महावस्त्र

विवेक मराठी    27-Oct-2017
Total Views |

 

आपण जीवनाला महावस्त्र समजतो, ही चूक आहे. ती एक ठिगळांची वाकळ आहे. ती पुरेशी नसतेच. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांनी त्या तथाकथित महावस्त्राचा त्याग केला. मोठी माणसं होती ती. आपण लहान माणसं आहोत. त्या वाकळीची एक चिंधीही आपल्याला आधाराला पुरते... म्हणजे हे सर्व माहीत असूनही मोह सुटत नाही. मोह सुटला की एका क्षणात राम वनवासाला निघतो. बुध्द, महावीर सत्याच्या शोधात निघताच. आपल्यासाठी ही चिंधी सत्य असेल, तर तसं असो. पण प्रत्येकाच्या मनात ठिणगी असते. बहुतेकांची ती विझते. काहींच्या ठिणगीची ज्वाळा होते.

 

विनीत घरी आला. नेहमी उत्साहात असणारी नंदा आज अस्वस्थ होती. तिचा चेहरा व्यग्र होता. काही न बोलताच ती उठली. तिने चहा करून आणला.

''ये ना. तूपण घे.'' विनीतने तिला म्हटलं.

''नको...''

''काय झालं?''

नंदाला सांगायचं होतं, पण कसं सांगावं याचा संकोचही वाटत होता. समोर वैदेही होती.

''सांग ना!''

''अहो, बाबाऽऽ''

''शूऽ...'' विनीतने बेडरूमकडे निर्देश करत म्हटलं.

''अं हं, आई-बाबा देवळात गेले आहेत.''

''हं, सांग मग...''

''अहो, आता मुली मोठया झाल्या.''

''हो का?'' विनीत.

''हसण्यावारी घेऊ नका. बाबा बाहेर बसलेले असतात. मुली कपडे बदलायला आत येतात... आणि अचानक बाबाही...''

विनीत एकदम गंभीर झाला.

''मुलींनी कपडे बदलताना दार लावावं.''

आता वैदेही बोलू लागली. ''बाबा, सारखी ये-जा करावी लागते. कधीतरी दार लोटलेलं असतं. पण आजोबांनी आत येताना लोटलेल्या दारावर टकटक करावं ना! एकदमच ते आत आले... मी फक्त अंडर्सवर...'' वैदेही बोलता बोलता गप्प झाली. आताही तिला संकोचल्यासारखं झालं.

''... हे बघ बेटा, हे चुकून झालं त्यांच्याकडून. तू आत गेली आणि ते मुद्दाम आत आले, असं तर नाही ना?''

''नाही बाबा, तसं नाही, पण...''

''बरं. मी त्यांना सांगतो की दार लोटलेलं असताना टकटक करून जात जा. आपल्या मुली आता पोरीबाळी राहिल्या नाहीत. अगं, घर लहान आहे. आत ते झोपतात. त्यांना कधी चश्मा हवा असतो, कधी कानकोरणं, तुझ्या आजीला कधी आवळकाठी. हे लहानमोठे अपघात होणारच.''

''पण मला संकोच वाटतो. दुपारपासून मी त्यांच्यासमोरही गेले नाही.''

''मग जा. मुद्दाम जा. ते आजोबा आणि तू नात आहेस. जे चुकून झालं, त्याचं तुला काही वाटलं नाही हे त्यांनाही कळायला हवं. त्यांनाही मनाला अपराधी वाटतच असणार ना!''

''हो ना! तेच मी वैदेहीला सांगतेय. आज या वेळी ते मंदिरात उगाच नाही गेलेत. तुम्ही आल्यावर हा विषय होणार, म्हणूनच गेले.''

वैदेहीला थोडंफार कळत होतं. पण तरी मनात खदखदतही होतं. आजी-आजोबा आवडतात, पण तरी... या लहान घरात सतत ते समोर असणं... बाहेर झोपायला लागणं हे तिच्या मोठया होत जाणाऱ्या मनाला पटत नव्हतं.

''बाबा, आणखी एक सांगायचंय.''

''हं...?''

''माझं बारावीचं वर्ष आहे. मी अभ्यासाला बाहेर बसले की, आजीला सिरियल पाहायची असते.''

''मल आपण आत बसावं.''

आता मात्र वैदेही चिडली.

