातिभेद खरा नव्हे' हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा होता. त्या काळात लोकहितवादी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे या सर्वांवर एकेश्वरी मताचा चांगलाच प्रभाव होता. जन्माधिष्ठित उच्चनीचता व जातिभेद नाकारणे व मोडणे, बालविवाह बंदी, पुनर्विवाहाला पाठिंबा, सार्वजनिक शिक्षणाचा प्रसार ही या सर्व पंथाची वैशिष्टये होती. (या सर्व पंथांतील धर्म व समाज यातील सुधारणाविषयक भूमिकेमुळे सर्व माणसात समानता आणण्याचा स्वतंत्र पर्याय हिंदू समाजाला उपलब्ध झाला. परिणामी ख्रिस्ती धर्माचे संभाव्य आकर्षण नाहीसे झाले.) जोतिरावांनी समाजातील स्त्रीवर्ग व शूद्रातिशूद्र समाजघटकांना त्यांच्या दयनीय परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षण व समाजसुधारणा यावर भर का दिला, हेच येथे स्पष्ट होते. या सर्व पंथांतील समाजसुधारणेसंदर्भातील भूमिका जोतिरावांना मान्य होती, त्यामुळेच त्यांनी या क्षेत्रात कार्याचे डोंगर उभे केले. केवळ विचारवंत नव्हे, तर कृतिशील समाजसुधारक अशी जोतिरावांची भूमिका होती आणि ती थॉमस पेन यांच्या भूमिकेशी व जीवनकार्याशी अगदी मिळतीजुळती होती.

थॉमस पेन आणि जोतिराव फुले यांच्या जीवनविषयक दृष्टीकोनात आणखी एक साम्य दिसून येते. पेन हा ब्रिटिश सरकारच्या महसूल खात्यात टॅक्स कलेक्टर म्हणून नोकरी करीत होता. या कलेक्टर्सना मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनामुळे त्यांच्यावर अन्याय होतो आहे, हे पेनच्या लक्षात आले. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पेनने 21 पानी पुस्तिका लिहून तिच्या 400 प्रती छापल्या. त्याने त्या सर्व संसद सदस्यांना व जबाबदार नागरिकांना वाटल्या. हे पेनचे पहिलेवहिले राजकीय लिखाण होते. पुढेही जेथे जेथे अन्याय झाल्याचे पेनच्या लक्षात आले, तेथे तेथे त्याने आपल्या लेखणीचे हत्यार उपसले व त्या धाडसी कृतींची किंमतही चुकविली. महात्मा फुले यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक कंत्राटे मिळविली. तेव्हा त्यांनी श्रमिक व मजुरांची बाजू घेऊन काळया व गोऱ्या नोकरशाहीवर कडाडून हल्ला चढविणारे लेखन केले. आपल्या पुढील आयुष्यात प्रत्येक क्षेत्रातील शोषण, फसवणूक व लुबाडणूक याविरोधात जोतिरावांनी आपली लेखणी सतत झिजविली व आपली मते लोकांसमोर व सरकारपुढे ठामपणे मांडली.

 

-5-

आपल्या 73 वर्षांच्या आयुष्यात थॉमस पेन दोन टप्प्यांत 21 वर्षे अमेरिकेत व 8 वर्षे फ्रान्समध्ये होता. आपल्या जाणत्या आयुष्यातील 24 वर्षे मायदेशी होता. त्यामुळे अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड या तिन्ही देशांतील राजकारण व राजकीय परिस्थिती यांचा पेनला खूप जवळून परिचय होता. अमेरिकेतील निग्रोंचा प्रश्न व तो सोडविण्यासाठी झालेली आंदोलने, अमेरिकेच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश सत्तेने आपली वसाहत असलेल्या अमेरिकेवर केलेला अन्याय व त्यांची केलेली आर्थिक पिळवणूक, ब्रिटिश वसाहतवादाच्या विरोधात झालेले अमेरिकेचे स्वातंत्र्ययुध्द यांची पेनला उत्तम जाण होती. फ्रान्सच्या राजघराण्याने सामान्य फ्रेंच माणसांशी केलेला अमानुष व्यवहार आणि त्या जुलमी अंमलाविरुध्द झालेली फ्रेंच राज्यक्रांती या घटना पेनने जवळून पाहिल्या होत्या. ब्रिटनमधील राजेशाही, त्यातील राजे, उमराव, सरंजामदार, धर्माधिकारी यांनी सामान्य ब्रिटिश नागरिकांची केलेली पिळवणूक, तसेच ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जगभरातील आपल्या वसाहतींची केलेली राजकीय पिळवणूक व आर्थिक लूट यांचा पेन साक्षीदार होता. कोणत्याही देशातील राजाच्या सत्तेला त्याचा स्पष्ट विरोध होता. ती सत्ता ही प्रजेवर लादलेली असते, म्हणून ती अनैसर्गिक असते. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याला मारक असलेली राजाची वंशपरंपरागत सत्ता पेनच्या टीकेचे लक्ष्य झाली होती. याचा अर्थ व्यक्तींचे समानत्व व त्याचे नैसर्गिक हक्क आणि लोकशाही स्वातंत्र्य हे पेनचे आग्रहाचे विषय होते. आपल्या लेखनातून आणि चळवळीतून पेनने याच आपल्या वैचारिक भूमिकेचा पाठपुरावा केलेला दिसतो.

