सांग सांग भोलानाथ...!

विवेक मराठी    25-Nov-2017
Total Views |

 

***विभावरी बिडवे**

गुरुग्राममधल्या प्रद्युम्न ठाकूर ह्या सात वर्षाच्या मुलाच्या हत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केली आहे. परीक्षा आणि शिक्षक पालक मिटिंग टाळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची बातमी आहे. खरंच परीक्षा आणि शिक्षक-पालक सभा बैठक टाळण्यासाठी त्याने ही हत्या केली असेल का? इतकं क्षुल्लक कारण आणि त्यासाठी इतका मोठा गुन्हा! मुलं म्हणजेच आपण आणि त्याचं कर्तृत्व हे आपलं स्टेटस आहे असा एक गुंता  विनाकारण होऊन बसला आहे. शिवाय पाश्चात्त्य अनुकरणामुळे, संस्थांनी केलेल्या बाजारीकरणामुळे वा इतरही अनेक कारणांनी झालेल्या मूल्यहीन शिक्षणाच्या वाटेव्यतिरिक्त आत्मिक बळ देणारे नैतिक आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान अभ्यासण्याचीही याक्षणी नितांत गरज निर्माण झाली आहे.

 'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?' ही निरागस कविता पुढे कधी कुठलं भयानक रूप धारण करेल अशी कधी कोणी कल्पनाही  केली नसेल.  गुरुग्राममधल्या प्रद्युम्न ठाकूर ह्या सात वर्षांच्या मुलाच्या हत्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी अकरावीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला सीबीआयने अटक केली आहे. परीक्षा आणि शिक्षक-पालक मीटिंग टाळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची बातमी आहे. तपासानंतर यथावकाश सत्य बाहेर येईलच. त्यामुळे प्रत्यक्ष त्या प्रकरणावर आणि सदर विद्यार्थ्यावर काही टीकाटिप्पणी करायचा इथे उद्देश नाही. पण ह्या खुनाचं त्या विद्यार्थ्याकडून प्राथमिक तपासामध्ये मिळालेलं जे कारण वाचलं, त्याने एक मोठं विचारचक्र सुरू झालं. हे विचारचक्र एका वाढत्या वयाच्या मुलीच्या आईच्या मनातलं - एक पालक म्हणून,  कदाचित मानसशास्त्राच्या पदवीमुळे निर्माण झालेलं - अभ्यासक म्हणून वा आजूबाजूच्या व्यक्तींचं निरीक्षण करत सजगतेने जगण्याच्या सवयीतून आलेलं किंवा एक बरंचसं आयुष्य जगून झाल्यानंतर आलेलं - एक माणूस म्हणून.

खरंच परीक्षा आणि शिक्षक-पालक सभा बैठक टाळण्यासाठी त्याने ही हत्या केली असेल का? त्या निमित्ताने शाळेमध्ये काहीतरी सनसनाटी होईल, सुट्टी मिळेल आणि आजचं मरण उद्यावर ढकललं जाईल. इतकं क्षुल्लक कारण आणि त्यासाठी इतका मोठा गुन्हा! आपण पालक म्हणून इतका ताण मुलांना देत आहोत का? मुलं इतका ताण खरोखर घेत आहेत का? एकूणच जगण्याच्या पध्दतीवरच निर्माण झालेली ही प्रश्नचिन्हं!

