मधुमेहातले हाडांचे प्रश्न

विवेक मराठी    28-Nov-2017
Total Views |

 

***डॉ. सतीश नाईक*

मधुमेह झाल्यावर अधिक प्रमाणात दिसणारे गुडघेदुखीसारखे सांध्यांचे काही विकारदेखील आहेत. या सगळया गोष्टींनी जिवावर बेतण्याची शक्यता नसली, तरी रोजचं जीवन बरंच दुरापास्त आणि दुखण्याने भरलेलं होतं, यात शंका नाही. म्हणूनच मधुमेहातल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या प्रश्नांकडे पाहिलं गेलं पाहिजे. दुर्लक्षित असे हे हाडांचे आणि सांध्यांचे प्रश्न इतर लोकांमध्येही दिसतात. मधुमेहींसाठी त्यांचा वेगळा विचार केला जात नाही. आणि दुर्दैवाने मधुमेहींना या दुखण्यांचा सामना करावा लागतो.

 धुमेह म्हटल्यावर मूत्रपिंड, डोळे, मज्जातंतू अशा इंद्रियांना होणाऱ्या इजांबद्दल बहुतेक मंडळी जागरूक असतात, परंतु हाडं आणि सांधे यांचा मधुमेहाशी कोणताही संबंध असेल असं निदान वरकरणी तरी कोणाला वाटणार नाही. अर्थात हे सत्य नाही. यात केवळ मधुमेहींमध्ये आढळणारे काही प्रश्न आलेच. शिवाय मधुमेह झाल्यावर अधिक प्रमाणात दिसणारे गुडघेदुखीसारखे सांध्यांचे काही विकारदेखील आले. या सगळया गोष्टींनी जिवावर बेतण्याची शक्यता नसली, तरी रोजचं जीवन बरंच दुरापास्त आणि दुखण्याने भरलेलं होतं, यात शंका नाही. म्हणूनच मधुमेहातल्या हाडांच्या आणि सांध्यांच्या प्रश्नांकडे पाहिलं गेलं पाहिजे.

यातल्या केवळ मधुमेहातच दिसणाऱ्या हाडांच्या प्रश्नांमध्ये अग्रक्रम लागतो तो फ्रोझन शोल्डरचा. बऱ्याच मधुमेहींमध्ये ही समस्या दिसते. खांदा दुखतो.हात खांद्याच्या वर नेणं कठीण होतं. तास प्रयत्न करायला गेल्यास वेदना होतात. कधीकधी या वेदना इतक्या तीव्र असतात की ती व्यक्ती आपले स्वत:चे केस विंचरू शकत नाही. कपडे अंगात घालणं म्हणजे एक कसरत बनते. एक्स रे काढण्यात काहीच अर्थ नसतो. कारण एक्स रेमध्ये काहीच दिसत नाही. मुळात हाडात किंवा सांध्यात कुठलाच प्रश्न नसतो. खांदा आणि दंड यातल्या हाडांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या सांध्याच्या कॅपस्यूलमध्ये दोष असतो. (सांध्यांना घट्ट बांधून ठेवणाऱ्या आवरणाला कॅपस्यूल म्हणतात.) साहजिकच या समस्येचं नाव adhesive capsulitis पडलं.

यात सर्वात जास्त वेळेला दिसणारं लक्षण असतं वेदना. हे बहुधा एकाच बाजूला असतं. खांद्याच्या सांध्याची कुठलीही हालचाल कठीण होते. खांद्याच्या पातळीवर हात हलवताना खूप दुखतं. क्वचित नुसतं त्या जागी स्पर्श केलं तरी ठणकतं. याचं कारण त्या सांध्याच्या आवरणाची लवचीकता कमी होते. आवरणातअसलेल्या प्रोटिन्सना वा त्यासारख्या इतर भागांना ग्लुकोज चिकटतं. त्यामुळे त्यांच्या गुणधर्मात बदल होतात. सांध्यात पुरेसा लवचीकपणा नसेल, तर तो हलवणं वेदनादायी होणारच. हाडांमध्ये कुठलेही बदल होत नाहीत. केवळ नरम भागापुरते सगळे मर्यादित असते. त्यामुळेच एक्स रेमध्ये काहीच निघत नाही. निदानासाठी सी.टी. किंवा एम.आर.आय. स्कॅन करावं लागतं. अर्थात डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यात पेशंटला नुसतं तपासलं, तरी निदान इतका स्पष्ट होतं की असल्या कुठल्याही महागडया तपासण्यांची गरजच नसते.

