आरोग्य हीच खरी संपत्ती!

विवेक मराठी    19-Dec-2017
Total Views |

मी आजवर चार वेळा मृत्यूच्या दारात जाऊन परत आलो आहे. त्यातील तीन वेळा अनपेक्षित होत्या, पण चौथी वेळ मात्र मी माझ्या हाताने स्वत:वर ओढवून घेतली होती. त्या संकटाने खऱ्या अर्थाने माझे कान टोचले. 'हेल्थ इज वेल्थ' (आरोग्य हीच संपत्ती) ही म्हण आपण वाचली असली, तरी अनुभवातून गेल्याखेरीज तिचे महत्त्व उमगत नाही. त्यामुळे माणसाकडे कितीही पैसा असला, पण त्याची तब्येत निरोगी नसेल, तर त्या संपत्तीचा काहीही उपयोग नसतो.

 व्यवसायात स्थिरावल्यावर एका टप्प्यावर मी गृहस्थाश्रमाचा पुरेपूर आनंद लुटत होतो. आमची दुकाने फायद्यात चालत होती, दुबईत माझे छानसे घर होते, मनमिळाऊ पत्नीची साथ होती, संसाराच्या वेलीवर दोन गोंडस फुले उमलली होती. यश-कीर्ती-समृध्दी यांचा वर्षाव झाला होता. पण माझ्या अंगावरचा हा सुखी माणसाचा सदरा फार काळ टिकला नाही आणि तोही माझ्याच चुकीमुळे.

तरुण वय असल्याने अंगात कामाची खुमखुमी होती. विसाव्या वर्षापासून मी दिवसाचे सोळा तास कष्ट करत होतो आणि व्यवसाय ऊर्जितावस्थेत आल्यावरही त्या दिनक्रमात फारसा बदल झाला नाही. उलट पैसा हातात खेळू लागल्यावर माझ्या सुप्त महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले. तीर् ईष्या इतकी प्रबळ होती की माझ्या मनानेही मला धोक्याचा इशारा दिला नाही. व्यवसाय वाढवण्याच्या कल्पनेने मला इतके झपाटून टाकले, की मी शरीराच्या नैसर्गिक घडयाळाची टिकटिकही विसरलो. 'तरुणपणात कष्ट करायचे नाहीत तर मग केव्हा?' या निश्चयाने मी अहोरात्र स्वत:ला व्यवसायात गुरफटून घेतले.

मी सकाळी नऊला दुकानात जात असे. दिवसभर बिझनेसखेरीज अन्य कुठेही माझे लक्ष नसे. ग्राहकांची, दुकानांची संख्या आणि उलाढाल कशी वाढेल, हाच विचार सतत मनात असे. सायंकाळी घरी गेल्यावरही मी हिशेबाची आकडेमोड मांडून बसू लागलो. पत्नीने एक-दोनदा मला संसाराच्या जबाबदारीची जाणीव करून दिली, पण तिचे शब्द माझ्या कानापर्यंत पोहोचले नाहीत. 'बिझनेस एक्स्पान्शन' या शब्दांची माझ्यावर इतकी भुरळ पडली की मी जेवणाचे आणि झोपेचे वेळापत्रक यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले.

सकाळी घरून नाश्ता करून बाहेर पडल्यावर मी धंद्यात इतका व्यग्र राहू लागलो, की माध्यान्ह भोजन चार-पाचला, तर सायंकालीन भोजन मध्यरात्री बाराला होऊ लागले. बरेचदा दुपारचे भोजन क्लायंटबरोबर हॉटेलमध्ये व्हायचे, तर सायंकाळी व्यापारी वर्तुळातील मेजवान्या असायच्याच. या सगळयामुळे आधी जेवणाच्या वेळा चुकू लागल्या आणि नंतर झोपेचे वेळापत्रकही बिघडले. रात्री झोपायला दीड-दोन वाजू लागले. मला त्याची फिकीर नव्हती आणि बेशिस्तीचा हा विषाणू आपल्या शरीरात दबा धरून बसलाय, याचीही मला जाणीव झाली नाही.

