चूकभूल... फक्त घेणे...

विवेक मराठी    27-Oct-2017
Total Views |

 

'भाभीं'चा नवरा बँकेच्या नोकरीत नडियादच्या शाखेत कामाला होते. तिथे सगळया गुजराथी अडोसपडोसमध्ये भाभींचं 'भाभी' हे नाव पडलं. पुढे महाराष्ट्रात राहायला आल्यावर 'भाभी' हे नाव त्यांच्या घरादाराला, राहणीसाहणीला शोभत नाही, असं अनेकांना वाटायचं. अगदी स्वत:च्या नावापासून ते मुला नातंवंडांपर्यंत, नातवंडांच्या आहाराबाबत, शिस्त लावण्याबाबत, लाड करण्याबाबत, मुलांच्या व्यग्रतेबाबत. त्यांची मदत मागण्याबाबत. त्यांनी दिलेल्या सुविधा नाकारण्याबाबत. पोटच्या मुलांना हाताळण्याबाबत. लांबच्या नातेवाइकांवर विसंबण्याबाबत, घराबाबत, घरधन्याबाबत, प्रेम बाळगण्याबाबत, प्रेम दाखवण्याबाबत. कुठेच कसे बरोबर वागू शकत नाही आपण? हाच विचार भाभींच्या मनात सतत घोळत होता. नेहमीच माणसामाणसात वाद, भांडण, संघर्ष होतात. तेव्हा मांडवली एकवेळ करता येते. 'चू.भू.द्या.घ्या.' म्हणता येतं. अजस्र... अज्ञात... अदृश्य... अशरीरी काळाशी हा संवाद कसा साधणार? का इथून पुढे आपल्याला, आपल्यासारख्यांना 'चुकभूल... फक्त घ्यावी' असं म्हणत राहावं लागणार?

 काळी सकाळी, म्हणजे चांगले पावणेसहा वाजून गेल्यावर स्वयंपाकघरातून काहीतरी खुडबूड ऐकू आली, तेव्हा भाभी दचकून उठल्या. सोनू उठला असणार. सकाळच्या गणिताच्या क्लासला जाण्याची तयारी करत असणार. आता जो क्लास-शाळा-खेळ चक्र सुरू होईल, ते दिवसभर चालूच राहील बिचाऱ्याचं. दमतो मग तो. घरात सगळेच दिवसचे दिवस घाण्याला जुंपलेले असतात. घरी रिकाम्या बसलेल्या आपणच सतत मदतीचा हात पुढे केला पाहिजे. भाभी धडपडत स्वयंपाकघरात आल्या. सोनूच्या हातातलं दुधाचं पातेलं काढून घेत म्हणाल्या,

''तू आवर तुझं. मी देते दूध तुला प्यायला.''

''दे. साखर खूप घालू नकोस. मम्मा म्हणते, आजींनी दुधात जास्त साखर घालून घालून तुझे दात किडवून टाकल्येत.''

''बरं.'' असं म्हणत भाभींनी दुधाचा ग्लास आणि साखरेचा डबा त्याच्यासमोर ठेवला. कोरडेपणाने म्हणाल्या, ''तुझी तूच घे साखर घालून. उगाच मी घातली, जास्त घातली असं नको.''

वाढत्या वयात मुलांना साखरेचं अपथ्य कसलं? उलट त्यांनी दोन घास जास्त खावे यासाठी वेळप्रसंगी थोडं गोडाचं आमिष दाखवायला काहीच हरकत नाही, असं भाभींना वाटायचं. म्हणजे स्वत:ची मुलं वाढवताना वाटायचं. त्यांची तिन्ही मुलं चांगल्या अर्थाने चांगलीच वाढली होती. पण ती जुनी गोष्ट. नातवंडांच्या वाढवण्यात आपण आपली मतं देऊ नयेत! भाभींनी कितव्यांदातरी मनाला समजावलं. पण ऐन वेळी राहवत नसे. नातवंडांबाबत काहीतरी ठरवण्याची, बोलून जाण्याची 'चूक' हातून घडे. आजतरी तशी घडू नये, असं मनाशी ठरवत भाभी व्हरांडयात फेऱ्या मारायला गेल्या. डायबेटिस झाल्यापासून डॉक्टरांनी त्यांना 'जास्तीत जास्त चाला' असा सल्ला दिला होता.

जराशाने दरवाजा धाडकन आपटत सोनू खोलीतून व्हरांडयात आला, तेव्हा तो क्लासला जायला निघालेला होता. सँडलची बकलं धड न लावताच तो त्याचे पट्टे तसेच फरपटत फरपटत सायकलजवळ जायला लागला, तेव्हा भाभींना राहवलं नाही.

''अरे, पडशील... पट्टा अडकेल कुठेतरी... तसा जाऊ नकोस. पट्टा शिवून घे म्हटलं होतं ना?''

''वेळ नाही मिळाला.''

''दुसरे सँडल घाल. आत आहेत ना तुझे दुसरे सँडल?''

''आता कुठे आत जाणार? आधीच मला लेट झालंय.''

''थांब, मी आणून देते'' भाभी लगबगीने आत गेल्या. आतला दुसरा सँडलजोड हातात घेऊन आल्या. त्याच्या पायाजवळ तो टाकला आणि समजुतीने म्हणाल्या,

''ठेव ते जुने सँडल इथेच. मी आणेन दुरुस्त करून. तू जा हे चांगले घालून. एवढं तर करू शकतेच ना आजी तुझ्यासाठी?'' यावर त्याने काहीच प्रतिक्रिया न देता सायकलच्या कुलपाला किल्ली लावली. त्याच्या जात्या आकृतीकडे थोडं कौतुकाने, थोडं रागाने बघत भाभी जुने सँडल घेऊन घरात शिरल्या.

