मनमानी म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नव्हे!

विवेक मराठी    17-Nov-2017
Total Views |

 

 

गेले काही दिवस कोणत्याही राजकीय घडामोडीपेक्षा जास्त लक्षवेधी ठरले आहेत ते चार चित्रपट. चित्रपटाची नकारात्मक प्रसिध्दी आणि प्रचार हे गतिमान प्रसाराचं प्रभावी माध्यम आहे याबद्दल चित्रपट निर्मात्यांना आणि त्यांच्या टीमला पुरेपूर खातरी आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच काही वाद हे जाणीवपूर्वक पेरले जातात, पसरवले जातात. त्यातून भरघोस नफा नाही झाला तर निर्मितीचा खर्च वसूल होतो. त्यामुळे या 'ट्रेंड'ची सध्या चलती आहे.

'न्यूड' या मराठी, तर 'एस. दुर्गा' या दाक्षिणात्य चित्रपटाची इफ्फीतून झालेली हकालपट्टी आणि 'दशक्रिया' व 'पद्मावती' या चित्रपटांना समाजातील विशिष्ट गटाकडून होत असलेला विरोध यामुळे हे चारही चित्रपट चर्चेत आहेत.

इफ्फीतून बाहेर गेलेला (संपादकीय छपाईला जाईपर्यंत तरी या चित्रपटाचं हेच स्टेटस होतं.) रवी जाधव यांचा 'न्यूड' हा चित्रपट कथाविषयामुळे वा शीर्षकामुळे नाही, तर तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने बाहेर गेला आहे, इतकंच कारण असल्याचं सध्या तरी दिसत आहे. विद्यार्थ्यांना न्यूड पोर्ट्रेट शिकवण्यासाठी मॉडेल म्हणून स्त्रीपुरुषांचा उपयोग करणं, ही कला महाविद्यालयांची वर्षानुवर्षाची प्रथा आहे. तो त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला एक टप्पा आहे. आणि त्यात वावगं काही नाही हे समजून घेण्याइतकी प्रगल्भता समाजात आहे. त्यामुळे केवळ तांत्रिक मुद्दयांवरच हा चित्रपट बाजूला ठेवला आहे का, यावर शक्य तितक्या लवकर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रकाश टाकावा. त्यामुळे या संदर्भातले गैरसमज दूर व्हायला मदत होईल.

'एस.दुर्गा'बाबत अनेक आक्षेप आहेत. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावली असली, काही सन्मान त्याला मिळाले असले, सेन्सॉर बोर्डाने सुचवल्यानंतर त्याच्या मूळ शीर्षकात बदल केला असला, तरी त्यातलं 'एस.' हे कशाचं लघुरूप आहे याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे हा बदल म्हणजे बदलाच्या नावाखाली केलेली निव्वळ धूळफेक आहे. मुख्य आक्षेप दुर्गाला लावण्यात आलेल्या या विशेषणालाच आहे. जी इथल्या बहुसंख्यांची श्रध्दास्थानं आहेत त्यांचा विनाकारण अवमान करणं, चित्रपटाच्या प्रसिध्दी-प्रचारासाठी अशी हीन पातळी गाठणं याला जर 'अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं' आवरण घातलं जाणार असेल, तर याहून वेगळा भ्रष्ट आचार असू शकत नाही. दर वेळी सर्वसामान्य प्रेक्षकांची 'यत्ता' काढून मूळ मुद्दयाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हा इशारा या चित्रपटाच्या विरोधात चाललेलं आंदोलन देत आहे. आपल्या व्यक्तिरेखेला कोणतं नाव द्यायचं याची मोकळीक लेखकाला असली, तरी असं नामकरण करताना लेखक भाबडा असतो असं समजण्याचा मूर्खपणा करण्याचं काही कारण नाही. हेतुपुरस्सर हिंदूंच्या श्रध्दास्थानांची मानहानी करायची आणि त्यावर प्रखर टीका झाली की सरकारच्या असहिष्णुतेच्या नावाने गळे काढायचे, हे इथल्या एका मोठया गटाचं गेल्या काही वर्षांचं व्रत आहे.