कित्येकांची उदाहरणे देताना आपण म्हणत असतो, 'अमुक अमुक अत्यंत कष्टाने वर आला/आली.' अशी एक पिढी होती, जिला टिकाव धरून राहण्यासाठी अत्यंत कष्ट करावे लागले. त्यांच्या पुढच्या पिढीला बरंचसं सहज उपलब्ध झालं. अगदी जे करायचं होतं ते वाढीव होतं, अधिकतर होतं. ह्या पिढीने आता मध्यमवर्गापासून ते उच्च मध्यमवर्गापर्यंत किंवा नवश्रीमंत वर्गापर्यंत प्रवास केला आहे. आणि सुखवस्तूपणाबरोबरच इथे ताणतणावाचं प्रमाणही वाढलंय. ह्या पिढीतल्या जोडप्यांना साधारणत: एक अपत्य आहे आणि आपल्या समाजातल्या स्टेटसप्रमाणे टिकून राहण्याच्या सर्व अपेक्षा ह्या एका अपत्यावर केंद्रित होत आहेत. आपल्या स्वत:कडून असलेल्या अपेक्षा आणि त्याचे ताणतणाव हे आपोआप मुलांकडे संक्रमित होत आहेत. साधारण 20-25 वर्षं चालणारं मुलांचं शिक्षण ही त्यातली एक महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे मुळात मुलांनी शिकावं असं आपल्याला का वाटतं, ह्यावर आपण सगळयांनीच विचार करण्याची वेळ आली आहे.

मुलांनी शिकून अधिकाधिक संपत्ती मिळवावी आणि जगातली सगळी सुखं त्यांना मिळताना अडचण येऊ नये, असं आपल्याला वाटतं की निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण घ्यावं? संशोधक, निर्माणक होऊन ह्या ज्ञानात भर घालावी की खूप मोठं उद्योगपती व्हावं? आयुष्य आनंदाने जगावं की यश, कीर्ती, प्रसिध्दी मिळावी वा घराचं नाव मोठं करावं? अर्थातच ह्या सगळया गोष्टी एकत्र असू शकतात आणि त्यात अयोग्य असं काहीच नाही. मात्र ह्या सगळयासाठी निव्वळ इतर कुटुंबांबरोबर स्पर्धा करण्यासाठी आपण मुलांच्या क्षमता न ओळखता त्यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी गैरवाजवी अपेक्षा तर ठेवत नाही आहोत ना? ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

शिक्षणाच्या कारणांचा विचार करावा हे ह्याचसाठी म्हटलं की एखाद्या मुलामध्ये खरोखर तेवढया क्षमता असतील, तर त्यांचा त्या पध्दतीनेच विकास होणं गरजेचं आहे. मात्र क्षमता नसताना जर अशा अपेक्षा लादल्या गेल्या, तर तीव्र ताणात आणि पर्यायाने डिप्रेशन आदी अनेक मानसिक आजारात, हिंसेत त्याची परिणती झालेली दिसते. ह्याचा अर्थ मुलांच्या विकासासाठी काही करूच नये, त्यांना शिक्षणासाठी उद्युक्त करूच नये असा नाही, तर मुलाची बौध्दिक क्षमता आणि त्याला येणारा ताण ओळखता आलाच पाहिजे. माझी मुलगी लहान होती, अभ्यास कमी होता तेव्हा खूप उत्साहाने अभ्यास करायची. पुढे पुढे लिखाण खरोखर खूप वाढत गेलं, बोटं दुखायची आणि मग लिहिण्याचा अत्यंत कंटाळा करायला लागली. ह्या परिस्थितीत जर मी तिला गृहपाठाशिवायही लिहिण्याचा खूप आग्रह करायला लागले, तर अभ्यासाविषयी जिव्हाळा कसा राहील? मग शुध्दलेखन, स्पेलिंग्स ह्यासाठी वेगवेगळया क्लृप्त्या शोधत गेले.