''बाबा, म्हणजे नक्की आमची खोली कोणती? अभ्यासाला आत, झोपायला बाहेर. आम्हाला स्पेस हवी नां!... तरी आठ वाजेपर्यंत मी कॉलेजच्या लायब्ररीत थांबते. आठला लायब्ररी बंद झाली की घरी यावंच लागतं. माझ्या मैत्रिणींच्या घरी त्यांची वेगळी रूम असते.''

आता नंदाला राहावलं नाही.

''वैदेही, तुझ्या बाबांनी प्रामाणिक राहून नोकरी केली आहे. त्यामुळे आपल्याला काही गैरसोय होते, ती सहन करावी लागेल. बाबांनी लोकांसारखा भ्रष्टाचार केला नाही. संधी आली तरी केला नाही.''

''मग करायचा असता.''

''तुझ्या एका खोलीसाठी?''

''हो...'' वैदेही पाय आपटत म्हणाली. दोघंही अवाक होऊन वैदेहीकडे पाहत राहिले.

हे वैदेहीचं वय बोलत होतं. काल-परवापर्यंत आजोबांच्या गळयात गळे घालून बसणारी वैदेही वयाने पार बदलवून टाकली होती.

''तुझ्यापुढे काय बोलावं कळत नाही.''

''असू दे. काही बोलू नकोस. उद्या बिल्डरला फोन लावून आपल्या घराचं कुठवर आलं ते पाहावं लागेल.'' अगदीच गळयापर्यंत पाणी आलंय. खरंच, मुली लहान होत्या तोपर्यंत लहान घराचं काही वाटलं नाही. पण मुलींना एकांत हवा, अभ्यासाला जागा हवी, त्या मोठया होत आहेत, त्यांच्या जाणिवा जाग्या होत आहेत. आपल्या स्त्रीत्वाचं भान त्यांना येतंय... पण अशीच अनेक घरं आणि घरातल्या मुली असतीलच नां! झोपडपट्टीत राहणाऱ्या मुली, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुली... आणि असेच आईवडीलही. आपल्या वडिलांनी आपल्याला संस्कार दिले. ते संस्कार आपण आजवर बाळगले. त्या संस्कारांचे परिणाम नंदाला आणि काही अंशी मुलींनाही भोगावेच लागले.

आपल्याला शक्य असूनही आपण वाममार्गाने पैसा कमावला नाही. पैसा आपल्याला नको होता, कारण आपल्या गरजा कमी होत्या. पण नंदाच्या गरजा, मुलींच्या गरजा... त्यांचं काय? आपला आदर्शवाद आपण त्यांच्यावर थोपला का? नंदाला घर हवंय म्हणजे काय...? फक्त आणखी एक खोली जास्तीची हवी आहे. ती काही अवाजवी मागणी तर करत नाहीये.

नंदाने कुरकुर केली नाही, पण मागणी मात्र केली. शांतपणे. बाबा-आईही ऍडजस्ट होत आहेतच ना! त्यांना पाथरीचं याहून मोठं घर आठवतच असेल की! आईने तर पंधरा माणसांत आयुष्य काढलं.

बाबांनी त्या काळातही आपल्या आणि गौतमच्या मैत्रीला स्वीकारलं. ही दृष्टीही बाबांनीच दिली.

... हा घराचा प्रश्न तरी किती वर्ष? सहा-सात वर्षांनी मुली आपापल्या घरी जातील.

बाबा, आई... विचार करता करता मनात जणू काटा मोडला. आई, बाबा आणखी किती वर्ष... त्यांचं दुखणं खुपणं...

... आणि या पाच-सात वर्षांत आपण किती वयाचे होणार? नंदाच्या डोळयातलं स्वप्नं तरी जिवंत राहील? एका वयानंतर येणारं निरिच्छपण आपल्यालाही येईल. मग घर मिळालं काय, न मिळालं काय?...

आपण मध्यमवर्गीय. न सोडता येत, ना धरता येत अशा अवस्थेत असतो. पैसा नसला तरी पैसा असल्याचं नाटक करत बसतो. फाटकी चादर धुऊन, दुमडून घालणारे. पण आपल्याबरोबरचे, आपल्याएवढाच पगार मिळवणारे आपल्यासारखे नाहीत. त्यांचे टू बीएचके फ्लॅट आहेत चांगल्या स्कीममध्ये आणि आपण या चाळीत...

