बिनधास्त सीमोल्लंघन करा...

विवेक मराठी    03-Oct-2017
Total Views |

***धनंजय दातार***

गुढीपाडव्याचा सण नव्या संकल्पांची गुढी उभारायला शिकवतो, तर विजयादशमीचा सण सीमोल्लंघन करून पराक्रम गाजवण्याचीर् ईष्या मनात उत्पन्न करतो. पण आपण त्यातून काहीच शिकत नाही. वर्षानुवर्षे आपण हे सण केवळ प्रतीकात्मक साजरे करून परंपरा पाळल्याचे समाधान मानत राहतो. आता ही मनोवृत्ती बदलली पाहिजे. जग 'ग्लोबल व्हिलेज' बनून जवळ येत असताना आपणही खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायला हवे.

 भारताला तीन दिशांनी समुद्राचे सान्निध्य लाभल्याने प्राचीन काळापासूनच सागरी व्यापाराची उत्तम परंपरा आहे. पूर्व किनारपट्टीवरील बंदरांतून जावा, इंडोनेशिया, बाली, सुमात्रा या देशांपर्यंत, तर पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांतून आखाती देश व आफ्रिकेपर्यंत भारतीय व्यापारी जहाजे घेऊन मुशाफिरी करत असत. त्याचबरोबर रेशीम मार्गासारख्या (सिल्क रूटसारख्या) भूमार्गानेही व्यापार मोठया प्रमाणावर होत असे. गंगा-यमुना-ब्रह्मपुत्रा यांसारख्या मोठया नद्यांतून नौकांद्वारे अंतर्गत वाहतूक व व्यापार होत होता. मसाले, कापड, नीळ, पोलाद आभूषणे अशा भारतीय उत्पादनांची मोहिनी जगाला पडली होती आणि भारत हा खऱ्या अर्थाने सुवर्णभूमी होता.

मध्ययुगात मात्र भारतावर वारंवार परकीय आक्रमणे होत राहिल्याने समाजाची मनोवृत्ती प्रथम बचावात्मक आणि नंतर परिस्थितीशरण झाली. व्यापारीवर्गही यापासून दूर राहू शकला नाही. एकेकाळी ज्या देशांतून व्यापाऱ्यांचे तांडे आणि जहाजांचे काफिले परदेशांत जात, तेथेच समुद्र उल्लंघनाबद्दल प्रायश्चित्त घेण्याचे विधी होऊ लागले. दूरवर जाणे नको म्हणून मुलाबाळांचे विवाह पंचक्रोशीतच जुळवणे किंवा एकदातरी काशीयात्रा घडणे म्हणजेच आयुष्याचे साफल्य मानणे अशा प्रकारांतून हा असुरक्षिततेचा पगडा दिसून येतो. व्यापार सोडाच, परंतु दुसऱ्या देशात अभ्यास, पर्यटन किंवा रोजगार यासाठी जाण्याच्या वाटाही भारतीय समाजाने स्वत:पुरत्या मनोमन बंद करून टाकल्या. वेगवेगळया राजवटींच्या अंमलातील भारताचे चित्र परदेशी प्रवाशांनी ग्रंथातून रेखाटले आहे. तसे कुणी भारतीयांनी परदेशांना भेट देऊन केल्याचे गेल्या शतकापर्यंत दिसून येत नाही.

हे तपशीलवार सांगण्याचे कारण म्हणजे आपल्यातील ही कासवाप्रमाणे पाय कवचात घेऊन बसण्याची सावध वृत्ती आजही बदललेली नाही. बहुतेकांना दर महिना ठरावीक पगाराची नोकरी हवी असते. पुन्हा ती आपल्याच गावात, घराजवळ आणि कायमस्वरूपी असावी, हीसुध्दा इच्छा असते. मी अनुभवातून सांगतो की उद्योजकतेला अशा 'गडया आपुला गाव बरा' मनोवृत्तीचा फारसा फायदा होत नाही. मी कधीकधी मनाशी आश्चर्य करायचो, की आमच्या दातार घराण्यात हे उद्योजकतेचे बीज पडलेच कसे? कारण एकतर सगळे नोकरदार, ठरावीक पगारात गुजराण करणारे मध्यमवर्गीय. धंदा कशाशी खातात, हे कुणालाच ठाऊक नव्हते, व्यापारी वर्गात ओळखी नव्हत्या, भांडवल उभारण्याचे धाडस नव्हते. माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. मलाही नोकरीच करायची होती. मग अशी कोणती सुप्त गोष्ट असावी, जिने दातारांना उद्योजकतेच्या वाटेवर आणून सोडले? मी शांतपणे विचार केल्यावर मला त्याचे उत्तर सापडले.

