फिल्म महोत्सवात तीन दिवस

विवेक मराठी    02-Dec-2017
Total Views |

‘इफ्फी’ हा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव 48वा असला तरी माझ्या दृष्टीने पहिलाच होता. महोत्सवात 23 ते 26 फिल्म्स आणि काही चित्रपटगृहात संवादाचे कार्यक‘म होत. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या माध्यमातून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे जरी वेषभूषा वेगळी असली, भाषा वेगळी असली, सांस्कृतिक बंध वेगळे असले, तरी मानवी भावना सर्वत्र सार‘या असतात, जगण्याचे प्रश्‍न सर्व ठिकाणी सारखे असतात, दुर्बळांची ससेहोलपट सर्वत्र सारखीच असते. विश्व मानवता हे एकच आहे, हे या माध्यमातून जाणवल्याशिवाय राहत नाही.

 सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सूचना आणि प्रसारण मंत्रालयातून मला फोन आला. फोनवर बोलणार्‍याने मला परिचय दिला आणि विचारले की, 48व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाच्या प्री-व्ह्यू कमिटीचे सदस्य म्हणून तुम्हाला घ्यायचे आहे, तुमची परवानगी आहे का? मी विचारले, ‘‘मला काय काम करावे लागेल?’’ ते म्हणाले, ‘‘मुंबईत बसूनच तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर आम्ही काही फिल्म पाठवू त्यांचे रेटिंग करून द्यायचे आहे.’’ क्षणभर मी विचार केला आणि त्यांना मान्यता देऊन टाकली. नंतर या खात्याकडून माझ्याकडे 35 चित्रपट पाठविले आणि पंधरा दिवसात त्याचे रेटिंग मागितले. हे जवळजवळ अशक्यच काम होते. तरीसुद्धा मी अन्य कामांना स्थगिती देऊन -20 चित्रपटांचे रेटिंग केले. या समितीचा सदस्य म्हणून गोव्याला फिल्म महोत्सवात तीन दिवस येण्याचे आमंत्रण मला आले. 23 ते 26 नोव्हेंबर मी फिल्म महोत्सवात होतो.

हा फिल्म महोत्सव 48वा असला, तरी माझ्या दृष्टीने पहिलाच होता, त्यामुळे महोत्सव म्हणजे काय? तेथे जाऊन करायचे काय? आपल्याला मार्गदर्शन कोण करील? असे अनेक प्रश्‍न निघण्यापूर्वी माझ्या मनात होते. हॉटेलवर पोहचल्यानंतर माझ्या हातात महोत्सवात दाखविले जाणारे चित्रपट आणि विविध विषयांवर होणारे संवाद यांचे वेळापत्रक ठेवण्यात आले. सकाळी नऊ पासून रात्री साडे दहापर्यंत एका पाठोपाठ एक-अशा कार्यक‘माची गर्दी होती. एकूण पाच चित्रपटगृहात एकाच वेळी चित्रपट चालू राहत. आलटून पालटून काही चित्रपटगृहात संवादाचे कार्यक‘म होत. कार्यक‘माचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले होते, कुठेही कसला गोंधळ नाही आणि चित्रपटगृहांची आसनसं‘या तशी मर्यादित असल्यामुळे चित्रपटाच्या भाषेत सांगयाचे तर प्रत्येक चित्रपट हाऊसफुल होत असे. आसाम केरळपासून ते हिमाचाल प्रदेशातील प्रतिनिधी महोत्सवाला आले होते. चित्रपट संकल्पनेशी काही ना काही कारणानिमित्त संबंधित होता. त्यामुळे खर्‍या अर्थाने हा चित्रपट जाणकारांचा मेळावा होता. हौशे-नवशे-गवशे अशांची सं‘या नगण्य होती. निष्ठेने पंढरपूरची वारी जशी केली जाते, तशी या महोत्सवाची वारी करणारेही अनेक जण होते. 20-22 वर्षे सातत्याने येणारेदेखील काही जण मला भेटले.

