वाय - फायमुळे असे बदलले जग!

विवेक मराठी    12-Dec-2017
Total Views |

आजच्या काळात सर्वच क्षेत्रांत वाय-फाय इंटरनेट प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. वैयक्तिक ते सार्वजनिक व्हाया प्रोफेशनल जीवनात वाय-फायमुळे खूप मोठा परिणाम होत असताना आपण त्याचे साक्षीदार बनत आहोत. या प्रणालीची ओळख करून देणारा हा लेख.

शोध मानवी जीवनासाठी एक मैलाचा दगड बनून गेला असून, यामुळे मानवी जीवनाने एक वेगळी कलाटणी घेतली आहे. परंतु विकासाची ही गती टिकवायची असेल, तर इंटरनेटची गती संथ पडता कामा नये. यासाठीच वाय-फायसारख्या तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद करणे गरजेचे ठरते. वाय-फायच्या संशोधनामुळे प्रत्येक क्षेत्र प्रभावित झाले आहे. वैयक्तिक ते सार्वजनिक व्हाया प्रोफेशनल जीवनात वाय-फायमुळे खूप मोठा परिणाम होत असताना आपण त्याचे साक्षीदार बनत आहोत. विविध क्षेत्रावर होणारा त्याचा परिणाम नक्की जाणून घेतला पाहिजे.

इंटरनेट वापरण्याची पध्दती

वाय-फायमुळे इंटरनेट प्रणाली अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकली, त्यामुळेच इंटरनेटचा वापरदेखील वाढलेला आहे. आज आपण स्मार्ट फोन, लॅपटॉप, टॅब्लेट अगदी सहज वापरत असतो. किंबहुना 24 तासांतील अधिकाधिक वेळ या उपकरणांसह व्यतीत करत असतो. हे कशामुळे? तर सहज आणि जलद इंटरनेट कनेक्शनमुळे शक्य होते. जगाच्या अनेक क्षेत्रांवर आज वाय-फाय तंत्रज्ञान आधिपत्य गाजवत आहे ते यामुळेच. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टी.व्ही. बघणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. सन 2000 साली जेव्हा वाय-फायचा वापर खूप लोकप्रिय नव्हता, तेव्हा इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या आणि 2017 सालची संख्या यात लक्षणीय फरक आहे. तेव्हा ऑॅनलाइन शॉपिंग, सोशल मिडिया, डिजिटल मार्केटिंग या बाबी असूनदेखील त्याचा उपयोग करण्याचे प्रमाण आजच्या तुलनेत नगण्य होते.

व्यावसायिक क्षेत्रातील बदल

शेअरेबल इंटरनेट कनेक्शन सहज उपलब्ध होऊ  शकत असल्यामुळे कोठेही कनेक्टिव्हिटी नेणे भौगोलिकदृष्टया शक्य झाले आहे. या जोरावर व्हर्च्युअल व्यवसाय करणारे कोटयवधी व्यावसायिक जगभरात निर्माण होऊ  शकले. त्यामुळेच ऑॅनलाइन शॉपसारख्या नवीन संकल्पनांना चालना मिळाली. यातून ई-कॉमर्सचे क्षेत्र मोठया प्रमाणात बहरले, त्याचबरोबर त्याची सुरक्षिततादेखील टिकून राहिली.

याबरोबरच आजचे कॉर्पोरेट युग झपाटयाने बदलले आहे. व्यावसायिक मीटिंग करण्यासाठी प्रत्येक वेळेला हजर राहण्याची आवश्यकता उरली नाही. अति-जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे परदेशातील गिऱ्हाइकाशीदेखील व्हर्च्युअली मीटिंग करता येणे शक्य झाले. त्यातून स्काइप, गुगल हँगआउट, व्हॉट्स ऍप व्हिडिओ कॉल, इत्यादीसारखी ऍप्लिकेशन्स निर्माण होऊ  शकली.

डिजिटल मार्केटिंगचे वेगळे क्षेत्र आज निर्माण झाले आहे, ज्यातून व्यावसायिक क्षेत्राने कात टाकली आहे. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आज ग्राहकांना आकर्षित केले जात आहे.

स्मार्ट सिटी

स्मार्ट सिटी ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्या माध्यमातून शहरे डिजिटल सुविधांनी संपन्न केली जात आहेत. यात गूगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या बलाढय कंपन्यादेखील भारतात गुंतवणूक करत आहेत. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहरांत ठिकठिकाणी वाय-फाय हॉट-स्पॉट बसविण्याचा. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाय-फाय हा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा पाया आहे.

जेव्हा स्मार्ट सिटी प्रकल्प अनेक ठिकाणी रुजेल, त्या वेळी एकेका शहरातून हजारो टीबी डेटा तयार होणार आहे. यातील बराच डेटा जनतेकरिता खुला असेल, त्याचे आदानप्रदान करण्याचे मुख्य कार्य जलद इंटरनेटच्या माध्यमातून होऊ  शकेल. ते वाय-फाय प्रणालीवर पूर्णपणे अवलंबून आहे.

अशा अनेक क्षेत्रांवर आज वाय-फाय प्रणाली आपला प्रभाव टाकत आहे. याचा दिवसेंदिवस वाढणारा वापर बघता ही प्रणाली येत्या काळात निश्चितच समाजावर सकारात्मक परिणामकारक ठरणारी असेल.  

9579559645