न सुकणाऱ्या जखमा

विवेक मराठी    14-Nov-2017
Total Views |

*** डॉ. सतीश नाईक***

रोगजंतू, माती यासारखा अडथळा असेल, तर जखम सुकायला वेळ लागणार हे ओघाने आलं. परंतु असं काही नसल्यास कापलेल्या जागच्या मृत पेशींच्या जागी तिथे आलेल्या सामग्रीचा उपयोग करून जखम भरून यायला वेळ लागत नाही. मधुमेहातही शरीराचा कल जखम भरून काढण्याचाच असतो. तोच निसर्गनियम आहे. फक्त जखमेच्या जागी पूर्वीच्याच पेशी येतील असं नाही.

 काका माझ्याशी वाद घालत होते. त्यांच्या हातात तीन-तीन रिपोर्ट होते. प्रत्येक रिपोर्ट त्यांना मधुमेह असल्याचं सांगत होता. त्यांना ते बिलकुल पटत नव्हतं. त्यांचं म्हणणं एकच होतं - मला मधुमेह असणं शक्यच नाही. माझ्या जखमा पटकन सुकतात. मग मला मधुमेह कसा असू शकतो? कारण मधुमेहात जखमा लवकर बऱ्या होत नाहीत..

हा विचार घट्टपणे उराशी बाळगणारे केवळ ते एकटेच नाहीत. मधुमेह म्हणजे न सुकणाऱ्या जखमा असंच अनेकांना वाटत असतं. त्यात तथ्यही आहे. मधुमेह झाल्यावर जखमा चांगल्या होण्यासाठी खूप वेळ लागतो, हे खरं आहे. मग काकांचं काय? ते खोटं बोलत आहेत का?

नाही. सत्य या दोघांच्या मध्ये लपलेलं आहे. ते सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला शरीराला होणारी जखमा बरी कशी होते हे माहीत करून घ्यायला हवं.

कुणालाही - म्हणजे अगदी नॉर्मल माणसालाही होणाऱ्या जखमा बऱ्या होताना शरीरात एका विशिष्ट क्रमाने बदल होतात. ज्या जागी जखम झालेली असते, त्या जागी अल्पसा का होईना रक्तस्राव होतो. मग तो रक्तस्राव थांबतो. याचं कारण तिथे प्लेटलेट्स गोळा होतात. जमा झालेल्या रक्ताची गुठळी बनवतात. समजा, जखम कुठल्या तरी अस्वच्छ गोष्टीमुळे झाली असेल, तर त्यात थोडे तरी रोगजंतू असणं स्वाभाविक असतं. रक्तस्रावातून वाहून आलेल्या पांढऱ्या पेशी सुरुवातीला त्या रोगजंतूंवर हल्ला करतात. रोगजंतू फारसे नसतील, तर तिथे जमा झालेल्या थोडयाशा पेशीदेखील पुऱ्या पडतात. पण त्यांची संख्या जास्त असली, तर पांढऱ्या पेशींना कुमक मागवावी लागते. सीमेवर तणाव निर्माण व्हावा, त्याचे वायरलेस संदेश जावेत आणि देशभरातून त्या ठिकाणी सैन्याची जमवाजमव व्हावी, तसाच हा प्रकार!

कुमक मागवायची म्हणजे त्यासाठी कुठला तरी निरोप पाठवणं आलं. हा निरोप एका रासायनिक स्वरूपाचा असतो. तो मिळाल्यानंतर शरीरात सुस्त पडलेल्या पांढऱ्या पेशी ज्या जागेवरून तो सिग्नल आलाय त्या जागी धाव घेतात. काही वेळातच तिथे भरपूर पांढऱ्या पेशींचा डेरा पडतो. सूक्ष्म रक्तवाहिन्या आपली दारं किलकिली करतात आणि त्यातून रक्तातले द्राव, प्रोटीन्स यासारखी सामग्री जखमेच्या जागी जमते. हा साठा एकाच वेळी अनेक कामं करतो. रोगजंतूंना रक्तात प्रवेश मिळू नये, म्हणून तिथे एक प्रकारची भिंत त्यांच्यामुळे उभी राहते. गोलाकार जमलेला हा गोतावळा रोगजंतूंना आत शिरायला तसूभरदेखील जागा ठेवत नाही. आपलं काम फत्ते होतं.