कार्यक‘माची पत्रिका पाहिल्यानंतर मी माझ्यापुरते ठरविले की नुसतेच चित्रपट बघत बसायचे नाही, तर काही संवाद कार्यक‘मात जाऊन बसले पाहिजे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे इंग्लिश संक्षिप्तीकरण ‘इफ्फी’ असे होते. संवादाच्या कार्यक‘माचा इफ्फीचा शब्दप्रयोग होता - ‘मास्टर क्लासेस’. अमीर खान यांचा दंगल चित्रपट खूप गाजलेला आहे. या चित्रपटाच्या कथालेखकाच्या सत्रात मी जाऊन बसलो होतो. सेन्सॉर बोर्डाचा सदस्य म्हणून गेल्या तीन वर्षांत अनेक चित्रपट मी पाहिले. चित्रपटगृहात बसल्यानंतर माझ्यापुढे चित्रपटाच्या पटकथेची फाईल ठेवली जाते. ती फाईल जरी नुसती वाचली, तर काहीही समजत नाही. समजत नाही याचा अर्थ चित्रपट लक्षात येत नाही. चित्रपटाचे संवाद पडद्यावर बघावे लागतात. मग ते संवाद सजीव होतात. ही कथा कशी लिहिली जाते? जो प्रसंग पडद्यावर येणार आहे, तो अगोदर आपल्या मनातून कोण पाहतो आणि तो संवाद पडद्यावर कसा जिवंत केला जातो, हे दंगल चित्रपटाची कथा लिहिणारे नितेश तिवारी आणि पियुष गुप्ता यांनी फार सुंदर रितीने प्रेक्षकांना समजावून सांगितले. कथा लिहिण्याची प्रकि‘या फार वेळखाऊ असते. दंगलची कथा लिहायला एक वर्ष लागले. हे ऐकल्यानंतर, चित्रपट करण्यासाठी काय प्रचंड मेहनत करावी लागते, हे लक्षात आले. साहित्य प्रकाराचा विचार करताना प्रतिभेचे स्फुरण झाले आणि एकटाकी कविता लिहून झाली, एकटाकी कथा लिहून झाली, हे किस्से मी ऐकले; परंतु चित्रपटाची कुठलीही पटकथा एकटाकी लिहून झाली, असे माझ्या तरी ऐकिवात नाही आणि ते शक्यही नाही.

भूमी पेडणेकर या अभिनेत्रीचा ‘ब‘ेकिंग स्टिरियोटाइप’ या विषयावरचा मास्टर क्लास होता. फिल्मफेअर अ‍ॅवार्ड मिळालेली ही सिनेअभिनेत्री आहे. हिंदी सिनेमातून स्त्रीच्या वाटेला ज्या भूमिका येतात, त्या प्रेमिका, पत्नी, आई, बहीण, वहिनी, नणंद, सासू, अशा नातेसंबंधाच्या असतात. या त्याच-त्याच प्रकारच्या भूमिका असतात. त्याला इंग्लिशमध्ये ‘स्टिरियोटाइप’ असे म्हणतात. पत्नी पतिशरणच असली पाहिजे, आई म्हणजे ममतेच्या पुतळाच असली पाहिजे आणि बहीण म्हणजे भावाची पूर्ण काळजी करणारीच असली पाहिजे अशा या चौकटी ठरलेल्या असतात. सासू, सून आणि नणंद यांच्या चौकटी सगळ्यांना माहीतच आहेत. भारतीय चित्रपटांतून स्त्रीच्या या त्याच-त्या भूमिका - स्टिरियोटाइप - कशा बदलत चालल्या आहेत आणि या भूमिका मी माझ्या चित्रपटांतून कशा साकार केल्या आहेत, हे भूमीने मांडले. त्याची सुरुवात हिंदी चित्रपटात मदर इंडियापासून झाली, हे सांगताना मदर इंडियातील आईने मुलाला गोळी घालण्याचा प्रसंग पीपीटीमध्ये दाखविला. तसेच खून भरी माँग या रेखाच्या चित्रपटातील प्रसंग तिने दाखविला. स्वतच्यिा चित्रपटातील जाडजूड बायकोची भूमिका करताना आपण वजन कसे वाढविले, हा किस्सा तिने सांगितला. नवर्‍याला या जाडजूड बायकोशी त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न करावे लागते. त्यामुळे तो तिचा पदोपदी अपमान करत राहतो आणि या चित्रपटातील जाडजूड नायिका हा अपमान सहन न करणारी आहे. चित्रपटातील हे स्त्रीचे बदलते रूप प्रेक्षकांनाही अतिशय भावले.

