जाहिरात हे व्यवसायासाठी टॉनिक...

विवेक मराठी    22-Nov-2017
Total Views |

व्यवसाय आणि जाहिरात कला यांचा अगदी जवळचा संबंध आहे. नवा उद्योग सुरू करणाऱ्याला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत आपली आणि उत्पादनाची माहिती पोहोचवण्यासाठी जाहिरात गरजेची असते, तसे बडया, सुस्थापित ब्रँडनाही आपले महत्त्व ग्राहकांच्या मनावर वारंवार ठसवण्यासाठी जाहिरातीचाच आधार असतो. वर्तमानपत्राच्या भाषेत म्हणतात की 'एक प्रभावी छायाचित्र शंभर शब्दांचे काम वाचवते.' तसेच धंद्याच्या भाषेत बोलायचे झाल्यास 'एक कल्पक जाहिरात शेकडो विक्रेत्यांचे काम वाचवते.'

 माझा व्यवसाय छोटासा होता, तोवर मला कधीही जाहिरात करण्याची गरज भासली नाही, कारण ग्राहकांना दर्जेदार उत्पादने आणि हसतमुख सेवा देऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा माझा सर्व प्रयत्न होता. या टप्प्यात मला मौखिक प्रसिध्दीचा (एका ग्राहकाने दुसऱ्याला माझ्या दुकानाबद्दल शिफारस करणे) खूप फायदा झाला. हळूहळू अल अदीलचा ग्राहकवर्ग वाढत गेला, तशी आमच्या सुपर स्टोअर्सची संख्या वाढू लागली.

नेहमीचे किराणा दुकान आणि सुपर स्टोअर यांच्या रचनेत लक्षणीय फरक असतो. छोटया दुकानात तुम्ही मागितलेली वस्तू दुकानदार आणून देतो, पण सुपर स्टोअरमध्ये ग्राहकाला त्याच्या पसंतीनुसार वस्तू स्वत: घ्यायचे स्वातंत्र्य असते. येथे ग्राहकाला आकर्षित करुन घेण्यासाठी उत्पादनांची मांडणी आटोपशीर व आकर्षक करावी लागते. असे प्रदर्शन (डिस्प्ले) हा जाहिरातीचा मूलभूत प्रकार असतो. सुपर स्टोअर उघडायला सुरवात केल्यानंतर मलाही हा सुंदर मांडणीचा प्रकार अंगीकारावा लागला. त्यातून 'पिकॉक' हा आमचा ब्रँड जसजसा लोकप्रिय होऊ  लागला आणि त्याच्या अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या उत्पादनांची संख्याही वाढू लागली, तसा या टप्प्यावर मी आपोआपच मालाची योजनाबध्द जाहिरात करण्याकडे वळलो.

त्या काळात वर्तमानपत्रे आणि रेडिओ हीच प्रभावी माध्यमे होती. आजच्यासारखा दूरचित्रवाणी वाहिन्यांचा किंवा सामाजिक माध्यमांचा (सोशल मिडिया) प्रसार झालेला नव्हता. मी रेडिओवर जास्त भर दिला, कारण लोक दिवसभर त्यावर बातम्या, गाणी ऐकत असत. सुरुवातीला रेडिओवरील माझ्या जाहिराती अगदी साध्या असत. नंतर त्यात वैविध्य किंवा कल्पकता आणावीशी मला वाटू लागली. भारतीय लोकांवर चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे आणि ते चित्रपटातील अभिनय आणि गाणी याइतकेच प्रसिध्द संवादही लक्षात ठेवतात. त्यामुळे मी माझ्या जाहिरातींत लोकप्रिय हिंदी चित्रपटातील संवादाचे प्रसिध्द वाक्य वापरण्याची कल्पना लढवली. एखाद्या मिमिक्री आर्टिस्टकडून मूळ अभिनेत्याच्या शैलीत हे वाक्य उच्चारून घ्यायचे व त्याबरोबर आमच्या उत्पादनाची जाहिरात करायची, असे त्याचे स्वरूप होते. पण अशा तऱ्हेने जाहिरातींची मालिका करण्याचे बजेट जेव्हा जाहिरात संस्थेने कळवले, तेव्हा मी अचंबित झालो. मुंबईतील प्रख्यात मिमिक्री आर्टिस्टनी हा संवाद बोलण्यासाठीचे मानधन खूप अधिक सांगितल्याचे कारण जाहिरात व्यवस्थापकाने दिले. मी सुचवले की आपण प्रथितयश नकलाकारांना न घेता एखाद्या होतकरू आणि बुध्दिमान कलाकाराला काम देऊन बघू. त्यामुळे खर्चातही बचत होईल. मुंबईत मिमिक्री क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघर्ष करत असलेला एक साधा व नम्र तरुण आम्ही निवडला. त्यानेही वाजवी मानधनात या जाहिरातींसाठी आवाज दिला. श्रोत्यांना या जाहिराती इतक्या आवडल्या की ते स्टोअर्समध्ये येताच जाहिरात आवडल्याचा उल्लेख करू लागले. आम्हाला मदत करणारा तो तरुण आज खूप मोठा मिमिक्री आर्टिस्ट बनला आहे. त्याचे नाव राजू श्रीवास्तव.

