व्यावसायिक शिष्टाचारांचे महत्त्व

विवेक मराठी    14-Dec-2017
Total Views |

व्यवसायात उत्पादनाआधी स्वत: मालक हाच पहिला ब्रँड असतो. ग्राहक दुकानात येतात तेव्हा मालक त्यांच्याशी कसा वागतो, यावरही धंद्याची वाढ अवलंबून असते. व्यावसायिक स्वभावाने तापट, उर्मट, तुसडा, तिरकस बोलणारा किंवा अगदी नको इतक्या सलगीने अघळ-पघळ बोलणारा असला, तर ग्राहकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन क्षणार्धात बदलतो. त्याच जागी मालकाचे व्यक्तिमत्त्व हसतमुख व सौजन्यशील असेल आणि त्याची वेषभूषा नीटनेटकी असेल, तर खरेदी हा ग्राहकांसाठी आनंद ठरतो. म्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने आधी स्वत:ची ब्रँड व्हॅल्यू वाढवणे गरजेचे असते. व्यावसायिक शिष्टाचार त्यासाठी उपयुक्त ठरतात.

 माझ्या बाबांची हवाई दलात नोकरी झालेली असल्याने त्यांच्या स्वभावात लष्करी शिस्त होती. बाबांचे कोणतेही काम नीटनेटके असे. त्यांनी हवाई दलाची नोकरी संपुष्टात आल्यावर एअर इंडियात स्टोअरकीपरच्या जागेसाठी अर्ज केला होता. तो इतका मुद्देसूद लिहिला होता की दीड हजार उमेदवारांमधून केवळ दोघांची निवड झाली. त्यात बाबांचा क्रमांक होता. या गोष्टीचा आम्हाला नेहमी अभिमान वाटे. बाबांची राहणीही शिस्तबध्द होती. रोज सकाळी गुळगुळीत दाढी करून मगच अंघोळीला जाण्याचा आणि अचूक नऊच्या ठोक्याला दुकान उघडण्याचा शिरस्ता त्यांनी निवृत्त होईपर्यंत चुकवला नाही. बाबा स्वभावाने अबोल होते, पण त्यांच्याकडे बघून मीही खूप शिकलो.

मी मागील भागात सांगितल्याप्रमाणे बाबांनी मला नीटनेटक्या वेषभूषेचे महत्त्व समजावून दिले. तरुण वय असल्याने मी नेहमी बेलबॉटम पँट आणि टी-शर्ट या वेषात वावरायचो. पण बिझनेस मीटिंग्जना जाताना इन-शर्ट करणे, पॉलिश केलेले बूट वापरणे, गळयाला टाय लावणे किती प्रभावी असते, हे बाबांनी पटवून दिले. मला पहिला पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांनी आग्रहाने मला सूट शिवायला लावला. तेव्हापासून मी नेहमी कोट वापरू लागलो. बाबा नेहमी सांगायचे की व्यावसायिकाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप ग्राहकांवर पडायला हवी. त्याने गबाळया अवतारात ग्राहकांपुढे जाऊ  नये. आश्चर्य म्हणजे शेजारच्या गिरणीवाल्या मुल्लाचाचांनीही मला अगदी हाच उपदेश केला होता. तेथे चक्की चालवून पिठे दळल्यावर मी त्या पीठ माखलेल्या अवतारात कधीही दुकानात जाऊ  नये, असे त्यांनी बजावले होते. ही सगळी माणसे ज्या छोटया छोटया गोष्टी मला शिकवत होती, त्यामागे खरे तर उत्तम व्यक्तिमत्त्व व्यवस्थापनाचे तत्त्व होते.

