उध्दवा, अजब तुझे....

विवेक मराठी    03-Nov-2017
Total Views |

 

आपल्या देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयोग याआधी अनेक वेळा झाले असले, तरी त्याला म्हणावे तसे यश आधी कधी लाभले नव्हते. पण आता हे चित्र पालटेल आणि 2019ची लोकसभा निवडणूक मोदीप्रणीत भाजपा सरकारला खूपच जड जाईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढच्या दोन वर्षांत मोदी सरकारने काही बरे काम केले, तरच त्यांचे काही खरे, नाहीतर तिसरी आघाडी 2019च्या लोकसभा निवडणुकीत सत्ता काबीज करेल आणि या सत्तांतराचे किंगमेकर ठरतील दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उध्दव ठाकरे. याचा ताजा पुरावा म्हणजे ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांनी तीन तास केलेली चर्चा होय. महाराष्ट्रात सत्तांतर झाले, त्याला नुकतीच तीन वर्षे झाली. सत्तांतर झाल्या झाल्या पक्षप्रमुखांनी आपल्या शिलेदारांना विरोधी बाकावर बसण्याचा आदेश दिला आणि तो आदेश हवेत विरायच्या आतच पक्ष सत्ताधाऱ्यांच्या गोटात गेला. पण विरोधी बाकाचा गुणधर्म अंगी इतका भिनला की गेली तीन वर्षे सत्तेत असूनही पक्षप्रमुख आणि त्यांचे शिलेदार विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. जगाच्या राजकीय इतिहासात हा एकमेव पक्ष असावा, जो सत्तेची ऊब चाखतानाच आपल्या सहकाऱ्यांना विरोध करतो. विरोधी पक्षाची नसलेली भूमिका पार पाडतो. पक्षप्रमुख म्हणतात त्याप्रमाणे सत्तेतील सर्व पक्ष शिलेदारांचे राजीनामे तयारच आहेत. फक्त ते सादर करण्याचा मुहूर्त सापडत नाही. मोदींना विरोध करण्यासाठी सत्तेतून बाहेर पडलेच पाहिजे असे थोडेच आहे? गेली तीन वर्षे सत्तेत राहून सत्तेलाच विरोध करण्याचा विक्रम करणाऱ्या पक्षप्रमुखांनी आता मोदींच्या विरोधात देशभर रान उठवायचे ठरवले असून त्यासाठी वेळप्रसंगी ते आपल्या तत्त्वांनाही तिलांजली देण्यास तयार झाले आहेत. मोदींना विरोध हा एककलमी कार्यक्रम हाती घेतल्यामुळे आपल्या पूर्वसुरींचा (पक्षी - बाळासाहेब ठाकरे) मार्ग आणि भूमिकाही विसरून गेले आणि मातोश्रीच्या पायऱ्या उतरून पक्षप्रमुख वाघासारखी छाती काढून कुठल्याशा हॉटेलात ममता बॅनर्जींच्या भेटीसाठी गेले. कधीकाळी देशाच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारालाही याच मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागले होते. पण आता मोदींचा विरोध हाच अस्तित्वाचा एकमेव प्रश्न असल्याने पक्षप्रमुख तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी, आपल्यासारखीच मळमळ असणाऱ्यांना एकत्र करण्यासाठी कोठेही जाऊ शकतात, भले त्यात मातोश्रीचा रुबाब मातीमोल झाला तरी चालेल. पक्षप्रमुखांच्या दृष्टीने मोदी विरोध महत्त्वाचा आहे.

