डोळयांची निगा - 2

विवेक मराठी    01-Nov-2017
Total Views |

दुर्दैवाने मधुमेह डोळयांच्या जवळजवळ प्रत्येक भागाचं नुकसान करतो. एकदा हे नुकसान सुरू झालं की मग जे उपाय योजले जातात, ते बऱ्यापैकी अघोरी म्हणावे असे असतात. इतके उपाय करूनही दृष्टी किती वाचेल हे कुणालाच सांगता येत नाही. पण तरीही या अत्यंत महत्त्वाच्या इंद्रियाकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं. तरीही आपले डोळे वेळच्या वेळी तपासून घेत नाहीत. दर वर्षी मधुमेहींनी डोळयात औषध घालून मागचा पडदा तपासून घेतला, तर कितीतरी लोकांचे डोळे वाचतील यात शंका नाही.

 डोळयांमध्ये केवळ पडदा नसतो. डोळयांच्या इतर भागांवरदेखील मधुमेहाचा परिणाम होत असतो.

नीट दिसायला जसा आपल्या डोळयांचा पडदा महत्त्वाचा असतो, तसंच डोळयांच्या आत असलेला द्रव अगदी स्फटिकासारखा स्वच्छ असावा लागतो. एखाद्या काचपेल्यात स्वच्छ पाणी असलं तर त्यापलीकडचं सगळं सुस्पष्ट दिसेल. पण तेच गढूळ पाणी असलं तर दिसणार नाही. मधुमेहात रक्तातलं ग्लुकोज खूप वाढल्यावर हेच होऊ शकतं. कारण रक्तातलं ग्लुकोज डोळयातल्या द्रवात उतरतं. तो द्रव साखरेच्या पाकासारखा अपारदर्शक बनतो. म्हणून जेव्हा मधुमेह अनियंत्रित होतो, तेव्हा अंधुक दिसायला लागतं. नजर कमी झाली म्हणून अनेकदा लोक चश्मा बदलायला जातात, कधीकधी बदलूनही घेतात. त्यांची फसगत होऊ शकते. नवा चश्मा घेण्यापूर्वी प्रथम आपलं ग्लुकोज नियंत्रणात आणायला हवं. ग्लुकोज व्यवस्थित झाल्यावर डोळयांमधला द्रव पूर्ववत व्हायला साधारण एक-दीड महिना लागतो. तेव्हा नवा चश्मा घ्यायच्याआधी किमान एखादा महिना जाऊ देणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवायला हवं.

कित्येकदा जवळचं कमी दिसणाऱ्या व्यक्तींना अचानक चश्म्याशिवायदेखील साफ दिसायला लागतं. त्यांना वाटतं, वा, छान आहे. आपली दृष्टी सुधारली आहे. पण मधुमेहात असं होणं म्हणजे उलटं लक्षणदेखील असू शकतं. त्यांचं ग्लुकोज अचानक खूप वाढलेलं असू शकतं. हा उफराटा प्रकार आपण लक्षात ठेवला पाहिजे.

