न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते...

विवेक मराठी    01-Nov-2017
Total Views |

 

कृषी क्रांती, औद्योगिक क्रांती यानंतर पुढची क्र ांती 'ज्ञान क्रांती' असेल, असे भाकित प्रसिध्द भविष्यवादी एल्विन टॉफ्लर यांनी वर्तवले होते. आज ते खरे होताना दिसत आहे. खरे तर या ज्ञानाचे महत्त्व भारतीय संस्कृतीत पाच हजार वर्षांपासूनच अधोरेखित केले आहे. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट दुसरी नाही, असे गीतेत सांगितले आहे. पण आपण आजही तो उपदेश दुर्लक्षित करत आहोत. ज्ञानाची तळमळ बाळगली, तर यशही सहजसाध्य होते.

 उद्यमाची आस असलेल्यांना मी नेहमी एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे धंद्यात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे उच्च शिक्षण असण्याची गरज नाही. नोटा मोजता येणे, चलनाची किंमत कळणे आणि सोपे अंकगणित इतक्या तयारीवरही तुम्ही उत्तम धंदा करू शकता. पण याचा अर्थ असा नव्हे की शिक्षणाला महत्त्व देऊ नये. माझे वरील वाक्य केवळ प्रवेशाच्या पायरीपुरते आणि प्रत्येकाला प्रेरित करण्यापुरते मर्याादित आहे. शिक्षणाचे आणि ज्ञानप्राप्तीचे महत्त्व किती अनमोल आहे, हे मी अनुभवातून शिकलो आहे.

शालेय वयात मला शिक्षणाची मुळीच गोडी नव्हती. कोणत्याही विषयात गती नव्हती. गणिताची तर मी धास्तीच घेतली होती. शिरखेडसारख्या खेडयातून एकदम मुंबईत आल्यावर वर्गातील मुले माझ्या ग्रामीण भाषेला हसत. त्यामुळे बुजून मी बोलायला घाबरत होतो. शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मी चाचरायचो. एक प्रकारचा संकोची आणि घाबरट स्वभाव बनला होता. मला खेळणे आवडायचे, पण त्याचे रूपांतर कधी क्रीडाकौशल्यात झाले नाही. एकंदरीत वर्गात जो तळाचा वर्ग असतो, ज्यांच्या प्रगतिपुस्तकात 'वरच्या वर्गात घातला' असा शेरा नेहमी असतो, तसा मी सामान्य विद्यार्थी होतो.

माझ्या आईला माझ्या शिक्षणाबद्दल खूप काळजी वाटत असे. मला शालेय शिक्षणात एकंदर रस नाही, हे बघून तिने इयत्ता आठवीला मला टेक्निकल स्कूलमध्ये घातले होते. हा मुलगा निदान वायरमन किंवा फिटर झाला तरी पुष्कळ झाले, असा तिचा विचार होता. माझे प्रगतिपुस्तक बघून बाबा फारसे काही बोलत नसत. ''तू नीट शिकला नाहीस, तर पुढे तुझ्या वाटयाला अंगमेहनतीची कामे येतील'' या शब्दात ते संभाषण संपवत. आईचे तसे नव्हते. ती कळकळीने मला सांगे, ''दादा! मला परिस्थितीमुळे इयत्ता सातवीतून शाळा सोडावी लागली. मी गृहिणी असल्याने मला कुणी शिक्षण विचारले नाही. पण तुझे तसे नाही. कोणतीही नोकरी करायची झाल्यास तुला प्रत्येक टप्प्यावर शिक्षण विचारतील. तू पुढे पोटापाण्याची सोय बघण्यापुरते तरी कौशल्य मिळव बाबा.'' आईचा उपदेश गांभीर्याने घेण्याइतकी परिपक्वता त्या वयात माझ्यात नव्हती. माझे 'पहिले पाढे पंचावन्न' सुरूच होते.

 विद्येविना मती गेली... 

आमच्या दुकानात आंध्र प्रदेशचे एक गृहस्थ कामाला होते. ते कमी शिकलेले होते, पण कामात एकदम तत्पर होते. ते स्वत: कष्टाळू होते आणि मी दिवसा भरपूर कष्ट उपसून रात्री शिक्षण घेत होतो, त्याचे त्यांना खूप कौतुक होते. मी मालकाचा मुलगा आणि ते नोकर असे नाते आमच्यात नव्हते. मी आजारी पडलो तर ते माझी खूप काळजी घेत. मी त्यांना अप्पा म्हणत असे. पुढे हे अप्पा थकले. त्यांना त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी जाण्याची ओढ लागली. जमलेली सर्व पुंजी घेऊ न ते भारतात रवाना झाले. त्यांना समृध्दीचे दिवस येतील आणि वृध्दत्व सुखात जाईल, याचा आम्हालाही आनंद होता.

पुढे एकदा मुंबईत त्यांचा मुलगा भेटला. अप्पांचे कुशल विचारता त्याने धक्कादायक बातमी सांगितली. अप्पांनी दोन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांच्याबाबत फार दुर्दैवी प्रकार घडला होता. अप्पा भारतात गेल्यावर त्यांनी जागा खरेदी करून त्यावर घर बांधले आणि उत्पन्नाचा आणखी एक स्रोत मिळावा म्हणून भाडयाने दिले. अप्पा निरक्षर होते. त्यांना केवळ अंगठा उठवायचे माहीत होते. भाडेकरूने त्याचा गैरफायदा घेतला आणि तो ते घर बळकावून बसला. त्या धक्क्याने अप्पांनी आत्महत्या केली होती. मला हे समजताच मी फार अस्वस्थ झालो. अप्पांचे कुटुंबीयही गरीब आणि फारसे शिकलेले नव्हते. ते आपल्याच दैवाला दोष देत होते. मी अप्पांच्या गावी जाऊ न एक हुशार वकील गाठला. त्याच्या मदतीने अप्पांचे घर त्यांच्या मुलाबाळांना मिळवून दिले. त्याच वेळी अप्पांच्या फोटोसमोर शपथ घ्यायला लावली की यापुढे शिक्षणाकडे दुर्लक्ष करणार नाही. निरक्षरता कसा विपरीत परिणाम करू शकते, हे दिसून आले आणि महात्मा फुले यांचे वाक्यही आठवले - 'विद्येविना मती गेली...'

