डोळयांची निगा

विवेक मराठी    07-Oct-2017
Total Views |

 

मधुमेहात सगळयात दुर्लक्षित गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे डोळे. कारण जोपर्यंत डोळे खूप खराब होत नाहीत, तोपर्यंत कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. साहजिकच, त्रास झाल्याशिवाय डॉक्टरांना न भेटण्याची आपली वृत्ती डोळयांचा बराच मोठा घात करते. लक्षात येईपर्यंत डोळा बहुधा अर्धा निकामी झालेला असतो. प्रत्यक्षात आताशा मधुमेह हे आंधळेपणा येण्याचं फार महत्त्वाचं कारण आहे. म्हणून मधुमेह डोळयांमध्ये नेमका काय गोंधळ घालू शकतो, हे समजून घ्यायलाच हवं.  

आपण डोळयांच्या सर्वात महत्त्वाच्या भागापासून सुरुवात करू. डोळयांचा पडदा किंवा रेटिना हा डोळयातला अत्यंत नाजूक आणि ज्याशिवाय आपल्याला कुठलीच प्रतिमा दिसू शकत नाही असा हिस्सा. पडदाच नाही, तर प्रतिमा नाही या भौतिकशास्त्राच्या नियमाला धरूनच हे आहे. आणि प्रतिमाच उमटली नाही, तर तिचं आकलन तरी होणार कसं? तर या पडद्याचा मध्यभाग जोपर्यंत शाबूत आहे, तोपर्यंत आपली दृष्टी फारशी कमी झालेली आपल्याला जाणवत नाही, कारण बहुतेक वेळा आपण सरळ नजरेने जग पाहत असतो. पण मध्यभाग शाबूत असतानाही डोळयांच्या इतर भागांमध्ये मधुमेहाचं आक्रमण झालेलं असू शकतं. मुळात कॅन्सरप्रमाणे मधुमेहात डोळे बरेच खराब होईपर्यंत काहीच न समजण्याचं हे सर्वात मोठं कारण आहे. डोळे आपलं पाहण्याचं काम बऱ्याच अंशी नीट करत असताना कोण कशाला त्यांची नोंद घेणार म्हणा! याचाच दुसरा अर्थ म्हणजे कॅन्सर जसा फैलावल्यावर त्याचं निदान होतं, तसंच थोडंसं डोळयांचं होतं. म्हणूनच मधुमेहींनी वेळच्या वेळी डोळयांच्या डॉक्टरांना दाखवून, डोळयात बाहुली मोठी करण्याचं औषध घालून डोळयांचा पडदा तपासून घेणं आवश्यक आहे.

वेळच्या वेळी म्हणजे नेमकं कधी? याचं उत्तर इथे दिलं पाहिजे. टाइप वन मधुमेहात मधुमेह अचानक उद्भवतो. निदान होण्याअगोदर त्याला शरीरात गोंधळ घालायला वेळच मिळालेला नसतो. म्हणून टाइप वन मधुमेहात पहिली पाच वर्षं तरी डोळयांचा प्रश्न उद्भवत नाही. त्यासाठी निदानानंतर पाचेक वर्षांनी डोळयांची पहिली चाचणी करायला सांगितलं जातं. आपल्यापैकी बहुतेकांना टाइप टू मधुमेह असतो. प्रत्यक्षात निदान होण्यापूर्वी किमान आठ ते दहा वर्षं मधुमेहाला पोषक परिस्थिती शरीरात तयार झालेली असते. हा काळ डोळयांवर मधुमेहाचा घाला होण्याला पुरेसा असतो. म्हणून या प्रकारच्या मधुमेहात निदान झाल्या झाल्या डोळयांची तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर दर वर्षी डोळे तपासून त्यांच्याकडे लक्ष देण्यासही सांगितलं जातं.

मधुमेह आयुष्याच्या काही वळणांवर मात्र वेगळा वागतो. मुलं वयात येताना आणि मधुमेही स्त्रिया गरोदर झाल्यास तो कधीकधी त्यांच्यावर अन्याय करतो. त्यांच्या डोळयांचे पडदे खराब करतो. म्हणूनच मधुमेह झालेली मुलं वयात येत असताना आणि आधीच मधुमेहाने ग्रस्त असलेली महिला गरोदर झाल्यावर त्यांनी डोळयांच्या डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्यावेत. गरोदरपणात तर दर तीन महिन्यांनी आणि प्रसूती झाल्यानंतर सहा आठवडयांचा कालावधी लोटल्यावर डोळयांची तपासणी व्हावी, अशी भलामण केली जाते.