बाहेरची मसालेदार जेवणे, भोजनाच्या अनियमित वेळा आणि जागरणे यांचा व्हायचा तोच परिणाम झाला. दोनच वर्षांत मला पित्ताचा (ऍसिडिटीच) त्रास जाणवू लागला. जागरणांमुळे झोपेचे तास कमी झाल्याने किंचित डोकेदुखी जाणवू लागली. खरे तर ही प्रारंभिक लक्षणे पुढच्या अनारोग्याची चाहूल होती, पण तरुणपण आणि यश यामुळे मी ते इशारे लक्षात घेतले नाहीत. हळूहळू मला तीव्र पित्तप्रकोप व असह्य डोकेदुखी जडली. पित्तशामक औषधे नित्याची झाली. त्यातच मला पाठदुखीचे दुखणे मागे लागले. कितीही औषधे घेतली तरी ही तीन दुखणी बरीच होत नव्हती. एक वेळ तर अशी आली, की मला ऑॅफिसमध्ये चार तास एका जागी बसून काम करणेही मुश्कील झाले.

मी अनेक डॉक्टरांना प्रकृती दाखवली, वेगवेगळया तपासण्या केल्या. माझ्यावर नऊ वेळा एंडोस्कोपी झाली. तरुण वयात धट्टीकट्टी प्रकृती असणारा मी प्रौढावस्थेत मूठभर गोळया खाऊ लागलो. कशाचाही उपयोग झाला नाही. डॉक्टरांच्या मते माझ्या शरीरात काहीही बिघाड नव्हता. कामाचा ताण किंवा चुकीची जीवनशैली यामुळे मला त्रास होत होता. पित्त, डोकेदुखी आणि पाठदुखी असा तीन डोक्यांचा राक्षस मला इतका छळू लागला, की आता या दुखण्यातून आपली सुटका नाही, या विचाराने मला औदासीन्य आले आणि नैराश्य (डिप्रेशन) हा नवा रोग जडला. मी आता नैराश्यावरही उपचार घेऊ लागलो. कधीकधी नैराश्याचा हा झटका इतका तीव्र असे, की आपण गेल्यावर बायको आणि चिमण्या पाखरांचे काय होणार, या विचाराने मी घाबरून जाई आणि त्यांना जवळ घेऊन रडत बसे. रडत-कुढत जगण्यापेक्षा आयुष्य संपवून टाकावे, असे वाटू लागे. अशा रितीने आयुष्यात चौथ्यांदा मी मृत्यूच्या दारात जाऊन उभा राहिलो.

  


रोगांचे मूळ चुकीच्या जीवनशैलीत...

बहुतेक समस्यांचे मूळ आपल्या चुकीच्या जीवनशैलीत असते. त्यामुळे दुखण्यातून धडा घेऊन मी सर्वप्रथम माझी जीवनशैली बदलली. सकाळी लवकर उठणे, फिरणे, ध्यानधारणा, योगासने, कार्यालयात जाणे, सायंकाळी घरी परतल्यावर व्यवसायाचे विषय बाजूला ठेवून कुटुंबात रमणे, सुट्टी मिळाल्यावर सहकुटुंब सहलीला जाणे, आहार व झोप यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे यावर लक्ष केंद्रित केले. मी पाच वर्षे रोज जेवणात केवळ कोंडयाची पोळी आणि हळद-मीठ घालून उकडलेल्या भाज्या खात होतो. आजही बाहेर जेवायला गेल्यास मी 'एक पदार्थ एकदाच' हा फर्ॉम्युला वापरतो. निर्व्यसनी राहिल्याचाही खूप फायदा होतो. मित्रांनो! 'आरोग्य ही आयुष्यातील पहिली संपत्ती असते' हे राल्फ वाल्डो इमर्सनचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा.