दूरचित्रवाणी या माध्यमाने प्रेक्षकांच्या मनाचा पगडा घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्याचाही फायदा मी करून घेतला. महिलांना विशेषत: गृहिणींना आवडतील अशा कौटुंबिक मालिकांचे भाग सुरू असताना ब्रेकमध्ये आमच्या उत्पादनांच्या जाहिराती लागत. या गृहिणीच माझा प्रमुख ग्राहकवर्ग असल्याने आपोआपच माझ्या उत्पादनांची शुध्दता, दर्जा व सुरक्षा ही प्रमुख वैशिष्टये त्यांच्या मनावर ठसत. या जाहिरातींचा मला फायदा झाला आहे. एकदा तर माझ्या मुलाच्या प्रतिक्रियेतूनच मला जाहिरात प्रभावी कशी करावी, याचा उपाय सुचला होता.

मी एक जाहिरातींची मालिका बनवली होती. त्यातील प्रत्येक जाहिरातीत मुले आईला त्यांच्या आवडत्या उत्पादनाबाबत विचारत असत 'मम्मा कहाँ से?' (आई, हे कुठून आणलंस?) आणि त्यानंतर अल अदील सुपर स्टोअर्सचा तपशील असे. एकदा टीव्हीवर ती जाहिरात दाखवत असताना माझा मोठा मुलगा हृषीकेश (त्या वेळी तो शाळेत होता) ती लक्षपूर्वक बघत होता. नंतर तो अनपेक्षितपणे उद्गारला, ''बाबा! कसली बकवास जाहिरात बनवलीय आपण?'' मला धक्काच बसला. एवढा प्रचंड खर्च करून आम्ही ती जाहिरात मालिका बनवली होती आणि माझ्या घरातूनच त्यावरील प्रतिक्रिया बकवास अशी होती. मी शांतपणे त्याला विचारले, ''आपली जाहिरात बकवास आहे, असे तुला का वाटते?'' त्यावर त्याने प्रांजळपणे सांगितले, ''माझ्या वर्गातील मुले तसे म्हणतात.''

मी विचारात पडलो. ही जाहिरात गृहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कौटुंबिक मालिकांमधील जाहिरात काळाचे स्लॉट्सही खरेदी केले होते. मग मुले या जाहिरातीला का बरे बकवास म्हणत असावीत? मग विचार करताना मला उमगले की अरे आपण जाहिरात पोहोचवण्यासाठी केवळ महिला वर्गाचाच विचार केलाय. लहान मुलांमध्ये तिचा प्रसार फारसा झालेला नाही. मग मी एक शक्कल लढवली. दुबईत त्या सुमारास क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होणार होते. मी त्याच्या प्रसारणादरम्यानचे टाईम स्लॉट विकत घेतले आणि त्याच जाहिरातींचा इतका मारा केला की काही प्रेक्षकांनी कंटाळून वाहिनीकडे अगदी तक्रारही नोंदवली, पण त्याच वेळी सामन्यांचा आनंद लुटणारी बच्चे कंपनी मात्र एकदम खूश झाली. वारंवार लागणारी ती जाहिरात बघून मुले आपल्या आयांना ''मम्मा कहाँ से?'' असा प्रश्न विचारून हसवू लागली. माझा उद्देश सफल झाला.