या बदलत्या रूपाची ओळख करून देणारा एक चित्रपट या महोत्सवात पाहायला मिळाला. ‘मर्लिना द मर्डर इन फोर अ‍ॅक्ट्स’असे या चित्रपटाचे नाव आहे. हा इंडोनेशियाचा चित्रपट आहे. इंडोनेशियातील एका बेटावरील एका खेड्यात, आडवळणावर, उंच जागी एक छोटेसे घर आहे. त्या घरात एक विधवा स्त्री राहते. तिचा पती नुकताच वारला आहे. मुलगा होता पण तोही वारला. तशी ती तरुण आहे आणि रूपानेसुद्धा चांगली आहे. त्या माळरानावर आवाज करत करत खाचखळग्यातून मोटरसायकल येते. इथून चित्रपटाला सुरुवात होते आणि शेवटही त्याच घरात होतो. मोटरसायकलवर आलेला इसम गँग लीडर असतो. त्याचे सात साथीदार असतात. तो मर्लिनाला सांगतो की, ‘‘आम्ही सर्व जण तुझा उपभोग घेणार आहोत. तू आमच्यासाठी जेवण कर, आम्ही तुझे पाहुणे आहोत.’’ ते सात जण एका छोट्याशा ट्रकमधून येतात. मर्लिनाची सर्व गुरे-ढोरे ट्रकमध्ये टाकतात आणि दोघे जण निघून जातात आणि पाच जण तिथेच थांबतात. सगळे जण भरपूर दारू पितात. या चित्रपटाच्या पहिल्या भागात मर्लिनाचा फक्त धीरगंभीर चेहराच दिसत राहतो. भवितव्याची अनिश्चितता, त्यातून मार्ग काढण्याचा संकल्प याचे वादळ तिच्या मनात चाललेले असते. पाच जणांपैकी चार जण मधल्या खोलीत बसलेले आहेत. ती त्यांना चिकन सूप आणि भात देते. तो खाऊन सगळे जण मरतात. तिच्या खोलीत झोपलेल्याला - मारकूसला ती उठवायला जाते. तो तिच्यावर बलात्कार करतो. त्याचा म्यानात असलेला सुरा ती हळूच काढते आणि एका घावात त्याचे मुंडके छाटून टाकते. अन्यत्र असला प्रसंग अंगावर काटा उभा करेल, परंतु त्या स्त्रीचे प्रचंड धाडस प्रेक्षकांकडून टाळ्या मिळविते.

चित्रपटाचा दुसरा अंक सुरू होतो आणि ही मर्लिना जाड दोरीने मुंडके घट्ट बांधून एका हातात ते धड घेऊन चालताना दिसते. खांद्यावर तिची छोटी पिशवी आहे. ती कोठे आणि कशासाठी निघाली आहे हे समजत नाही. निर्मनुष्य रस्त्यावर ती उभी राहते. बाळंतपणाचे दिवस भरत आलेली तिची मैत्रीण नोव्हा तिथे येते. पुरुषांकडून होणार्‍या पीडेबद्दल तिचे बोलणे सुरू होते. तिचे बोलणे टकळीच असते. मर्लिना बसमधून पोलीस स्टेशनला जाते. गुन्ह्याची कबुली देते. पोलीस तिला पकडत नाहीत. आम्ही येऊ, पाहू, पुरावा असेल तर कारवाई करू आणि आमच्याकडे वाहन नसल्यामुळे एक महिना लागेल असे उत्तर तिला मिळते. तिची मैत्रीण तिच्या घरी जाते. ज्याचे मुंडके कापले गेले आहे, त्याचा मुलगा पुन्हा त्या घरी येतो. मर्लिनाला बोलावून घेतो, मारकूसच्या मुंडक्याची मागणी करतो आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. हा बलात्काराचा प्रसंग चालू असतानाच नोव्हा दरवाजा ढकलून आत येते. मुलाचा लांब सुरा काढते आणि एका घावात त्याचे डोके शरीरापासून वेगळे करते.

