नाव...

विवेक मराठी    16-Dec-2017
Total Views |

*** जयंत विद्वांस***

 नावात काय असतं? काहीही नसतं, पण ते धारण करणारा माणूस स्वकर्तृत्वाने त्याला योग्य ठरवतो, तेव्हा ते अचूक आहे असं वाटायला लागतं. आर्थिक परिस्थितीनुसार नाव बदलतं. रामचा रामभाऊ  होतो किंवा राम्या होतो. मनोहरला पंत चिकटतं, नाहीतर मग मन्या होतो. तुमची पत ठरवते तुमचं नाव किती पूर्ण हाक मारायचं ते. बाळया - पैसे असतील तर बाळासाहेब होतो!

'What's in a name?' अर्थात 'नावात काय असतं?' असं विल्यमपंत त्यांच्या 'रोमिओ-ज्युलिएट' नाटकामध्ये म्हणून गेलेत. एकूणच पुण्यात राहणारी माणसं (राहणारी म्हणजे जन्माला आल्यापासून राहणारी. बाहेरून आलेले रेफ्युजी यात मोडत नाहीत), दुसऱ्याचं विधान जगप्रसिध्द असलं तरी त्याला तोडीस तोड काही सापडतंय का बघतात किंवा त्याला निरुत्तर करणारं काहीतरी शोधतात. आनंदीबाईंचा वारसा सांगत मी फक्त 'अ'चा 'न' केला आणि प्रतिप्रश्न तयार. विल्यमराव, नावात काय नसतं? गमतीचा भाग सोडून देऊ, पण जन्माला आल्यावर सगळयात मोठं कार्य काय? तर नाव शोधणं. लगेच शोधमोहीम चालू होते. आधी अभिमन्यू अवस्थेत असताना आपल्या कानावर चर्चा पडत असाव्यात, पण नंतर लक्षात राहत नाहीत, एवढंच. जन्माला आल्यापासून आपण परस्वाधीन असतो. आपल्याला काय हाक मारली तर आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देण्याएवढी अक्कल आल्यावर खरं तर नाव ठेवायला हवं. पूर्वजांचं किंवा मागच्या पिढीच्या कुणाचं नाव चिकटवून आठवण तेवती ठेवणं हे सगळयात सोपं काम.

पत्रिका आली की शुभाक्षरानुसार शोधमोहीम चालू होते. काहीच्या काही अक्षरं असतात. एकाला ठा अक्षर होतं. त्यामुळे त्याचं नाव ठामदेव ठेवलं होतं. अर्थात देव आणि मंडळी नाराज होऊ नयेत म्हणून. आता गूगल याद्या देतं अर्थांसकट. कित्येक नावं ऐकलेलीही नसतात. पण श्रीमंतांच्या पोरांची असली, तर त्याला अर्थ असतो. 'कीया', 'वालीनी' ही मुलींची नावं आहेत हे समजल्यावर मी हैराण झालो होतो. 'मी शोधली' असं मुलीच्या काकांनी सांगितल्यावर मी म्यूट झालो होतो. तयार केली असं म्हणायचं असावं त्याला कदाचित. त्यांच्याकडे ऑॅडी आणि बीएमडब्ल्यू होती, त्यामुळे नाव काय का असेना. पण काळानुसार नावं बदलत जातात. पूर्वी देव लोक चार्टला अग्रभागी असायचे. बाप्यांसाठी शंकर, मारुती, राम, कृष्ण, विष्णू आणि इतर देव लोक तर मुलींसाठी देव्या, फुलांची, नद्यांची नावं असायची. राम, श्रीराम, सीताराम, आत्माराम, जगन्नाथ, विष्णू, विठ्ठल, बाळकृष्ण, बळवंत, श्रीकृष्ण, राधाकृष्ण, शंकर, महादेव, हनुमान, मारुती, बजरंग. मग देवांचे इतर नातेवाईक यायचे - लक्ष्मण ऍंड ब्रदर्स, बलराम, मेघनाद, अभिमन्यू. मुलींसाठी सीता आणि तिची अनेक नावं; देव्यांमध्ये अंबा, लक्ष्मी, रेणुका, गौरी; नद्यांमध्ये गोदा, कृष्णा, भीमा, कावेरी; इतर नातेवाइकांमध्ये कौसल्या, द्रौपदी, उर्मिला, राधा, सत्यभामा, रुक्मिणी; फुलांमध्ये सुमन, सरोज, पुष्पा, गुलाब. कमतरताच नव्हती.