 

माझी ती अवस्था बघून पत्नी मनातून हादरली होती, पण ती मला नेहमी पाठीवर हात ठेवून दिलासा आणि आत्मविश्वास द्यायची. तिने श्रध्देने देवाची विनवणी, उपवास सुरू केले. घरात एकदा शतचंडी होमही करून झाला. मी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, पुष्पौषधी असे वेगवेगळे उपचार केले. अगदी विश्वास नसतानाही गंडे-दोरे आणि ज्योतिषाचा सल्ला घेऊन झाला. त्या वेळेस मी इतका हतबल होतो, की कुणीही सुचवेल ते करत होतो. अशा वेळी मला या नैराश्यातून बाहेर काढले ते मानसिक आजारांवर समुपदेशन करणाऱ्या एका महिलेने. ही ब्रिटिश वृध्दा सत्तरीची होती. माझी समस्या ऐकल्यावर ती आश्चर्याने उद्गारली, ''अरे! तू चांगला हट्टाकट्टा आहेस, घरी पत्नी व दोन गोड मुले आहेत आणि व्यवसायही चांगला चालला आहे. मग तुला जीवन नकोसे का झाले आहे?''

मी दुखण्याचे कारण सांगताच त्या बाईने तिची स्वत:ची कहाणी मला ऐकवली. ती पन्नाशीत असताना तिला एका कारने जोरदार धडक दिली होती. रुग्णालयात नेल्यावर ती वाचणार नाही, असेच डॉक्टरांना वाटत होते, पण शेवटपर्यंत उपचार करत राहण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले. आश्चर्य म्हणजे बाई शुध्दीवर आल्या, पण त्यांना इतक्या दुखापती झाल्या होत्या की त्यांना बरे करण्यासाठी डॉक्टरांना पुढच्या दहा वर्षांत त्यांच्यावर 12 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्या बाईंनी मनगटापासून दंडापर्यंतची बाही मागे ओढून मला दाखवले. टाके घातल्याच्या खुणा जागोजागी होत्या. ते बघून मी हादरून गेलो. त्या बाई मला शांतपणे म्हणाल्या, ''मुला! मला अजूनही फिजिओथेरपीचे उपचार घ्यावे लागतात, पण सत्तरीच्या या वयात माझा जीवनोत्साह मुळीच कमी झालेला नाही. तू का तरुण वयात निराश होतोस? तुझ्या दुखण्यावर आपण रेकी किंवा ऍक्युपंक्चर असे उपचार करून बघू या.'' त्यांच्या सल्ल्याने मी भानावर आलो आणि निश्चय केला की काहीही झाले तरी जीवनाला विटायचे नाही.

त्याच सुमारास मी दुबईतील कृष्ण मंदिरात रोज जात असे. तेथे देवाची कळवळून प्रार्थना करत असे. एकदा देवळाच्या बाहेर एका गरीब, पण धट्टयाकट्टया कुटुंबाला साधीच भाकरी आनंदाने खाताना बघितले. मग डोक्यात प्रकाश पडला. 'हेल्थ इज वेल्थ' म्हणीचे महत्त्व उमगले. त्याच क्षणी मी देवाला गाऱ्हाणे घातले. ''मला या व्याधीतून बाहेर काढ. जीवन जगण्याची आणखी एक संधी दे. मी पुन्हा चूक करणार नाही.'' त्या प्रार्थनेला फळ आले असावे. मी एकदा टीव्हीवर ऍक्युपंक्चर उपचाराचा एक कार्यक्रम बघितला. इतक्या सगळया उपचारांत आणखी एक, असे मानून मी ते उपचार घेतले आणि माझी पाठदुखी एकदम बरी झाली. पित्तप्रकोप आणि डोकेदुखीतून मात्र मला कराडच्या डॉ. नचिकेत वाचासुंदर या आयुर्वेद तज्ज्ञांनी बाहेर काढले. त्यांची औषधे व पथ्ये यामुळे मी आजवर स्वस्थ राहून जीवनाचा आनंद घेत आहे.

  anand227111@gmail.com