आतापर्यंत शुभंकर आणि त्याची बायको उठून बाहेर आले होते. आपल्या आईची आतबाहेर चाललेली लगबग बघून शुभंकरने त्याबाबत विचारलं. भाभींनी नातवाची सगळी 'कर्तूद' सांगत समारोप केला.

''शेवटी मीच म्हटलं, आज मी आणते तुझं पायताण दुरुस्त करून.''

''का?''

''मी आहे इथे म्हणून.''

''तुम्हाला लाखदा सांगितलं, मुलांची कामं तुम्ही करत जाऊ नका. त्यांचं त्यांना करू द्या. पुढे हॉस्टेलवर गेली, जगभरात कुठेही गेली तर त्यांच्या गोष्टी त्यांनाच कराव्या लागणार आहेत ना? तुम्ही त्यांच्या चुकीच्या सवयी लावून ठेवू नका. पण...'' शुभंकरची बायको त्वेषाने म्हणाली. उगाच तिच्या दिवसाची सुरुवात ताणाने केल्यासारखं होऊ नये, म्हणून भाभी गप्प बसल्या. ती खूपदा मुलांच्या 'स्वावलंबनाबाबत' बोलायची, हे खोटं नव्हतं. पण समोर आणि रिकाम्या असलेल्या आजीला चटकन पुढे होऊन नातवंडाला मदत करावीशी वाटते, हे मधल्यांना कसं कळावं? जाऊ दे! आपणच ही चूक पुन्हा करायला नको. भाभींनी स्वत:ला समजावलं. शुभंकरला त्यांचा बदलता नूर जाणवला. तोही सामोपचाराला लागला.

''ट्राय टू अंडरस्टँड भाभी. काळ बदललाय. मुलांना एवढं सतत संरक्षण देत बसून नाही चालायचं आताच्या दिवसात. ओके?''

''ठीक आहे.''

''तू फारशी बाहेर पडत नाहीस. तुला माहीत नाहीये बाहेरचं जग कसं झालंय ते... हं? म्हणून ही म्हणत असते अधूनमधून... हं... नो ऑफेन्स मेण्ट... हं?''

''सोड रे... एवढयाशा मुद्दयावर कसली आलीये ही भाषा? चलो, आगे बढो.''

भाभी खरंच 'आगे बढल्या'. पटकन आंघोळ उरकून लॅपटॉपसमोर बसल्या. आतमध्ये मुलगा, सून, स्वयंपाकाची बाई, त्यातच फोन, मेसेजेस - दिवसाची लढाई सुरू होती. गेली तीन-चार वर्षं त्या लॅपटॉप वापरत होत्या. चुकायच्या, विसरायच्या, अनेकदा निम्म्यात वैतागून तो बंद करायच्या. पण हळूहळू त्याच्यात त्या रमत चालल्या होत्या. आणि आज तर मनूला मेल करण्याची हौसच होती. त्यांनी खूपसं एकाग्र चित्त करून, त्यांच्या परीने अतोनात मेहनतीने लॅपटॉपवर पत्र लिहिलं. पण ते 'सेंड' होईना. मनूचा पत्ता बरोबर होता, नेमकी हवी तीच बटणं त्या दाबत होत्या. तरीही... का कोण जाणे... शुभंकर घाईघाईने ऑफिसला जायला निघाला, तेव्हा नाइलाजाने त्यांना बोलावं लागलं.

''हे कसं होतंय बघतोस का रे?''

''बस का? आता घाईत हेही करायचं का?''

''राहू दे.''

''तुला शंभरदा म्हटलं होतं. छानसा स्मार्टफोन घेऊन देतो. आरामात कोचवर बसून, हवं तेव्हा लिही. स्काईप कर. तर ते नाही.''

''अरेऽ आता माझ्यावर कशाला एवढा खर्च?''

''हेच तुझं चुकतं भाभी. मी एवढी ऑफर करतोय. घे तू स्मार्ट फोन. मी खर्च करायला तयार आहे. कधी पैशांबद्दल तक्रार करत नाही. मग तुझाच का विरोध?''

शुभंकरचं म्हणणं खोटं नव्हतं. त्याच्याकडे पैसा बरा होता आणि आईसाठी खर्च करण्याची तयारीही. पण भाभींनाच धीर होत नसे. अपराधी वाटे... आता आपल्यावर खर्च कशाला? मुलांचं, नातवंडांचं सगळं अगोदर व्हावं. हौस, चैन, गरजा, छंद... सगळयावर आधी हक्क त्यांचा. असं मानण्यात आपलं काही चुकलं का? चुकतंय का? भाभी विमनस्कपणे घरभर फिरत राहिल्या. घरात खूप पसारा होता. आवराआवरी, साफसफाई करणं शक्य होतं. भाभी करूही शकल्या असत्या, पण सुनेला त्यांची ढवळाढवळ आवडत नसे. ''एवढाल्ले पगार देऊन मोलकरणी ठेवायच्या, त्या काय आपण कामं करण्यासाठी? तुम्ही मध्ये मध्ये केलंत की त्यांचं फावलंच. शिवाय जगापुढे बोभाटा होणार... एवढं वय झालं तरी म्हातारीला कामं करायला लावतात.''

दिवसेंदिवस आपलं जरा जास्तच चुकायला लागलंय की काय? काय काय दुरुस्त करायचं? सावरून घ्यायचं?

