जपान, भारत आणि बुलेट ट्रेन वगैरे...

विवेक मराठी    03-Oct-2017
Total Views |

1945 - हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधल्या दोन शहरांवर अमेरिकेने अणुबाँब टाकला आणि सगळं जग हादरलं. त्या हल्ल्याने जपानची आर्थिक अवस्था शून्यवत करून ठेवली.

साल 1947 - भारत स्वतंत्र होत होता आणि जपान अमेरिकेच्या मदतीने आपल्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून सावरत होता.

साल 2017 - जपानचे पंतप्रधान भारतात आले. बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जपानच्या सेंट्रल बँकेने नाममात्र व्याजदराने कित्येक लाख कोटींचं कर्ज दिलं.

माझ्या मनात प्रश्न आला, सत्तर वर्षांत आशिया खंडातला एक चिंचोळा देश इतकी प्रगती करू शकतो, तर त्याच आशिया खंडातील प्रचंड विविधता, साधनसंपत्ती असलेला आपला देश मात्र अजूनही मागे का राहतो? या प्रश्नाला उत्तर शोधताना माझ्या हातात जो स्टडवेलचं 'हाऊ आशिया वक्र्स' हे पुस्तक हातात येतं आणि मग एकेक प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. पूर्व आशियामधल्या काही धडाडीच्या अर्थव्यवस्थांच्या अभ्यासातून आलेली निरीक्षणं या पुस्तकात मांडलीयेत.

1950 साली जपानचं दरडोई उत्पन्न जगातल्या अविकसित राष्ट्रांच्या गटात बसेल इतकं होतं आणि तोच जपान पन्नास वर्षांत जगातल्या प्रगत देशांच्या पंगतीत जाऊन बसतो.

जी कथा जपानची, तीच कथा साउथ कोरिया आणि तैवानची.  गेली अनेक वर्षं हे देश पूर्व आशियाच्या विकासरथाचे सारथी ठरलेले आहेत.

यांनी असं काय केलं, हे जो स्टॅडवेलने मांडलंय त्यात तो तीन महत्त्वाचे आणि तिन्ही अर्थव्यवस्थांमध्ये समान असलेले दुवे मांडतो.

  1. जमीन सुधारणा आणि पुनर्वाटप. 2. औद्योगिकीकरण आणि निर्यातीवर जोर. 3. वेळप्रसंगी घेतलेले कठोर आर्थिक निर्णय.

जमीन सुधारणा आणि पुनर्वाटपातून काय साधलं गेलं? तर जमिनीची उत्पादकता वाढली, काम करणारे हात वाढले, शेती अधिकाधिक यांत्रिक पध्दतीने करता येऊ लागली. पध्दतशीरपणे केलेल्या या जमीनवाटपामुळे कृषी उत्पन्न वाढलंच आणि त्या वाढलेल्या उत्पन्नाच्या निर्यातीतून येणाऱ्या पैशांमधून औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला.

आपल्याला आठवत असेल, भूदान चळवळीच्या माध्यमातून, कूळ कायद्याच्या माध्यमातून भारतात अशा प्रकारचे प्रयत्न झालेले. मात्र राजकीय अनास्थेमुळे काही राज्ये वगळता जमीन सुधारणा आणि पुनर्वाटपाचा कार्यक्रम फारसा यशस्वी झाला नाही.

औद्योगिकीकरणावर जोर हे या अर्थव्यवस्थांचं दुसरं महत्त्वाचं लक्षण. अर्थातच औद्योगिकीकरणावर जोर देताना त्याचा पाया निर्याताधारित राहील याची काळजी घेतलेली. दुसऱ्या महायुध्दात ज्या अमेरिकेने जपानला बेचिराख केलं, त्याच अमेरिकेचा जपानच्या निर्यातीत सगळयात जास्त वाटा आहे.

तिसरं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे वेळप्रसंगी घेतलेले कठोर आर्थिक निर्णय आणि भांडवलावर असणारं नियंत्रण. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की भांडवलावरचं नियंत्रण म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्थेला अभिप्रेत असणारं नियंत्रण नव्हे, तर दूरगामी फायद्यांचा विचार करून अर्थव्यवस्थेला वळण लावण्यासाठी केलेलं नियंत्रण.

या सगळयांच्या बरोबरीने आणखी एक गोष्ट म्हणजे बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिटयूट्सचा भांडवल वितरणात केलेला सुयोग्य वापर. त्यामुळे जपानच्या अर्थव्यवस्थेतल्या पायाभूत सुविधा आणि उद्योग यांची उभारणी आणि विकास थेट परदेशी गुंतवणुकीतून फारसा झालेला नसून निर्यातीतून मिळालेल्या परकीय चलनातून अधिक झालेला आहे. त्यातूनच मग होंडा, सुझुकीयासारखे ऑॅटोमोबाइल जायंट्स, नोमुरासारख्या बलाढय आर्थिक कंपन्या उभ्या राहिल्या. परकीय चलनातून आलेल्या सुबत्तेने पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करता येऊ शकल्या. बुलेट ट्रेन्स हे त्या पायाभूत सुविधांचं मूर्त रूप आहे.

1947 ते 2017 असा हा जपानचा प्रवास आहे. संरक्षणावरचा खर्च अत्यंत कमी करून तो इतर विधायक गोष्टीत गुंतवणं हे जपानचं आणखी एक वैशिष्टय. (यात अमेरिकेने टाकलेल्या निर्बंधांचा मोठा वाटा होता म्हणा!)  या सत्तर वर्षांत अनेक चढउतार आलेच. 'एशियन क्रायसिस', 1992 ते 2002 असं 'लॉस्ट डीकेड' ज्यात आर्थिक विकासात आलेली घट या सगळया आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र निर्यातकेंद्री आणि औद्योगिकीकरण या दोघांच्या भक्कम पायावर उभी असलेली जपानी अर्थव्यवस्था त्यातून बाहेर पडली.

जपान हे करत असताना आपला भर मुख्यत्वे निर्यातीपेक्षा देशांतर्गत व्यापारावर अधिक राहिला. औद्योगिकीकरण नेहरूंच्या काळात झालं; मात्र सततचे परकीय हल्ले, आयात-निर्यातीतील तूट, समाजवाद, साम्यवाद की भांडवलवाद यापैकी नक्की काय स्वीकारावं याबद्दल नसलेली एकवाक्यता यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेने प्रगतीचा वेग फारसा पकडलाच नाही. एका निर्णायक क्षणी मग आपल्यालाही अर्थव्यवस्थेची कवाडं खुली करून जागतिकीकरण स्वीकारावं लागलं.

आज जेव्हा आपण 'बुलेट ट्रेन स्वस्तात मिळाली' असं म्हणतोय, तेव्हा या बुलेट ट्रेनच्या मागे उभ्या असलेल्या जपानी अर्थव्यवस्थेच्या इतिहासाकडेसुध्दा बघायला हवं. याच जपानच्या औद्योगिकीकरणाने जगाला मित्सुबिशी, होंडा आणि टोयाटो यासारखे बँ्रड दिलेत, कान-बान, जस्ट इन टाइम यासारख्या संकल्पना दिल्यात. जपानचं हे ॠण समजावं, म्हणून हा लेखप्रपंच.    

9773249697

aabhish101010@gmail.com