अफाट बौध्दिक क्षमता असणाऱ्या मुलांची शिक्षणाची गरज आणि त्यांना वळण लावण्याची गोष्ट बाजूला ठेवू. पण सर्वसामान्य पालकांना सामान्यत: आपली मुलं उत्तम शिकावी हे वाटण्याचं आणखी तर काही कारण नाही ना? इतर कुटुंबीयांबरोबर आणि त्यांच्या मुलांबरोबर स्पर्धा, असूया, वरचढ होण्याची ईर्षा, फुशारक्या, दिखाऊपणा, छानछोकी, स्टेटस टिकवण्याची आत्यंतिक गरज ह्यातल्या कुठल्याही गोष्टीसाठी आपण मुलांना ताण देत असू, तर त्यावर खूप विचार करायची गरज आहे. ही स्पर्धा, ही ईर्षा कधीही न संपणारी आहे. इतक्या ताण-तणावांनंतर यश, प्रसिध्दी मिळेलही, पण ती टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा आयुष्यभर तेच ताणतणाव. हीच ईर्षा, ज्यामुळे आपण मुलांना शालेय परीक्षांव्यतिरिक्त भारंभार परीक्षांना बसवत आहोत, अनेकविध कलांचे, खेळांचे क्लास लावत आहोत, आय.आय.टी., बारावीनंतरच्या प्रवेशासाठी मुलांना सातवी-आठवीपासून क्लासच्या घाण्याला जुंपत आहोत. ह्यातले किती विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहेत, पुढे जाऊन कितीजण कलेसाठी आयुष्य वाहणार आहेत, खरंच किती जणांना आय.आय.टी.ला प्रवेश मिळणार आहे - किंबहुना ह्या सर्वच क्षेत्रांतल्या दिग्गजांनी खरोखर एवढा ताण सहन करून हे मिळवलंय का, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली का की ती त्यांची स्वयंप्रेरणा होती, ह्याचा थोडा अभ्यास करायला पाहिजे. इतरांच्या जबरदस्तीने आणि स्वयंप्रेरणेशिवाय व्यक्ती खूप पुढे जाऊ  शकते आणि गेलीच तर टिकाव धरू शकते असं खरोखर आपल्याला वाटतं का? ह्याचाही विचार करायला पाहिजे. कितीही नामांकित शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला, क्लास लावला वा इतर सोयीसुविधा पुरवल्या तरी किंवा केवळ त्यामुळे ह्यातले फार थोडे आइनस्टाइन होणार आहेत. आणि जे होणार आहेत, ते ह्यातली कुठलीही गोष्ट न मिळता होणार आहेत. कला, खेळ शिकवणं, शिक्षणासाठी प्रवृत्त करणं हे चूक नाही, तर दर वेळेस एक्सलन्सची अपेक्षा ठेवणं चूक, हे आपल्याला पटतं ना? त्याचाही विचार करायला पाहिजे.

 ह्यातल्या सगळया गोष्टी केल्या, मोठं पॅकेज देणाऱ्या नोकऱ्या मिळाल्या तरी वेळांचा आणि कामांचा ताण सहन न होऊन ऐन चाळिशीतच निवृत्त होणारे आणि नंतर आपल्या मनाजोगं काम सुरू करणारे अनेक जण आजकाल दिसत आहेत. बऱ्याच जणांना आयुष्याच्या एका टप्प्यावर अशी उपरती होत असलेली दिसून येताना पालकांनी मुलं आपल्या ताब्यात आहेत म्हणून वा मालकी हक्काने असं ताणतणावांचं आयुष्य त्यांनी चूक दुरुस्त करायचं वय येईपर्यंत जगायला का प्रवृत्त करायचं?