40 वर्षांहून जास्त संसार झाला होता भाभींचा. तीन मुलं लहानांची मोठी करून झाली होती. नातेवाईक, कुटुंबकबिला सांभाळून झाला होता. बेताच्या पैशात टुकीने राहून झालं होतं. फार मोठं यश नसेल नावावर, पण अपयशाचं धनीही कधी व्हावं लागलं नव्हतं. नवरा असेपर्यंत वाद व्हायचे. तुझं हे चुकलं, ते चुकलं वगैरे तो ऐकवायचा. पण मग भाभीही संधी पाहून परतवार करायच्या. एकूण आपापसातले आरोप-ठपके सोडले तर बाहेरून तरी तुमचं 'हे चुकतं', 'ते चुकतं' वगैरे ऐकून घ्यायची वेळ आली नव्हती. सवय तर मुळीच लागली नव्हती. म्हटलं तर बरं नाव होतं घरादारात. मग तो सगळा बरेपणा, भलेपणा आता कुठे गेला? कोणाला विचारावं? विचारणं चुकेल का? भाभी स्वत:शीच खल करत बसल्या.

अस्वस्थपणे... विमनस्कपणे घरभर फिरत... भिरभिरत राहिल्या. तेवढयात सँडी कॉलेजला जायच्या तयारीत बाहेर आला, तेव्हा क्षणात त्यांचा चेहरा उजळला. नातवंडांना पाहिलं की असंच व्हायचं त्यांचं. लख्ख प्रकाशासारखा आनंद... निर्मळ पाण्याची फेसाळ धार... वाऱ्याची शिरशिरी...

''निघालात मिस्टर कॉलेजला?''

''का गं ? काय हवंय?''

''नाही... ती मनूची मेल... कितीदा सेंड केली तरी...''

''आर यू शुअर? तू सेंडच दाबलंस?''

''हो... म्हणजे नेहमीसारखं... तुम्हीच शिकवलंयत...''

''कमॉन आजी... खूपखूप दिवसांनी लॅपटॉपवर बसलीस की असंच होणार ना... तुला सांगतो... रोज अर्धा तास मशीनवर... प्रॅक्टिससाठी तरी... बघतो आता संध्याकाळी...'' सँडी फिस्कारला. त्याचा बाप कालच भाभींना म्हणाला होता, नीट कळत नसताना मशीनशी खुडबूड करतेस हेच चुकतं तुझं. त्या वेळी मनाचा कोपरा मोडला होता. आता एवढं वाटलं नाही.

कॉलेजला जायची गडबड, दुसरीकडे दहादा वेगवेगळया कोनांमधून आरशात केस बघण्याचा खटाटोप, मध्येच फोनवर मित्राचा मेसेज वाचणं अशा धुमश्चक्रीत अडकलेल्या या आपल्या नवथर नातवाचं ते फिस्कारणंही भाभींना गोड वाटलं. कालपरवापर्यंत आपल्या अंगाखांद्यावर खेळलेलं हे पोर आता आपल्यालाच शिकवतंय, यातली गमतीची भावना मनातल्या नाराजीवर मात करून गेली.

''बरं... सँडी सर. पुन्हा नाही चुकणार... प्रॉमिस...'' वगैरे हसून बोलून त्यांनी सावरून घ्यायचा प्रयत्न केला. पण ते ऐकायलाही सँडी थांबला नाही. त्याला वेळ नव्हता. भाभींपुढे अाता दिवसभर वेळच वेळ होता. मुलगा-सून नोकऱ्यांवर, दोन्ही नातवंडं शाळा-कॉलेजात अशी निघून गेली की त्या दिवसभर घरी टी.व्ही.च्या, फोनच्या किंवा नोकरचाकरांच्या सोबतीत असायच्या. खेरीज त्या त्या दिवशी मनात घोळणारा एखादा मुद्दा किंवा विषय वगैरे...

जसा आज मनूच्या मेलचा मुद्दा होता. थोरली मनस्विनी लग्न झाल्यापासून गेली वीस वर्षं व्हर्जिनियामध्ये राहत होती. नुकतंच तिने नवीन घर घेतलं होतं. त्याची वास्तुशांत करण्यासाठी आपल्या नेहमीच्या उपाध्यांकडून इथे एक चांगला मुहूर्त काढून घेऊन तो तिला कळवण्याची 'गोड' कामगिरी भाभींनी अंगावर घेतली होती. फोनवरच्या बोलण्यात, ऐकण्यात थोडं मागेपुढे होऊ शकतं. त्यापेक्षा सगळया वास्तुशांतीचा तपशील नीट लिहून पाठवणंच बरं पडेल, या कल्पनेने भाभींनी मेल पाठवण्याची धडपड केली होती. वयाच्या साठीनंतर चुकतमाकत शिकूनही त्यांनी तितपत यंत्रकौशल्य हस्तगत केलं होतं खरं तर.. पण आज, कोण जाणे, कशामुळे, कुठेतरी, काहीतरी गफलत...

रिकामपणामुळे भाभींच्या डोक्यात तोच विषय घोळत राहिला. त्याविषयी बोलायला समोर कोणी नव्हतं, म्हणून त्यांनी यशोला फोन लावला. यशो धाकटी लेक. ती गावातच राहायची आणि घरच्या घरीच काहीतरी कुकिंगचे क्लासेसबिसेस चालवायची.

''अगं यशोऽ आज जरा गडबडच झाली गं. वास्तुशांतीचा मुहूर्त, पूजासाहित्य, कलशाची तयारी वगैरे सगळं एवढं लिहिलं मी. पण नेमकं बाई माझ्या हातून...''