आता मुख्य प्रश्न असा आहे की एवढी काळजी घ्यावी इतका मधुमेह डोळयांना कुठला त्रास देतो?

मधुमेह डोळयांच्या बाबतीत तशा अनेक समस्या उभ्या करतो. डोळयाच्या जवळजवळ प्रत्येक भागाला तो सतावतो. अर्थात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पडदा. साहजिकच आपण पडद्यापासून सुरुवात करू.

डोळयांमधल्या अतिशय सूक्ष्म अशा रक्तवाहिन्यांना मधुमेह बराच उपद्रव करतो. ज्याप्रमाणे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठून त्या रक्तवाहिन्या चोंदतात, तद्वत डोळयांच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यादेखील बंद होतात. त्या वाहिन्या पडद्याच्या ज्या भागाला रक्तपुरवठा करत असतात, तो भाग रक्त मिळत नसल्याने उपासमारीची शिकार होतो. त्यातून या उपासमार झालेल्या पेशी शरीराकडे रासायनिक सिग्नल पाठवतात. हे सिग्नल मिळाल्यावर शरीर त्वरित नव्या दमाच्या रक्तवाहिन्या बनवण्याचा आदेश डोळयांच्या पेशींना देतं. वेळेचा तगादा असल्यामुळे या रक्तवाहिन्या घाईघाईत बनवण्याला पर्याय उरत नाही.

इथे कोणी म्हणेल - हे तर चांगलंच आहे की! जिथे रक्त उपलब्ध नाही, तिथे नव्या रक्तवाहिन्यांची योजना ताबडतोब करणं यात वाईट काय? पण अशा घाईघाईत बनलेल्या रक्तवाहिन्या डोळयांच्या जन्मजात रक्तवाहिन्यांहून बऱ्याच निराळया असतात. तिथेच घोटाळा होतो. काम दर्जेदार होत नाही, त्यात त्रुटी राहून जातात. जन्मजात रक्तवाहिन्यांच्या जवळपास प्रत्येक पेशीला एक एक स्नायूची पेशी लपेटलेली असते. आपलं आकुंचन-प्रसरण करून ही स्नायूची पेशी रक्तवाहिनीचा व्यास लहान-मोठा करते. त्यामुळे डोळयांच्या लहानात लहान रक्तवाहिनीतदेखील गरजेनुसार त्या त्या भागाचा रक्तपुरवठा कमी-जास्त करण्याची क्षमता निर्माण होते. हे काम करत असताना स्नायूची पेशी आधार देण्याची, पुष्टी देण्याची अतिरिक्त जबाबदारीसुध्दा पार पडत असते. त्यामुळे रक्तदाब वाढला तरी या जन्मजात रक्तवाहिन्या निभावून नेऊ शकतात. रक्तवाहिन्यांचा पृष्ठभाग ताणला जाऊन त्यावर फुगवटे येत नाहीत.

घाईघाईत बनलेल्या रक्तवाहिन्यांना असा स्नायूंचा आधार नसतो. त्यांच्या पेशींमध्ये फार ताण सहन करण्याची ताकद नसते. साहजिकच जरासा रक्तदाब वाढला की त्यांच्या पृष्ठभागाला फुगवटे तयार होतात, जे थोडयाशा ताणाने, कुठल्याही कारणाने रक्तदाब वाढला गेला की फुटतात, त्यातून रक्तस्राव होतो. म्हणून नव्या रक्तवाहिन्या व त्यावर निर्माण झालेले फुगे हे मधुमेहात डोळयांचा प्रश्न सुरू झाला आहे याचं सुरुवातीचं लक्षण असतं. या फुगवटयांना डॉक्टर 'मायक्रो ऍन्युरिझम' म्हणतात. फुटलेल्या रक्तवाहिन्यांतून केवळ रक्तच बाहेर पडतं असं नाही, तर कोलेस्टेरॉलसारख्या तेलकट गोष्टीदेखील मिळालेली संधी साधतात आणि बाहेर पडून डोळयाच्या पडद्यावर आपलं बस्तान बसवतात. डोळयांमध्ये असलेला द्रव जोपर्यंत स्फटिकासारखा स्वच्छ असतो, तोपर्यंत दिसण्यात अडचण येत नाही. पण रक्तातल्या लाल पेशी जेव्हा त्या द्रवात उतरतात, तेव्हा गढूळ झालेल्या त्या द्रवातून प्रकाशकिरणं आरपार जाऊ  शकत नाहीत. दृष्टी कमी होते.

