'चिरतरुण' ज्येष्ठांचा मेळावा

विवेक मराठी    23-Nov-2017
Total Views |

मुंबईतील  ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मिलनाचा कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी चेंबूर हायस्कूलच्या पटांगणात संपन्न झाला. 1950 सालापासून संघकामात काही ना काही जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे हे स्नेहमिलन होते. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. भास्करराव मुंडले यांची. या कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनी उपस्थित राहून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला...

 'संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम' अशी संघाची व्याखा महाराष्ट्राचे प्रांत संघचालक कै. माननीय बाबाराव भिडे करीत असत. संघ म्हणजे वर्षभर चालणारे, एकापाठोपाठ एक येणारे कार्यक्रम असेच संघाचे स्वरूप असते. संघ कार्यकर्ता एक कार्यक्रम संपला की दुसऱ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागतो. दोन कार्यक्रमांच्या मध्ये अनेक बैठका असतात. म्हणून संघ कार्यकर्त्याची व्याख्या गमतीने 'ज़ो बैठकांमागून बैठका करीत असतो, तो संघ कार्यकर्ता'. कार्यकर्त्यांच्या घरी जर विचारले की, रमेश कुठे गेला आहे? उत्तर ठरलेले असते - बैठकीला.

अशा कार्यक्रमांतून आणि बैठकांतून देशव्यापी संघ उभा राहिलेला आहे. आज देशात दीड लाख सेवाकार्य संघस्वयंसेवक चालवितात आणि 35 हजार स्थानी 69 हजार शाखा आहेत. संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम आणि कार्यकर्ता म्हणजे बैठका, या सूत्रातून एवढे प्रचंड कार्य तयार झालेले आहे. जे स्वतःला संघाचे अभ्यासक समजतात आणि संघावर भन्नाट पुस्तके किंवा लेख लिहितात, त्यांना यातील काहीही समजत नसते. त्यांना दिसतो तो विस्तारित संघ. परंतु हा संघ कसा विस्तारित झाला आहे, कोणामुळे विस्तारित झाला आहे, याचे त्यांना ज्ञान शून्य असते.

अशा आजच्या विस्तारित संघाच्या कामाची पायाभरणी करणारे लाखो स्वयंसेवक आहेत. मुंबईतील अशा ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मिलनाचा कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी चेंबूर हायस्कूलच्या पटांगणात संपन्न झाला. 1950 सालापासून संघकामात काही ना काही जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या स्वयंसेवकांचे हे स्नेहमिलन होते. संघाच्या परिभाषेत 'कार्यक्रम' होता. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना श्री. भास्करराव मुंडले यांची. त्यांनी आता वयाची पंचाएेंशी पार केली आहे. या वयात जी शारीरिक अवस्था असते, ती भास्कररावांची आहे. परंतु भास्करराव मनाने चिरतरुण आहेत. या वयातही संघकामाची ओढ, गोडी, आस त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

 

प्रमोद बापट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पुढे नेणारे आणि त्यात चैतन्य भरणारे हे सूत्रसंचालन होते, संघ काळानुरूप कसा बदलतो याचे उत्तम दर्शन घडविणारे होते.

 

संघकामाचे मुख्य सूत्र संपर्काचे असते. स्वयंसेवक एकमेकांशी भावनिकदृष्टया घट्ट जोडलेले असावे लागतात. हे काम सततच्या संपर्कानेच होते. संघकार्यकर्ता किंवा प्रचारक संघकाम करतो म्हणजे काय करतो? तो सातत्याने संपर्काचे काम करीत राहतो. संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांनी संघकामाची जी अनेक सूत्रे दिली, त्यातील प्रमुख सूत्र 'संघकाम प्रत्येक घरात गेले पाहिजे' हे आहे. स्वयंसेवकांच्या वारंवार भेटीगाठी घडत राहिल्या पाहिजे. या भेटीगाठीत एकमेकांशी आत्मीयतेने संवाद साधत राहिले पाहिजे. संघकार्यावर बंदी घालण्याचे प्रयत्न काँग्रेस सरकारने दोनदा केले, ते फसले. याचे कारण असे की, जोपर्यंत दोन माणसांना एकमेकांशी भेटण्यात बंदी घालता येत नाही, तोपर्यंत संघकार्य बंद होणे अशक्य आहे.

