'वेष नसावा कधीही बावळा...'

विवेक मराठी    28-Nov-2017
Total Views |

 व्यवसायाइतकीच ग्राहकांवर प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे त्याचा मालक असतो, हा महत्त्वाचा धडा माझ्या बाबांनी मला शिकवला. व्यावसायिकाने आपल्या ग्राहकांशी आणि कर्मचाऱ्याशी सौजन्याने बोलावेच, त्याचबरोबर स्वत:चे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आणि हसतमुख ठेवण्याचीही काळजी घ्यावी, असे ते सांगत. मी त्यांचा सल्ला मानला आणि आज अखेर त्याचे महत्त्व विसरलो नाही. 'वेष असावा बावळा, परी अंतरी नाना कळा' असे एकेकाळी समर्थ रामदास म्हणून गेले होते. पण आजच्या काळात मात्र 'तुम्ही असता कसे यापेक्षा तुम्ही दिसता कसे' याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून मी म्हणेन, 'वेष नसावा कधीही बावळा.'

वयाच्या विशीत असताना बेलबॉटम पँट आणि टी-शर्ट हा माझा नेहमीचा पोषाख होता. साधारणपणे तरुण पिढी त्यांच्या काळातील हिरोंच्या फॅशनचे अनुकरण करत असते आणि मीसुध्दा त्याला अपवाद नव्हतो. दुबईत दुकानात काम करताना किंवा बाहेर जाताना मी या एकाच स्टाइलचे कपडे घालून जात असे. बाबाही कधी माझ्या कपडयांबद्दल काही मत व्यक्त करत नसत.

पण विशिष्ट ठिकाणी किंवा प्रसंगी ठरावीक कपडे वापरावेत, हा पहिला धडा मला बाबांनीच दिला. मी आमच्या दुकानाची पिठे दळायला शेजारच्या गिरणीत जात होतो. त्या वेळी मी स्वत: चक्कीवर दळणे दळत असे. बाबांनी सुरुवातीलाच सांगितले, ''जय! रोजच्या वापराचे शर्ट-पँट अंगावर ठेवून पीठ दळू नकोस. गिरणीत ठेवलेला मळकट लांब डगला व पँट अंगावर चढव आणि रुमालाने केस पूर्ण झाकून मगच दळणे दळ. सगळयात महत्त्वाचे म्हणजे दळणाचे काम संपल्यावर हात-पाय व चेहरा स्वच्छ धुऊन मगच दुकानात येत जा.'' मी त्यांच्या सूचनेचा मनाशी विचार करत असताना ते म्हणाले, ''हे तुला सांगण्यामागे तुझ्या चांगल्या कपडयांवर पीठ उडून ते खराब होऊ नयेत, हा हेतू आहेच, पण पीठ माखलेल्या अवतारात तू आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकांच्या नजरेस पडू नयेस. अन्यथा ते तुला गबाळा आणि निष्काळजी समजतील.'' बाबांनी अगदी मोजक्या वाक्यांत व्यवसायाच्या यशाचे एक मर्म मला उलगडून सांगितले.

पुढेही बाबांनी विविध प्रसंगांतून नीटनेटक्या वेषभूषेचे महत्त्व माझ्या मनावर ठसवले. दुबई एअरपोर्ट ऑॅथॉरिटीच्या फ्लाइट केटरिंग विभागाला मालपुरवठा करण्याचे एक मोठे कंत्राट आम्हाला मिळू पाहत होते. त्याबाबत पूर्वचर्चा करण्यासाठी त्यांच्या उच्चाधिकाऱ्यांनी आम्हाला भेटीला बोलावले होते. मी आणि बाबा त्या मीटिंगला गेलो. एरवी माझ्या कपडयांबाबत मतप्रदर्शन न करणाऱ्या बाबांनी त्या दिवशी मात्र मला नेहमीचा वेष बदलण्याची सूचना केली. बेलबॉटम पँट आणि टी-शर्टच्या जागी नॅरो-बॉटम पँट व फुल स्लीव्ह्ज शर्ट घालायला लावला. माझ्याकडे कोट नव्हता, पण शर्टवर टाय घालून मी मीटिंगला गेलो. ती बैठक चांगली झाली. त्या लोकांवर प्रभाव पडावा, म्हणून मी आमच्या कंपनीबाबत आणि ग्राहकांबाबत तपशिलाने माहिती देत होतो. ते अधिकारी आणि माझे बाबा शांतपणे ऐकून घेत होते.