पेनच्या या राजकीय विचारांचा जोतिरावांच्या मनावर चांगलाच ठसा उमटलेला दिसतो. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती. त्यांच्या वसाहतवादी वृत्तीचे, ध्येयधोरणांचे व प्रत्यक्ष व्यवहाराचे चांगलेच चटके भारतीयांना बसत होते. त्यामुळे हळूहळू या गुलामगिरीविरुध्द - म्हणजेच ब्रिटिश राजसत्तेविरुध्द येथील राजकारण तापू लागले होते. लहुजी वस्ताद यांच्या तालमीत जोतिराव नियमित जात होते ते मल्लविद्या व युध्दकौशल्य शिकण्यासाठी. 'ही लष्करी विद्या मी इंग्रज सरकारला पालथे घालण्यासाठी शिकलो' असे जोतिरावांनी 'गुलामगिरी' या त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे. पुढे 'इंग्रज आज आहेत, उद्या नाहीत. ते आपल्याला जन्मभर पुरणार नाहीत' याची जाणीव जोतिरावांनी व्यक्त केली. याचा अर्थ जोतिरावांच्या मनात स्वातंत्र्याची ऊर्मी होती व त्यांचा मूळ पिंड देशभक्तीचा होता. याचे अनेक पुरावे जोतिरावांच्या चरित्रात मिळतात. अर्थात पुढे 'सशस्त्र क्रांती आपल्या काळात अशक्य आहे' असे त्यांची विचारान्ती ठरविले. मात्र या निर्णयामुळे ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाविरुध्दचा त्यांचा राग नाहीसा झाला, असे होत नाही. ब्रिटिशांच्या गुलामगिरीचा सल त्यांच्या मनात कायमच होता. ते स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते होते. गुलामगिरीचा समूळ नाश व स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा या फ्रेंच राज्यक्रांती व अमेरिकन स्वातंत्र्ययुध्द यांच्या प्रेरणा होत्या. त्यासाठी थॉमस पेन याने आपल्या ग्रंथातून तात्त्वि आधार उत्पन्न करून दिला होता. त्याप्रमाणे गुलामगिरी विरोध हीच जोतिरावांसारख्या तत्कालीन देशभक्तांची प्रेरणा होती, हे स्पष्ट आहे. जोतिरावांच्या लेखनातून याचे पडसाद उमटत राहतात.

सामान्य व पददलित समाजघटकांवर होणारा अमानुष अन्याय व त्याविरोधातील संघर्ष हा थॉमस पेन यांच्या सामाजिक चिंतनाचा गाथा होता, मग ते अमेरिकेतील निग्रो असोत वा फ्रान्स व इंग्लंडमधील वंचित समाजघटक असोत. पेनने अमेरिकेतील निग्रो समाजाच्या गुलामगिरीचा प्रश्न मोठया पोटतिडीकीने हाताळलेला दिसतो. निग्रोंना अमेरिकेत दिली जाणारी वागणूक अन्यायकारी व विषमतायुक्त होती. याची तुलना त्याने आफ्रिकन गुलामांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीशी केली आहे. गुलामगिरीतून निग्रो समाजाची मुक्तता व्हावी म्हणून पेनने आपल्या लेखनातून आकाशपाताळ एक केले आहे. त्याच वेळी अमेरिकेतील विचारवंतांनी व सुबुध्द लोकांनी अब्राहम लिंकन यांच्या नेतृत्वाखाली निग्रोंना गुलामगिरीतून मुक्त करावे म्हणून जे अथक प्रयत्न चालविले होते, त्यांना पेनने सैध्दान्तिक व सक्रिय पाठिंबा दिला, कारण तो त्याच्या दृष्टीने मानवमुक्तीचा लढा होता.