या प्रश्नावर वेदनाशामक औषध घेत राहणं हा उपाय नसतो. बऱ्याच वेळा वेदना कमी करणाऱ्या औषधांचा खूप फायदा होतोच असं नाही. आखडलेला सांधा व्यायामाने मोकळा करणं हा हमखास लागू होणार उपाय असतो. काही वेळा सांध्यात इंजेक्शन दिलं जातं, तर काही वेळेला भूल देऊन रुग्णाला झोपवलं जातं आणि त्या काळात जबरदस्तीने सांधा हलवला जातो. अशा अघोरी प्रकारांना आता फारच क्वचित वापरलं जातं.

असाच दुसरा प्रश्न म्हणजे खांद्याला आणि हाताला एकत्र एकाच वेळी होणारी वेदना किंवा 'शोल्डर हँड सिंड्रोम'. यात खांद्याचं दुखणं असतंच. त्याचबरोबर हाताची वेदना आणि हातात होणारे बदल असतात. हातात होणाऱ्या बदलांचे तीन स्तर दिसतात. हा आजार झालेल्या पहिल्या तीन ते सहा महिन्यांत हाताचे सांधे अचानक सुजतात, लाल होतात, दुखायला लागतात, थोडा स्पर्शदेखील वेदनेचे कारण बनतो, ते ते सांधे स्पर्शाला गरम लागतात.

पुढच्या सहा महिन्यांत त्या सांध्यांच्या वर असलेली त्वचा चमकदार दिसू लागते, त्यावरच्या सुरकुत्या नाहीशा होतात. शेवटच्या काळात सांधे निकामी व्हायला सुरुवात होते. ज्या मंडळींमध्ये ही समस्या दिसते, त्यांना पूर्वी कधीतरी त्या जागी मार लागलेला असण्याची शक्यता असते. थायरॉइड ग्रंथीचा स्राव वाढला तरी असं होऊ  शकतं. एक्स रेमध्ये बहुधा हाडांची घनता कमी झालेली दिसते. सुरुवातीच्या काळात उपचार केले गेले तर बराच फायदा होतो. म्हणूनच वेळेवर करणं आवश्यक ठरतं. वेदनाशामक औषधं आणि कसरती हेच यावरचे उत्तम उपाय आहेत.

डायबेटिक हँड सिंड्रोम हा पुढचा प्रकार. कमी लोकांमध्ये दिसणारा, पण मधुमेहाशी पक्क नातं सांगणारा. त्यातल्या त्यात तो टाइप वन मधुमेहात अधिक दिसतो. यात हाताच्या सांध्यांवरची त्वचा जाडसर होते. हाताचे छोटे सांधे हलवणं अवघड होतं. त्यांच्या हालचालींचा आवाका मर्यादित होतो. याचाच एक भाग म्हणजे ट्रिगर फिंगर. आपण एखाद्या पिस्तुलीच्या किंवा बंदुकीच्या चापावर बोट ठेवावं आणि ते तसंच राहावं, सरळ करता येऊ  नये, अशा वेळी बोटाची जी गत होईल तीच या आजारात होते. ट्रिगरवर ठेवलेलं बोट सरळ करताना अडकल्यासारखं होतं. पुन्हा व्यायामावर भरवसा ठेवण्याला पर्याय नसतो.

जेव्हा मनगटाच्या सांध्याला बांधून ठेवणारं बंधन जाडसर होतं, तेव्हा डयूपितरां कॉन्ट्रॅक्चर - Dupuytren contracture नावाचा आजार होतो. मनगटाच्या सांध्याला एका जागी पक्कं धरून ठेवणाऱ्या या बंधनाच्या खाली हाताकडे जाणारे मज्जातंतू असतात. ते दाबले जातात. मज्जातंतूंना इजा झाल्यावर कधीकधी ते मृत होतात आणि हे मज्जातंतू ज्या ज्या स्नायूंना नियंत्रित करतात, त्यांची ताकद कमी होते. ते हळूहळू सुकायला, बारीक व्हायला लागतात. मग हाताचा आकार बदलतो. लकवा झालेल्या एखाद्या व्यक्तीसारखा दिसू लागतो. त्या हाताची काम करण्याची शक्ती क्षीण व्हायला लागते. नमस्कार करायला दोन्ही पंजे एकत्र करता येत नाहीत. पंजे एकमेकांना नीट जोडले जात नाहीत. पंजांमध्ये अल्पशी जागा राहते. यालाच prayer sign असं म्हणतात.

