मुल्लाची बांग

विवेक मराठी    24-Nov-2017
Total Views |

रामजन्मभूमीचा विषय न्यायालयाबाहेर चर्चेने सोडवता येऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुस्लीम समाजातील काही गट या विषयात पुढाकार घेताना दिसत आहेत. असे जर झाले, तर आपली राजकीय निवृत्ती जाहीर करण्याशिवाय मुलायमसिंहांसमोर दुसरा कोणताही पर्याय असणार नाही. त्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुलायमसिंह पुन्हा मुल्ला बनले आणि त्यांनी आपल्या कुकर्माची गझल गायली.

माजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांनी नुकताच वयाच्या एेंशीव्या वर्षात प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत बांग ठोकून, आपण अजूनही मुल्ला मुलायम आहोत हे मुलायमसिंह यांनी दाखवून दिले. कधीकाळी देशाच्या पंतप्रधानपदाचे स्वप्न उराशी कवटाळून हा माणूस मुस्लिमांचे पराकोटीचे लांगूलचालन करत होता. पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, पण लांगूलचालनाची व्याधी मात्र अंगीमांसी भिनली आहे. आणि ती अशी अधूनमधून आपले रूप दाखवत असते. आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत मुल्ला मुलायम म्हणाले की, ''मी 1990 साली 28 कारसेवकांना मारले आणि बाबरी ढांच्याचे रक्षण केले. हे रक्षण करताना आणखी काही जणांचा बळी घेण्याची वेळ आली असती, तर त्यातही मागे पुढे पाहिले नसते'' अशीही दर्पोक्ती या प्रसंगी मुल्ला मुलायम यांनी केली असून या कामगिरीचा परिणाम म्हणून 1990नंतरच्या निवडणुकीत 105 जागा मिळाल्या होत्या, याचीही त्यांनी आठवण करून दिली. आज केवळ 47 जागांपुरता मर्यादित राहिलेल्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोरच मुल्ला मुलायम यांनी आपल्याच कुकर्माचा पाढा वाचून दाखवला आहे. घराणेशाही आणि मुस्लीम लांगूलचालन ही मुल्ला मुलायमच्या सायकलची दोन चाके आहेत. भलेही ते स्वतःला राम मनोहर लोहिया यांचे शिष्य समजोत, पण लोहियांचा समाजवाद ना कधी मुल्ला मुलायमला कळला, ना कधी त्या दिशेने त्यांचा प्रवास झाला. समाजवाद म्हणजे लांगूलचालन नाही, विशिष्ट समाजाविषयी, धर्माविषयीचा द्वेष नाही. सर्व समाजगटांना सोबत घेऊन समाजाच्या सर्व पातळयांवरच्या बदलाचे सूत्र समाजवादाने सांगितले. या सूत्रात संघर्ष असला, तरी पराकोटीच्या द्वेषाला आणि मताच्या वाडग्यासाठी लाळघोटेपणाला अजिबात थारा नाही. पण मुल्ला मुलायम यांनी समाजवादाच्या बुरख्याखाली स्वतःला मुस्लिमांचा तारणहार घोषित केले. रामजन्मभूमी आंदोलनाला हिंदूंचा धार्मिक उन्माद ठरवत मुस्लीम समाजात आपले स्थान निर्माण केले याणि यातूनच 'अयोध्या मेंपंछी भी पैर नही मारेगा' अशी अतिरेकी भूमिका घेतली. अयोध्येत आलेल्या कारसेवकांच्या रक्ताने शरयूचे पाणी लाल केले. स्वतःची सेक्युलर प्रतिमा निर्माण करताना मुल्ला मुलायम कारसेवकांसाठी यम ठरला.