इकडे भारतात स्त्रिया आणि शूद्रातिशुद्र हा जोतिरावांसमोरचा पीडित समाजगट असला, तरी त्यांच्या प्रश्नांची धग निग्रोंच्या प्रश्नाइतकीच तीव्र होती. स्वाभाविकपणे जोतिरावांनी पेनच्या लिखाणातून प्रेरणा घेऊन 'भारतातील विचारवंतांनी व कर्त्या सुधारकांनी या देशातील स्त्रिया व शूद्रातिशुद्र या समाजघटकांना परोपजीवी पुरोहित वर्गाच्या बौध्दिक दास्यातून मुक्त करावे' असे आवाहन गुलामगिरी या आपल्या महत्त्वपूर्ण ग्रंथातून केले. त्यातील युक्तिवाद अतिशय आक्रमक परंतु समर्पक आहेत. देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने पुरोहितवर्ग शूद्रातिशुद्रांना सर्वत्र पिळत आहे, हे त्यांनी सोदाहरण मांडले. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी जन्माधिष्ठित उच्चनीचता, वर्णवर्चस्व, जातिभेद, अस्पृश्यता यांचा पुरस्कार करून सामाजिक विषमतेला खतपाणी घातले, असा त्यांचा आक्षेप आहे. अवतारवाद, ग्रंथप्रामाण्य व मूर्तिपूजा या चालीरिती नाकारल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही, असे जोतिरावांचे प्रतिपादन आहे. उच्चवर्णीय समाज - विशेषत: ब्राह्मण वर्ग बहुजन समाजाला नीच, हीन व क्षुद्र समजतो. त्याविरोधात जोतिरावांनी बंड पुकारले. या उच्चवर्णियांनी आपल्या सुखस्वास्थ्यासाठी स्त्रियांना व शूद्रातिशुद्रांना गुलामाप्रमाणे राबविले. महारांना अस्पृश्य ठरवून त्यांच्यावर माणुसकीला काळिमा फासणारे कितीतरी कडक व हीनत्वदर्शक निर्बंध लादले. त्यांना विद्येचे दरवाजे बंद करून ज्ञानार्जनाचा हक्क नाकारला, असे आक्षेप त्यांनी या ग्रंथात नोंदविले आहेत. पुरोहितशाहीने व ब्राह्मणवर्गाने या विषमतेला खतपाणी घातले व बौध्दिक गुलामगिरी या वर्गावर लादली, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. या वर्गाने गुलामगिरीतून बाहेर पडावे असे वाटत असेल, तर विद्यार्जन हाच त्यांच्यासाठी मुक्तीचा मार्ग आहे, त्यातूनच समाजजागृती होऊ शकेल आणि याची जबाबदारी प्रामुख्याने इंग्रज सरकारने घेतली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. आपले हे म्हणणे त्यांनी ज्या शब्दांत मांडले आहे, त्याला ऋषिमुनींच्या मंत्रोच्चाराचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. ते म्हणतात,

विद्येविना मती गेली । मतिविना नीति गेली ।

नीतिविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शुद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।

याचबरोबर एकेश्वरवाद, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या जीवनमूल्यांचा सर्व समाजाने मनोमन स्वीकार केल्याशिवाय व त्याप्रमाणे व्यवहार केल्याशिवाय सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटणार नाही, असे जोतिराव म्हणतात. शेवटचा मुद्दा - जोतिराव मूलत: ब्राह्मणद्रेष्टे नव्हते. त्यांचा विरोध पुरोहितशाहीला व ब्राह्मण्यवृत्तीला आहे. म्हणूनच ते या ग्रंथात म्हणतात, 'धार्मिक ग्रंथाधारे दुसऱ्यावर धार्मिक व सामाजिक गुलामगिरी लादण्याची रूढी व परंपरा ब्राह्मणांनी सोडली, तर आमचा त्यांच्याशी काहीच दावा असण्याचे कारण नाही.' 'तृतीय रत्न' हे नाटक, 'सत्सार 1-2', 'इशारा', 'ब्राह्मणाचे कसब', 'अखंडादी रचना' या जोतिरावांच्या लेखनात त्यांच्या या समाजचिंतनाचे पडसाद कमी-अधिक तीव्रतेने उमटलेले दिसतात. सारांश - प्रश्न भिन्न असले, तरी त्यांच्याकडे बघण्याची पेन व जोतिराव यांची दृष्टी सारखीच होती, कारण मानवमुक्ती हाच त्या दोघांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता.