रावण, बिभीषण, कुंभकर्ण, 'दु'पासून चालू होणारी शंभर कौरव नावं, वाली, सुग्रीव, गांधारी, कुंती, माद्री, मंथरा, कैकयी, शिशुपाल ही नावं काही माझ्या ऐकण्यात नाहीत. कौरवांना एकुलती एक बहीण होती दु:शला, ती जयद्रथाची बायको होती. (त्या रवी शास्त्रीच्या वडिलांचं नाव जयद्रथ आहे.) पण तुम्ही कोणत्या पार्टीत आहात, त्याप्रमाणे तुमच्या नावाला किंमत असते, हे तेव्हापासून आहे. पूर्वी घरात दिवाळी अंकासारखी दर वर्षी पोरं व्हायची. त्यामुळे आत्याच्या, मावशीच्या, आजीच्या आवडीचं नाव एकेकाला देता यायचं. बाळाला आणि त्याच्या आईला कोण विचारतंय तेव्हा! मग ती आई आपली तिच्या आवडीचं नाव लाडाने हाक मारायची. विनासायास देवाचं नाम (आपलं नाव असतं, देवाचं नाम असतं, संपला विषय..) घेतलं जातं हाक मारताना, म्हणून देवादिकांची नावं ठेवली जायची. पण म्हटलं ना - आर्थिक परिस्थितीनुसार नाव बदलतं. रामचा रामभाऊ  होतो किंवा राम्या होतो. मनोहरला पंत चिकटतं, नाहीतर मग मन्या होतो. तुमची पत ठरवते तुमचं नाव किती पूर्ण हाक मारायचं ते. बाळया - पैसे असतील तर बाळासाहेब होतो (आणि दरारा असेल तर 'बाळ' हेसुध्दा नाव चालतं मग).

काळानुसार नावं बाद होतात. आमच्या एका मित्राला त्याचं नाव वासुदेव असल्याचा भयंकर राग होता. घसघशीत नावं केव्हाच बाद झाली. पद्मनाभ, पद्माकर, जानकीदास, द्रुष्टद्युम्न, सात्यकी, मदन, बब्रुवाहन, हणमंत, श्रीकृष्ण, सीताराम, वामन, केशव, आत्माराम, पुरुषोत्तम, अच्युत, बाळकृष्ण, धोंडो, दत्तो, गोदावरी, द्रौपदी ही नावं आता दुर्मीळ. नवीन नावं जास्त आकर्षक आहेत. इरावती, प्रियदर्शिनी, संजीवनी, इंदिरा, मल्लिका, प्रियंवदा ही नावं मला कायम आवडत आलीयेत. ती ग्रेसफुल वाटतात मला. पण आता सगळं कमीतकमी शब्दात काम. दोन किंवा तीन अक्षरी नावं. ओळखीतल्या एका मुलीचं नाव कादंबरी होतं. जेमतेम पॅम्प्लेट वाटेल इतकी बारीक होती बिचारी. नावाला अर्थ असतो ना? ''आमची कादंबरी आलीये का हो तुमच्याकडे?'' ''तक्रार नोंदवायचीये, आमची कादंबरी हरवलीये दुपारपासून'' अशी वाक्यं ऐकणारा माणूस आ वासेल आधी. वेगळेपणच्या हट्टापायी नाव ठेवताय फक्त. गावसकरने त्याचे आदर्श 'रोहन कन्हाय', 'एम.एल.जयसिंहा' आणि मेव्हणा 'गुंडप्पा विश्वनाथ' यांची मिसळ करून मुलाचं नाव रोहनजयविश्व ठेवलं, पण पुढे पडद्यावर फक्तं रोहनच आलं, ते तीन आणि मध्ये बापाचं नाव असूनही त्याचा त्याला फायदा काही झाला नाही. मिथुनने स्वत: आणि मोहंमद अलीची भेसळ करून मुलाचं नाव मिमोह ठेवलं होतं. अरे, हाक मारायला तरी जमतंय का ते नाव?        