आमच्या दुकानात काही ग्राहक माझी मजा करत. मला इंग्लिश भाषा फार अवगत नव्हती, हे ओळखून ते मुद्दाम माझ्याशी फाडफाड इंग्लिशमधून बोलत. त्यावर माझी उडणारी तारांबळ बघणे त्यांना मौजेचे वाटे. एकदा मी हा न्यूनगंड काढून टाकायचे ठरवले आणि इंग्लिशचा संभाषणवर्ग लावला. सहा महिन्यांत मी उत्तम इंग्लिश बोलण्यात पारंगत झालो. त्याच वर्गात मला प्राथमिक शिष्टाचारांचेही शिक्षण मिळाले. हस्तांदोलन कसे करावे इथपासून ते संभाषण प्रसंगी देहबोली कशी असावी, इथपर्यंत बारकावे त्यात होते. 'हॅलो' केव्हा म्हणतात आणि 'हाय' केव्हा म्हणतात, 'हाऊ  डू यू डू' आणि 'हाऊ आर यू' या विचारण्यांत काय फरक असतो, थँक्स शब्दाचा मुबलक वापर का करतात, हे मी त्यात शिकलो. पुढे बडया व्यावसायिक वर्तुळांत वावरताना मला या शिष्टाचारांचा खूप फायदा झाला.

बाबांचा रागीट स्वभाव आम्हाला घरी शिस्त लावण्यापुरता मर्यादित होता. पण दुकानात मात्र त्यांचे रूपांतर एका मुरब्बी व्यावसायिकात होई. ग्राहकांशी अघळ-पघळ बोलण्यापेक्षा चातुर्याने कसे बोलावे, रागावलेल्या ग्राहकांशी बोलताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर कशी ठेवावी, सौजन्य आणि मर्यादशील स्वभावाने ग्राहकांचे मन कसे जिंकावे आणि कौशल्याने विक्री कशी करावी, हे शिकावे तर त्यांच्याकडून. मी व्यवसायात आणखी एक पथ्य पाळले. 'बालादपि सुभाषितं ग्राह्यं' या वचनानुसार मला शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या किंवा माझ्या चुका दाखवून देणाऱ्या प्रत्येकाचा मी आदर केला. त्यातूनही खूप शिकलो.

मी एकदा एका मोठया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसमोर बसलो होतो. ते युरोपियन गृहस्थ होते. मध्येच माझा मोबाइल वाजू लागला. मी गडबडीने कॉल बंद करू लागलो. त्यांनी आपले बोलणे थांबवून मला प्रथम कॉल घेण्यास सांगितले. मी पटकन फोनवरील संभाषण आवरते घेतले आणि त्यांना सॉरी म्हणालो. त्यावर ते हसून म्हणाले, ''मिस्टर दातार, चर्चेला सुरुवात होण्यापूर्वीच आपण आपला मोबाइल सायलेंट मोडवर टाकायचा असतो आणि तातडीचे निरोप संदेशाद्वारे (एसएमएसद्वारे) कळवण्यास आधीच संबंधितांना सांगायचे असते. ही छोटीशी काळजी घेतली, तर नंतर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ येत नाही. लक्षात ठेवा. बिझनेस मीटिंग्जमध्ये संभाषणात व्यत्यय येऊन चालत नाही. बडया व्यावसायिक वर्तुळांमध्ये व्यावसायिक शिष्टाचारांकडे जागरूकतेने बघितले जाते.'' मला त्यांचे म्हणणे पटले.

कमी खा आणि मोजके बोला...

व्यावसायिकाने आपल्याला आलेल्या ई-मेल्सना कालापव्यय न करता वेळीच उत्तरे का द्यायची असतात, किंवा भेटीच्या वेळेपूर्वी पाच मिनिटे आधी तेथे का पोहोचायचे असते, हेही मला समव्यावसायिकांनी समजावून सांगितले आहे. कॉर्पोरेट डिनर, मेजवान्या किंवा अगदी घरगुती सण-समारंभात कमी खायचे आणि व्यापारी वर्तुळात आसपास अनोळखी लोक असतील तर मोजके बोलायचे, हे कानमंत्र मात्र मी स्वानुभवातून शिकलो. यावर एक चांगले सुभाषितही आहे.

जिव्हे प्रमाणं जानीहि, भोजने, भाषणेपिच

अतिभुक्तीरतीवोक्ती सद्य: प्राणापहारिणीं

(हे जिभे तू भोजन आणि भाषण करताना त्याचे प्रमाण जाणून घे. अति बोलणे आणि अति खाणे वेळप्रसंगी जिवावर बेतू शकते.)