ज्येष्ठ मराठी साहित्यिक बाबा भांड यांच्या अतिशय गाजलेल्या 'दशक्रिया' या कादंबरीवर बेतलेल्या, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचं प्रदर्शनही वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अतिशय सकारात्मक संदेश देणारा असा या कादंबरीचा शेवट आहे. चित्रपटातही तो तसाच असावा असा अंदाज. मात्र काही मंडळींचा आक्षेप त्यातल्या काही संवादांना आहे, अशी माहिती मिळते. सोळा संस्कारांपैकी कोणत्याही संस्कारांचं पौरोहित्य करण्याचा हक्क किंवा अधिकार एका जातसमूहापुरता मर्यादित असू शकत नाही, अशी मांडणी करणारे आणि त्याबाबत आग्रही असणारे ब्राह्मण समाजातही आहेत आणि अन्य जातिसमूहांतही आहेत. ज्ञान प्रबोधिनीसारख्या संघटनेत नामकरणापासून श्राध्दविधींपर्यंत सर्व विधी करणारे सर्व जातीसमूहांतले स्त्री-पुरुष पुरोहित तयार होतात आणि नाशिक येथील शंकराचार्य न्यासही गेली काही वर्ष निवडक विधींचं प्रशिक्षण ब्राह्मणेतरांना देत आहे. या दोन्ही कामांमागे याच विचाराचं अधिष्ठान आहे. तेव्हा अशा विषयांवर वादाचं मोहोळ न उठवता, समाजमनाला नवा विचार देणाऱ्या चित्रपटाचं स्वागत करायला हवं.

'पद्मावती' हा चित्रपट सेन्सॉरपर्यंत पोहोचण्याआधीच देशभर टीकेचे प्रहार झेलतो आहे. संजय लीला भन्साळीची ही जुनी खोड आहे. या वेळी मात्र ती त्याला भलतीच महागात पडण्याची चिन्हं आहेत. धंदेवाईक हेतू बाळगून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली त्याने इतिहासाची मोडतोड करायची, सर्वसामान्यांच्या भावना पायदळी तुडवायच्या - इतकं महत्त्व या व्यक्तीच्या अभिव्यक्तीला, तेही सातत्याने का दिलं जावं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराणी पद्मिनी ही दंतकथा असेलही कदाचित, पण ही दंतकथा सर्वसामान्य हिंदूंना स्वत्व जपण्यासाठी अतुलनीय शौर्य बाळगण्याची प्रेरणा देते. अशी सकारात्मक प्रेरणा देणाऱ्या कथेला नख लावायचा अधिकार म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य असतं का? ते काहींचा विशेषाधिकार आहे का? त्याला जबाबदारीची चौकट आहे की नाही? त्याने खिलजीच्या स्वप्नदृश्यात पद्मिनी दाखवली आहे का याची अद्याप कल्पना नाही. पण ज्या दोन नृत्यांचे प्रोमोज आहेत, त्यात या महाराणीला दरबारात नृत्य करताना दाखवलं आहे, जे पूर्णपणे विसंगत आणि राज्ञीपदाचा अवमान करणारं आहे. जर पद्मिनीचं नाव घेऊन, स्वत:च्या मनाला हवं तेच पडद्यावर दाखवायचं असेल तर व्यक्तिरेखेचं नाव पद्मिनी ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी?

तरीही या चित्रपटाचा विरोध करताना कोणीही हिंस्र पातळीवर उतरू नये, असं आमचं ठाम मत आहे. त्याचा आम्ही स्पष्ट शब्दांत निषेध करत आहोत. पण अशा प्रतिक्रियांमागच्या कारणांचा विचार करून तिथे दुरुस्ती होणं गरजेचं आहे. सहिष्णुता म्हणजे नेभळटपणा नव्हे, तर सकारात्मक दृष्टीकोनातून समाजाच्या भल्यासाठी नव्या विचारांचा केलेला कृतिशील स्वीकार. ते करण्याची परंपरा या धर्मात आहे. ती यापुढेही राहील. भन्साळीसारख्या तद्दन धंदेवाईक माणसाला विरोध केला म्हणजे सहिष्णुता लयाला गेल्याचा डांगोरा पिटण्याचं कारण नाही.

लोकांच्या - त्यातही विशेषत: हिंदू धर्मीयांच्या श्रध्दांना, भावनांना पायदळी तुडवायचं हाच जर अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अर्थ इथल्या काही कलावंतांना अभिप्रेत असेल आणि तो सगळयांनी कायम बिनबोभाट मान्य करावा अशी अपेक्षा असेल, तर आता ते होणे नाही, असा संदेश गेल्या काही दिवसांतील घटना देत आहेत.