आमचे दातार घराणे हे काही पिढयांपासून भटक्यांचे (जिप्सी) आहे. आमचा कोणता पूर्वज काय कारणाने कोकणातले आपले गाव सोडून कधी विस्थापित झाला, हे मला ठाऊक नाही. पण आमचे सांगण्यासारखे कुठलेही मूळ गाव नव्हते. माझे आजोबा दत्तात्रय दातार हे रेल्वेत नोकरीला होते. वेगवेगळया गावांत बदल्या होत अखेर निवृत्त होताना ते विदर्भातील लाड कारंजा येथे स्टेशन मास्तर होते. त्यांना ते गाव आवडले आणि तेथे स्थायिक होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. माझे वडील हवाईदलात होते. त्यांच्याही वारंवार बदल्या होत. नेमणूक झाल्यावर लगेच ते पंजाबात पतियाळा येथे रुजू झाले आणि अखेर मुंबईत निवृत्त होऊन तेथून दुबईला गेले. माझे प्राथमिक शिक्षण प्रथम पतियाळात, नंतर शिरखेड या खेडयात, नंतर मुंबईत आणि अखेरीस दुबईत झाले. वडिलांना लहानपणापासून वेगवेगळी गावे हिंडायला मिळाली, लष्करी नोकरीमुळे विविध भारतीय समाजांत वावरण्याची सवय लागली. तीच सवय माझ्यातही आली. याच जिप्सी वृत्तीने अखेर आम्हाला व्यापारी बनवले.

उद्यमाची प्रेरणा मनात बाळगणाऱ्यांना माझे नेहमी सांगणे असते, की बिनधास्त धंदा सुरू करा आणि संधी मिळताच सीमोल्लंघन करा. दुसऱ्या गावात, राज्यात किंवा देशात जाण्याची संधी आली तर पाय मागे घेऊ नका. मारवाडी समाजाच्या उत्कर्षावर एका लेखकाने लिहिलेले पुस्तक मी वाचले. ब्रिटिश राजवटीत संस्थाने खालसा झाल्यावर राजस्थानात अनेक सावकार, व्यापारी घराण्यांचा राजाश्रय संपला. काही जण तर दिवाळखोर झाले. पण त्यांनी हार न मानता देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन उद्योग थाटले आणि त्यातून मोठमोठी उद्योजक घराणी उभी राहिली. पंजाबी आणि सिंधी समाजाची उद्योजकताही अशीच स्फूर्तिदायक आहे. फाळणीनंतर स्थावर, चीजवस्तू मागे सोडून भारतात आलेल्या या समाजातून अनेक जण शून्यातून उद्योजक बनले आहेत. मराठी समाजाचेही उदाहरण घेतले, तर अनेक मराठी उद्योजक गरीब किंवा मध्यमवर्गातून मेहनतीने मोठे झाले आहेत. अशा यशस्वी उद्योजकांच्या कथा नेहमीच स्फूर्तिदायक असतात.

