विकास खाणारे भकास झाले!

विवेक मराठी    10-Nov-2017
Total Views |

 

 गुजरातमध्ये नरेंद्रभाई मोदी यांनी भ्रष्टाचाराचा धंदा बंद केला आहे,  आता देशात हा धंदा बंद करण्याच्या कामात ते गुंतले आहेत. विकास वेडा झाला नसून विकास खाणारे भकास झाले आहेत. गुजरातच्या जनतेला हे दाखवून द्यायचे आहे की आम्ही गुजराती आहोत, त्याच वेळी आम्ही भारतीय आहोत आणि त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत. गुजरातचे हित गुजरातच्या विकासात आहे. भारताचे हित भारताच्या विकासात आहे आणि हिंदूंचे हित मानवाला मानवी धर्म देण्यात आहे. सत्तेवर कोण राहणार? कोणता पक्ष राहणार? केवळ या प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते गुजरातचे मतदान मर्यादित नाही. विधानसभेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये गुजरातच्या जनतेने भावी भारताच्या पायाभरणीचे दगड रचले. आता त्यावर भिंती उभ्या करण्याचे काम त्यांना करायचे आहे.

 गुजरात राज्याचे देशातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. उद्यमी गुजराती जनता, व्यापारी वर्गातील गुजरातमधील स्थान, या आर्थिक कारणांबरोबरच महात्मा गांधींचा गुजरात, सरदार वल्लभभाई यांचा गुजरात यामुळे गुजरातचे देशातील स्थान उठून दिसत असते. पाकिस्तानला लागून असलेली सरहद्द, नर्मदा नदीवरील प्रचंड धरण अशा विषयांमुळेदेखील गुजरात अन्य राज्यांपेक्षा उठून दिसतो. तसे म्हटले, तर पंजाब, हरयाणा, राजस्थान या राज्यांनादेखील अशी वैशिष्टये लावता येऊ शकतात. देशपातळीवरील दिग्गज नेते या राज्यांनीदेखील देशाला दिलेले आहेत. हे वाचल्यानंतर महाराष्ट्रप्रेमी वाचक नक्कीच प्रश्न करील की, महाराष्ट्र गुजरातपेक्षा काही कमी आहे का?

तरीसुध्दा गुजरातच्या एका वैशिष्टयाबाबत गुजरात हे सगळयात वेगळे राज्य ठरते. आज ज्यांचे वय तिशी-पस्तिशीच्या आसपास असेल, त्यांना 1974चे गुजरातचे नवनिर्माणाचे आंदोलन माहीत नसणार. जून महिना आला की अणीबाणीची चर्चा सुरू होते. गुजरात आंदोलन हे अणीबाणीचे कारण आहे. गुजरात आंदोलनाने काँग्रेसविरुध्द आणि भ्रष्टाचाराविरुध्द देशव्यापी जबरदस्त वातावरण निर्माण केले. राजकारणापासून दूर गेलेले जयप्रकाश नारायण गुजरात आंदोलनामुळे पुन्हा सक्रिय झाले. 1977 साली दिल्लीतून इंदिरा गांधीची सत्ता जाण्यात या सर्वाची परिणती झाली. सगळया देशाला हलवून सोडण्याची शक्ती गुजरातमध्ये आहे.

2014च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विजय झाला. स्वबळावर त्यांनी केंद्रातील सत्ता मिळविली. नेतृत्व केले नरेंद्र मोदी यांनी. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यांना आग लागून कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले. गुजरातमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया झाली आणि मुस्लीम समाजाला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागली. नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने 'मौत का सौदागर' ठरवून टाकले, अमेरिकेने तेव्हा त्यांना व्हिसा देण्याचे नाकारले. नंतर झालेल्या सर्व निवडणुकीत गुजरातच्या हिंदू जनतेने भाजपाला निर्णायक बहुमत दिले. गुजरातचा हा वीर पुढे देशाचा वीर झाला. देशातील हिंदू जनतेनेही त्यांना आपलाच नेता मानले आणि 2014च्या निवडणुकीत, इतिहासात प्रथमच हिंदू जनतेने सामूहिकपणे मतदानाच्या पेटीच्या माध्यमातून आपली इच्छा प्रकट केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टी केंद्रस्थानी सत्तेवर आली. हिंदू एक झाला की तो काय चमत्कार करतो, हे गुजरातने गेली वीस वर्षे दाखवून दिले आहे. गुजरातचे अनुकरण करून भारतातील हिंदूंनी देशपातळीवर त्यावर मोहोर उमटविली आहे.