मुंबईतील अशा ज्येष्ठ स्वयंसेवकांनी एकत्र यावे, एकमेकांना भेटावे, मनमोकळया गप्पा कराव्यात, एकत्र भोजन करावे, आजचे संघकार्य कसे चालू आहे, कोणकोणते नवीन विषय चालू आहेत, याची माहिती करून घ्यावी ही या कार्यक्रमामागची मूळ संकल्पना. एखाद्या संघटनेचा जेव्हा अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम असतो, तेव्हा मागण्यांचे ठराव केले जातात. आंदोलन करायचे असेल तर त्याची रूपरेखा सांगितली जाते. ज्याच्या विरुध्द आंदोलन करायचे आहे, तो किती नालायक आहे हे सांगायला लागते. संघाचे कोणतेही मिलन अशा विषयांसाठी होत नाही. तेथे ठराव नसतात, कोणाच्या विरुध्द भाषणबाजी नसते, आंदोलन वगैरे काही नसते. फक्त आत्मीयता आणि आत्मीयताच असते.

संघ म्हणजे देशाचा विचार, अशी संघाची आणखी व्यापक व्याख्या करता येते. म्हणून अशा कार्यक्रमात देशाचा विचार अग्रभागी असतो. आपल्या समाजात जातींचा विचार करणे, त्यांच्या प्रश्नांचा विचार करणे, त्यापुढे जाऊन आपल्या प्रांतिक अस्मितेचा विचार करणे हे स्वाभाविकपणे घडत असते. फक्त देशाचा विचार करणारी ही एकमात्र संघटना आहे. त्याची मीमांसा करताना संघ प्रचारक मधुभाई कुलकर्णी यांनी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनातील फार सुंदर उदाहरण दिले. डॉक्टरकी उत्तीर्ण झालेला हा तरुण, लग्न करून संसार थाटण्याचा विचार करीत नव्हता, दवाखाना घालण्याचाही विचार त्याच्या मनात नव्हता; हिंदू समाजाची अत्यंत अवनत अवस्था का निर्माण झाली? याचे चिंतन त्याच्या मनात अहोरात्र चालत राहिले. राजा दाहिरचा सेनापती महम्मद बीन कासीमला फितूर का होतो? पृथ्वीराज चव्हाण याचा भाऊ जयसिंग राठोड महम्मद घोरीला फितूर का होतो? शिवाजी महाराजांच्या विरुध्द चंद्रराव मोरे उभा का राहतो? डॉक्टरांनी याचे उत्तर दिले की, देशभावना दुर्बळ झाली की स्वार्थ बोकाळतो. मी, माझे कुटुंबीय, माझी जात, ही देशापेक्षा मोठी वाटू लागते आणि मग शत्रूशी हातमिळवणी करताना काही वाटत नाही. डॉक्टरांनी ठरविले की 'देश प्रथम, नंतर सर्व काही' असे मानणारा हिंदू समाज मी निर्माण करीन. त्यांनी आपल्या पंधरा वर्षांच्या आयुष्यात 700 शाखांच्या माध्यमातून हे करून दाखविले. आज 'देश प्रथम, बाकी सर्व गोष्टी नंतर' हा विचार जागविणाऱ्या देशात 69 हजार शाखा आहेत.

मुंबईतील ज्येष्ठांचे मिलन म्हणजे 'देश प्रथम, अन्य गोष्टी नंतर' हा विचार जगणाऱ्या स्वयंसेवकांचे मिलन होते. त्यात सहभागी होताना, मी ज्यांच्या बरोबर मुंबईतील संघकाम केले, संघकामातील बारकावे ज्यांच्याकडून मी शिकलो, असे अनेक स्वयंसेवक होते. त्या वेळेस प्रकर्षाने आठवण होत होती, तेथे उपस्थित नसलेल्या, परंतु देवघरातून हा सोहळा पाहणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची. मधुकरराव मोघे, मनोहरपंत मुजुमदार, काका दामले, भाई मयेकर, भाई गायतोंडे, आबा मयेकर, नलावडे, मनोहर कुंटे, चित्तरंजन पंडित, शांताराम गीध, माधवराव मार्केटकर, अनंतराव देशपांडे, मुकुंदराव पणशीकर... अशी किती नावे घ्यावीत! या सर्वांनी जे कष्ट उपसले, त्यातूनच आज मुंबईचे संघकाम उभे राहिले आहे.