आजूबाजूला डोळसपणे बघितलं, तर खूप गोष्टी बदललेल्या दिसताहेत. ठरावीक वयात शिक्षण पूर्ण होणं, ठरावीक वयात लग्न, मग मुलं असं एक आखीवरेखीव चौकटबध्द आयुष्य जगता येण्याचाही ताण येतोय, तर आपल्या मुलांनी काही वेगळं, विशेष करण्याचाही ताणच येतोय. मग वेगळया पध्दतीच्या शाळा आहेत, वेगळया वाटा आहेत तरी त्या वाटांवरून जाऊन जगरहाटीत टिकण्याची भीती आहेच. पालकांना आपल्याला हवं त्याप्रमाणे मुलांना वाढवण्याची जशी भीती आहे, तशीच त्यांना त्यांच्या पध्दतीने आयुष्याचा मार्ग निवडू दिला तरीही आहे. 'एक गुन्हेगार तुरुंगात आपल्या आईच्या कानाला चावला. तू मला हे सगळं चुकीचं आहे हे वेळीच का नाही सांगितलंस? असं त्याने आईला विचारलं.' अशी एक गोष्ट बाबा लहानपणी नेहमी सांगायचे. 'कविता करून वा गाणं म्हणून पोट भरत नाही हे तू मला का सांगितलं नाहीस?' असेही प्रश्न पालकांपुढे आहेतच. मुलांना वाढवताना असे सगळे पर्याय समोर आहेत. आणि त्यामुळे सगळेच अस्वस्थ आहेत. पालकांसहित मुलं सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत, त्याचं व्यसन लागत आहे, मोबाइल्स, व्हिडिओ गेम्स, टीव्ही ह्यामध्ये मुलं अडकली आहेत. पूर्वी कुठेतरी एखादं तुरळक प्रेमप्रकरण दिसायचं. आजकाल जवळपास सगळया मुलांना शाळेच्या वयापासून गर्लफ़्रेंड-बॉयफ्रेंड असणं अपरिहार्य वाटतंय. हे सगळं कशाचं लक्षण आहे? कुणीच स्वस्थ नाहीय. शांत नाहीय. अशाच तणावांवर उपाय म्हणून काहीतरी विशेष, काहीतरी सनसनाटी केलं जातंय. मग तो ब्लू व्हेल गेम असो वा प्रद्युम्नचा कथित खून.

ह्या सगळयातून आपण काय मिळवत आहोत आणि मुलांना कुठल्या वाटेवर नेत आहोत? सातत्याने काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण नक्की काय गमावत आहोत? पैसा, लाइफस्टाइल, आणखी पैसा आणि आणखी उत्तम लाइफस्टाइल! हे चक्र कधी थांबणार? 'ये जवानी है दिवानी' ह्या चित्रपटामधलं माझं एक आवडतं दृश्य आहे. चित्रपटामधला नायक कबीर आपलं भ्रमंतीचं स्वप्न घेऊन जगभर फिरत आहे. एखाद्या प्रेक्षणीय स्थळी गेल्यावर एकही ठिकाण बघायचं न ठेवता प्रत्येक जागेला त्याला भेट द्यायची आहे. त्यासाठी त्याची अव्याहत धावपळ चालू आहे. राजस्थानातल्या किल्ल्यावरून समोर सूर्यास्त होताना दिसत आहे. आणि कबीर नैनाला लाइट आणि साउंड शो मिस होऊ  नये म्हणून उठण्याची घाई करत आहे. सोनेरी ऊन पसरलं आहे, संध्याकाळचं वारं येत आहे. ती म्हणते, ''तू सगळं एकाच दिवशी करू शकत नाहीस.'' तो ''करू शकतो'' असं म्हणत कागदावरची यादी तिच्या हातात देतो. ती कागद भिरकावून देते. ''तो लाइट आणि साउंड शो खूप ढासू असेल असं नंतर कळलं तर?'' तो तिला विचारतो. ''तो तसा नक्कीच असेल'' असं ती त्याला म्हणते. सूर्य आता अधिकच सौम्य होत आहे.  ती म्हणते, ''आपण गेलो तर हा सनसेट कोण बघेल?'' मग कबीर तिच्या शेजारी बसतो. शेवटी ती त्याला म्हणते, ''कितानाही ट्राय करो बनी, लाइफ में क़ुछ ना कुछ तो छुटेगाही. तो जहा है वहीका मजा लेते है!'' धावपळीमुळे ताणले गेलेले त्याच्या चेहेऱ्यावरचे स्नायू सैलावतात, संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी त्याचा चेहरा उजळून जातो. समोर एक शहर पसरून असतं. त्याची क्षितिजं आपल्याला दिसत राहतात. फार फार सुंदर दृश्य! धावण्याचा नादात असं कुठेतरी थांबायलाही पाहिजे, मुलांनाही हे शिकवायला पाहिजे.