इयत्ता दहावीला गणिताने माझी विकेट काढली. मी एकूण पाच वेळा नापास झालो. अखेर माझ्या प्रयत्नातील सातत्य बघून म्हणा, किंवा माझे पेपर तपासायचा कंटाळा आला असेल म्हणा, पण मी सहाव्या प्रयत्नात एकदाचा पास झालो. इयत्ता अकरावीला मी कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हे वाणिज्य शाखेचे गणित मात्र माझ्यासाठी हसरे रूप घेऊ न आले. इथे ती क्लिष्ट प्रमेये, सिध्दता, एकसामायिक समीकरणे, त्रिकोणमिती असे किचकट प्रकार नव्हते. इथे मस्त नफ्या-तोटयाचे हिशेब, ताळेबंद असे आवडणारे प्रकार होते. पूर्वी गणित सोडवताना माझी आकडेमोड चुकायची, म्हणून मी उत्तरे पुन्हा पुन्हा तपासून बघायचो. ती सवय आता मला वरदान ठरली.

मी इयत्ता बारावीत असताना 'बाबांनी दुबईत सुरू केलेल्या दुकानात मदतीसाठी जातो,' असा आईच्या मागे धोशा लावला. आईने बाबांकडे शब्द टाकला, पण बाबांना मी असे अर्धवट शिक्षण घेऊ न तेथे येणे मुळीच मंजूर नव्हते. ते स्वत: जुनी बारावी पास होते. मी निदान पदवीधर तरी व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्याच सुमारास परिस्थितीच अशी निर्माण झाली की बाबांना दुकानात मदतीसाठी कुणाची तरी गरज भासू लागली. त्यांनी नाइलाजाने माझ्या येण्याला होकार दिला आणि मी दुबईला रवाना झालो. पण तेथे गेल्यावर मला आयुष्यातील खरी कसोटी द्यावी लागली. मी खूप कष्ट उपसले, अनुभव घेतले आणि अपमानही सहन केले. 'धंदा करणे तुम्हाला जमणार नाही,' हे वाक्य वारंवार ऐकून घ्यावे लागायचे. याच सुमारास एका प्रसंगाने मला शिक्षणाची खरी किंमत कळली.

आमच्या दुकानातून दुबईतील एका मोठया व्यापाऱ्याला माल पुरवला जायचा. हिशेब करून पैसे आणण्यासाठी मला नेहमी त्यांच्या कार्यालयात जावे लागायचे. हे व्यापारी गृहस्थ प्रचंड श्रीमंत असले तरी फारसे शिकलेले नव्हते. त्यांनी सहीसुध्दा चेकवर लिहिण्यापुरती शिकून घेतली होती. त्यांना धंद्यातील बारीक-सारीक माहिती होती, परंतु आकडेमोड येत नव्हती. मी त्यांच्यापुढे बसल्यावर ते माझ्याकडून चेक्सवरील रकमा वाचून घेत. कुठल्या आकडयावर किती शून्ये याचा हिशेब बोटे मोजून करत. मला त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाविषयी प्रचंड आदर होता, पण एका गोष्टीचे दु:ख वाटे. त्यांच्या नजरेआड त्यांचे कर्मचारीच मालकाच्या निरक्षरपणाची टिंगल करत. 'काला अक्षर भैंस बराबर' असे उपरोधिक बोलत. एवढा श्रीमंत आणि अनेकांचा पोशिंदा असलेला माणूस, पण या एका त्रुटीमुळे त्याची चेष्टा होई. माझ्या मनात विचार आला, की 'आपणही शिक्षणात कमी राहिलो तर पुढे कुणीही आपल्याला सहज सुनवायला कमी करणार नाही आणि आयुष्यभर न्यूनगंड राहील तो वेगळाच.'

मी दुबईच्या एका कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बारावीच्या पुढचे शिक्षण सुरू केले. दिवसभर कष्ट आणि रात्री अभ्यास, असे तीन वर्षे करून मी पदवी प्राप्त केली. पुढे तेथूनच मी बिझनेस मॅनेजमेंटमधील डॉक्टरेट पूर्ण केली. दहावीला गणितात पाच वेळा नापास झालेला धनंजय तेथून डॉ. धनंजय दातार म्हणून सन्मानाने बाहेर पडला. शिक्षणाने माझ्यातील खूपशा त्रुटी निघून गेल्या. शाळकरी वयात जो मुलगा चाचरत आणि घाबरत बोलायचा, तो हजारो श्रोत्यांपुढे सहजतेने भाषण देऊ  लागला. दुबईत एकवेळ टॅक्सीचे भाडे वाचवण्यासाठी पायपीट करावी लागली, तेथेच माझ्या हातून कोटयवधी रुपयांचे व्यवहार घडले. मी आजही स्वत:ला विद्यार्थी मानतो. नवे काही शिकण्याची तळमळ सोडलेली नाही. ज्ञानासारखे, शिक्षणासारखे पवित्र दुसरे काही नाही, हे मी खऱ्या अर्थाने जाणले आहे.