The Age of Reason या ग्रंथात थॉमस पेन यांच्या धर्मचिंतनाचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यात त्याने आपल्या धर्मविषयक कल्पना व धारणा यांची चर्चा केली आहे. त्या चर्चेचे स्वरूप आपण यापूर्वी पाहिले आहे. कोणत्याही धर्मात असणाऱ्या तत्त्वांची वा सिध्दान्तांची समीक्षा, चर्चा वा चिकित्सा जर तो धर्म नाकारत असेल तर तो धर्मच नव्हे, असे पेनचे परखड मत होते, हेही आपण पाहिले आहे. या पेनच्या ग्रंथाचा प्रभाव जोतिरावांच्या धर्मचिंतनावर पडला आहे, हे त्यांच्या 'गुलामगिरी' व 'सार्वजनिक सत्यधर्म' या ग्रंथांतून स्पष्ट होते. खरे म्हणजे सामाजिक प्रश्नांची चर्चा करताना जोतिरावांनी त्या त्या ग्रंथात धर्माविषयीची आपली मते थोडयाफार प्रमाणात मांडली आहेत. कारण धर्मचिंतन व समाजचिंतन हे विषय कप्पेबंद असू शकत नाहीत, अशी त्यांची धारणा होती.

समाज आणि धर्म यांच्या परस्परसंबंधांची चर्चा करताना जोतिरावांनी 'कोणत्याही सामाजिक प्रश्नाचा उगम कुठे ना कुठे धर्मातील तत्त्वप्रणालीत झालेला असतो, म्हणून धर्मचिकित्सा महत्त्वाची' असे मत जोतिरावांनी मांडले आहे. ते पेनप्रमाणेच एकेश्वरवादी होते. बहुदेववाद ही कल्पना अज्ञानमूलक व भ्रामक आहे, असे त्यांचे मत होते. 'ईश्वर हा चराचर सृष्टीचा निर्माता व नियंता. मानवी स्त्री-पुरुष ही त्याची लेकरे. तो त्यांचा पोशिंदा, न्यायदाता व उध्दारक. निर्मिकाची न्यायनिष्ठा व दयार्द्रता परस्परपूरक असतात. सत्कर्माचे चांगले फळ व दुष्कर्माला शासन यातून ईश्वराचा न्यायीपणा दिसतो. ते त्याच्या नैतिक जबाबदारीचे तत्त्व आहे. ईश्वराच्या क्षमाशीलतेमुळे स्खलनशील माणसाला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते. मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या विचार करण्याच्या शक्तीत आहे. त्याच्या साहाय्याने सृष्टिज्ञान मिळविण्याचा व निर्मिकाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न माणसाने करावा. माणसाच्या बुध्दीला मर्यादा आहेत, आपण अपूर्ण आहोत याचे भान आले तरच माणूस ईश्वर शरण होऊ शकेल. धर्माला मध्यस्थाची गरज नाही. प्रचलित चालीरिती, रूढी, परंपरा व अंधश्रध्दा यांचा धर्माशी काडीचाही संबंध नाही. धर्मात शिरलेले सर्व दोष हे मानवनिर्मित आहेत. त्यामुळे त्या दोषांवर, उणिवांवर, अपप्रवृत्तींवर टीका करणे, हे धर्मकृत्यच आहे. मनुष्य हा धर्मविचारांचा केंद्रबिंदू आहे. ईश्वर व मानव यांच्या परस्परसंबंधांचे दिग्दर्शन व त्यानुसार मानवी जीवन साफल्याचा विचार हे खऱ्या धर्माचे पवित्र कार्य आहे. 'सर्व मनुष्ये ईश्वराने जन्मत:च स्वतंत्र निर्माण केली आहेत. त्यामुळे त्यांचे मूलभूत अधिकार हे नैसर्गिक व स्वयंसिध्द आहेत. ते कोणी कोणाला द्यायचे व नाकारायचे हा प्रश्नच उद्भवत नाही. धर्म ही कोणा एका जनसमूहाची मिरासदारी नाही.' या शब्दात सूत्ररूपाने जोतिरावांच्या धर्मचिंतनाचा सारांश मांडता येईल. यावरून पेन व जोतिराव यांच्या धर्मचिंतनाचा गाभा किती समान आहे, हे लक्षात येईल.