यशोवर भाभींचा भडिमार सुरू झाला. तिने जरा वेळ तो ऐकून घेतला, पण लवकरच कंटाळून थांबवत म्हटलं,

''जाऊ दे नं आई, ती काय लहान आहे का आता? का नवी आहे परदेशात की बाई तिला जमणार नाही? तू कशाला इथे बसून सगळं हाकायला बघत्येस?''

''असं कसं? तिकडे एकटी पडत असेल बिचारी... म्हणून माझा तिच्यात जीव... नाही राहवत आताशा...''

''तिला एकटं पाडताना नाही झालं तुझ्या जिवाला काही? एवढी काळजी होती, तर करायचं नव्हतं परदेशी राहणाऱ्या माणसाशी लग्न. हेच चुकतं तुम्हा लोकांचं. इथे राहून तिथल्यांची काळजी करत बसणं... ते तिकडे मजेत असतात खारे पिस्तेबिस्ते खात आणि इकडे आमच्या डोक्याला खुराक...'' यशो तिच्या नेहमीच्या ट्रॅकवर गेली. लग्नानंतर मनू परदेशी गेली होती, यशो इथेच होती. आपापल्या परीने जी ती सुखातच होती; पण मनातले अंधारे कोपरे असे मध्येमध्ये चमकून जायचे. यशोला वाटायचं, आईला नेहमीच मनूचा ओढा वाटतो. मनूला वाटायचं, यशोला बरी ऊठसूठ आईची मदत मिळते. आईची तिच्या मुलांकडेच जास्त माया वळते. आपली मुलंपण नातवंडं नाहीत का हिची? वगैरे वगैरे. पण दोघींच्या तोंडच्या वाक्यांचा सारांश साधारण सारखाच असायचा. आई, तुझं आमच्या बाबतीत हे... हे... हे... हे... चुकतंय किंवा चुकलंय.

''वेडया आहेत दोघी न् दुसरं काय!'' भाभींनी स्वत:शीच म्हणत फोन ठेवला. काटर्यांनो, तुमची हगणीमुतणी मी काढलीयेत... तुम्ही माझ्या चुका काय काढताय? त्याही मुळामध्ये नसलेल्याच? वगैरे वाक्यं कधीतरी दोघींना ऐकवायला हवीत हेही स्वत:शीच म्हटलं... यशोला सासऱ्यांचं घर आयतं मिळत गेलं होतं, पण मनू परदेशात आपली वास्तू उभारू शकली होती. कपडयांच्या फारतर एकदोन बॅगा घेऊन परदेशी गेलेली आपली मुलगी एवढी मजल मारू शकली, याचा त्यांना मनापासून आनंद होता. अभिमानही वाटत होता. शरीराने त्या तिच्या वास्तुशांत समारंभाला जाऊ शकत नसल्या, तरी मनाने केव्हाच तिथे पोहोचल्या होत्या. मुलगा शुभंकर त्यांना यावरून नेहमी चिडवायचा, ''भाभी... तुझं म्हणजे अगदी भारतात राहणाऱ्या मुसलमानांसारखं चालतं बरं का! कायमच! मुक्काम इथे आणि मनाचा सारा ओढा तिथे.''

''हो ना रे... चुकतंच नाही का हे? पण काय करणार? एकदा बाई आई होऊन चुकली की असल्या एकेक चुकींची धनीण होणारच ना...''

''भाभी तुसी ग्रेट हो!'' शुभंकर चेष्टेवारी न्यायचा.

सर्वात तो थोरला. त्याच्या लहानपणी भाभींचा नवरा म्हणजे त्यांचा जन्मदाता बँकेच्या नोकरीत नडियादच्या शाखेत बदलून गेला होता. तिथे सगळया गुजराथी अडोसपडोसमध्ये भाभींचं 'भाभी' हे नाव पडलं. इतकं पडलं की, खूपदा त्यांचा नवराही 'भाभी सांगेल तसं', 'भाभीला विचारून करा.' असं म्हणायला लागला. पुढे महाराष्ट्रात राहायला आल्यावर 'भाभी' हे नाव त्यांच्या घरादाराला, राहणीसाहणीला शोभत नाही, असं अनेकांना वाटायचं. पण अंगावरच्या कपडयासारखी नावं थोडीच पटापटा बदलता येतात? जरा जाणत्या वयात आल्यावर दोघी मुलींनी एक दिवशी आपापसात ठरवून भाभींना 'आई' म्हणायला सुरुवात केली. ''आमची नावं माऽऽऽ रे 'यशस्विनी' आणि 'मनस्विनी' अशी भारदस्त ठेवलीस आणि तू काय 'भ्याभ्यी' म्हणवून घेणार? नो वे. आमच्यासाठी आता तू आईच!'' असं मुलींनी त्यांना नावापासून दुरुस्त करून घेतलं. पुढे अमेरिकेत गेल्यावर मनूने खूपदा वैतागून फोनवर सुनावलं होतं, 'कसलं टंग टि्वस्टर नाव ठेवलंयस आई तू माझं? इथे एकाला धड मनस्विनी म्हणता येत नाही. सगळे 'मैस्वी' म्हणतात मला. मैस्वी... शिवी दिल्यासारखं वाटतं एकेकदा.' यावर हसून भाभींनी आपली ती 'चूक' पदरात घेतली होती. पदर मोठ्ठा काढायच्या त्या.

