कोणतेही काम कमी दर्जाचे नसते...

विवेक मराठी    08-Nov-2017
Total Views |

व्यवसायात पाऊल टाकल्यावर सगळयात पहिला धडा शिकलो, तो म्हणजे कोणतेही काम कमी दर्जाचे नसते. काम हे केवळ काम असते आणि त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीच नसते. एकदा हे सत्य मनात ठसले, की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या कर्मयोगाच्या मूलतत्त्वाचाही प्रत्यय येऊ  लागतो. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' हीच आपल्या प्रगतीची आणि समृध्दीची पहिली पायरी असते.

 माझ्या बाबांनी दुबईत उघडलेल्या दुकानात मदत करण्यासाठी मी 26 फेब्रुवारी 1984 या दिवशी मुंबई सोडली. एअर इंडियाच्या गंगा या विमानाने मी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. प्रवासभर मी मनोरथांचे इमले रचत होतो. त्या वेळी मी केवळ इयत्ता बारावी उत्तीर्ण होतो आणि वयाची विशीही ओलांडली नव्हती. दुबईला जाऊन, दोन वर्षांत श्रीमंत बनून, गळयात सोन्याची साखळी मिरवत 'धनंजयशेठ' म्हणून ओळखले जाण्याचे दिवास्वप्न माझ्या डोळयांत तरळत होते.

बाबांनी पत्रातून कळवल्यानुसार मी विमानतळावरून त्यांना दुकानात फोन केला. त्यावर ते म्हणाले, ''तू टॅक्सीने येऊ  नकोस. तुला आणायला मी ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवतो.'' मी एकदम हरखून गेलो. ''अरे वा! माझ्या स्वागतासाठी गाडी आणि ड्रायव्हर'' या विचाराने माझी कॉलर ताठ झाली. मी विमानतळाबाहेर येऊन वाट बघू लागलो. थोडया वेळाने माझ्यापुढे एक मालवाहक टेंपो उभा राहिला. ड्रायव्हरने खाली उतरून पाठीमागचे दार उघडले. तेथे मालाची पोती आणि विविध वस्तूंचे पॅक्स कोंबून रचले होते. त्यात थोडीशी जागा करुन त्याने माझे सामान टाकले आणि त्याच्या शेजारी दाटीवाटीने बसून मी दुकानाकडे रवाना झालो.

आमचे दुकान म्हणजे एक नमुना होता. भारतात गावोगावी आढळणाऱ्या 'आगे दुकान, पिछे मकान' पध्दतीची ती रचना होती. फक्त येथे मागच्या बाजूस माल साठवण्याचे गोदाम होते आणि त्याच्या एका कोपऱ्यात माझे बाबा एक स्टोव्ह, काही पातेली आणि अंथरूण एवढया बाडबिस्ताऱ्यासह राहात होते. बाबांनी त्या दिवशी माझ्यासाठी स्वयंपाक बनवला, तो म्हणजे तिकडे तयार मिळणारा रोटीसारखा पाव (खुबूस), पातळ भाजी आणि भात. दुसऱ्या दिवसापासून जेवण बनवण्याची जबाबदारी माझी असेल, हे सांगायला बाबा विसरले नाहीत.

पुढच्या दिवशी मी बाबांना सांगितले, ''मी येथे तुम्हाला मदत करायला आलो आहे. तुम्ही सांगाल ते करीन.'' त्यावर बाबा म्हणाले, ''तशी दुकानाच्या व्यवहारांत तुझी मला मदत होणार नाही. तू झाडलोटीपासून सुरुवात कर.'' मला त्या सूचनेचे फार आश्चर्य वाटले. माझ्या मनोरथांच्या फुग्याला एव्हाना टाचण्या लागायला सुरुवात झाली होती. बाबांना काही विचारण्याची सोयच नव्हती. ते तसे कडक आणि रागीट होते. ''मी येथे झाडू-पोछा करायला आलोय का?'' असे विचारले असते, तर ''आल्या पावली मुंबईला परत जा'' असे म्हणायला त्यांनी कमी केले नसते.

रोजचा स्वयंपाक आणि झाडू-पोछा यानंतर हळूहळू लादी, काचा आणि तावदाने पुसणे, 50 किलोची पोती पाठीवर वाहून नेणे, ड्रायव्हर नसेल तेव्हा टेंपो चालवणे आणि उधारी वसुलीसाठी हेलपाटे मारणे ही कामेही माझ्या गळयात पडली. मी न कुरकुरता ती करत होतो, तरी माझ्या मनाला एक नाराजी सतावत होती. बाबा दुकानाचे मालक होते आणि मी त्यांचा मुलगा होतो, तरी नोकरांनी करायची ही कामे ते माझ्याकडून का करून घेत होते?

काही महिन्यांनी मी कंटाळलो. एक दिवस बाबांच्या रागाची पर्वा न करता धीटपणे त्यांना म्हटलो, ''बाबा! मी येथे धंद्याचे कौशल्य शिकून घ्यायला आलो आहे, पण माझा सगळा वेळ झाडू-पोछा, स्वयंपाक आणि हमाली कामात चालला आहे. तुम्हीही मला काही शिकवत नाही.'' बाबांचे फटकळ उत्तर ऐकण्याची तयारी असताना आश्चर्य म्हणजे बाबा शांतपणे माझ्याकडे नजर रोखून म्हणाले, ''जय! मीसुध्दा आयुष्यात प्रथमच धंदा करतो आहे आणि अनुभवातून शिकतो आहे. मी तुला काय शिकवणार? तुला दुकान चालवण्याचे कौशल्य शिकायचे असेल, तर एखाद्या मोठया सुपर स्टोअरमध्ये उमेदवारी करून शिकून घे. मी तशी खटपट करतो.''

