अस्तित्वरक्षणासाठी अराजक

विवेक मराठी    16-Dec-2017
Total Views |

 

विधानसभेच्या नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा शरद पवार यांच्या मार्गदर्शनानंतर संपला. या मोर्चाची सांगता करताना शरद पवार यांनी ''महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, सरकारची देणी देऊ नका, सरकार उलथवा'' अशी चिथावणीची भाषा वापरली. ती त्यांच्या लौकिकास साजेशीच आहे. फरक इतकाच की आजवर ते असे उघडपणे न बोलता केवळ कृती करून नामानिराळे राहत असत, या वेळी मात्र त्यांना अशी उघड भूमिका घेण्यावाचून पर्याय नव्हता. विधानसभेत सिंचन घोटाळयावर चर्चा होणार आणि आपले सगेसोयरे त्यात कारागृहात जाणार, हे शरद पवार यांना माहीत असल्यामुळेच त्यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना 'देणी देऊ नका, सरकार उलथून लावा' असा सल्ला दिला आहे. महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी संकटात असताना स्वतःला दुसऱ्या हरित क्रांतीचा शिल्पकार म्हणवून घेणारा हा जाणता राजा अराजकाला निमंत्रण देणारा अशा प्रकारचा सल्ला का देतो? या गोष्टीचा खोलात जाऊन विचार करायला हवा. ''संपूर्ण कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची सरकारी देणी देऊ नका'' असे शरद पवार ज्या दिवशी सांगत होते, त्याच दिवशी काही करोडो रुपये कर्जमाफीपोटी शेतकऱ्यांना मिळाल्याच्या बातम्या प्रमुख वृत्तपत्रांतून प्रकाशित झाल्या होत्या. तर मग शरद पवार अशी अराजकाला आमंत्रण देणारी भाषा कशासाठी करतात?

याच भाषणात शरद पवार यांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका करताना ''तुम्हाला लाज वाटायला पाहिजे'' असे विधान केले. याचा संदर्भ होता मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्तांबरोबर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या भेटीचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर नेमकेपणाने बोट ठेवताच, शरद पवार यांनी मणिशंकर अय्यर आणि मनमोहन सिंह यांची पाठराखण करण्यात पुढाकार घेतला. ''पंतप्रधानांना लाज वाटली पाहिजे'' असे म्हणताना शरद पवार आणि मणिशंकर अय्यर यांचा इतिहास काय आहे? दगलबाजी हा या दोघांच्या स्थायिभाव असल्याचे याआधी अनेक वेळा दर्शन झाले आहे. मणिशंकर अय्यर हे 1962च्या युध्दाच्या काळात चीनच्या मदतीसाठी देणगी गोळा करत होते. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात जाऊन मोदींना सत्तेवरून दूर करण्यासाठी मदतीचा हात मागण्याचे काम याच मणिशंकर अय्यर यांनी केले होते. अशा राष्ट्रविरोधी माणसाने बोलावलेल्या बैठकीत जर माजी पंतप्रधान जात असतील, तर ती राष्ट्रविरोधी कृती नाही काय? नरेंद्र मोदींनी या कृतीकडे बोट दाखवले, तर त्यांची लाज काढण्यापर्यंत शरद पवार यांची मजल गेली. शरद पवार मणिशंकर अय्यरांची आणि अन्य मंडळींची पाठराखण करत आहेत, कारण त्यांचीही जातकुळी तशीच आहे. शरद पवार यांचा सत्तेच्या राजकारणातील दगलबाजीचा इतिहास सर्वज्ञात आहे. संरक्षणमंत्री असताना सरकारी विमानाने दहशतवाद्यांना सोबत घेऊन केलेला प्रवास ही जनता विसरलेली नाही. आपण जाणते नेते आहोत या भ्रमात राहणाऱ्या शरद पवारांना आपल्या गतकाळातील घटनांचा विसर पडला, तरी जनता मात्र त्यांची अशी कृत्ये विसरलेली नाही. जेव्हा सरकार उलथवून लावण्याचा सल्ला शरद पवार देत होते, त्या काळात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांत 123पैकी केवळ 6 जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळाल्या. यावरून मतदार शरद पवार यांना किती गंभीरपणे घेतात आणि त्यांचा कल कुठे आहे, हे लक्षात येत आहे. तरीही शरद पवार अशी अराजकाची चिथवणी कशासाठी देतात?

तीन वर्षांपूर्वी शरद पवार यांनी अशाच प्रकारची भाषणबाजी केली. आताही तोच सूर पुन्हा आळवला. यामागे सिंचन घोटाळयात  गुंतलेल्या पवारांच्या चेल्यांची काळजी आहे. छगन भुजबळांनंतर आता कुणाचा नंबर लागणार, याचे अवघ्या महाराष्ट्राला कुतूहल असताना विधानसभेचे अधिवेशन चालू होत असताना शरद पवार अशा प्रकारचे वक्तव्य करतात, तेव्हा त्यांना काय म्हणायचे आहे हे न सांगताही कळते. शरद पवारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंधरा वर्षे सत्ता भोगली आणि सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःची तुंबडी भरली. सिंचन घोटाळा हे त्या हिमनगाचे एक टोक आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर या घोटाळयाची चौकशी सुरू झाली, भुजबळ कारावासात गेले. आता आपल्या आप्तेष्टांची पाळी आहे, हे लक्षात आलेले शरद पवार सरकारवर आपला अस्तित्वात नसलेला दबाब टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी काँग्रेसशी जुळवून घेण्याचे, सरकारविरुध्द जनतेत असंतोष निर्माण करण्याचे संकेत आपल्या कार्यकर्त्यांना देत आहेत. आपल्या अस्तित्वरक्षणासाठी शरद पवार यांनी केलेली ही केविलवाणी धडपड आहे.

शरद पवार यांना महाराष्ट्राची नस माहीत आहे असे म्हटले जात असे. कधीकाळी ते नक्कीच खरे असेल. पण आज तसे वास्तव नाही. शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला दिवसेंदिवस लागलेली घसरण थांबवून मतदारांत, जनतेत पक्षाविषयी पुन्हा विश्वास निर्माण करून पक्षाला धवल यश प्राप्त करून देईल असा करिश्मा शरद पवारांकडे शिल्लक राहिला नाही. त्यामुळे शरद पवारांनी अराजकाचे आवाहन करण्यास सुरुवात केली नाही का? शरद पवारांची जनमानसातील प्रतिमा आणि त्यांचे अलीकडच्या काळातील व्यवहार या वरवर परस्परविरोधी गोष्टी दिसत असल्या, तरी शरद पवार यांच्या अस्तित्वासाठी त्या आवश्यक आहेत. शरद पवार यांचा पक्ष सत्तेत नाही आणि सत्तेत येण्याची शक्यताही नाही; अशा वेळी जे सत्तेत आहेत, त्यांना सत्ताच्युत करण्यासाठी किंवा त्यांच्या कामात अडचणी निर्माण करण्यासाठी शरद पवार अराजकाला निमंत्रण धाडत आहेत, हे उभा महाराष्ट्र ओळखून आहे.