शेवटी या सगळया जुन्या गोष्टी. आज महत्त्वाचं काय? तर चि. मनूला वास्तुशांतीचा तपशील वेळेत आणि नीट कळवणं. काय करावं?... कोणाला हाताशी धरावं?... भाभी विचारात घरभर फिरत राहिल्या. अगदी मागच्या अंगणापर्यंत पोहोचल्या, तर बाहेर कामवाल्या बाईकडून पुकारा सुरूच. सोबत बेलचा गजरही

''भाभी, अहो भाभी...''

''आले...''

''केव्हाधरून आवाज देत्येय मी... शेवटी परत माघारी जाणार होते. माहितीये?''

''आले... येत्येय... आणि माघारी जायचा विचार पण करू नकोस बये... आजचं घरातलं काम राहिलं तर संध्याकाळी घरी आल्यावर 'ती' शंख करेल माझ्या नावाने!'' भाभी आपल्या सुनेचं नाव क्वचितच घेत. 'ती', 'तिला', 'तिचं' असंच चालायचं खूपदा. त्यावरून शुभंकरने सुनावलंही होतं मागे एकदोनदा. 'तूच कमी पडलीस तिला माया लावण्यात. साधं नावानं हाक मारणं होईना तुझ्याने.' भाभींची सासू त्यांना 'ती' म्हणायची, तसं त्या सुनेला म्हणायला लागल्या होत्या. एवढंच होतं खरं त्यांच्या बाजूने. एरवी त्यांनी सुनेचं जाणूनबुजून काही कमी केलं नव्हतं. करायचं कारणही नव्हतं, पण बोट ठेवायला एक चूक राहिली खरी, असा विचार करत एक दुखरा पाय ओढत पुढचा दरवाजा उघडायला येईपर्यंत भाभींना अंमळ वेळच लागला. एवढयातल्या एवढयात त्यांचं शरीर थोडं मंद झालं होतं. छोटयाशाही कामाला आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागतोय, छोटयाशाही निर्णयाप्रत येईपर्यंत जरा गडबड उडत्येय असं जाणवायला लागलं होतं. 'म्हातारपण, म्हातारपण' म्हणतात ते हेच असावं, असं मनाशी म्हणत त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडायचाच अवकाश, विजेच्या वेगाने आत शिरत कामवाली बडबडायला लागली.

''हल्ली तुमचं हे फार वाढलंय हं भाभी.''

''काय वाढलंय माझं?''

''तंद्रीत राहणं, पटकन लक्षात न येणं, खोळंबून ठेवणं दुसऱ्याला.''

''तसं नाही गं. पाऽऽर मागे होते ना तिकडे उभी.. तिथे नसेल ऐकू आली पहिली बेल. होतं ना एखाददा असं.''

''लांबलचक बोळकंडीसारखं घर बांधून ठेवलंयत एकदा... म्हणून होतोय त्रास. दार कुठे... तुम्ही कुठे...''

''आता आहे खरं तसं...''

''आता सोताचा प्लॉट घेऊन सोताचं घर करायचं म्हटल्यावर मस्स बैजवार पंज्यासारखा चौकोनी प्लॉट घेवावा की नाही माणसानं? चारी अंगांनी सारख्या खोल्या निघतील असा!... तुमची झाली मेलगाडी... जन्मभर निस्तरायला...''

आपला तब्बल तीन-चार मिनिटांचा खोळंबा झाल्याचा वैताग कामवालीने असा बाहेर काढला होता तर. बाकी सगळा दोष तिचा नव्हताच. हा विषय घरात खूपदा निघायचा. विशेषत: शुभंकरने नव्या वस्तीत पॉश प्लॅट बुक केल्यामुळे आणि केल्यापासून. भाभींचं घर जुनं तर झालं होतंच आणि फार सोयीचं, टुमदार वगैरेही नव्हतं. एकेकाळी मोठया मुश्किलीने गावठाणातला कडेचा एक चिंबुळका प्लॉट कर्जाने विकत घेऊन त्यांच्या नवऱ्याने एकामागे एक अशा तीन खोल्या काढल्या होत्या, तीन दगडांची चूल मांडण्यापुरत्या. पुढे जरा नटवल्या, लग्न करताना शुभंकरने वरती दोन खोल्यांची माडी चढवली. पुढे मुलांना हुंदडायला गच्ची केली. हे टप्प्याटप्प्याने होत गेलं. गरजा वाढत गेल्या, भागतही गेल्या. पण बोळकंडी, मेलगाडी, काडयापेटी या शब्दातला उध्दार काही कधी गेला नाही. 'असलं' घर बांधण्यात आपण चूक केली, आपल्याला सौंदर्यदृष्टीच नव्हती हे ऐकून ऐकून तोंडपाठ झालेल्या भाभींनी कामवालीसमोर कबुलीजबाब देऊन टाकला.

''बरं झालं हं, घरात कुठे काय चुकीचं आहे हे तू सांगितलंस ते. आता हे घर जसंही आहे, तसं जमेल तेवढं साफसूफ कर आणि जा बये.''

उगाच तिच्या तोंडी लागायला नको, म्हणून त्या पुढच्या अंगणात आल्या. तसं छोटंसंच होतं ते, पण चार कुंडया होत्या. दोन वेली होत्या, फुलं यायची, कधी पाखरं यायची, तेवढाच भाभींचा जीव रमायचा. तेवढयाशाच जागेत उगाच इथली कुंडी तिथे ठेव, कुठे माती उकर, कुठे छाटण कर यामुळे काहीतरी केल्यासारखं वाटायचं. अशाच दोनचार फांद्या त्या सावरत असताना समोरच्या रस्त्यावरून जाणारी कांचन त्यांना दिसली. त्यांच्या मुलींची जुनी मैत्रीण. दोघींच्या मधल्या वयातली कांचन लग्न करून पलीकडच्या गल्लीतच राहायला गेली होती. त्यामुळे दिसायची अधूनमधून. मुली माहेरपणाला आल्या की, घरीही यायची. तिला बघताच भाभींना एकदम एक अफलातून कल्पना सुचली.