अनेक इच्छा, स्वप्नं आली, गेली. आपण इच्छा असूनही निरिच्छासारखे राहिलो. आपल्याला समाजाच्या नव्या भ्रष्टाचारी वळणाला स्वीकारायचं नव्हतं. समुद्राच्या लाटांवर काडी पडलेली असावी, तिच्या खालून असंख्य लाटा येतात-जातात, काडी मात्र तिथल्या तिथे हेलकावते.... तसे आपण जिथल्या तिथे राहिलो. समाजाची मानसिकता बदलत गेली, पण आदर्शवादाची नाही. म्हणून आपलीही नाही. पण आपण गौतमासारखं नि:संगही होऊ शकलो नाही. कारण आपली जात. आपण ब्राह्मण. एक गौतम सोडला तर आपल्या हेतूबद्दल, भावनेबद्दल शंका गौतमच्या मित्रांच्याही मनात होती. म्हणून आपण अलिप्त झालो. रहाटगाडगं वरचं खाली... खालचं वर झालंय. ब्राह्मण कुटुंबात जन्मलो ही आपली चूक होती का? त्यात ब्राह्मणाची वृत्ती. सोवळं आवळून स्पर्श टाळायची सवय. ती आताही कायम. सतत स्वत:चं विश्व आवळून असलेले. तेवढयात समाधानी. एक ब्राह्मण दुसऱ्या ब्राह्मणाला कितपत जवळ येऊ देतो? कितपत मदत करतो? अभीचं तर विश्वच वेगळं. पैसा आणि पैसा. सुखांच्या राशीत लोळतो तरी... असमाधानी!

खरं तर आपणही खूप मोठं, नजरेत भरेल असं काही केलंच नाही. आपली चळवळ आपल्यापुरती होती. प्रामाणिकपणाची आणि गौतमची मैत्री जपण्याची. काहीतरी करायला हवं होतं. एक मूठभर, ओंजळभर तरी. आपलं लहानसं विश्व त्या कृतीने कदाचित मोठं झालं असतं.

आजकाल आपण आपल्या आयुष्यापासून विलग होतोय का? डिटॅच? तेच तेपण भोगून काही वेगळी स्वप्नं पाहतोय का?

विनीत रात्री कितीतरी वेळ विचार करत होता. गौतम आणि अभी या आपल्या मित्रांचाही.

***

सकाळचे दहा वाजले होते. विनीतने ऑफिसमध्ये जायच्या आधी नंदाला बजावून ठेवलं होतं की बिल्डरला फोन लाव.

नंदा घडयाळाकडेच बघत होती.

तिने बिल्डरला फोन लावला.

''सर, आमच्या घराचं पझेशन कधी देणार?''

''मॅडम, सध्या बांधकाम बंद ठेवावं लागलंय. जवळजवळ सहा महिने झालेत.''

''अहो, पण असं कसं?'' नंदा हादरलीच.

''काय करणार मॅडम! वर्षभरापासून या क्षेत्रात रेसेशन चालू आहे. तरी आम्ही बांधकाम चालू ठेवलं. पण आता बुकिंगच होत नाही. अनेकांची बांधकामं ठप्प पडली आहेत. आम्ही तरी काय करणार?''

''सर, पण आमचं घर तरी पूर्ण...'' आपण काहीतरी वेडयासारखं बोलतोय हे तिच्या लक्षात आलं.

''मॅडम, पूर्ण स्कीमच बंद आहे सध्या. तुमचं घर आहे चौथ्या मजल्यावर... एखाद वर्षात सुरू होईल बांधकाम...''

''सर, पण आमचे पैसे अडकलेत हो त्याच्यात.''

''हो. आमचेही अडकलेत. आणि बांधकाम काही दिवसांसाठी थांबलंय. एकदा हे रेसेशन कमी झालं की भरभर पूर्ण होईल.''

''अहो, पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? आमचं लहानसं घर... सासू... सासरे... मुली...'' नंदाचा धीर सुटून ती बोलू पाहत होती.

त्यावर काय बोलावं हे न कळून बिल्डर गप्प होता.

''मॅडऽऽम... आम्ही यावर काय करू शकतो? घर पूर्ण होणारच आहे. पण थोडा वेळ लागेल. थोडी तं कळ सोसावी लागेल.''

''म्हणजे किती?''

''एकदा काम सुरू झालं की दोन वर्षं तरी.''

''दोन वर्षं...''

''हो. दहा मजली स्कीम आहे. तेवढा वेळ तर लागणारचं.''

नंदाने फोन ठेवला.

ती पार कोलमडली. ती उशीत डोकं खुपसून रडू लागली.

तिच्या सासूबाई जवळ आल्या.

''नंदा, काय झालं गं रडायला...''

''आई.... बघा ना हो, घराचं बांधकामच सध्या बंद पडलंय.''