मधुमेही मंडळींमध्ये हाडं ठिसूळ होतात असा आजवर समज होता. पण आता वेगळीच गोष्ट समोर आली आहे. टाइप वन मधुमेहात हाडांमधलं कॅल्शियम कमी होत जातं, परंतु टाइप टू मधुमेहात ते वाढतं, हे स्पष्ट झालं आहे. याच कारणाने टाइप टू मधुमेहात स्पॉन्डिलोसिसदेखील जास्त प्रमाणात दिसतं. यालाच 'हायपर ऑॅस्टिओसिस' म्हणतात. अशा वेळी रुग्णाला कंबरदुखी होते. खूप मोठया प्रमाणात नसली, तरी थोडी थोडी कंबर दुखायला लागते. कमरेच्या हालचालीत कुठलीच बाधा येत नाही.

म्हणूनच मधुमेहींनी सररास कॅल्शियम घेणं योग्य नाही. त्याचा फारसा फायदाही नाही. कंबरदुखी म्हणजे कॅल्शियम घ्यायलाच हवं हा विचार चुकीच्या संकल्पनेवर आधारित आहे. त्याऐवजी अधूनमधून व्हिटॅमिन डी घेतलेलं बरं. कारण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं अंग दुखण्याचं प्रमाण अधिक आहे. व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशात आपल्या त्वचेखाली तयार होतं. पण हा सूर्यप्रकाश सकाळी अकराच्या दरम्यानचा हवा. आपल्याकडचं कडक उन्ह पाहता सकाळी अकरा वाजता कोणी फिरायला जायला धजणार नाही. त्यांनी व्हिटॅमिन डी तोंडी घेतलेलं बरं. ते आठवडयातून एकदा रित्या पोटी घ्यावं लागतं.

काही लोकांना कोलेस्टेरॉल कमी करणारं स्टॅटिन नावाचं औषध सुरू असतं. त्याने शरीर दुखू शकतं, हेही लक्षात घ्यायला हवं.

कॅल्शियम कमी झाल्यास सांध्यातल्या हाडांची रचना बदलते. विशेषत: पायांच्या सांध्यात याचा प्रभाव अधिक जाणवतो. तिथे असे रचना बदलेले सांधे शरीराचं वजन नीट पेलू शकत नाहीत. हाडं मोडू लागतात. तिथल्या मज्जातंतूवरदेखील मधुमेहाचा परिणाम झालेला असतोच. त्यामुळे हाडं मोडलेली जाणवत नाहीत. याला डॉक्टर 'चारको फूट' असं म्हणतात. हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळे कधीही एकाच पायाला वेदना न होणारी सूज दिसायला लागली की सावध व्हायला हवं. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

आतापर्यंत आपण मधुमेहात दिसणाऱ्या हाडांच्या व सांध्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करत होतो. परंतु समाजामध्ये एरव्हीही दिसणारे हाडांचे व सांध्यांचे काही प्रश्न मधुमेहात कमी वयात आणि प्रकर्षाने जाणवतात, त्यांचाही ऊहापोह इथे व्हायला हवा.

यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे गुडघेदुखी किंवा osteo-arthritis. ही सुरू झाली की रुग्ण त्याला नेमून दिलेला चालण्याचा व्यायाम करू शकत नाहीत. मग प्रश्नांची मालिका सुरू होते. मधुमेह नियंत्रित करण्याचं आणखी एक आयुध भात्यातून कमी होतं.

रक्तातलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढून होणारा गाउटसारखा आजारदेखील मधुमेहात अधिक असतो. हाताचे, पायाचे लहान सांधे त्यामुळे दुखायला लागतात. प्रत्यक्ष युरिक ऍसिड न वाढता होणारी सांधेदुखी अर्थात 'स्युडो गाउट'सुध्दा मधुमेहात जास्त दिसतो. पायाच्या पुढच्या भागातले सांधे झिजून होणारा osteolysis of forefoot हा प्रश्न, तसंच पन्नाशीच्या पुढच्या वयातल्या मधुमेहींना त्रास देणारा, कधी कमरेच्या तर कधी गुडघ्याच्या सांध्यांना आलटून पालटून दुखावणारा migratory osteolysis of hip and knee हा आजार मधुमेहींची पाठ सोडत नाही.

एकंदरीतच दुर्लक्षित असे हे हाडांचे आणि सांध्यांचे प्रश्न इतर लोकांमध्येही दिसतात. मधुमेहींसाठी त्यांचा वेगळा विचार केला जात नाही आणि दुर्दैवाने मधुमेहींना या दुखण्यांचा सामना करावा लागतो.

9892245272