 

कल्पना लढवा, ग्राहक आकर्षित होतील...

जाहिरात लोकप्रिय होण्यासाठी प्रत्येक वेळी ती खर्चीकच असावी लागते, असे नाही. कल्पकतेने केलेली साधी जाहिरातही लोकप्रिय होऊ  शकते. मी एकदा दुबईतील एका खाद्य प्रदर्शनाला भेट दिली होती. तेथे विविध ब्रँडच्या उत्पादनांचे स्टॉल होते. एका ठिकाणी लोकांची गर्दी दिसली, म्हणून मी तेथे डोकावलो. त्या स्टॉलवर दोन रूपवान युवतींना सम्राज्ञीची वेषभूषा देऊन अंगावर झगमगते शोभेचे अलंकार आणि डोक्याला मुकुट घालून उभे केले होते. अगदी राजवाडयाचा आभास निर्माण केला होता. या सम्राज्ञी ग्राहकांना छोटे छोटे पॅक नमुना म्हणून वाटत होत्या आणि लोक मजेने ते एन्जॉय करत होते. मी सहज तो स्टॉल कसला आहे, हे बघितले आणि आश्चर्यचकित झालो. तो चक्क बासमती तांदळाचा स्टॉल होता. आपला तांदूळ कसा शाही बासमती आहे, हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी कंपनीने ही भन्नाट कल्पना लढवली होती. मी त्यांच्या कल्पकतेला दाद दिली.

पूर्वीपेक्षा आता जाहिरातींची अनेक माध्यमे खुली झाली आहेत. छापील माध्यमे, नभोवाणी वाहिन्या आहेतच, त्याशिवाय सोशल मीडियावरील जाहिरातीही प्रभावी ठरत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या जाहिराती कमी खर्चाच्या असल्याने नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने व तरुण पिढी नेटसॅव्ही असल्याने एसएमएसद्वारे, ईमेलद्वारे किंवा फेसबुक, टि्वटर, यूटयूब अशा प्लॅटफॉर्मवरून केलेल्या जाहिरातीही परिणामकारक ठरतात. एखाद्या उत्पादनाबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी ग्राहक संबंधित कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देतात. हे संकेतस्थळही उत्पादनांची जाहिरात करण्याचे फायदेशीर व्यासपीठ असते. मी तर इव्हेंट्सचा वापरही जाहिरातीसाठी करून घेतो. ही कल्पना मला ग्राहकांनीच सुचवली. पूर्वी आम्ही आमच्या नव्या स्टोअर्सचे उद्धाटन साध्या पध्दतीने करत असू, पण ग्राहकांना झगमगाट, सेलेब्रिटी, सेलेब्रेशन यांचे आकर्षण असते. त्यांना त्यात आनंद मिळतो. अशा वेळी मीही उत्पादनांवर आकर्षक सवलत देऊन त्यांची जाहिरात करतो.

आपल्याकडे एक म्हण आहे - 'बोलणाऱ्याची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत.' व्यवसायात जाहिरातीचे महत्त्व स्पष्ट करण्यास ही म्हण पुरेशी आहे. आपण गप्प बसलो किंवा प्रसिध्दीपासून दूर राहिलो, तर ग्राहक कसे आकर्षित होणार? त्यातून जाहिरातशास्त्राचे एक तंत्र आहे. तुम्हाला केवळ एकदा जाहिरात करून चालत नाही. उत्पादनाचे महत्त्व ग्राहकांच्या मनावर ठसवण्यासाठी जाहिरातींचा मारा करावा लागतो. अब्जावधींची उलाढाल असलेल्या कंपन्यांनाही सातत्याने जाहिराती का कराव्या लागतात, याचे उत्तर यात दडले आहे.

vivekedit@gmail.com