परमुलखात जाण्याची कल्पना लोकांना का रुचत नाही? मनात येणारा पहिला विचार म्हणजे सुखासुखी आपले गाव, आपली माणसे सोडून कशाला उगीच नशिबाची परीक्षा घ्यायला जायचे? नंतर वाटते, की तेथील स्थानिक लोक आपल्याला स्वीकारतील का? त्या गावातील व्यापारी सहकार्य करतील का? स्पर्धेत आपला निभाव लागेल का? या सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे. जर तुमचा स्वत:च्या ध्येयावर व गुणवत्तेवर ठाम विश्वास असेल आणि तुमचा स्वभाव मैत्रिपूर्ण व लवचीक असेल, तर तुम्ही जगात कुठेही यशस्वी व्यवसाय करू शकाल. कधीकधी आपल्या मनातील या शंका अनाठायी ठरतात. आपण काही पूर्वग्रह मनाशी बाळगतो, पण वस्तुस्थिती वेगळी असते.

माझ्या बाबांना मदत करण्यासाठी मी उत्साहाने अगदी तरुण वयात - म्हणजे इयत्ता बारावी झाल्यावर लगेच दुबईला गेलो. मला तेथील भाषा, स्थानिक संस्कृती, रितीरिवाज, मानसिकता याबाबत काहीही माहिती नव्हती. मला मराठी, हिंदी आणि कामचलाऊ इंग्लिश इतक्याच भाषा येत होत्या. दुबईतील स्थानिक समाज हा अरबीत व्यवहार करतो. ती भाषा मला येत नव्हती. त्यामुळे दुकानात इंग्लिश व अरबी या दोन भाषांत बोलणारे ग्राहक आले की माझी तारांबळ उडायची. मला न्यूनगंड जाणवू लागला. कुठून या परक्या मुलखात येऊन पडलो, असे वाटायला लागले. पण एका प्रसंगातून मी खूप महत्त्वाचा धडा शिकलो. मी एकदा दुकानात काम करत असताना एक स्थानिक माणूस येऊन अरबीतून काही विचारू लागला. मला त्याची भाषा कळत नसल्याने मी भांबावून त्याच्याकडे बघत बसलो. थोडया वेळात त्यालाच समजले, की मला अरबी येत नाही. त्यावर त्याने शेल्फवरील एका वस्तूकडे खूण केली व हात उभा धरून मनगटाच्या मध्यावर थाप मारली. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला ती वस्तू अर्धा किलोमध्ये हवी होती. ती दिल्यावर तो हसत हसत शुभचिंतन करत निघून गेला. त्यानंतर मी लगेच दुकानातील वस्तूंना अरबी भाषेत काय म्हणतात ते आणि शिष्टाचाराचे शब्द शिकून घेतले. पुढे प्रयत्नपूर्वक इंग्लिश आणि अरबी भाषाही अस्खलित बोलण्यास शिकलो.

 

परमुलखात धंदा करण्यासाठी कानमंत्र...

आपण परमुलखात व्यवसाय करायला जात असू, तर तेथील स्थानिक भाषेचा व संस्कृतीचा आदर करणे आणि त्या समाजाचे रितीरिवाज आत्मसात करणे फार महत्त्वाचे ठरते. सुरुवातीला तुम्हाला तेथील स्थानिक भाषा आली नाही, तरी संकोच बाळगू नका. तेथील लोक समजून घेतात आणि त्यांची भाषा तुम्हाला शिकवतात. तुम्ही मात्र ती शिकण्याइतकी लवचीकता दाखवली पाहिजे. एखाद्या देशात जाऊन किमान तीन वर्षांत तेथील स्थानिक भाषा शिकून न घेणे लाजीरवाणे ठरते. त्याचे खूप तोटेही असतात. परदेशात धंदा करताना तुमच्या गरजांपेक्षा तेथील बाजारपेठेच्या किंवा ग्राहकांच्या गरजा समजून घेणे महत्त्वाचे असते. ज्या गोष्टींबद्दल स्थानिक नागरिक संवेदनशील असतील, त्या हेकेखोरपणाने विकण्याचा वेडेपणा करू नये. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक कायद्यांची चौकट मोडू नये. आपले उत्पादन गुणवत्तापूर्ण आणि व्यवहार पारदर्शक असावेत. भांडण, संघर्ष, राजकारण टाळावे आणि आपल्या कामकाजावर लक्ष केंद्रित करावे, हे उत्तम.

vivekedit@gmail.com