आम्ही तेथून बाहेर पडताच मी जरा उत्साहाने बाबांना म्हणालो, ''बाबा! एकंदर कल बघता आपल्याला हे कंत्राट मिळण्याची संधी जास्त दिसतीय.'' त्यावर बाबांनी मला दोन गोष्टी समजावून दिल्या. ते म्हणाले, ''हे बघ जय! अशा बिझनेस मीटिंग्जमध्ये क्लायंटपुढे आपण वाचाळपणे बोलायचे नसते. विचारतील तेवढया प्रश्नांना गांभीर्याने आणि मोजक्या शब्दांत उत्तरे द्यायची. तू आपल्या व्यवसायाविषयी आणि ग्राहकांविषयी सांगत बसलास, पण ही माहिती आधीच त्यांनी मिळवलेली असते. दुकानात ग्राहकांशी दोन शब्द जास्त बोलावेत, पण मोठया कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठकीत नेहमी दोन शब्द कमी बोलावेत. चर्चा व्यवहारापुरती मर्यादित ठेवावी.''

बाबा पुढे म्हणाले, ''तुला तुझा नेहमीचा पोषाख बदलायला लावण्यामागेही कारण आहे. माझी हवाई दलात नोकरी झालेली आहे. लष्करात ड्रेस कोडचे पालन काटेकोर केले जाते. ड्रिलच्या वेळचा पोषाख निराळा, परेडच्या वेळचा पोषाख निराळा, वर्कशॉपमध्ये काम करण्याचा पोषाख निराळा आणि भोजनाच्या वेळचा पोषाख निराळा. यात गैरशिस्त खपवून घेतली जात नाही. त्यामुळे आपोआपच हे नियम पाळण्याची सवय पडते. व्यावसायिकानेदेखील पोषाखाचे असेच भान ठेवणे गरजेचे असते. बिझनेस मीटिंग्जना जाताना टाय-इनशर्ट-पॉलिश्ड बूट असा रुबाबदार पोषाखच घालावा, म्हणजे त्याचा एक वेगळा प्रभाव पडतो.

बाबांचे सांगणे मला पटले. त्या दिवसापासून मी प्रसंगाला साजेशी वेषभूषा करू लागलो. मला दुबईत पहिला पुरस्कार मिळाला, तेव्हा तो घ्यायला जाण्यापूर्वी मी आयुष्यातील पहिला कोट आठवणीने शिवून घेतला. हे टापटिपीचे महत्त्व मी आमच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनाही समजावून सांगितले. आमच्याकडे एक कर्मचारी होता. तो खूप साधेपणाने राही. एकदा मी त्याला एका ग्राहक कंपनीतून येणे रकमेचा चेक आणायला पाठवले होते. तो बऱ्याच उशिराने आला. उशिराचे कारण विचारता तो म्हणाला, ''सर! त्या लोकांनी मला तासभर बसवून ठेवले, पण शेवटी काम झालेच नाही.'' मी एकदा त्याच्याकडे नजर टाकली आणि म्हणालो, ''हे बघ. तू पँटमध्ये शर्ट न खोचता आणि पायात स्लीपर घालून गेलास. त्यांना वाटले असेल की हा ऑॅफिसबॉय आहे. आता एक काम कर. उद्या पायात पॉलिश केलेले बूट, पँटमध्ये इन-शर्ट, कमरेला पट्टा आणि गळयात टाय अशा पोषाखात पुन्हा तेथे जा आणि त्यांच्या वागणुकीतील बदल तुझा तूच अनुभव.'' तो माणूस दुसऱ्या दिवशी मी सांगितल्यानुसार पोषाख करून गेला आणि खरोखर 15 मिनिटांच्या आत त्याच्या हातात चेक पडला.