 दादरच्या शिवाजी पार्क शाखेत 50 वर्षांपूर्वी स्वयंसेवक म्हणून आलो. गोळवलकर गुरुजी अनेकदा या शाखेला भेट देत. सरसंघचालकांसमोर प्रार्थना म्हणताना दडपण कधीच वाटले नाही. उलट तेच नंतर आमच्या पाठीवर हात ठेवून प्रार्थनेचा अर्थ समजावून सांगत. मी नंतर देश-विदेशात गेलो, शिंगे फुटली, थोडी वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली. मात्र, शेवटी जसे वासरू गायीकडे येते, तसा मी संघात परतलो. 

- डॉ. विजय हब्ब

 

या कार्यक्रमात समारोपाच्या बोलण्यापूर्वी 'मन माझे विसावले, संघ मंदिरी स्थिरावले' हे गीत गायले गेले. या गीताचे रचनाकार आहेत शिवराय तेलंग. मुंबईच्या संघकामाच्या अनेक रचनाकारातील शिवराय तेलंग हे एक. त्यांच्या आठवणीने कंठ दाटून आला. 'देश प्रथम' हे जीवनातील सूत्र कळल्यानंतर शिवराय तेलंग यांनी आपल्यातील कवी, साहित्यकार, चित्रकार, चिंतक हे सर्व विषय बाजूला ठेवले. यातील एकाही गुणाचा त्यांनी उर्वरित आयुष्यात उत्कर्ष केला असता, तर ते महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी झाले असते, साहित्यकार झाले असते, किंवा चित्रकारही झाले असते. संघाच्या स्वर्गीय गीतात त्यांनी आपला स्वर मिळवून टाकला. पूरिया धनश्री रागात हे गीत बसविलेले आहे. या रागाचे स्वर अतिशय गोड, तसेच गंभीर आणि सायंकाळच्या वेळेस गायला जाणारा हा राग आहे. गीतातील भाव समर्थपणे प्रकट करण्यास हा राग समर्थ झालेला आहे.

स्नेहमिलनास उपस्थित असलेले बहुतेक जण साठी पार केलेले आणि काही जण नव्वदीच्या घरात पोहोचलेले होते. या वयातही त्यांना संघाच्या कार्यक्रमात दूर-दूरून यावेसे का वाटले? मुंबईबाहेरूनही अनेक जण आले होते. त्यांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य संघाच्या एका अत्यंत वेगळया संस्कारात आहे. मनुष्य म्हणजे शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यांचा समुच्चय आहे. श्रीगुरुजींनी हा विचार आपल्या बौध्दिक वर्गातून अनेक वेळा मांडला. दीनदयाळजींनी एकात्म मानव दर्शनात तोच विचार मांडलेला आहे. संघाची शाखा शरीर, मन, बुध्दी आणि आत्मा यावर संस्कार करणारी पध्दती आहे. खेळ, शारीरिक कार्यक्रम हे शरीराचे आकर्षण असते, मनाला वळण लावण्यासाठी संघाची शिस्त असते, बुध्दीला खाद्य देण्यासाठी संघविचार असतो आणि आत्मीय अनुभवाची शिदोरी देणारे कार्यक्रम सामूहिक मिलनाचे असतात. एकाच वेळी हे संस्कार घडत जातात. ते कसे घडतात, हे स्वयंसेवकालाही समजत नाही. काही जण बुध्दीपर्यंत येतात आणि बुध्दीत काही विपर्यास निर्माण झाला की संघापासून दूर जातात. अशांची संख्या तशी नगण्य असते, परंतु ज्यांच्या आत्मतत्त्वाला संघ स्पर्श करून गेला ते जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी 'मी स्वयंसेवक आहे' हे विसरत नाहीत.