''कांचन... ए कांचन... जरा इकडे ये तर.''

''काहो भाभी? आज काय विशेष?''

''मला तुझं एक मापाचं ब्लाऊज आणून देशील का गं?''

''माझं माप? कोणासाठी?''

''मनूसाठी म्हणजे गं... तुमची दोघींची मापं सारखीच असतील ना?''

''असतील थोडीफार''

''मग कर ना एवढी मदत मला. तुझ्या मापाचं ब्लाऊज दे येता-जाता. त्यावरून मनूसाठी घेऊन शिवून आणि पाठवीन तिला. तिच्याकडच्या समारंभाची भेट म्हणून.'' नुसतं सांगतानाही भाभींचे डोळे लकाकले. मुलीकडला समारंभ आणि स्वत: जाऊ शकत नाही, मग निदान आपली भेटवस्तू तरी... त्यांनी तोंडभरून कांचनला सगळं पाल्हाळ सांगितलं. तिनं पुरतं ऐकूनही न घेता सुरुवात केली.

''इथून साडी-ब्लाऊज पाठवणार तुम्ही? ब्लाऊज शिवून? काहीतरीच काय भाभी? केवढयाला पडेल ते...''

''असू दे... आहेत तेवढे पैसे माझ्याकडे.''

''मी त्या अर्थाने म्हटलं नाही. अहोऽ आजकाल ऑनलाईन सगळं मिळतं तिथल्या लोकांना. नुसती ऑर्डर सेंड करायचा अवकाश की हव्या त्या रंगाचं, फॅशनचं हवं ते ब्लाऊज शिवून पाठवतात इथून. मोठमोठे डिझायनर्स असतात त्याचे. मनूला असेलच की सगळं माहिती.''

''असू शकेल.''

''मग तिने केलीच असेल की फंक्शनच्या आपल्या कपडयाचोपडयांनी सोय.''

''केली असेल...''

''मग तुम्ही कशाला घेताय अंगावर ओढवून? हे असं फार होतं तुम्हा लोकांचं.''

''आम्हा लोकांचं म्हणजे?''

''एल्डरली पेरेटंसचं. आपल्या आवडीनुसार मुलांना गिफ्ट्स द्यायच्या... मग त्यांना आवडल्या नाहीत, त्यांनी वापरल्या नाहीत की नाराज व्हायचं, रागवायचं.''

''अच्छाऽऽ म्हणजे माझं मनूला भेट पाठवणं चुकीचं आहे असं तुला म्हणायचंय? मला आपलं वाटलं तिला सरप्राइज द्यावं, तिचं तिच्यापाशी खूप असलं तरी आईने धडपडून काहीतरी दिल्याचा तिला आनंद होईल वगैरे वगैरे... शिवाय देण्यामध्ये माझा स्वत:चा आनंद असणारे ना...'' भाभींनी थोडं तिच्याशी, थोडं स्वत:शी म्हटलं. पण त्यांचा आवाज दुखरा आला असावा. कारण कांचनने एकदमच सूर बदलला.

''बाकी तुमचं काम म्हणजे चोखच असणार भाभी. कधी देऊ माझा ब्लाऊज पाठवून?''

'थांब... बघते जरा...'' एवढं म्हणून भाभी मागे वळल्या.

कांचनही जराशी घुटमळून रस्त्याला लागली. भाभी थोडा वेळ उगाचच एकदोन कुंडयामधली माती उकरत सारखी करत राहिल्या. शुभंकर कधीचा म्हणत होता, घराभोवती माती, पाणी झाडंझुडपं केल्याने उगाच किडेमकोडे येतात घरात. घर किडयांसाठी बांधायचात की माणसांसाठी बांधायचात तुम्ही लोक? वडिलांच्या पश्चात लवकरच त्याने घर बदलायचंय ठरवलं म्हणून या कुंडया वाचल्या. नाहीतर...

रोजच्यासारखं दुपारचं जेवण, पेपरबिपर वाचणं, टी.व्ही. बघणं आणि संध्याकाळी फिरत फिरत जवळच्या सार्वजनिक बागेत जाऊन बसणं हा रोजचा दिनक्रम आता पुढे होता. बागेत ठरावीक बायका भेटत, त्यांच्याशी माफक बोलणं होई, पण त्याहून जास्त धडपडून कोणाकडे जावं, कोणाला भेटावं, ऐसपैस गप्पाटप्पा कराव्यात हे भाभींकडून होत नसे. नवरा गेल्यापासून त्यांना तशी काही उमेद उरलीच नव्हती. मुलं सुरुवातीला खूपदा म्हणायची, ''तू बाहेर जात जा. वाटल्यास ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर सहलींना जात जा. नव्या ओळखी करून घे. आजकाल कोणी हसत नाही अशा गोष्टींना.'' मुलांचं म्हणणं खरंच होतं. आपल्याला हसायला तरी दुसऱ्यांना वेळ आहे कुठे? पण मनाला कसं समजावायचं? नवरा अवचित, काही तासांच्या व्याधीनंतर गडप झाला आणि भाभींना स्वत:साठी काही चैन करण्याने अपराधी वाटू लागलं. घराच्या कोषात सुरक्षित वाटू लागलं.