व्यवसायाच्या निमित्ताने दुबईच्या व्यापारी वर्तुळात बाबांची ओळख निर्माण झाली होती. त्याचा वापर करून त्यांनी मला एका सुपर स्टोअरमध्ये काम मिळवून दिले. हे कामही हरकाम्या पध्दतीचे होते. ज्या विभागात माणसे कमी, तेथे मला मदत करावी लागे. त्या स्टोअरमध्ये बघून बघून मी खूप शिकलो. हजारो वस्तूंची साठवण, वर्गवारी, सुबक मांडणी, विक्रीतील बोलण्याचे कौशल्य या गोष्टी लक्षात येऊ  लागल्या. मात्र इतर सगळी कामे मी बिनतक्रार करत असलो तरी एक काम करताना मला किळस वाटत असे. त्या स्टोअरमध्ये बीफ, पोर्क असे मांसाचे प्रकारही विकले जात. ते जरी पॅकिंगमध्ये असले तरी त्याला हात लावताना मला किळस येई. घरच्या संस्कारामुळे मला गोमांस आणि वराहमांस हाताळणे नकोसे वाटे.

एक दिवस मी त्या सुपर स्टोअरच्या मालकाला सांगितले, की ''मी बीफ आणि पोर्कला हात लावणार नाही.'' त्याने विचारले, ''का?'' मी स्पष्ट सांगितले, की ''मी हे खात नाही.'' त्यावर तो म्हणाला, ''मी तर जैन आहे आणि कांदा, लसूणही खात नाही, पण हा माझा धंदा आहे.'' तेव्हापासून मी ठरवले की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते आणि कोणत्याही कामाला लाजू नये.

त्या अनुभवी व्यावसायिकाच्या वाक्यामुळे माझे डोळे उघडलेच, त्याचबरोबर बाबांच्या वागण्यामागचा गूढार्थही लक्षात आला. बाबा माझ्यातून एक कुशल दुकानदार घडवू पाहत होते. फक्त त्यांची शैली उपदेश करण्याची नसून शांतपणे बदल घडवण्याची होती. मालकाचा मुलगा म्हणून माझ्या डोक्यात हवा जाऊ  नये, याची काळजी ते घेत होते. स्वत: उत्तम स्वयंपाक करत असूनही जेवण बनवण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपवले होते, कारण वेळ पडलीच तर मी स्वत: रांधून खाऊ  शकेन. झाडू-पोछा आणि लादी साफ करण्यापासून दुकानात कारकिर्दीची सुरुवात करायला लावण्यामागेही मला दुकानाचा कानाकोपरा ठाऊक व्हावा आणि कामाच्या ठिकाणाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, हा उद्देश होता. पोती वाहायला, गाडी चालवायला आणि वसुलीला पाठवण्यामागे मी बारीकसारीक कामात तरबेज व्हावा, हा हेतू होता. ते माझी परीक्षा बघत होते. ही कामे हलकी समजून मी सुरुवातीलाच नकार दिला असता, तर आपला मुलगा व्यवसायिक होण्याच्या योग्यतेचा नाही, हे त्यांनी ओळखले असते. सुदैवाने मी संयमाने कष्ट करत राहिल्याने त्यांनी वेळ येताच मला सुपर स्टोअरमध्ये अनुभव घ्यायला लावून माझी यत्ता उंचावली होती.

पुढे भारतातील एका उद्योजक घराण्याचा इतिहास वाचताना असाच प्रसंग ठाऊक झाला. परदेशातून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेऊन परतलेल्या आपल्या मुलाला उद्योगपती वडिलांनी पहिले काम कोणते दिले असेल, तर ते म्हणजे कारखान्यात येणारा कच्चा माल ट्रकमधून उतरवून घेण्याचे. त्यानंतर त्याला शॉप फ्लोअर, पर्चेस, क्वालिटी कंट्रोल, अकाउंट्स अशा विविध विभागांत उमेदवारी करायला लावली. दोन वर्षे कष्ट करून घेतल्यावर त्याला सुपरवायझर्स, मॅनेजर्स यांच्या हाताखाली प्रशिक्षण दिले. टप्प्याटप्प्याने पदोन्नती देत दहा वर्षांनी त्यांनी मुलाकडे व्यवसायाची सूत्रे सोपवली. आज त्याच मुलाच्या नेतृत्वाखाली तो उद्योग समूह जोमाने वाटचाल करत आहे. माझ्या वडिलांनीही हेच सूत्र माझ्याबाबत अवलंबले होते.

आज 33 वर्षांनंतरही मी माझ्या कारकिर्दीतील हा पहिला उपदेश विसरलेलो नाही. माझ्या मुलाने शिक्षण संपवून घरच्या व्यवसायात येण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्याला मी स्पष्ट बजावले, ''तू मालकाचा मुलगा असलास तरी तुझ्या घरी. कंपनीत उमेदवारी करताना तुला हे नाते बाजूला ठेवावे लागेल. एक कर्मचारी बनून इतरांत मिसळून काम करावे लागेल आणि दिलेले कोणतेही काम नाकारता येणार नाही.'' समाधानाची गोष्ट म्हणजे त्याला ते पटले आहे.

भारतात जाती-धर्माच्या भेदभावामुळे आणि कामाची उच्च-नीचता ठरवण्याच्या चुकीच्या प्रथेमुळे खूपच सामाजिक नुकसान झाले आहे. ते दुरुस्त करायचे असेल, तर 'वर्क इज वर्शिप' (काम हीच पूजा) या मंत्राने सुरुवात करू या.

vivekedit@gmail.com