पक्षप्रमुखांनी नुकतीच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. पक्षप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही, तर ते सडेतोड आणि आक्रमक हिंदुत्वाची पाठराखण करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. पक्षप्रमुख आणि त्यांच्या पक्षाचे आक्रमक हिंदुत्व म्हणजे काय? हा जरी संशोधनाचा विषय असला, तरी ते हिंदुत्वासाठी काम करतात असे आपण मान्य करायला हरकत नाही. तर असे हे आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे पक्षप्रमुख प. बंगालमध्ये हिंदू समाजावर अत्याचार होत असताना डोळे बंद करून घेणाऱ्या, मात्र रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न समोर येताच कासावीस होऊन त्यांना आधार देणाऱ्या, मुहर्रमच्या मिरवणुकीला त्रास होऊ नये म्हणून दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी घालणाऱ्या ममता बॅनर्जींना भेटायला जातात, यामागे निश्चित अशी भूमिका आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे. पक्षप्रमुखांना गेल्या तीन वर्षांपासून मोदीद्वेषाची कावीळ झाली आहे. पण ममता बॅनर्जी तर या आजाराने गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत. दोघांचेही कमीत कमी एका मुद्दयावर एकमत होऊ शकते, आणि तो मुद्दा आहे भाजपा विरोधाचा, मोदीद्वेषाचा. बाकी पक्षप्रमुखांकडे असणारी एकाधिकारशाहीची वृत्ती ममताबाईंकडेही आहे, याबाबतही एकमत होऊ शकते. त्यामुळे पक्षप्रमुख आणि ममता बॅनर्जी यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन तास चर्चा करून देशात तिसऱ्या आघाडीच्या पुनःउभारणीचा मुहूर्त शोधला, असे जाणकारांचे मत आहे. लवकरच देशात तिसऱ्या आघाडीचा झंझावात निर्माण होईल, आणि लोकसभेत स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या आणि देशातील 29 राज्यांपैकी 19 राज्यांत सत्ताधारी असणारा भाजपा या झंझावातात उडून जाईल. पक्षप्रमुख राष्ट्रीय नेते होतील. त्याच्या मतानुसार, सूचनेनुसार देशात तिसरी आघाडी सत्ता राबवेल आणि मोदीपर्व संपवल्याचे समाधानही पक्षप्रमुखांना लाभेल.

आपल्या सोईचे असेल ते मिळवण्यासाठी प्रसंगी लाचारी केली तरी चालते, ही राजकारणातील रीत आहे. पक्षप्रमुख त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे गुजरातच्या आनंदीबेनना विरोध करणारे पक्षप्रमुख प. बंगालच्या ममता बॅनर्जींसमोर मान झुकवतात, तीही स्वाभिमानाने. आनंदीबेन मुंबईत इथल्या उद्योजकांना गुजरातचे निमंत्रण द्यायला आल्या होत्या, म्हणून विरोध. मग ममता बॅनर्जी काय रसगुल्ला वाटायला आल्या होत्या? कोणताही मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात प्रवास करतो ते उद्योगजगत आणि गुंतवणूकदार यांना निमंत्रित करण्यासाठीच. मग आनंदीबेन आणि ममता बॅनर्जी या दोघीना वेगवेगळी वागणूक देण्यामागे पक्षप्रमुखांची कोणती भूमिका होती? ममता बॅनर्जी यांचा मोदीविरोध सर्वांना माहीत आहे. स्वतःच्या ताकदीवर त्या मोदींचे काहीही बिघडवू शकत नाहीत. त्याच्यासारखीच अवस्था असणाऱ्यांची संख्या जरी देशभरात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असली, तरी ही मंडळी सातत्याने आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात. प. बंगालात ही धुरा ममता बॅनर्जी संभाळत आहेत. त्यांनी मुंबई भेटीत समदुःखी पक्षप्रमुखांना आपल्या कळपात ओढले आहे. पक्षप्रमुख एका दिवसात राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले आहेत. पक्षप्रमुखांचा पक्ष आणि संभाव्य तिसऱ्या आघाडीचा वारू असाच उधळत राहिला आणि मोदीद्वेषाची मुक्ताफळे उधळत राहिला, तर 2019मध्ये चित्र नक्कीच वेगळे असेल. फक्त त्या वेळी भिंग घेऊन कुणाला शोधावे लागेल, याचा विचार पक्षप्रमुखांनी केलेला बरा.