दारिद्रयरेषेखालील परिवारांचा संघर्ष, खरोखर तीव्र बुध्दिमत्ता असणारी मुलं, जगाला काही योगदान देणाऱ्या व्यक्ती ह्या ह्याहून भिन्न आहेत. त्यांना आपल्या क्षमता सिध्द करताना कदाचित इतका त्रास, इतका तणाव येणार नाहीय. बाकी आपण बहुतांश सर्वसाधारण गटातले आहोत. आणि ही बाब जितक्या लवकर आपण स्वीकारू, तितकं आयुष्य सहज, सोपं असणार आहे.

आयुष्य आनंदाने जगण्याची कला, स्वत:चे निर्णय घेण्याची आणि निभावण्याची क्षमता, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची विजिगीषू वृत्ती, इतर कोणीही नसताना स्वत:मागे सतत खंबीरपणे उभं राहण्याची सवय, चुका वा अपयश स्वीकारण्याची प्रवृत्ती, शिक्षणाबद्दल आस्था, स्वर्थाव्यतिरिक्त काही योगदान आणि दातृत्वातलं समाधान अशी अनेक स्किल्स मुलांमध्ये रुजवण्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. पालकांची भूमिका ही वाटाडयाची असली पाहिजे. मात्र आपला वेळ, आपले पैसे हे मुलांमध्ये इन्व्हेस्ट करून त्यांच्याकडे मालकी हक्काने बघत आपलं अस्तित्व शोधण्याची आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये आपलं स्टेटस शोधायची प्रवृत्ती घातक होत चालली आहे. मुलं म्हणजेच आपण आणि त्याचं कर्तृत्व हे आपलं स्टेटस आहे, असा एक गुंता विनाकारण होऊन बसला आहे.

ही बाब जितकी वैयक्तिक अथवा कौटुंबिक आहे, तितकीच सामाजिकही आहे. ही चौकट समाजाने आखून दिली आहे. त्यातल्या यश-अपयशाच्या आणि प्रगतीच्या व्याख्या समाजानेच ठरवल्या आहेत. आणि त्यासाठी शिक्षणाचं स्वरूपही समाजानेच ठरवलंय. त्यामध्येच आपण राहायचा आटोकाट प्रयत्न करतोय. दुसऱ्यांकडून ती चौकट जरा विस्कटली, अपयश आलं, वेगळेपण निदर्शनास आलं तर त्या व्यक्तीला आणि कुटुंबाला समाज म्हणून स्वीकारण्याऐवजी आपण दूर लोटत आहोत. कदाचित ह्यामुळेच कुटुंब अधिकाधिक आत्मकेंद्रित होत जात आहे. ही वाढती दडपणं सहन करणं ही सोपी गोष्ट राहिली नाही. पण आपण वैयक्तिक पातळीवर हा गुंता सोडवू शकलो, तर समाज म्हणून सगळयांना बरोबर घेऊन जाण्याची आपली कुवत वाढेल आणि एकूणच समाजमनाची ही चौकट थोडी शिथिल होईल.

प्रचलित औपचारिक शिक्षण आणि त्यातून काय साध्य व्हायला पाहिजे, हा आणखी एक स्वतंत्र विषय आहे. पाश्चात्त्य अनुकरणामुळे, संस्थांनी केलेल्या बाजारीकरणामुळे वा इतरही अनेक कारणांनी झालेल्या मूल्यहीन शिक्षणाच्या वाटेव्यतिरिक्त आत्मिक बळ देणारे नैतिक आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञान अभ्यासण्याचीही  नितांत गरज निर्माण झाली आहे.

9822671110