पण आज मनूसाठी काहीतरी धाडण्याची कल्पना सर्वावर मात करून गेली. दुपारी पडल्यापडल्या गावातल्या भाचीची आठवण झाली. तिचा नवरा पायलट होता. एका मोठया विमान कंपनीत नोकरीवर होता. गेली काही वर्षं तर तो फक्त मुंबई, लंडन, न्यूयॉर्क याच रूटवर होता म्हणे. मागे एकदा भेटल्यावर म्हणाला होता, ''अमेरिकेच्या लेकीसाठी काही पाठवायचं असलं तर माझ्याकडे देत चला. मी ओळखीओळखीत झटकन पोहोचवू शकेन.'' घ्यावी का त्याच्या मदतीची संधी? पूर्वी कधी नाही घेतली. आता एकदा घ्यायला काय हरकत आहे? वाटल्यास तिथल्या स्थानिक टपालाचा - कुरियरचा वगैरे खर्च देऊ. पण एकदा.... ती वेळ गाठण्यासाठी... निदान मनाच्या समाधानासाठी... थोडी वाट वाकडी करून...

फार दिवसानंतर दुपारी एकटीने घराबाहेर पडून रिक्षा करून भाभी किशोरीकडे पोहोचल्या. तिने आश्चर्याने, आनंदाने भरघोस स्वागत केलं. भाभीचं स्वागत केलं, तसंच लेकीला आहेर पाठवण्याच्या, आपल्या नवऱ्याने ते नेण्याच्या कल्पनेचंही स्वागत केलं. 'खुश्शाल दे', 'बेलाशक कर', 'केव्हाही सांग'' वगैरे शाब्दिक आश्वासन दिलं. भाभींचा जीव पिसासारखा हलका झाला काही काळ. पण बोलता बोलता गप्पांना वेगळंच वळण लागलं.

''मी तर म्हणते मावशी, तू स्वत:च का गेली नाहीस मनूकडे... त्यानिमित्ताने?''

''मी...? काहीतरीच काय?''

''काहीतरी काय आहे त्यात? आपण आपल्या लेकीच्या आनंदात सहभागी होणं... हे काय चुकीचं आहे का?''

''दोघं असतो तर गेलो असतो एकवेळ. तिच्या पहिल्या बाळंतपणाला गेलो होतोच ना.''

''माहितीये. पण आता काका नाहीत म्हटल्यावर तू जाणारच नाहीस का?''

''नको वाटतं.''

''का? इतर बायका जात नाहीत? तुझ्यासारख्या असून.''

''त्यांचं त्यांना. मला नाही वाटत जावंसं.''

''याला काय अर्थ आहे? पुष्कळ वर्षं झाली की आता त्यांना जाऊन.''

''मला सगळं काल घडल्यासारखं वाटतं.''

''असं करू नकोस मावशी. मोठी चूक करून बसशील.''

''हो का?''

''मग? स्वत:ला कोंडून घेऊन काय सिध्द करायचंय तुला? तुझं काकांवरचं प्रेम, भक्ती वगैरे?''

''नाही गं. सिध्द कोणासाठी करायचं? मनच वळत नाही त्यांच्या पश्चात चैन करायला. अपराधी वाटतं.''

''बघ बाई. मला काही म्हणायला अधिकार नाहीये तसा. पण आतून वाटतंय ते सांगते. इतकं 'नवरासेण्टि्रक जगणं', बरोबर वाटतं का तुला तरी? माणूस हवा, प्रश्नच नाही, पण त्याच्यानंतर आयुष्य हवं की नाही आपलं आपल्याला? आपल्याकडच्या बायकांचं हेच चुकतं आणि मग...'' ऐकता ऐकता भाभींच्या डोळयात पाणी यायला लागलं. किशोरीच्या ते लक्षात आल्यावर ती चपापली. हुशारीने विषय बदलून 'मावशीऽऽ तुझे केस अजून खूप काळे राहिले आहेत हं', 'शुभंकर जिम करून करून बराच वाळलाय की' असं काहीबाही बोलायला लागली. भाभींनीही स्वत:ला सावरलं. पण गप्पांना कडू किनार लागली ती लागलीच. मग भाभींनी आवरतं घेतलं. 'निघते... संध्याकाळ झाली की रस्त्यावरची गर्दी वाढेल.' वगैरे बोलून पाय काढला. मनूच्या भेटीचं पुडकं कधी, कसं किशोरीच्या हाती पडेल हे ठरवून दोघींनी निरोप घेतला.

रस्त्याला लागल्यावर भाभींना पटकन रिक्षा थांबवता आली असती. पण त्यांनी तसं केलं नाही. हळूहळू पावलं टाकत रस्त्याच्या कडेकडेने चालत राहिल्या. थोडा अंधार पडायला लागला होता. ते त्यांना बरं वाटलं. कोणी भेटावं, कोणाशी बोलावं असं वाटत नव्हतंच नाहीतरी. करायचंय काय उजेडात चेहरे बघून-दाखवून? पाय दुखेपर्यंत टाचा घासत घासत त्यांनी रस्ता काटला आणि नंतर रिक्षा करून घर गाठलं. वाटेत दुरून नेहमीची बाग दिसली, बाकावर नेहमीच्या बायका दिसल्या, तरी त्या थांबल्या नाहीत. नको वाटलं कोणाला भेटणं, कोणाशी बोलणं.