''काय?''

''हो. त्या क्षेत्रात मंदी चाललीय म्हणे. आणखी तीन वर्षं तरी घर होत नाही. आणि या पोरी पाहिल्या ना कशा हातघाईवर आल्यात. किती प्रयत्न करतेय मी. टयूशन घेते, काटकसर करते. यांच्या प्रामाणिकपणाचं हे फळ मिळालं बघा. त्यापेक्षा घेतले असते पैसे तर...''

''नंदा!'' सासऱ्यांच्या उद्गाराने ती भानावर आली.

''नंदा, धीर सोडू नको. मार्ग निघेल.''

''काळ असा आहे की पैशाशिवाय मार्ग निघत नाही. दुसरं घर भाडयाने घ्यावं म्हटलं तर चौपट भाडं आणि डिपॉझिट वेगळं. काही नाही बाबा, प्रामाणिकपणाचा काही फायदा नाही. इतके दिवस काही वाटलं नाही...''

''बरोबर आहे नंदा. तेव्हा आम्ही पाथरीलाच होतो. लहान घरात दोन माणसं वाढली, मुली मोठया झाल्या... घर जेवढयाला तेवढंच आहे. कळतंय आम्हाला. पण निघेल, काहीतरी मार्ग निघेल. अशी हताश होऊ नको. अगं, प्रामाणिकपणे जगल्याचं समाधान थोडं उशिरा लक्षात येतं. मुलींनासुध्दा ते नंतर जाणवेल की आपले बाबा अकलंकित होते.''

बाबांच्या बोलण्याने नंदाला धीर आला.

''नंदा, त्या दिवशी मी चुकून आत गेलो बघ. पोरी मोठया झाल्या, लक्षातच नाही आलं. कालपर्यंत माझ्या मांडीवर येऊन बसणारी पोर... म्हातारपण असंच असतं. जरा उमज कमीच होते. वैदेहीची माफी मागावी वाटली, पण खूपच ओशाळलो होतो... तूच सांग तिला की आजोबाला माफ...''

''बाबा... नाही... माफी मागायची कशाला? होत असतं असं.. तुमच्याबद्दल तर किल्मिषही नाही मनात... तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मी समजावलंय वैदेहीला.''

''तू समजवशील, ही खात्री होती मला. मी स्वत: प्रामाणिक राहून विनीतला प्रामाणिकपणा शिकवला, त्याचं बघ... हे फळ मिळालं मला. तुझ्यासारखी विश्वास ठेवणारी, मान ठेवणारी सून! नाहीतर इतरांच्या घरात एवढया तेवढया घटनांचा केवढा इश्यू होतो.''

''चुकलंच माझं, निराशेच्या भरात काहीतरी बोलून गेले. आई, मी अभी भाऊजींना फोन लावू का?''

''बघ लावून. तुझं समाधान होणार असेल तर. पण तो तरी वेगळं काय सांगणार आहे?''

''हंऽऽ !''

अभीने बिल्डरला फोन लावला.

त्याचं तेच उत्तर होतं.

''अभी, तुला तर माहितीच आहे मार्केटची. मी वेगळं काय सांगू...?''

''तुझ्या दुसऱ्या स्कीममध्ये एखादं घर असेल तर बघ भाडयाने.''

''अभी, सर्व स्कीम लो इन्कम ग्रूपच्या आहेत. त्यांना टू बीएचके हवंय. माझ्याजवळ तशी स्कीम नाही.''

अभीही अस्वस्थ झाला. परिस्थितीपुढे सर्वच विवश होते.

***

विनीत उशिराच घरी आला. आला आणि काही न बोलता पलंगावर आडवा झाला.

नंदा चहा घेऊन आली.

''का हो... बरं नाही?''

विनीत गप्पच.

''आई-बाबा कोठे आहेत?''

''संध्याकाळी मंदिरात गेले. आज त्यांनाही यायला उशीर झाला.''

''आणि मुली?''

''त्यांच्या मैत्रीणीकडे अभ्यासाला.''

''नक्की नां! मैत्रिण माहितीतली आहे ना?''

''हो. मी खात्री करून घेतलीय. तुम्ही का पण असे थकलात?''

नंदा विनीतच्या जवळ बसली. त्याच्या केसांमधून बोटं फिरवू लागली.

विनीतच्या मिटल्या डोळयांच्या कडांमधून पाणी कानशिलांवर आलं.

''काय झालं? विनीत... सांगा ना!''