 

 


 व्यसने नुकसानीला कारणीभूत ठरतात...

व्यावसायिकाने पोषाखाइतकीच आपल्या व्यक्तिमत्त्वाचीही काळजी घ्यावी लागते. काहींना धूम्रपानाची, तर काहींना पान-सुपारीपासून ते तंबाखू-गुटखा चघळण्याची सवय असते आणि ते इतके आदतसे मजबूर होतात की सार्वजनिक ठिकाणीही न लाजता तल्लफ भागवतात. पण अशी व्यसने व्यवसायात नुकसानीचेही कारण बनतात.


एका कंपनीला मालपुरवठा करण्यासाठी मी निविदा भरली होती. मी लावलेला दर त्या कंपनीला जरा जास्त वाटला. त्याचे कारण जाणून घेण्यासाठी त्यांनी मला भेटीला बोलवले. चर्चेत त्या कंपनीच्या अधिकाऱ्याने मला सांगितले की आणखी एका स्पर्धक पुरवठादाराने लक्षणीय कमी किंमतीत निविदा भरली आहे. तुम्हीही तुमचा दर तेवढा ठेवलात, तर काही विचार होऊ  शकेल. पण एका ठरावीक मर्यादेखाली दर कमी करणे मला शक्य नसल्याने आपला व्यवहार इतक्या कमी किंमतीला होऊ  शकणार नाही, असे नम्रपणे सांगून तेथून मी निघून आलो. हे कंत्राट आपल्या हातून जवळपास गेले, असे समजून मी तो विषय विचारातून काढून टाकला.

काही दिवसांनी त्या कंपनीने मला ते कंत्राट देत असल्याचे कळवले. मी आश्चर्यचकित झालो. हा बदल कसा घडला? हे विचारता तो अधिकारी म्हणाला, ''अहो, तुमचे स्पर्धक पुरवठादारसुध्दा चर्चेसाठी आले होते, पण त्यांना सिगरेटचे व्यसन आहे. बैठकीत त्यांच्या तोंडाचा उग्र वास घमघमत होता. मला पाच मिनिटेही त्यांच्याशी संभाषण करणे मुश्कील झाले. आम्ही विचार केला की जो मनुष्य आपल्या सवयींवर थोडया वेळासाठी नियंत्रण राखण्यात इतका निष्काळजी असेल, त्याच्याकडून व्यवहारात शिस्तीची अपेक्षा कशी धरावी?'' मला एकाच वेळी गंमत वाटली आणि त्या स्पर्धकाची कीवही आली. चारचौघात वावरताना काळजी न घेतल्यास कसे नुकसान होऊ  शकते, हे त्या प्रसंगातून उमगले.

 

व्यावसायिक शिष्टाचार (बिझनेस एटिकेट्स) आजच्या काळात खूप महत्त्वाचे ठरतात. पोषाखाप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्यासाठी आणखीही काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. कार्यालयीन बैठकीत जांभया देणे, चर्चा सुरू असताना मोबाइलवर आलेला कॉल घेणे, कॉर्पोरेट डिनरप्रसंगी आकंठ खाणे-पिणे, चारचौघांत दात कोरणे, नाक-कान-डोके खाजवणे, समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेण्याअगोदरच अस्वस्थता किंवा नापसंती दाखवणारे हावभाव करणे अशा छोटया गोष्टीही आपला प्रभाव पडण्यास मारक ठरतात. एक छान सुभाषित मी नेहमी आठवणीत ठेवतो -

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं ब्रह्वाशिनं निष्ठुरवाक्यभाषिणम।

सूर्योदये ह्यस्तमयेपि शायिनं विमुञ्चति श्रीरपि चक्रपाणिम ॥

(अर्थ - मळकट कपडे घालणारा, अस्वच्छ दात असलेला, सदैव खादाड, कठोर बोलणारा, सूर्योदयानंतर झोपणारा (आळशी) अशा माणसाच्या हातावर अगदी लाभदायक चिन्हे व भाग्यरेषा असल्या, तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते. )