 

-6-

थॉमस पेन याने आपल्या एकूण लेखनाविषयी जो अभिप्राय नोंदवून ठेवला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणतो, 'लेखन करताना मी अगदी साधी, सोपी, स्पष्ट आणि सहज अर्थबोध होईल अशी भाषा वापरतो. अप्रत्यक्ष सूचना व सौम्य इशारे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही. याला माझ्याजवळ तीन कारणे आहेत. पहिले - माझ्या म्हणण्याचा आशय नीटपणे लोकांच्या ध्यानात आला पाहिजे. दुसरे - माझी कळकळ आणि निर्धार याची वाचकांना खात्री पटली पाहिजे आणि तिसरे - खोटेपणाकडे, स्वयंतुष्टतेने डोळेझाक करणे हा सत्याचा उपमर्द आहे, असे मी मानतो.' थॉमस पेन यांचा हा त्यांच्या स्वत:च्या लेखनावरील अभिप्राय जोतिरावांच्या वाचनात आला होता की नाही, हे कळायला मार्ग नाही. मात्र आपण आपले वाङ्मय कोणासाठी व कोणत्या हेतूने लिहितो, याची जोतिरावांना स्वच्छ जाणीव होती. याची तीन कारणे आहेत. पहिले - त्यांना स्त्रिया व शूद्रातिशूद्र यांच्या मनात स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविषयी व गुलामगिरीविषयी चीड निर्माण करावयाची होती. दुसरे - वर्णश्रेष्ठत्वाविषयी त्यांच्या मनात जी अकारण न्यूनगंडाची भावना होती, ती त्यांना दूर करावयाची होती. तिसरे - पददलितांना गुलामगिरीत डांबून ठेवणाऱ्या लोकांच्या भंपकपणाचे बुरखे टराटरा फाडून अशा लोकांच्या मनोवृत्तीतील घृणास्पदता त्यांना उघडकीस आणायची होती. त्यामुळे त्यांचे लेखन काहीशा भडक लोकभाषेत झालेले दिसते. आपण स्वान्तसुखाय किंवा आत्मानंदासाठी कलावंतांच्या भूमिकेतून लेखन करीत नसून समाजाशी त्यांच्या प्रश्नांबाबत थेट संवाद साधणे हा आपला लेखन हेतू आहे, अशी त्यांची भूमिका होती. जोतिरावांना असलेली सामाजिक प्रश्नांविषयीची जाण, त्याविषयीचे त्यांचे आकलन, त्यांच्या मांडणीतील स्पष्टवक्तेपणा व आक्रमकता पाहिली, म्हणजे पेन आणि जोतिराव यांच्या भाषेतील व लेखनशैलीतील सारखेपणा सहज नजरेत भरतो. जोतिरावांना जर त्यांच्या स्वत:च्या लेखनाविषयी अभिप्राय विचारला असता, तर कदाचित त्यांनी पेनच्याच शब्दांचा आधार घेतला असता. अनेकदा आक्रमक भूमिका हीच बचावाची परिणामकारक हमी असते या सर्वमान्य तत्त्वाशी पेन व जोतिराव इमान राखून होते, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही.

जोतिरावांच्या भाषाशैलीबद्दल आणखी सांगायचे, तर त्यांची भाषा ही या मातीतील व अस्सल मराठी वळणाची भाषा आहे. त्यामुळे या मातीतील सत्त्व तिच्यात उतरले आहे. त्यामुळे ते रांगडया लोकभाषेत लिहितात. पाश्चात्त्य जगातील विचारांचा ते आदर करीत, पण त्याचे दडपण त्यांच्या मनावर नसे. उलट ते देशानुकूल करून घेण्यावर व त्या प्रकाशात येथील सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्यात त्यांना स्वारस्य होते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या भाषेची व विचारांची नाळ कायमच येथील जनसामान्यांशी, कष्टकरी वर्गाशी जोडलेली दिसते.