''नंदा, आजवर मुलगा, पती, पिता आणि एक ऑफिसातला छोटासा पण जबाबदार ऑफिसर म्हणून सर्व मूल्यं निभवलीत. पण आज हरलोय.''

''तुम्ही लाच...''

''नाही नंदा. लाच नाही घेतली, पण एक निर्णय घेतलाय.''

विनीतने आपलं डोकं उशीत लपवलं.

''लाज वाटतेय नंदा. आपलं नशीब चांगलं आहे, पण थोडं थिटं आहे. त्यात आपण सर्व मावू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुलींचं वाढतं वय आहे, त्यांना आपण दूर करू शकत नाही.... आई-बाबा अशा वयस्कर वयात आहेत की, त्यांना पाथरीला एकटं सोडता येत नाही. पुणं सोडता येत नाही... नवीन घर घेता येत नाही. सगळे रस्ते बंद झाल्यावर उरला एकच रस्ता...''

''कोणता... सांगा तरी. काही उपाय आहे हे ऐकूनही बरं वाटतंय.''

''नंदा, लहानपणापासून आई-वडिलांसोबत होतो. त्यांनी केवढी स्वप्नं पाहिली माझ्याबद्दल. मी फार हुशार नसल्याने मेरिटवर डॉक्टर किंवा इंजीनिअर नाही होऊ शकलो. पण त्या वेळी बाबांनीच धीर दिला. समाजाला हुशार माणसापेक्षाही चांगल्या माणसांची गरज आहे. सर्व्हिस कर. अगदी प्रामाणिकपणे. तेच माझं स्वप्न आहे. बाबा म्हणाले होते... पण आज.''

''काय झालं?''

''आज त्यांचा हा चांगला मुलगा त्यांच्यासाठी वृध्दाश्रम शोधून आला.''

''काय... आईबाबांना वृध्दाश्रमात...''

''काय करायचं सांग मग! हे बघ, मी वृध्दाश्रम पाहून आलोय. चांगला स्वच्छ आहे. खर्चही आपल्या आवाक्यातला आहे. म्हणजे बाबांच्या पेन्शनमध्ये...'' अपराधी होत तो गप्प झाला.

''अहो, पण आपण असताना, घर असताना त्यांनी वृध्दाश्रमात का राहावं?''

''बरोबर आहे. मी तिथे अनेक वृध्दांना भेटलो. खूप जणांची साधारण हीच परिस्थिती आहे. तिथे मेडिकल चेकअप होतं. कार्यक्रम होतात, लायब्ररी आहे, टी.व्ही. असतो. मी गेलो, तेव्हा काही जण बागेत फिरत होते, काही पत्ते खेळत होते. तसे आनंदी वाटले. खंत एकच होती की, त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला येत नाहीत. आपण तसं नाही करायचं. मला वचन दे... आठवडयातून दोनदा तू तिथे जाशील. मीही दोनदा जाईन. घरचं काही त्यांच्या आवडीचं खायचं करून.''

नंदाचे डोळे भरून येत होते.

''किती सवय झालीय त्यांची मला! एवढाच मार्ग आहे का हो?''

''तूच सांग आणखी कोणता मार्ग आहे? पाथरीला तर ते जाऊच शकणार नाहीत. आपण जात येत राहू. काही दुखणं खुपणं झालं तर आपण सोबत असूच की. शेवटी हे असंच व्हायचं होतं. आदर्श बाळगता बाळगता कधी खड्डयात पडतो हे कळत नाही...''

''बाबा, आज म्हणत होते 'काही मार्ग निघेल... काळजी करू नकोस.' काही दिवस थांबू या. त्यांचे शब्द खरे ठरतात का पाहू या...''

''पाहू... पण आजवर थांबलोच ना! आणखी काय वाचासिध्दी होणार आहे?''

दोघं सुन्न अवस्थेतच होते.

''चहा थंड झाला. गरम करून आणते...'' म्हणत ती आत गेली.

अजूनही तो विचार त्यांच्या पचनी पडत नव्हता.

***

आई-बाबा बाहेरून आले. आठ वाजून गेले होते.

दोघं उत्साहात होते.

विनीत आणि नंदा मात्र दृष्टी चोरत होते.

''आज उशीर झाला बाबा?'' विनीतने विचारलं.

''हं...'' बाबांनी बसल्या बसल्या खुशीतच आपल्या मांडयावर हात आपटले.

''आज एका मोहिमेवर गेलो होतो आणि मोहीम फत्ते झाली.''

