गरिबीला लाजू नये, श्रीमंतीने माजू नये...

विवेक मराठी    13-Nov-2017
Total Views |

 

मला पुष्कळदा आढळून आले आहे की गरिबीत पूर्वायुष्य काढायला लागलेली माणसे श्रीमंत बनतात, तेव्हा त्यांच्यात काही भयगंड रुजून बसतात. काहींना पूर्वी भोगलेले दिवस आठवणेही नकोसे वाटते आणि ते कायम पैशाचा विचार करत चंचल लक्ष्मीला ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागतात. त्यातूनच त्यांच्यात एक कृपण वृत्ती वाढीला लागते. माझ्याबाबत हे घडले नाही, कारण माझ्या आई-वडिलांचे संस्कार...

 माझे लहानपण गरिबीत गेले. सुख एवढेच, की ही गरिबी अशी होती, जिने कधी उपाशी राहू दिले नाही किंवा भीक मागू दिली नाही, पण त्याचबरोबर गरजेहून यत्किंचितही अधिक काही मिळू दिले नाही. माझे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण अमरावती जिल्ह्यातील शिरखेड या खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. शिरखेडला मी माझ्या आईकडच्या आजोळी राहत होतो. आईकडचे आजोबा म्हणजे दामोदर कुरुळकर. ते तेथील सरकारी रुग्णालयात कंपाउंडर होते. माझ्या आजीचे नाव शांताबाई. गमतीची गोष्ट म्हणजे दोघांची नावे त्यांच्या व्यक्तीमत्त्वाशी मुळीच जुळणारी नव्हती. आजोबांचे नाव दामोदर असले, तरी त्यांच्याकडे कायम पैशाची तंगी असायची आणि आजीचे नाव शांताबाई असले, तरी ती स्वभावाने रागीट होती. खूप खस्ता खात आयुष्य काढल्याने तिचा स्वभाव तिरसट झाला होता.

शिरखेडला आजोळच्या घरी मी इयत्ता पहिली ते चौथी अशी चार वर्षे घालवली. या काळात माझे रोजचे जेवण म्हणजे सकाळी पोळी व वरण, तर रात्री पोळी आणि दही. ताटात चारी ठाव पदार्थ नसायचे. भात आणि काही गोडधोड केवळ सणासुदीच्या दिवशी बनत असे. भाजी, चटणी, कोशिंबीर हे पदार्थही क्वचित बनत. कधी रुग्णालयातून गेलेल्या एखाद्या रुग्णाने त्याच्या शेतातील माळवं आणून दिली तरच त्याची भाजी, कोशिंबीर होई. मला कधीकधी पोळी आणि दही खाण्याचा कंटाळा येई. मी आजीकडे दह्यात साखर घालण्याचा हट्ट धरायचो. त्यावर आजी म्हणायची, ''साखर सकाळच्या चहापुरतीच आहे. सध्या तू दह्यात साखर आहे, असे समजून खा.'' आजीची ती विवशता समजून घेण्याचे माझे वय नव्हते. मी खोडकरपणा करून तिला सतावत असे आणि ती वैतागाने 'जावयाचे पोर हरामखोर' असे म्हणत मला धोपटून काढत असे.

आजोबांच्या घरी लाइट नव्हते. सायंकाळी रॉकेलवर चालणारा कंदील पेटवून त्याच्या उजेडात व्यवहार होत. कंदिलाच्या काचा रांगोळीने पुसणे, वातीवरची काजळी कापणे, रॉकेल गाळून त्यातील कचरा काढणे ही कामे माझ्याकडे असत. शाळेतून आल्यावर कंदिलाच्या उजेडात लवकर गृहपाठ करायला लागायचा. रात्री दिवे जाळत बसण्याची चैन परवडणारी नसल्याने मी आजीचा स्वयंपाक उरकायच्या आत गृहपाठ संपवत होतो. माझ्याकडे शाळेचा एकच गणवेश होता. रोज तोच धुऊन, वाळवून वापरायचा. पावसाळयात तो लवकर वाळला नाही की आजी स्वयंपाकाच्या तव्यावर तो सुकवून देत असे. आजोबा स्वत: टायरचा सोल लावलेल्या स्वस्तातील चपला वापरत असत. मला चपला नसल्याने मी अनवाणीच शाळेला जात असे. वर्गात दंगा-मस्तीत गणवेशाची बटणे तुटत. ती लावण्याचा व्याप नको म्हणून आम्ही सेफ्टी-पिना लावत असू. त्या पिनचा आणखीही एक फायदा व्हायचा. शाळेत अनवाणी जाताना पायात वारंवार काटे घुसत. ते काढण्यासाठी या पिनसारखे उपयुक्त साधन दुसरे नव्हते. पावसाळयात पोते पांघरून आम्ही शाळेला जात असू. सगळयांच्याच घरी थोडयाफार फरकाने अशीच गरिबी होती. त्यामुळे 'गरजेला उपयोगी पडतो, तोच खरा मित्र' ही म्हण आम्हा सगळयांसाठी लागू होती.