अशा या गुजरातमध्ये 9 आणि 11 डिसेंबरला विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. साऱ्या भारताचे लक्ष गुजरातच्या निवडणुकांकडे लागलेले आहे. गुजरात देशाला कोणती दिशा देणार? हा एकच महत्त्वाचा प्रश्न आहे. वेगवेगळया वृत्तवाहिन्या निवडणुकांपूर्वी मतदारांचे सर्वेक्षण करतात आणि त्यानुसार आपले अंदाज व्यक्त करतात. एबीपी न्यूजच्या अंदाजाप्रमाणे भारतीय जनता पार्टीला 144 ते 152 जागा मिळतील. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडिया यांच्या अंदाजाप्रमाणे भाजपाला 110 ते 125 जागा मिळतील. मतदानापूर्वीचे सर्वेक्षण आणि जागांचे अंदाज नेहमीच खरे ठरतात असे नाही. म्हणून त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणे अवघड आहे. निवडणूक प्रचाराचे वातावरण कसे तापत जाईल, शेवटच्या दहा-पंधरा दिवसात कोणत्या घटना घडतील, यावर मतदानाचे प्रमाण आणि पक्षांना मिळणारे मतदानाचे प्रमाण अवलंबून असते.

राज्याची निवडणूक राज्याच्या प्रश्नावर लढविली जाते. काँग्रेसने मागील चुका लक्षात घेता मुस्लीम तुष्टीकरणाचा मुद्दा निवडणुकीत आणायचा नाही, असे ठरविले आहे. त्यामुळे राहुल गांधी चुकूनही गुजरात दंगलीचा विषय काढीत नाहीत. ते मंदिरात जातात, कपाळाला गंध लावतात, हिंदूंच्या श्रध्दांविषयी मला आदर आहे, हे त्यांना सांगायचे आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावर काँग्रेस निवडणूक लढवूच शकत नाही. हिंदू समाजात जातींच्या आधारे प्रचंड फूट पाडून हिंदू मतांचे विभाजन घडवून आणण्याची राहुल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांची व्यूहरचना आहे. त्यासाठी त्यांनी पटेल समाजातील हार्दिक पटेल, दलित समाजाचे जिग्नेश मेवानी आणि मागासवर्गीयांचे अल्पेश ठाकोर यांना जवळ केलेले आहे. या तिन्ही नेत्यांचा उदय गेल्या दोन-तीन वर्षांत झालेला आहे.

नेत्याचा उदय करण्याची एक व्यूहरचना असते. थोडेबहुत नेतृत्वगुण असलेला युवा नेता अगोदर हेरावा लागतो. आंदोलनाचा विषय त्याच्या डोक्यात घुसवावा लागतो, आंदोलनाची साधने त्याला उपलब्ध करून द्यावी लागतात, पैशांची तरतूद करावी लागते, कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांचा ताफा उभा करावा लागतो, प्रसिध्दी माध्यमात त्याला प्रचंड प्रसिध्दी द्यावी लागते, माध्यमांना प्रसिध्दीची किंमत द्यावी लागते, अखिल भारतीय स्तरावरचे नाव असलेले नेते अशा युवा नेत्याच्या मागे उभे करावे लागतात. साधारणतः कम्युनिस्टांची ही पध्दती आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट, भाजपाच्या संदर्भात जुळे भाऊ बनून विरोधासाठी उभे राहतात. ते दोघेही एकमेकांना साहाय्य करतात. अशा सर्व व्यूहरचनेतून हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश हे नेते उभे राहिलेले आहेत. म्हटले तर ते कागदी घोडे आहेत आणि म्हटले तर ते नेते आहेत. गुजरतच्या जनतेला त्यांची परीक्षा करायची आहे.

गुजरातमध्ये काँग्रेस आणि हे तीन नेते, बरोबर कम्युनिस्ट पार्टी या सर्वांची स्ट्रॅटेजी भाजपाला पराभूत करण्याची आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे असे आहे की, गुजरातमध्ये भाजपाला हरविणे अशक्य आहे. त्यांचे मत थोडे बाजूला ठेवले तरी भाजपाला हरविण्याचे धोरण म्हणजे काय? हे समजून घ्यायला पाहिजे. लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हिंदू समाजाला राजकीयदृष्टया तोडण्याचे हे धोरण आहे. इंग्रजांनी 150 वर्षे भारतावर राज्य करताना हे धोरण चालविले. काँग्रेस पक्षानेदेखील 60 वर्षे देशावर राज्य करीत असताना हेच धोरण चालविले. कोणत्याही प्रकारचा जातवाद हा सेक्युलर आहे, तो प्रागतिक विचार आहे, मनूवाद संपविणारा आहे, अशा प्रकारची मांडणी राजकीय नेतेदेखील करतात आणि त्यांनी विकत घेतलेले बुध्दिमानदेखील करतात. जातवाद जागवून जातिअंताची भाषणे करण्यास त्यांना लाज वाटत नाही. प्रश्न असा आहे की गेली वीस वर्षे शहाणी झालेली गुजरातची जनता, काँग्रेसचा हा मायावाद कसा समजून घेणार आहे?