रोगजंतू, माती यासारखा अडथळा असेल, तर जखम सुकायला वेळ लागणार हे ओघाने आलं. परंतु असं काही नसल्यास कापलेल्या जागच्या मृत पेशींच्या जागी तिथे आलेल्या सामग्रीचा उपयोग करून जखम भरून यायला वेळ लागत नाही. मधुमेहातही शरीराचा कल जखम भरून काढण्याचाच असतो. तोच निसर्गनियम आहे. फक्त जखमेच्या जागी पूर्वीच्याच पेशी येतील असं नाही. त्वचेला पडलेली भेग बंद करणं, ती जागा बुजवणं हे निसर्ग सगळयात महत्त्वाचं समजतो. मग त्या जागी व्रण आला, तरी निसर्गाची त्याला हरकत नसते.

आता याचा नीट धांडोळा घेतला की जखम बरी व्हायला नेमकं काय लागतं, जखम झालेल्या ठिकाणी कोणती परिस्थिती लागते हे कळणं कठीण जात नाही. सगळयात पहिल्यांदा जखम झाली, तर त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांना तडे जाणार. तिथे मुळात पुरेसं रक्त पोहोचलं पाहिजे. म्हणजे जखमेच्या जागी रक्तवाहिन्यांचं व्यवस्थित जाळं हवं. नुसतं जाळं असून भागणार नाही, त्या धडधाकट हव्यात. त्यात ब्लॉक वगैरे नसायला हवेत. पोहोचलेल्या रक्तात असलेल्या पांढऱ्या पेशी सशक्त हव्यात. तिथून बाहेर निघालेला संदेश शरीरभर नीट पोहोचायला हवा. त्या यंत्रणेत सुसूत्रता हवी. बाहेरून आलेल्या रोगजंतूंचा नायनाट करण्याइतकी आपली रोगप्रतिकारशक्ती सक्षम हवी. जखम भरून काढण्यासाठी वापरले जाणारे प्रोटीन्स व तत्सम पदार्थ उत्तम प्रतीचे हवेत. तर आणि तरच जखम पटकन आणि व्यवस्थित बरी होईल.

मधुमेहात यातल्या अनेक यंत्रणांमध्ये गडबड होते. प्रथम मधुमेह रक्तवाहिन्यांची तोंडं बंद करतो. त्यामुळे हृदयरोगात जशा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स होतात तशी परिस्थिती जवळपास सगळयाच रक्तवाहिन्यांमध्ये होते. हे ब्लॉक्स रक्त तितक्या प्रभावीपणे पुढे जाऊ देत नाहीत. साहजिकच जखमांचा रक्तपुरवठा बाधित होतो. मधुमेहात आपली रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते, म्हणजे पांढऱ्या पेशी तितक्याशा कार्यक्षम नसतात. जखमेकडून आलेल्या संदेशाला त्या त्वरित प्रतिसाद देतातच असं नाही. जखमेत शिरलेले रोगजंतू या अल्पशा उशिराने मिळालेल्या पांढऱ्या पेशींच्या प्रतिसादाचा चांगलाच फायदा उठवतात. शिवाय वाढलेल्या ग्लुकोजवर ताव मारायलाही वाव असतो. रोगजंतू पटापट वाढले नाहीत तरच नवल. बऱ्याचदा मधुमेह हाडांवर परिणाम करतो. हाडं ठिसूळ होतात. जराशा दबावाने मोडतात. कधीकधी त्यांचा चुरा होतो. हे हाडांचे कण जखम भरून येण्याच्या क्रियेत अडथळा बनतात. जखम चिघळत राहते. त्याचबरोबर, मोडलेल्या हाडांच्या मज्जेमध्ये रोगजंतूंचा शिरकाव व्हायला वेळ लागत नाही. हाडांच्या मज्जेमध्ये शिरलेलं इन्फेक्शन काढणं, तिथल्या रोगजंतूचा नायनाट करणं खूप अवघड होतं. म्हणूनच जर पायाला हाडांचं मजबूत पाठबळ नसेल, तर डॉक्टर पाय कापायचा सल्ला देतात.

अर्थात ही अवस्था काही मधुमेह झाल्या झाल्या होत नाही. त्यासाठी बराच काळ जावा लागतो. म्हणून 'माझी जखम बरी होते म्हणजे मला मधुमेह असणं शक्य नाही' हे गृहीतक बरोबर नाही. मात्र जेव्हा झालेली जखम ठरावीक काळात भरून निघत नसेल, तेव्हा मधुमेहाची तपासणी करायला हवी. कारण जखमा नीट न होण्याचं ते सगळयात महत्त्वाचं कारण आहे.

यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी. कुठलीही जखम भरून यायला साधारण दोन आठवडयांचा कालावधी पुरेसा असतो. या काळात जखमेवर त्वचेचं आवरण बनलेलं दिसत नसेल, तर समजावं की काळजी करायचं कारण आहे. त्वरित कारवाई व्हायला हवी. आता मलमपट्टी करण्याची वेळ नक्कीच निघून गेलेली आहे. यानंतर झपाझप पावलं उचलली गेली पाहिजेत. अन्यथा काही खरं नाही.

आता पावलं उचलायची म्हणजे काय करायचं, हे पाहिलं पाहिजे. अर्थात हे सगळे नियम केवळ पायांच्या जखमांना लागू नाहीत. कुठल्याही ठिकाणी जखम असेल, तरी यातले बहुतेक नियम सारखेच असतात.

सगळयात पहिलं पाऊल जंतुसंसर्ग कमी करण्यासाठी उचलायला हवं. संध्याकाळी छोटंसं वाटणारं इन्फेक्शन रात्रभरात सर्वत्र पसरलेलं, पायाच्या मुळावर आलेलं अनेकदा दिसतं. म्हणजेच जखमेच्या आसपासचा भाग लालसर दिसायला लागला, तिथलं तापमान इतर भागांपेक्षा वाढलेलं दिसलं की ताबडतोब डॉक्टरांचा दवाखाना गाठून त्यावर उपचार सुरू करायला हवेत. जखम वरवरची असेल, तर बहुधा एखाददुसऱ्या रोगजंतूंचा संसर्ग होण्यावर थांबलेलं असतं. पण जखम खोलवर असेल, स्नायू किंवा हाडांपर्यंत पोहोचलेली असेल, तर बहुधा अनेक रोगजंतूचं बांडगूळ तिथे वाढत असतं. अशा वेळी कुठल्या रोगजंतूचा प्रादुर्भाव अधिक तीव्र आहे, हे जाणून घ्यायला जखमेचा खोलवर भाग उकरून त्याची तपासणी करावी लागते आणि त्रास देणारा रोगजंतू हुडकून काढावा लागतो. तरच त्यावर योग्य ते ऍंटिबायोटिक देणं शक्य होतं.

दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे जखमेचा रक्तपुरवठा. कुठलीही जखम बरी व्हायला पुरेसं रक्त आणि त्या रक्ताने सोबत वाहून आणलेले पोषक पदार्थ लागणार, हे समजायला कठीण नाही. त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऑॅक्सिजन - प्राणवायू. तोच नीट मिळाला नाही, तर पेशींमध्ये प्राण कुठून येणार? मग जखम बरी होण्याऐवजी चिघळत जाते. त्यात ज्या ठिकाणी अशी जखम बरी करण्यासाठीची उलाढाल चालू असते, त्या ठिकाणी तर जास्तच रक्तपुरवठा आणि ऑॅक्सिजन लागणार. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की त्या जागी जमा झालेल्या गोतावळयाची भिंत, आलेली सूज उलट अडथळा बनते. आगीच्या ठिकाणी जमलेल्या जमावामुळे आग विझवायला आलेल्या बंबाला जायला वाट मिळू नये, तसला हा प्रकार होतो. अर्थात जिथे रक्तपुरवठा अगदीच संपलेला असेल, तो भाग काळा पडायला लागतो. काळा, मृत भाग शरीरात ठेवण्याचं कारण उरत नाही. तो काढून टाकणं हाच पर्याय उरतो.

हे सगळं असं विस्ताराने सांगण्याचा मुद्दा हा की 'माझी जखम बरी होते, मग मला मधुमेह असण्याची शक्यता नाही' हे म्हणणं जसं योग्य नाही, तसंच पूर्वीचा अनुभव चांगला आहे म्हणून आता झालेल्या जखमेकडे मधुमेहींनी दुर्लक्ष करणंदेखील बरोबर नाही. जखमेच्या आसपास दिसणारा लालपणा अथवा आलेली सूज दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही, हे आपण आपल्या मनावर घट्ट बिंबवून ठेवलं पाहिजे.

9892245272