''कसली मोहीम? घरबीर शोधलं की काय?'' नंदानं विचारलं.

''नाही गं बाई. ती मोहीम आवाक्याबाहेरची आहे.'' आई म्हणाली.

''हे बघा, तुम्ही दोघं शांतपणे समोर बसा पाहू आणि शांतपणे ऐका. तुम्हा दोघांबद्दल आमच्या मनात काही किंतू नाही.'' बाबा सांगू लागले.

''एक छोटीशी गोष्ट आहे. माणूस माकडाला पटकन पकडू शकत नाही, पण तरी मदारी त्यांना पकडतात. कसं माहितेय...''

''नाही.''

''हात आत जाईल अशा आकाराचं काचेचं भांडं घेतात. आणि त्यात फुटाणे ठेवतात. फुटाणे माकडाला फार प्रिय. फुटाणे घ्यायला तो हात आत घालतो. फुटाणे मुठीत घेतो आणि मूठ अडकते. माकड पकडलं जातं.''

''पण हात आत जातो, तसा बाहेरही पडेलच की!''

''विनीत, गंमत तीच आहे. माकडाला मुठीतले फुटाणे सोडवत नाहीत. त्या फुटाण्यांच्या प्रेमापायी तो अडकून राहतो. तसंच माणसाचं होतं बेटा. कधीकधी परिस्थिती एवढी आवळ होते की, आपण तिच्यात अडकून पडतो. आपल्या मुठीत जे जे आहे ते सोडतही नाही आणि सुटकाही होत नाही. अशा वेळी शहाणपणा असतो मूठ थोडी सैल करायची. हात थोडा रिकाम्या करायचा आणि बाहेर काढायचा. होय की नाही?''

''हो बाबा... पण''

''तशीच तू आणि मी मूठ सैल करायची. तुम्हाला आमचा मोह आणि आम्हाला तुमचा मोह. प्रेम आहे. पण ही शरीरं... घरात मावत नाहीत. त्यांना थोडं वेगळं करायचं.''

''म्हणजे?'' विनीत शहारला.

''आज आम्ही एक वृध्दाश्रम पाहून आलो. इथून जवळ आहे. चांगला आहे. आता म्हातारपणी तुमच्याहून दूर पाथरीला तर आम्ही जाऊ शकणार नाही. काही मेजर दुखणं निघालं, तर तिथे वैद्यकीय सेवाही मिळणार नाही. म्हणून इथेच राहायचं. तुम्ही जवळ असाल. हाकेच्या अंतरावर असाल... आणि आम्ही आमच्या एज ग्रूपमध्ये रमू. अरे, आज मी तिथे रमीचे दोन डाव टाकले आणि या तुझ्या आईनं दोन गाणीही म्हटली. मग काय, हिचं गाणं ऐकून तिथल्या बायकांनाही गाणी म्हणायची हौस आली. अरे, काही जणांनी तर चक्क डयुएट गाणी म्हटली. राज कपूर, नर्गिस. मजा आली. बागबगिचाही लावलाय तिथे. मला तर वाटतं, आजूबाजूच्या लहान मुलांसाठी संस्कार केंद्रही सुरू करता येईल.''

बाबांच्या डोळयात एकाच वेळी अश्रू आणि उत्साहही होता.

''म्हणजे बाबा, शेवटी तुम्ही या घरातून बाहेर पडणार?''

''विनीत, नंदा... सहनशक्तीची एक मर्यादा असते. तुमच्या मुलींचीही तशीच मर्यादा आहे. सहनशक्ती संपली की समोरचा माणूस मनाच्या बाहेर फेकला जातो. मनाच्या बाहेर पडण्याऐवजी घराबाहेर पडलेलं बरं. आणि एकाच गावात असल्याने आपण केव्हाही भेटू शकतो.''

''हो. आणि नंदा, भेटायला येताना तुझ्या हातची भरली वांगी मात्र नक्की आणायची हं.''

नंदाला हुंदका फुटला.

''आई...'' ती आईजवळ गेली. त्यांच्या मांडीवर तिने डोकं ठेवलं. तिचे कढत अश्रू आईच्या साडीवर ओघळू लागले.

विनीतची स्थितीही काही वेगळी नव्हती. हाच विचार आपणही केला होता, पण विचार आई-बाबांना सांगणं हे धर्मसंकट होतं. पण बाबांनी तोच मार्ग शोधला.