गरिबीने माझ्यावर खूपच संस्कार केले. मला काटकसर करायला शिकवले, पैशाची किंमत ओळखायला शिकवले, एखादी गोष्ट मिळेपर्यंत वाट बघण्याचा संयम अंगी बाणवला. माझ्या आईनेही बऱ्याच गोष्टी केवळ नजरेच्या धाकाने मला शिकवल्या. आम्ही नात्यात कुणाकडे जेवायला गेलो तर मी अधाशीपणे जेवत नाही ना किंवा ताटात काही वाया घालवत नाही ना, याकडे तिचे बारीक लक्ष असे. आई-वडील नेहमी सांगत, ''बाळांनो! आपल्या घरात तुम्हाला साधे, मोजके, पण पोटभर कायम खायला मिळेल. मात्र दुसऱ्याच्या घरच्या पक्वान्नांवर नजर ठेवून परान्नाचा लोभ धरू नका.'' मला त्याची इतकी सवय झाली होती की कुणाच्या घरी गेलो आणि त्यांनी काही खाण्याचा आग्रह केला, तर ''माझे आताच खाणे झाले आहे, पोटात थोडीशीही जागा नाही'' असे सांगून मी नकार देत असे.

'माणसाने खाऊन माजावे, पण टाकून माजू नये' अशी आपल्याकडे म्हण आहे. आमच्याकडे खायलाच पुरेसे नव्हते, तर टाकणे दूरच राहिले. मला आजही ताटात टाकून देण्याच्या प्रकाराची चीड आहे. मी माझ्या मुलांनाही त्या शिस्तीतून सूट देत नाही. माणसाने कधीच माजू नये, असेच माझे मत आहे. मला एकदा बिझनेस मीटिंगसाठी एका अरब देशात जाण्याची वेळ आली. मला ज्यांनी भेटायला बोलवले होते, ते त्या देशातील एक प्रभावी नेते होते. अरब प्रदेशात आधी भोजन आणि मग चर्चा करण्याचा रिवाज आहे. त्याला अनुसरून या गृहस्थांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये भोजनादरम्यान चिकन, मटण, मासे, विविध उंची वाइन्स असे नाना प्रकारचे पदार्थ मागवले. मी ते बघून थक्क झालो. मी मोजकेच पदार्थ डिशमध्ये घेऊन ती संपवली, परंतु त्या श्रीमंत व्यक्तीने मात्र केवळ काही घास उष्टावून ते सर्व उंची खाद्यपदार्थ अगदी सहजतेने टाकून दिले. माझे मन हळहळले. वाटून गेले, की त्या भोजनाच्या बिलाच्या रकमेत 50 माणसे पोटभर जेवली असती. माझी आई म्हणायची, ''माणसाने गरिबीला लाजू नये आणि श्रीमंतीने माजू नये.'' त्या शब्दांची आठवण झाली.

 


किंमत माणसाला नसून त्याच्याजवळच्या पैशाला असते...

 
गरिबीने मला अपमानही खूप सहन करायला लावले. लहानपणी मला एका गृहस्थांनी समारंभाच्या पंगतीत जेवणाच्या ताटावरून उठवले होते. ''बाळ, ही पंगत मोठयांसाठी आहे, तू नंतर बस'' असे सांगून त्यांनी मला उठवले होते. आईला ही गोष्ट सांगितल्यावर तिने शुक्रवारची कहाणी सांगून माझी समजूत काढली होती. तिचे ते बोलणे अगदी खरे होते. मला पंगतीतून उठवणारे हेच सद्गृहस्थ पुढील काळात मी दुबईत उद्योजक झाल्याचे कळताच काही मदत मागण्यासाठी वारंवार संपर्क साधू लागले, तेव्हा मला उमगले की 'किंमत माणसाला नसून त्याच्याकडील पैशाला असते.'

 

 मला पुष्कळदा आढळून आले आहे, की गरिबीत पूर्वायुष्य काढायला लागलेली माणसे श्रीमंत बनतात, तेव्हा त्यांच्यात काही भयगंड रुजून बसतात. काहींना पूर्वी भोगलेले दिवस आठवणेही नकोसे वाटते आणि ते कायम पैशाचा विचार करत चंचल लक्ष्मीला ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागतात. त्यातूनच त्यांच्यात एक कृपण वृत्ती वाढीला लागते. भारतीय मनोवृत्ती आणि परदेशी लोकांची मनोवृत्ती यात एक मोठा फरक मला आढळून येतो. आपल्याकडे पुढच्या पिढयांसाठी मालमत्ता, संपत्ती साठवत बसण्यावर भर दिला जातो, तर परदेशात नव्या पिढीला त्यांच्या चरितार्थाच्या वाटा त्यांनीच शोधायला प्रोत्साहन दिले जाते. आयुष्याचा आनंद घेण्याबाबतही तेच. आपल्याकडे वर्षानुवर्षे पैसे साठवत बसून वृध्दापकाळाची सोय करण्याचा विचार केला जातो, परंतु परदेशातील लोक दोन-चार वर्षे पैसे साठवून छानपैकी सहली काढून निरनिराळे देश बघून येतात. मला नेहमी वाटते की आपल्याकडे पैसे आहेत, तर ते खर्च करून जीवनाचा आनंद भरभरून घेतला पाहिजे. अंगात जोर आहे तोवरच फिरले पाहिजे, कारण साठवलेला पैसा अखेर वृध्दापकाळी औषधे आणि रुग्णालय यांवरच खर्च होतो.

मी गरिबीला लाजलो नाही आणि श्रीमंतीने माजलो नाही याचे कारण आई-वडिलांची शिकवण. 'कष्ट आणि प्रामाणिकपणा या गुणांवर पुढे जा आणि वेळ आल्यावर समाजाच्या देण्याची परतफेड कर' असे त्यांनी मला शिकवले आहे. मी त्याचे काटेकोर पालन करत आहे. आयुष्यात कष्ट केल्याखेरीज काही मिळत नाही, हे शिकल्यामुळे मला माझ्या यशाचा आणि सुबत्तेचा माज नाही. मी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग नेहमी नजरेसमोर ठेवतो - 'जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे, उदास विचारे, वेच करी॥'

vivekedit@gmail.com