घरी पोहोचल्यावरही त्या गप्पगप्पच होत्या. कधी नव्हे ते रिक्षाने लांबवर जाऊन आल्याने थकल्याही होत्या. शिवाय मनावरचं ओझं होतंच आपलं सगळंच चुकत असल्याचं. अगदी स्वत:च्या नावापासून ते मुला-नातवंडांच्या नावापर्यंत. नातवंडांच्या आहाराबाबत. शिस्त लावण्याबाबत. लाड करण्याबाबत. मुलांच्या व्यग्रतेबाबत. त्यांची मदत मागण्याबाबत. त्यांनी दिलेल्या सुविधा नाकारण्याबाबत. पोटच्या मुलांना हाताळण्याबाबत. लांबच्या नातेवाइकांवर विसंबण्याबाबत. घराबाबत. घरधन्याबाबत. प्रेम बाळगण्याबाबत. प्रेम दाखवण्याबाबत. कुठेच कसे बरोबर वागू शकत नाही आपण? जेमतेम चार घास खाऊन त्यांनी स्वत:चा पलंग गाठला. अंग टाकून दिलं. नाहीतरी सगळी घरी असताना त्यांना टीव्हीवरचे त्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघता येतच नसत. 'कसली पुअर टेस्ट आहे आजी तुझी' असं नातवंडं कधीची म्हणतच असत.

हळूहळू घरही मिटायला लागलं. बाहेरचे आवाज कमी झाले. हालचाली मंदावल्या. भाभींना झोप येत नव्हती. एरवी या वेळी त्या काहीबाही वाचत. आज मात्र त्यांनी थेट पायावर पांघरूण घेऊन डोळयांवर हात ठेवला. आतमध्ये डोळे उघडेच होते. स्वत:विषयीच्या कणवेने मध्येच भरून यायला बघत होते. कधीतरी फटकन खोलीचा दिवा लागला आणि शुभंकर आत आला. काहीतरी आठवल्यासारखं लगबगीने म्हणाला, ''भाभीऽ कामाच्या रेटयात साफ विसरलो मी... मनूची सकाळची मेल गेली का गं?''

''राहू दे.'' भाभींनी डोळयावरचा हातही न काढता म्हटलं.

''च्... किशोरीचा फोन आला... त्यावरून आठवलं...''

''रात्र झाली. झोपू या आता.''

''भाभीऽऽ तू सांगायचंस ना गं मला आल्या आल्या...''

''सँडीला बोलले होते... बघणार होता तो.''

''सँडयाऽऽ काय तू पण...? भाभी, नेहमी असं करतेस तू... वेळ निघून जाते... मग काही उपयोग होतो का? चुकांची गणती करण्याखेरीज... अं...'' शुभंकर दुखऱ्या आवाजात म्हणाला. भाभी उठून बसल्या. त्याच्याकडे एकटक बघत राहिल्या. आताही डोळयात कणव होतीच. फक्त नुसत्या स्वत:पेक्षा त्याच्याविषयी. सर्वांविषयी. घरदाराविषयी. घरातल्या माणसांविषयी. परिस्थितीविषयी... एकूणच जगण्याविषयी. आवाजात उसना उत्साह आणून त्या म्हणाल्या, ''उद्याला करू हं मनूचं सगळं. ठीक आहे?''

''मला ठीकच सगळं. तुझं तू ठरवं भाभी.''

भाभींनी फक्त मान हलवली. शुभंकर क्षणभर घुटमळला आणि हलकेच खोलीबाहेर गेला. भाभींना आडवं पडायचंही सुचलं नाही. उशा भिंतीशी उभ्या करून त्यांनी बसल्या बसल्या त्यावर पाठ टेकली. दिवसाची 'फिल्म रिवाइंड' करत... शुभंकरने केलेला समारोप आठवत... वेळ निघून जाते. असंच काहीतरी. वेळ निघून गेल्यावर चुकांची गणती वाढते. गणती... भाभींनी बोटांनी कपाळ दाबलं. डावीकडून उजवीकडे... उजवीकडून डावीकडे... आणि झटक्यात हात खाली घेतला. आपलीपण जगण्याची खरी वेळ निघून गेलेली नाही का? काय झपाटयाने गेली? काही कळायच्या आत गेली... आणि आपण होतो तिथेच... खरं तर या झंझावाती वेगामुळे जरा जास्तच लडबडत... भेलकांडत... मग झपाटयाने पुढे जाणाऱ्यांनी आपलं सगळं चुकीचं ठरवलं तर काय आश्चर्य? त्यांच्या वेगात, मुळापासून बदलून आपण सामावू शकत नाही... एवढं अनोळखी निमूट स्वीकारू शकत नाही... चुकणार नाही तर होणार काय दुसरं?

माणसामाणसात वाद, भांडणं, संघर्ष होतात, तेव्हा मांडवली एकवेळ करता येते. 'चू.भू.द्या.घ्या.' म्हणता येतं. अजस्र... अज्ञात... अदृश्य... अशरीरी काळाशी हा संवाद कसा साधणार? का इथून पुढे आपल्याला, आपल्यासारख्यांना 'चूकभूल... फक्त घ्यावी' असं म्हणत राहावं लागणार? भाभी किती वेळ तशाच निश्चल बसून होत्या त्यांचं त्यांना समजलं नाही. पायापाशी काहीतरी हुळहुळलं तेव्हा दचकून वाकल्या. तर कधीकधी घरात घुसणारी मांजर त्यांच्या पायापाशी घुटमळत होती. गोरी, गुब्बी, गरम अंगाची मांजरी! भाभींनी तिला उचलून पांघरूण लपेटून जवळ घेतलं... अगदी जवळ... पोटाच्या - छातीच्याजवळ... ती तेवढी त्यातल्या चुका काढत बसली नाही. 'म्यांव्' म्हणून कुशीत शिरली.  ती ऊब भाभींना हवीहवीशी वाटली.

मंगला गोडबोले

9822498228

mangalagodbole@gmail.com