''तुम्ही दोघं अवघड वाटून घेऊ नका. विनीत, मला तुझा अभिमान वाटतो. अशी परिस्थिती असूनही तू वाईट मार्गाने पैसा कमावला नाही... नंदा काल तू म्हणाली ना की विनीतच्या प्रामाणिकपणाला हे 'फळ' मिळालं घर नसण्याचं. पण बेटा... एक लक्षात घे. प्रत्येक झाडाला फळ येतंच असं नाही. अनेक झाडं फळ न देणारी असतात. पण ती सावली देतात. ऊर्जा देतात, स्वच्छ चांगला वायू देतात. कडुलिंबाचं झाड बघ. पानं कडू असतात, पण धान्यात ठेवलं तर धान्याला कीड लागत नाही. असेच काही गुणही असतात. ते सुखाची फळं देणार नाही, पण आनंदाची, सार्थकाची सावली देतात. विनीतसारखा प्रत्येक ऑफिसर प्रामाणिकपणे वागला, तर... त्याचं घर नाही, पण देश मात्र चांगला वसेल..''

''बाबा, तरी असं का व्हावं? सुरक्षित झाकू पाहणारी ही चादर तोकडी का पडावी?''

''आपण जीवनाला महावस्त्र समजतो, ही चूक आहे. ती एक ठिगळांची वाकळ आहे. ती पुरेशी नसतेच. हे ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्यांनी त्या तथाकथित महावस्त्राचा त्याग केला. मोठी माणसं होती ती. आपण लहान माणसं आहोत. त्या वाकळीची एक चिंधीही आपल्याला आधाराला पुरते... म्हणजे हे सर्व माहीत असूनही मोह सुटत नाही. मोह सुटला की एका क्षणात राम वनवासाला निघतो. बुध्द, महावीर सत्याच्या शोधात निघताच. आपल्यासाठी ही चिंधी सत्य असेल, तर तसं असो. पण प्रत्येकाच्या मनात ठिणगी असते. बहुतेकांची ती विझते. काहींच्या ठिणगीची ज्वाळा होते. जशी तुझ्या त्या गौतमची...''

गौतमच्या विचाराने विनीतचा चेहरा काळवंडला. गौतम त्या ज्वाळेत स्वत:च जळला, हे बाबांना कसं सांगावं?

''का रे... काय झालं?''

''हे सगळं अचानक! बाबा... एक कबूल करू?''

''सांग ना!...''

''काल... मीही वृध्दाश्रमाची माहिती काढून आलो. तुम्हाला कसं सांगावं हे कळत नव्हतं. आम्ही दोघं दडपणाखाली होतो.''

''आपली छान ओळख असते एकमेकांशी, पण अचानक अशी परिस्थिती येते की ओळखीची माणसं काहीशी अनोळखी वाटतात. आपण विश्वास ठेवून एखादा विचार मांडायचा. त्यावर विचारविनिमय करून ओळख पक्की करायची. बाप-लेकात तर हे व्हायलाच हवं ना! तर आता दडपणातून बाहेर या. दोन-तीन वर्षांनी आपलं घर होईल. आम्ही पुनः परत येऊ. रामानेच वनवासाला जावं असं थोडीच आहे? दशरथानेही जावं की वानप्रस्थाला...''

बाबांचा आवाज थोडा कापला.

''आणि हो... गौतमचा विषय काढल्यावर तुझी चलबिचल झाली होती. ती मी ओळखली. त्याला काही समस्या आली असेल, तर त्याच्या पाठीशी उभा राहा. समाजाला ज्या माणसांची गरज आहे, त्यापैकी तो आहे.''

''बाबा, मला तुमचा खरंच अभिमान वाटतो. तुम्ही त्याही काळात मला प्रोत्साहन दिलं. जेव्हा जातिव्यवस्था पाथरीसारख्या ठिकाणी फार तीव्र होती, तेव्हा तुम्ही गौतमच्या मैत्रीला विरोध केला नाही. आता तर पुष्कळ फरक पडलाय. पण गौतम मात्र हरलाय...''

''काय झालं?''

विनीतने जमेल तेवढं सांगितलं. काही गोष्टी सूचकपणे सांगितल्या.

बाबा हळहळले.