डोळयांची उघडझाप करण्यासाठी आणि हव्या त्या दिशेला त्यांची हालचाल करण्यासाठी डोळयांचे स्नायू काम करत असतात. मधुमेहात शरीराच्या इतर भागातले स्नायू ज्याप्रमाणे कमकुवत होतात, स्नायूंना मेंदूकडून येणारे संदेश नीटपणे पोहोचवणारे मज्जातंतू प्रभावित होतात, तीच गोष्ट डोळयांच्या स्नायूंच्या बाबतीत घडते. डोळयांची हालचाल करणारे बहुतेक स्नायू मेंदूकडून थेट येणाऱ्या क्रॅनियल नर्व्हज या गटातले असतात. मधुमेहाने त्यांच्यावर घाला घातला की डोळयांच्या स्नायूंना हतबलता येते. त्यांना लकवा होतो. डोळयांच्या बाहुलीकडच्या पारदर्शक भागाबद्दल (कॉर्नियाबद्दल) थोडया सावधगिरीच्या सूचना द्यायला हव्यात. साधारण डोळयांना, विशेषत: कॉर्नियाला सहजी इजा होऊ नये, म्हणून निसर्गाने एक योजना केलेली आहे. हा भाग अत्यंत सजग आणि संवेदनशील बनवला आहे. बुब्बुळांना स्पर्श करायला जवळ जावं तर पापण्या पटकन मिटतात. इजा करणारी वस्तू डोळयांना स्पर्शू देत नाहीत. मधुमेहात ही प्रतिक्षिप्त क्रिया कमी होते. बुब्बुळांना इजा व्हायची शक्यता वाढते. बुब्बुळाला चरा पडला तरी ते पटकन कळत नाही. यासाठीच तर मधुमेही व्यक्तींनी काँटॅक्ट लेन्स लावू नयेत असा सल्ला दिला जातो. पण तिसरी, चौथी आणि सहावी क्रॅनियल नर्व्ह प्रभावित होण्याची भीती मधुमेहात असते. त्यातही तिसरी आणि सहावी अधिक वेळा प्रभावित झालेली दिसते. मज्जातंतूंना रक्ताचा पुरवठा करणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने त्यांची उपासमार होते. पुरेसं पोषण न मिळाल्याने मज्जातंतू मृत होतात आणि लकवा होतो, असं बहुतेक तपासण्यांमध्ये दिसून आलं आहे. फक्त आपल्याला आलेला तिरळेपणा किंवा डोळयांची न होणारी हालचाल मधुमेहामुळे आहे असं मानून गप्प बसता नये. जवळजवळ 50 टक्के मधुमेहींच्या अचानक आलेल्या तिरळेपणामागे वेगळं काहीतरी कारण असतं, हेदेखील सिध्द झालं आहे. त्यामुळे डोळयांच्या डॉक्टरांना दाखवून निदान आपल्या बाबतीत इतर कुठलंही गंभीर कारण नाही ना, याची खात्री करून घेतली पाहिजे.

तिसऱ्या क्रॅनियल नर्व्हचा लकवा झाल्यास पापणी वर उचलणं जड जातं. म्हणजे एक डोळा उघडत नाही. अशा वेळी आपण डॉक्टरांकडे धाव घेतोच. परंतु जर तिरक्या डोळयांनी पाहिलं असता दोन दोन दिसत असेल, तर ती गोष्ट डॉक्टरांच्या लक्षात आणून देतोच असं नाही. पण हेसुध्दा कुठेतरी बिनसल्याचं लक्षण आहे आणि तेही डॉक्टरांना दाखवायला हवं.

मधुमेहात आणखी एक गोष्ट अशीच दुर्लक्षित करता कामा नये. डोळयांच्या खोबणीत झालेलं इन्फेक्शन कधीकधी जिवावर बेतू शकतं. बहुधा फंगसमुळे झालेली इन्फेक्शन्स खूप भीतिदायक असतात. नाकात सुरू झालेलं म्युकोर मायकोसिसचं फंगस इन्फेक्शन पाहता पाहता खोबणीच्या आसपास असलेल्या सायनसमध्ये पसरतं आणि तिथून थेट मेंदूपर्यंत पोहोचतं. यात रुग्णाचा जीव जाण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. म्हणून कुठलीही इजा झालेली नसताना डोळयांच्या आसपास लाल दिसायला लागलं, दुखायला लागलं, तर जराही दुर्लक्ष करणं योग्य नाही. तसंच मधुमेही व्यक्तींना डोळे आले, तर त्याचे व्यवस्थित उपचार करून घ्यायला हवेत; कारण कित्येकदा अशा एरव्ही क्षुल्लक वाटणाऱ्या, 'येतात डोळे अनेकांचे' असं म्हणून दुर्लक्ष कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी मधुमेहात गंभीर होण्याची भीती असते. यासाठी घरगुती उपचार करत बसण्याऐवजी डॉक्टरांना दाखवणं अधिक चांगलं.

आपल्याकडे खूप उष्ण वातावरण आहे. उन्हाळयात अंग चांगलंच भाजून बुब्बुळांवरदेखील या उष्णतेचा परिणाम होऊ शकतो. ती कोरडीठाण होऊ  शकतात. म्हणून उन्हाळयात डोळे थंड ठेवणाऱ्या थेंबांचा, कृत्रिम अश्रू बनवणाऱ्या थेंबांचा नियमित वापर करावा. शिवाय मोटारसायकल चालवताना धूलिकणांमुळे डोळयांना इजा होणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. गॉगल वापरायला हवेत. पोहण्याच्या तलावातली साफसफाई हा कळीचा मुद्दा आहे. त्यातले रोगजंतू डोळयात जाणार नाहीत याची दक्षता घेणं तितकंच आवश्यक आहे. तिथेदेखील सहसा पोहण्याचा गॉगल घातल्याविना पाण्यात उतरू नये.