इथे दोन-चार गोष्टी लक्षात यायला हरकत नाही. मधुमेहाने डोळयांमध्ये गडबड करायला सुरुवात केली की मधुमेह काबूत ठेवण्याला जितकं महत्त्व आहे, तितकंच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित असण्याला आहे. शिवाय मूत्रपिंडाशी, मज्जातंतूशी वा हृदयाशी संबंधित काही प्रश्न झालेला असला, तरी डोळे खराब होण्याची भीती वाढते. कारण रक्तदाबाने नव्या आधारहीन रक्तवाहिन्या फुटतात, कोलेस्टेरॉलने पटलावर चरबी जमा होते, अधिकाधिक रक्तवाहिन्या चोंदतात. मज्जातंतू रक्तवाहिन्यांच्या आकुंचन-प्रसरणाचे संदेश नीट नेऊ  शकत नाहीत. मग गरजेनुसार रक्तपुरवठा करणं शक्य होत नाही. हृदयरोग झाला ही कुठेतरी रक्तवाहिन्या चोंदताहेत याची पावतीच, याचा स्पष्ट पुरावाच असते. काही लोकांना कॉन्ट्रक्चर असतात. म्हणजे त्यांचे सांधे आखडलेले असतात. सांध्यांच्या उघडझाप होण्याला प्रतिबंध करणारे, सांध्यांचा लवचीकपणा नाहीसा करणारे, ते खेचून धरणारे बंध त्यांच्यामध्ये असतात. या व्यक्तींमध्येदेखील डोळयांचा पडदा निकामी होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं काही अभ्यासांत दिसून आलं आहे. ज्यांची मूत्रपिंडं मधुमेहग्रस्त आहेत, त्यांनाही हा धोका अधिक असतो, कारण मूत्रपिंड आणि डोळे नुकसान करणाऱ्या एकाच प्रकारच्या प्रक्रियेचे बळी असतात. एकाला समस्या झाल्यावर दुसऱ्याला काहीच झळ न बसण्याची शक्यता कमी असते.

थोडक्यात सांगायचं, तर या सगळया घटना घडत असताना ना दुखत, ना खुपत. साहजिकच आपल्याला हे होत असताना काही जाणवणं शक्य नसतं. मग कुणी डॉक्टरकडे जाणार कशाला आणि आपले डोळे तपासून घेणार कशाला? यासाठी काहीच लक्षणं दिसत नसताना मुद्दाम जाऊन डोळयांच्या डॉक्टरांची गाठ घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण एकदा का या सूक्ष्म फुग्यांची संख्या वाढली की माणसाची नजर कमी कमी होत जाते. मग उपचार करून खूप उपयोग होतोच असं नाही.

त्यातही डोळयांच्या पडद्याचे फोटो काढणं जास्त चांगलं. तुमच्याकडे एक दस्तावेज तयार होतो. फोटो तुम्ही भविष्यात केव्हाही पाहू शकता. डोळयांमध्ये झालेला सूक्ष्म बदलदेखील पूर्वीचा फोटो पाहून, त्यांची तुलना करून सहज लक्षात येतात. फोटो पाहायला वेळेची मर्यादा नसते. त्यामुळे प्रत्यक्ष पाहत असताना नजरेतून सुटलेली गोष्ट पुन्हा पडताळता येते. बराच वेळ न्याहाळता येते. शंका असेल तर ते दुसऱ्या आणखी तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवता येतात. आता तर मोठमोठया डॉक्टरांना ईमेल करून पाठवता येतात. म्हणून हे सांगणं.

9892245272