पेन आणि जोतिराव यांच्यात आणखी एक साम्य जाणवते. पेनने आपल्या राजकीय चिंतनात जे मुद्दे मांडले, त्यांचा अंतर्भाव अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात व फ्रान्सच्या राज्यक्रांतीनंतरच्या राज्यघटनेत करण्यात आला. तद्वत, जोतिरावांनी ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणातील झिरप सिध्दान्त नाकारून 5 ते 12 या वयोगटातील मुलामुलींसाठी सार्वत्रिक, सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद करून त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, असे जे निवेदन 1882 साली हंटर कमिशनसमोर दिले, त्याचेच प्रतिबिंब पुढे शंभर वर्षांनंतर भारतीय राज्यघटनेत पडलेले दिसते. 5 ते 15 या वयोगटातील बालकांसाठी, शिक्षणाचा मूलभूत अधिकार आता राज्यघटनेत मान्य करण्यात आला आहे, याचे श्रेय जोतिरावांच्या द्रष्टेपणाला दिले पाहिजे. दुसरे म्हणजे स्त्रियांच्या व शूद्रातिशूद्रांच्या उन्नतीसाठी जोतिरावांनी जे मुद्दे मांडले, त्यातील आरक्षणासारख्या अनेक मुद्दयांचा समावेश राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानच्या राज्यकारभारात करून घेतला आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून त्याची अंमलबजावणीही केली. यातही जोतिरावांचा द्रष्टेपणा दिसतो.

एका बाजूला स्त्रिया व शूद्रातिशूद्र हे जोतिरावांच्या सामाजिक संघर्षाचे केंद्रबिंदू आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणप्रसार, ज्ञानविस्तार, विचारजागृती, ब्राह्मणशाहीशी संघर्ष ही त्यांच्या लढाईची शस्त्रे आहेत. दास्यमुक्तीच्या या लढयात संपूर्ण समाजाने सहभागी झाले पाहिजे, असा जोतिरावांचा आग्रह होता. दुखणे जुनाट आहे, त्यामुळे औषधयोजनाही दीर्घकाळ करावी लागणार, याचे जोतिरावांना भान आहे. समाजाची बदल स्वीकारण्याची गती किती मंद असते याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे आमूलाग्र समाजपरिवर्तनाची ही लढाई दीर्घकाळ चालणार, हे त्यांनी ओळखले आहे. ते एके ठिकाणी म्हणतात, 'अति सुधारलेल्या अमेरिकन लोकांपैकी अर्ध्या लोकांनी आपल्या खासगत देशबांधवांबरोबर तीन वर्षे जंग केल्याशिवाय आपल्या हातातून दासांस (निग्रोंना) सोडले नाही... तर मग अशिक्षित, अज्ञानी, अतिशूद्रांचे काय?' याचा मथितार्थ असा की भारतातील समाजसुधारणेचा रस्ता खूप लांबचा व दमछाक करणारा आहे. मात्र आपल्याला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचण्याचा तो एकमेव रस्ता असेल, तर तो सगळयात जवळचा रस्ता आहे याची जाणीव पेनला होती व जोतिरावांनाही.

जोतिरावांनी आपल्या विचारावर व व्यवहारावर थॉमस पेन यांचे ऋण मोकळेपणे मान्य केले असले, तरी त्याचे त्यांनी अंधानुकरण केले नाही. पेनच्या विचारांनी सामाजिक प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी जोतिरावांना मिळाली, हे खरे आहे. पण त्यांनी आपल्या देशातील सामाजिक प्रश्नांचे जमिनीवरील वास्तव लक्षात घेऊन आपल्या विचारांची व कार्याची मांडणी केली, हे महत्त्वाचे. तत्कालीन महाराष्ट्रातील प्रबोधनाची व समाजसुधारणेची चळवळ प्राय: उच्चवर्णीयांच्या सामाजिक प्रश्नांभोवती फिरत होती. तिचा परीघ वाढवून ती सर्वसमावेशक (Inclusive) या अर्थाने महाराष्ट्रातील समाजप्रबोधन व परिवर्तनाची कोंडी त्यांनी फोडली. समाजातील शोषित, पीडित, वंचित व दुर्लक्षित समाजघटकांपर्यंत ही चळवळ पोहोचविली. तळागाळातील समाजघटक या चळवळीच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले. थॉमस पेन यांचीही समाजपरिवर्तनामागील भूमिका हीच होती. भारतात हा विचार व त्याचा अनुरूप कार्य जोतिरावांनी महाराष्ट्रात रुजवले, हे त्यांचे ऋण मान्य करणे म्हणजेच त्यांच्या विचारांचे व कार्यांचे मोठेपण व द्रष्टेपण मान्य करणे होय!

- प्राचार्य श्याम अत्रे

9324365910

shyamrao.atre@gmail.com