 

बिझनेस एटिकेट्समध्ये खूप छोटया गोष्टींचे भान बाळगावे लागते. अगदी आपले हावभाव कुणाला खटकू नयेत, याचीही काळजी घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही कुणाशी तरी समोरासमोर बोलत असाल, तर अशा वेळी केसातून हात फिरवणे, कपाळ चोळणे, नाक खाजवणे, जांभई देणे यासारख्या कृती टाळायच्या असतात. समोरच्या माणसाला त्याचा राग येतो. माझ्याकडे जनसंपर्क क्षेत्रातील एक व्यावसायिक येत. त्यांचा चेहरा कधीही निरुत्साही नसायचा. ते नेहमी सस्मित मुद्रेने बोलायचे आणि त्यांच्या अंगावर एक मंद सुगंध दरवळायचा. एकदा बोलताना मी त्यांच्याकडून या प्रसन्न चर्येचे तंत्र जाणून घेतले. कोणत्याही मीटिंगला किंवा कुणाशी चर्चा करायला जाताना हे गृहस्थ पाउचमध्ये एक परफ्यूमची आणि एक माउथवॉशची बाटली घेऊन जात असत. मीटिंग सुरू होण्यापूर्वी पाच मिनिटे आधी ते वॉशरूममध्ये जाऊन चेहरा स्वच्छ धूत, माउथवॉशने गुळण्या करत आणि अंगावर सुगंधाचा शिडकावा करून मगच खुर्चीत बसत. त्यांच्या सहवासानेच शेजारच्या माणसाला प्रफुल्लित वाटे. ही खरेच अनुकरणीय युक्ती आहे.

माणसाच्या सवयी आणि व्यसने त्याला कशी नुकसानकारक ठरू शकतात, याचे उदाहरण मी बघितले आहे. मी एका मोठया कंपनीला मालपुरवठा करण्यासाठी निविदा भरली होती. प्रत्यक्ष चर्चेत त्या कंपनीने आणखी भाव पाडून मागितला. एका पुरवठादार स्पर्धकाने खूप कमी दराने माल पुरवण्याची तयारी दाखवल्याचे त्यांनी माझ्या कानावर घातले. त्यावर माझा माल दर्जेदार असल्याने मला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे भाव कमी करता येणार नाहीत, असे सांगून मी ती चर्चा आटोपती घेतली. ते कंत्राट आपल्याला मिळणार नाही, असेच गृहीत धरून मी तो विषय विसरून गेलो. काही दिवसांनी अनपेक्षितपणे कंपनीतून मला कंत्राट मिळाल्याचा फोन आला. मला आश्चर्य वाटले. मी अधिक चौकशी केली असता कळले की त्या स्पर्धक पुरवठादाराला सिगरेटचे व्यसन होते आणि चर्चेच्या वेळीही त्याच्या तोंडाला असह्य उग्र दर्प येत होता. ज्या माणसाला आपल्या व्यसनावर थोडया वेळासाठीही नियंत्रण ठेवता येत नाही, त्याच्या शब्दावर भरवसा कसा करायचा? त्यापेक्षा दातारांसारखा निर्व्यसनी माणूस व्यवहारात चोख राहील, असा विचार करून कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांनी ते कंत्राट माझ्याकडे सोपवले होते. हा प्रसंगही मला अंतर्मुख करणारा होता.

मित्रांनो! जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर चांगल्या सवयी असणे गरजेचे असते. अन्यथा पुढील सुवचनात वर्णन केल्याप्रमाणे स्थिती होते -

कुचैलिनं दंतमलोपधारिणं बह्माशिनं निष्ठुरभाषिणञ्च।

सूर्योदयोचास्तमिते शयानं विमुञ्चति श्री: यदि चक्रपाणि॥

(मळकट कपडे, अस्वच्छ दात, सदैव खादाड, कठोर बोलणे अशा सवयी असलेल्या माणसाच्या हातावर लाभदायक चिन्हे व भाग्यरेषा असल्या, तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते.)

vivekedit@gmail.com