मधुमेहात कमी वयात मोतीबिंदू होतो, हेदेखील अनेक अभ्यासांमध्ये सिध्द झालं आहे. इतकंच नव्हे, तर हा मोतीबिंदू फार लवकर 'तयार' होतो. मोतीबिंदू 'पिकला' म्हणतात तसं होतं. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया जपून करावी लागते. कारण इथेही जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाण इतरांच्या तुलनेने बरंच अधिक असतं. धुरकट दिसायला लागणं हे याचं सगळयात मोठं लक्षण.

ग्लॉकोमा किंवा ज्याला आपण मराठीत 'काचबिंदू' म्हणतो, तो प्रकार मधुमेही मंडळींमध्ये सर्वसामान्य जनतेपेक्षा दीडपट जास्त दिसतो. विशेषत: ज्याला ओपन ऍंगल ग्लॉकोमा म्हणतात, त्याचं प्रमाण अधिक असतं. यात डोळयांमधलं प्रेशर नेहमीपेक्षा वाढतं आणि त्या दबावाखाली डोळयांच्या आतल्या नाजूक गोष्टींवर दाब पडून त्यांना इजा होते. शिवाय या संदर्भातली औषधं मधुमेहींमध्ये जपून वापरावी लागतात. ग्लुकोज कमी झाल्याचं चिन्ह म्हणजे जोरात भूक लागणं, थरथरायला होणं, घाम फुटणं ही असतात. ग्लॉकोमामध्ये वापरले जाणारे डोळयात घालायचे थेंब कधीकधी ही चिन्ह दिसू देत नाहीत. त्यामुळे प्रश्न निर्माण होऊ  शकतो. ग्लुकोज खूप कमी झालेलं न समजल्यामुळे रुग्ण बिनधास्त राहतो आणि क्वचित कोमात जातो.

तीच गत याच आजारात तोंडावाटे घ्यायच्या औषधांची. डोळयात वाढलेलं प्रेशर कमी करायला लघवीवाटे थोडंसं पाणी बाहेर टाकतील अशी औषधं दिली जातात. पण शरीरातलं पाणी बाहेर टाकताना क्षारदेखील बाहेर जातात. अशाने रक्तातलं क्षारांचं प्रमाण वर-खाली होण्याची मोठी भीती असते. म्हणून ही औषधं वापरताना रक्तातल्या क्षारांवर बारीक लक्ष ठेवावं लागतं. वारंवार त्यांची तपासणी करून घ्यावी लागते. बहुधा ज्यांना मधुमेहाने मूत्रपिंडाचा त्रास सुरू झाला आहे, त्यांच्यामध्ये फारच जपून राहावं लागतं.

दुर्दैवाने मधुमेह डोळयांच्या जवळजवळ प्रत्येक भागाचं नुकसान करतो. एकदा हे नुकसान सुरू झालं की मग जे उपाय योजले जातात, ते बऱ्यापैकी अघोरी म्हणावे असे असतात. रक्तवाहिन्यांना आलेले फुगवटे असोत की होणारा रक्तस्राव असो, लेझर किरणं वापरून केलेली उपाययोजना म्हणजे डोळयांच्या नाजूक भागाला त्या किरणांच्या साहाय्याने जाळून टाकण्याचा प्रयत्न असतो. दृष्टी वाचवण्यासाठी असं करणं अपरिहार्य असतं. विचार करण्याची गोष्ट म्हणजे शरीराचा एखादा भाग जाळून टाकावा लागणं हा अघोरी प्रकार नव्हे काय?

इतकं करूनही दृष्टी किती वाचेल हे कुणालाच सांगता येत नाही. पण तरीही या अत्यंत महत्त्वाच्या इंद्रियाकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं. रक्त अगदी नियमित तपासून ग्लुकोजवर बारीक नजर ठेवणारी मंडळीदेखील आपल्या 'नजरे'ला तितकंसं महत्त्व देत नाहीत. आपले डोळे वेळच्या वेळी तपासून घेत नाहीत. दर वर्षी मधुमेहींनी डोळयात औषध घालून मागचा पडदा तपासून घेतला, तर कितीतरी लोकांचे डोळे वाचतील यात शंका नाही. या बाबतीत आपले 'डोळे' कधी 'उघडणार', कोण जाणे.    

9892245272