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी मुल्ला मुलायमच्या समाजवादी पार्टीत गटबाजीला ऊत आला होता. बापाच्या विरुध्द बेटयाने बंडाचा झेंडा फडकवला होता. बापाला बाजूला सारत पोराने पक्ष आपल्या ताब्यात घेतला, पण त्यालाही यश मिळाले नाही. 1992 साली सत्ता प्राप्त करणारी समाजवादी पार्टी केवळ 47 जागांपुरती मर्यादित झाली. ज्या मुस्लीम मताच्या आधाराने मुल्ला मुलायम यांचे राजकारण चालत होते, अशा मतदारसंघातही भाजपाचे हिंदू उमेदवार विजयी झाले. या साऱ्याच पार्श्वभूमीवर मुल्ला मुलायम यांनी 1990चा आळवलेला राग खूप गोष्टी सूचित करणारा आहे. उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणे आणि लांगूलचालनाचे राजकारण मोडीत काढत भाजपा प्रचंड बहुमताने सत्तेत आला आहे. रामजन्मभूमीचा विषय न्यायालयाबाहेर चर्चेने सोडवता येऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुस्लीम समाजातील काही गट या विषयात पुढाकार घेताना दिसत आहेत. असे जर झाले, तर आपली राजकीय निवृत्ती जाहीर करण्याशिवाय मुलायमसिंहांसमोर दुसरा कोणताही पर्याय असणार नाही. त्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुलायमसिंह पुन्हा मुल्ला बनले आणि त्यांनी आपल्या कुकर्माची गझल गायली.

ज्या मुस्लीम समूहाच्या लांगूलचालनामुळे काही काळ मुल्ला मुलायमसिंह सत्तेची चव चाखू शकले, तो समूह आता त्यांच्याबरोबर नाही, हे मागील विधानसभा निवडणुकीत सिध्द झाले आहे. आझम खानसारखा बोलभांड बरोबर असताना ही अवस्था झाली आहे.  काही काळापुरते तुम्ही विशिष्ट समाजाला, संघटनांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून आपला स्वार्थ साधू शकता. पण ही स्थिती दीर्घकाळ राहत नाही. मुस्लीम समाज समाजवादी पार्टीपासून दुरावण्याची कारणे काय आहेत? आपला एवढा दणदणीत पराभव कशामुळे झाला? याचा शोध घेण्याऐवजी मुलायमसिंह यांनी आपण कधीकाळी मुस्लीम समाजाचे तारणहार कसे होतो आणि उत्तर प्रदेशमधील एकगठ्ठा मुस्लीम मतपेढी आपल्या ताब्यात कशी होती, हे सांगताना स्वतःच्या कुकर्माचा पाढा वाचला आहे आणि आपण सेक्युलर असल्याची बांग दिली आहे. कदाचित या निमित्ताने दुरावलेला मुस्लीम समूह पुन्हा आपल्याकडे वळेल, अशीही वेडी आशा त्यांना असेल.

''मशीद वाचवण्यासाठी गरज पडली असती तर आणखी माणसं मारली असती'' असे वक्तव्य करणाऱ्या मुलायमसिंहांसमोर तेव्हाही मुस्लीम समाजाची मते होती आणि आजही मतांचाच विषय आहे. देशाच्या एकतेसाठी कारसेवकांवर गोळीबार केला अशी बढाई मारणाऱ्या मुलायमसिंहांनी देशाच्या एकतेची नव्हे, तर नेहमी जातवादाची, सांप्रदायिकतेची वाट चालली आहे. उत्तर प्रदेशात जातीय राजकारणातून सत्तेकडे वाटचाल केली आणि त्याला बळ देण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन केले, सत्तेची ऊब चाखली. आता सत्ता नाही. उत्तर प्रदेशातील जातीय, सामाजिक समीकरणेसुध्दा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बदलून गेली आहेत. अशा परिस्थितीत आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी, स्वतःला अडगळीतून बाहेर काढून पुन्हा प्रकाशझोतात येण्यासाठी मुल्ला मुलायमसिंहांनी आपल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधला आणि मुस्लीम लांगूलचालनांची बांग दिली.