याचे अप्रतिम उदाहरण रमेश मेहता यांच्या बोलण्यातून आले. त्यांच्या घरी बाळासाहेब देवरसांचा मुक्काम दीर्घकाळ राहिला. एके दिवशी त्यांना ख्यातनाम सिनेनट अमरीश पुरी यांचा फोन आला. पुरी यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले, वाकून बाळासाहेबांना त्यांनी नमस्कार केला आणि खाली बसले. ते म्हणाले, ''सिनेमातील माझी प्रतिमा काहीही असली, तरी मी द्वितीय वर्ष शिक्षित संघ स्वयंसेवक आहे. एका भागाचा कार्यवाहदेखील होतो.'' सरसंघचालकांच्या शेजारी कसे बसायचे, म्हणून ते खाली बसले. बाळासाहेबांनी त्यांना उठविले आणि आपल्या बाजूला बसविले. हे उदाहरण संघव्यवहारावर उत्तम प्रकाश पाडणारे आहे. स्वयंसेवकाने कसे वागले पाहिजे, हे अमरीश पुरी यांनी दाखवून दिले आणि आत्मीय भाव कसा प्रकट करावा हे सरसंघचालकांनी दाखवून दिले.

 

1948मधील संघावरील बंदी उठावी, यासाठी संघ 11 डिसेंबर रोजी सत्याग्रह करणार अशा बातम्या होत्या. मात्र संघाने 9 डिसेंबरलाच सत्याग्रह केल्याने पोलीस चक्रावून गेले. मी 20 स्वयंसेवकांसह महाडला सत्याग्रह केला होता. आम्हाला अटक झाली. मात्र नंतर रायगडचे तुरुंग स्वयंसेवकांनी भरून गेल्याने आम्हाला मुंबईत सीफेसच्या बरॅकमध्ये नेण्यात आले. त्या चार बरॅकमध्ये एकूण 1400 स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. सगळयांना त्या थंडीत शहाबादी फरशीवर विना अंथरूण-पांघरुणाचे झोपवले होते. तुरुंग जणू संघ शिबिरच झाला होता. आम्ही गमतीत म्हणायचो की, सरकारी खर्चात शिबिर झाले! 

- रत्नाकर भागवत

 

संघ म्हणजे सामूहिक चिंतन अशी संघाची आणखी एक व्याख्या करता येते. व्यासपीठावर मधुभाई कुलकर्णी, सतीशजी मोंढ, सुनील सप्रे विराजमान झाले होते. सतीशजींनी आणि सुनीलजींनी आजच्या संघकार्याची माहिती सर्वांपुढे ठेवली. संघकामाचे विविध आयाम सर्वांपुढे मांडले. सर्वांना ज्याची माहिती आहे त्याची सर्वांच्यावतीने मांडणी केली. मधुभाईंनी समारोप केला. संघ कुठून सुरू झाला आणि आज आपण कुठे आहोत हे त्यांनी थोडक्यात सांगितले. हेसुध्दा एक प्रकारचे सामूहिक चिंतनच असते. 2025 साली संघाची शताब्दी येईल. इथपर्यंत अतिशय वेगाने कार्यविस्तार करायचा आहे, तीन-तीन वर्षांचा एक-एक टप्पा धरून वाटचाल करायची आहे, प्रत्येक मंडलात शाखा सुरू करायची आहे, हा संघविषय त्यांनी मांडला. कार्यविस्ताराचा विषय प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात सतत असतो. आपले कार्य अजून पूर्ण झालेले नाही, समाजात अनुकूलता जरी असली तरी समाजाच्या सर्व स्तरात, सर्व जाती-वर्गात संघकाम पोहोचलेले नाही, याची जाणीव प्रत्येकाला असते; परंतु कार्यविस्तारासाठी आता शरीर अनुकूल राहिलेले नाही, ही जाणीवदेखील असते. याचा अर्थ आपण निकामी झालो असा करायचा का? संघात असा अर्थ केला जात नाही. स्वयंसेवक हा जीवनभर स्वयंसेवकच असतो - स्वयंप्रेरणेने स्वदेशासाठी काम करणारा. या वेळी कोणते काम करावे, हे त्याला फारसे सांगावे लागत नाही. त्याची प्रेरणा एकच असते आणि ती म्हणजे देशाचा वैभवकाळ पाहण्याची. म्हणून तो 'दिसू लागला मंगल जवळ, देशाचा वैभव काळ' या गीताच्या ओळी जगत राहतो.

9869206101