ज़ागतिक पातळीवर विचार करायचा, तर भारताने जगाला दिशा देणे हे भारताचे जागतिक लक्ष्य आहे. हे काम समर्थपणे करण्यासाठी स्वधर्म, स्वदेश आणि संस्कृती ही ज्यांची जीवनमूल्ये आहेत, अशी माणसे सत्तेवर दीर्घकाळ राहिली पाहिजेत. राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस ही आपली हिंदू ओळख विसरलेली काँग्रेस आहे. कम्युनिस्टांच्या कच्छपी लागलेली काँग्रेस आहे. मुसलमानांच्या मतासाठी हिंदूंच्या पाठीत सुरा खुपसण्यास काँग्रेस मागे-पुढे पाहत नाही. हिंदू ऐक्याविषयी काँग्रेसला काही देणेघेणे नाही. हिंदू जीवनदर्शन, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू योगदर्शन यावर काँग्रेसचा विश्वास आहे की नाही? असा प्रश्न पडतो. रामजन्मभूमी हा काँग्रेसच्या अनास्थेचा विषय आहे. गुजरातच्या मतदारांनी काँग्रेसची ही ओळख कदापि विसरता कामा नये. ही पटेलांची काँग्रेस नाही, इटालियन सोनिया गांधींची काँग्रेस आहे.

विकास, आरक्षण आणि दलितांवरील अन्याय-अत्याचार यावर राहुल गांधी यांनी भर दिलेला आहे. गेली वीस वर्षे गुजरातमध्ये विकास झाला नसता, तर देशातील हिंदू जनतेने देश नरेंद्र मोदींच्या हाती दिला नसता. विकास नेहमीच वेळखाऊ असतो. आंब्याची कोय आज लावली की लगेचच त्याला दुसऱ्या वर्षी आंबे लागत नाहीत, हे सर्वांना समजते. विकासाच्या नावाखाली पैसा खाण्याचा धंदा काँग्रेस आणि त्यांचे सर्व साथीदार, नोकरशाहीतील नोकरशहा आजपर्यंत अंदाधुंदपणे करीत होते. राहुल गांधीचे पिताश्रीच एकदा म्हणाले होते की, विकासाचा एक रुपया दिल्लीहून निघाला की ज्याच्यासाठी तो निघाला आहे त्याच्या हातात फक्त पंधरा पैसे पडतात. विकासाची रक्कम वीस-पंचवीस लाख कोटींची असते. मधल्या मध्ये किती रक्कम हडप केली जाते, याचे गणित वाचकांनीच करावे. गुजरातमध्ये नरेंद्रभाई मोदी यांनी हा धंदा बंद केला, आता देशात हा धंदा बंद करण्याच्या कामात ते गुंतले आहेत. विकास वेडा झाला नसून विकास खाणारे भकास झाले आहेत. त्यांचे दुःख राहुल गांधी व्यक्त करतात. या भकास लोकांचा चेहरा म्हणजे राहुल गांधी आहेत.

गुजरातच्या जनतेला हे दाखवून द्यायचे आहे की आम्ही गुजराती आहोत, त्याच वेळी आम्ही भारतीय आहोत आणि त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत. गुजरातचे हित गुजरातच्या विकासात आहे. भारताचे हित भारताच्या विकासात आहे आणि हिंदूंचे हित मानवाला मानवी धर्म देण्यात आहे. सत्तेवर कोण राहणार? कोणता पक्ष राहणार? केवळ या प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते गुजरातचे मतदान मर्यादित नाही. जातवादी लोकांचे करायचे काय? जमातवादी लोकांचे स्थान काय? आपले तत्त्वज्ञान, संस्कृती, मूल्यपरंपरा याच्याविषयी काहीही आदर नसलेल्या लोकांचे करायचे काय? याचेही उत्तर देणारे आहे. विधानसभेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये गुजरातच्या जनतेने भावी भारताच्या पायाभरणीचे दगड रचले. आता त्यावर भिंती उभ्या करण्याचे काम त्यांना करायचे आहे.

9869206101