''गौतममधला कार्यकर्ता संपायला नको. त्याच्यासारखे लोक हताश होणं हे समाजाचं नुकसान आहे. जे घडलं, ते वाईट घडलं. फक्त त्याला माझा एक निरोप दे... हे शोषण एका स्त्रीचं झालंय. ती विशिष्ट जातीची म्हणून नाही, तर ती 'स्त्री'जातीची आहे म्हणून. माणूस एवढा हिंस्र झालाय की प्रत्येक स्तरातल्या स्त्रीला या शोषणाला बळी पडावं लागतं. कधी तर जिवानिशी जाते. त्याची लढाई जातिव्यवस्थेशी आहे. हे हलाहल पिऊन त्याला ते काम करावं लागेल. त्याला सावरायला काही दिवस लागतील खरं, पण मग तुम्हीच त्याला उत्साह द्यायचा.''

बाबांनी बोलता बोलता वृध्दाश्रमाचा संवेदनशील विषय अगदीच बाजूला ठेवला. खरं तर दोन्हीकडून तो विषय स्वीकारला गेला होता. मग त्यावर अधिक बोलणी नको होती.

पण रात्री विनीत मात्र विचार करत बसला. आयुष्यभर बाबांनी आणि आपण काही आदर्श बाळगले, पण अखेर आदर्शांना एवढी मुरड घालावी लागली! आई-वडिलांचा सहवास महत्त्वाचा की आदर्श? आपण पराभूत झाल्याची भावना हळूच डोकं वर काढत होती. केवळ ही समंजस नातीच आपल्या आयुष्याची मिळकत होती... तो गहिवरून आला. आज त्या नात्यातला समंजसपणा केवढा जिंकला! ज्या कारणांवरून इतर घरात भांडणं, शिव्याशाप होतात, ते कारण सहज सोडवलं गेलं. सगळा संमिश्र भावनांचा गुंता होत होता... या क्षणी आई-बाबा काय विचार करत असतील याचाही तो विचार करत होता. नंदा हलके हलके त्याच्या माथ्यावर हात फिरवत होती.

मुलींचं काही वेगळंच चाललं होतं.

''आजी-आजोबा जाणार... बाबांना वाईट वाटतंय. बट इट्स फॉर टाइम बीईंग. अगं शरण्या, वृध्दाश्रमात त्यांनाही केवढी एंटरटेनमेंट आहेत. शिवाय अशा ठिकाणी आजकाल इव्हेंट होतात ते वेगळेच. यांनी प्रॅक्टिकल राहून विचार केला तर बरं होईल. आपणही भेटूच की त्यांना. बाय दे वे... आजोबांचं कबर्ड मी माझ्या कपडयांसाठी घेणार हं. माझी पुस्तकंही असतात. जागा पुरायला हवी...''

''चालेल, पण आजीची सूटकेस माझी हं...''

''अगं, सूटकेस तं आजी घेऊन जाईल.''

''खरंच की, पण आजीच्या अलमारीत माझं सामान मावेल.''

***

आईने बाबांचा हात धरला होता.

''जमेल ना हो... एकदमच नवीन ठिकाण, कधी कल्पनाही केली नव्हती अशी जागा आहे ती... सर्वच वयस्क. बरं वाटेल ना?''

''रमवून घ्यायचं सुमन. तसं तिथलं वातावरण चांगलंच वाटलं आपल्याला. सर्व समवयस्क.''

''तेच तर, उत्साह वाटायला हवा. सर्व म्हातारे. तब्येतीच्या कुरबुरी...''

''सुमन... बस, सामोरं जायचं. पूर्वी वानप्रस्थाश्रम होता. आता वृध्दाश्रम आला. मृत्यूजवळ जायच्या आधीची पहिली पायरी. अनेक गोष्टींच्या परित्यागाची. बस... उरतील ते श्वास आपले. शांतपणे ताऱ्यांकडे पाहू, वाऱ्याची अनुभूती घेऊ... पानगळ पाहू... जगण्याच्या धामधुमीत परमेश्वराचं हे कौतुक पाहायचं राहून गेलं, हो ना?'' ते आईच्या हातावर थोपटत म्हणाले.

''आणि सुमन, तू आणि मी आहोत ना सोबत...''

''आणि कोणा एकाचा हात सुटला, तर...?''

बाबांनी आईचा हात घट्ट धरला. त्यांचा हात कापत होता.

''खरंच, उरलेल्या व्यक्तीचं काय होईल? पण सुमन, आयुष्य एकदाच मिळतं. अनेक अनुभूतीही आयुष्यातून मिळतात. त्या एकटेपणाचीही अनुभूती घेत जगायचं. जितका आनंद गोळा करत जगता येईल तेवढं जगायचं. तू किंवा मी, जो कोणी उरेल त्याने.''

घरात सर्व विश्वांची सरमिसळ होत होती.

 

रेखा बैजल

9850347252