अपभ्रंश करण्यात तर आपण वाकबगार आहोत. एवढं सुंदर नाव असतं, पण जवळीक झाली की, किंवा आहे हे दाखवण्यासाठी एरवी जास्त अपभ्रंश होतात लगेच. अव्या, सुऱ्या, नित्या, रव्या, नंद्या, अथ्या, नच्या, सुन्या, संज्या, मुक्या, दिल्या. मूळ नावं काय स्वस्त होती म्हणून मोठी ठेवली होती का? फारीनात जॉन्या, मायकेल्या, अंद्रया, बराक्या, मॅथ्यूडया, रॉबन्या अशा हाका कुणी मारत असतील असं वाटत नाही. मुलींनासुध्दा पुष्पे, सुमे, धुरपे, कुमे, प्रभे, गोदे, कृष्णे हाका असायच्या. पण आजीने अशी नातीला मारलेली अपभ्रंशित हाक मात्र मला कायम कानाला गॉड वाटत आलीये. म्हणून घरात माणसं असावीत खूप. सगळी तुमच्या जन्माच्या आधीची असावीत. प्रत्येक जण तुम्हांला कागदोपत्री नावापेक्षा लाडाने काहीतरी नाव देतो, मजा असते त्यात. समजा, दहा-बारा वर्षांची सुमी परकर-पोलक्यातली एक चुणचुणीत मुलगी आहे, तिला अशी भरल्या घरात किती नावं असतात बघा. आजी कार्टे म्हणते, आजोबा लबाडी कुठेय? म्हणतात, काका तिला गोपीचंद, बंडया म्हणतोय, भाऊ  तिला ताई म्हणतोय, मोठा असेल तर सुमडी कोमडी म्हणतोय, आई सुमे म्हणते, बाबा तिला उगाचच महाराणी असल्यासारखं सुमाताई म्हणताहेत. वय कितीही वाढू देत, त्या नावासरशी ती हाक मारणारा माणूस न बघता आठवतो.

नावात काय असतं? काहीही नसतं, पण ते धारण करणारा माणूस स्वकर्तृत्वाने त्याला योग्य ठरवतो, तेव्हा ते अचूक आहे असं वाटायला लागतं. अमिताभ म्हणजे 'अमित है आभा जिसकी'. नो लिमिट्स. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे इतकं साधं आणि अनाकर्षक नाव बाळगणारा माणूस, उत्तम पुरुषाची सगळी लक्षणं बाळगून होता. सचोटीने, स्वकर्तृत्वावर पैसा जमवला, दान केला. धोंडो केशव कर्वे इतकं जुनाट वाटणारं नाव धारण करणारा माणूस काळाच्या पुढचं काम करत होता. ग्लॅमरस जगात अजिबात न शोभणारं 'नाना' असं एरवी चारचौघात हाक मारण्यासाठी वापरलं जाणारं नाव घेणारा माणूस त्याच सामान्य नावाची दहशत टिकवून आहे. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे या नावात काय आहे नतमस्तक होण्यासारखं? कार्य असलं की सगळं होतं. त्शेरिंग फिंन्त्सो डेंझोंग्पा हे काय सुटसुटीत नाव आहे का? 'थ्री इडियट्स'मधलं फुनसुख वांगडू हे काय आवडण्यासारखं नाव आहे? नावात काय नसतंय, ते आणावं लागतं, स्वकर्तृत्वाने. त्यामुळे विल्यमसाब, आप बराबर है एकदम!

जन्माला आल्यावर मी दोन दिवस सतत रडत होतो म्हणे. जुन्या जाणत्या एक वयस्क नर्स त्या दवाखान्यात होत्या. त्यांनी आईला विचारलं, ''घरात कुणी अकाली गेलंय का?'' वडिलांचे वडील - माझे आजोबा - वडील बारा वर्षांचे असताना गेले, माहिती पुरवली गेली. त्या म्हणाल्या, त्यांचं नाव ठेवा. शांत होईल. मग आज्जीने कैक वर्षांनंतर तिच्या मिस्टरांचं नाव माझ्या कानात घेतलं आणि मी एकदम म्यूट झालो म्हणतात. कागदोपत्री जे नाव आहे, ते कुणीही हाक मारत नाही, कुणी हाक मारली तरी मी लक्ष देणार नाही, कारण अठ्ठेचाळीस वर्षं ती कानाला सवयीची नाही. आजोबांच्या नावाचा अपभ्रंश आज्जीला ऐकावा लागू नये, म्हणून तिनेच जयंत नाव ठेवलं. मतदान करताना मी आणि वडील पाठोपाठ जात नाही. आधीच आमचं आडनाव एकदम धड आहे, तिथली मठ्ठ माणसं आम्ही डुप्लिकेट मतदान करायला आल्यासारखी संशयाने बघतात.

नाव टिकवण्यासाठी लोकांना मुलगा हवा असतो, तो नाव आणि आडनाव लावतो म्हणून. मला माझ्या आजोबांचं नाव माहितीये. त्याच्या आधीची नावं? कालौघात काय काय पुसलं जातं, आपल्या सामान्य नावाला कोण लक्षात ठेवणारे इथे? आधी आपण नाव ठेवतो, मग नावं. नाव घे, लाजू नको (हे कालबाह्य झालंय, तरीही), नाव निघालं पाहिजे, नाव काढू नकोस त्याचं, नाव काढलंस बघ, तुझं नाव कमी करण्यात आलं आहे, नावं ठेवायला जागाच नाही काही अशी अनेक कानाला प्रिय, अप्रिय वाटणारी वाक्यं त्या सामान्य नावाशी निगडित आहेत, एवढं खरं!!

9823318980