या सगळ्या शारीरिक श्रमामुळे तिला प्रसववेदना सुरू होतात आणि ती एका मुलाला जन्म देते. एकाच खोलीत सहा प्रेते पडली आहेत आणि नवीन बालक जन्माला आले आहे. जन्म-मृत्यूचा खेळ असा चालू राहतो. मर्लिना आणि नोव्हा यांच्याभोवती फिरणारा चित्रपट रडणार्‍या, परिस्थितीला शरण जाणार्‍या हतबल स्त्रीचे दर्शन घडवीत नाही. ती एकटीच आहे, तिच्या मदतीला कुणी नाही, मदतीला तिची मैत्रीण स्त्रीच आहे. बाळंतपणासारखा अवघड विषय आहे आणि त्या दोघींनाच तो पूर्ण करावा लागतो. स्त्रीच्या त्याच-त्या भूमिकांना छेद देणारा इंडोनेशियन भूमीवर तयार झालेला चित्रपट खूप विचार करायला लावतो.

सुदैवाने असे परंपरेच्या बाहेर जाणारे चित्रपट पाहण्याचे भाग्य मला लाभले. निखळ करमणूक करणारे जेम्स बाँडचे चित्रपटही महोत्सवात होते. परंतु ते इतर वेळी पाहता येतात. पृथ्वीमातेचे दुखि मांडणारा ‘मदर’ हा चित्रपट असाच जबरदस्त आहे. भय चित्रपटाचे माध्यम त्याच्यासाठी वापरले आहे. चित्रपट पाहताना लगेचच तो लक्षात येत नाही आणि मग लक्षात येते की काही चित्रपट फक्त डोळ्यांनी बघायचे असतात, तर काही चित्रपट डोक्याने बघायचे असतात. अर्थात असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार मोठा गल्ला करू शकणार नाहीत, परंतु चित्रपट हे जनमानसावर जबरदस्त प्रभाव पाडणारे एक माध्यम आहे आणि या माध्यमाचा कलात्मकरित्या लोकमन घडविण्याच्या दृष्टीने तेवढाच उपयोग आहे, हे स्वीकारले की अशा चित्रपटांचे महत्त्व लक्षात येते. इफ्फीच्या महोत्सवापूर्वी रेटिंग देण्यासाठी जे चित्रपट मी बघितले, त्यातील निम्म्याहून अधिक चित्रपट वेगळी वाट चोखाळणारे आणि काही तरी सांगण्याचा प्रयत्न करणारे मला वाटले. या आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे जरी वेषभूषा वेगळी असली, भाषा वेगळी असली, सांस्कृतिक बंध वेगळे असले, तरी मानवी भावना सर्वत्र सार‘या असतात; जगण्याचे प्रश्‍न सर्व ठिकाणी सारखे असतात, दुर्बळांची ससेहोलपट सर्वत्र सारखीच असते. विश्व मानवता हे एकच आहे, हे या माध्यमातून जाणविल्याशिवाय राहत नाही. शेवटी जाता जाता एक सांगावेसे वाटते की, ज्याला चित्रपट समजून घेण्याची आवड आहे, त्याने या महोत्सवात आवर्जून गेले पाहिजे.     

9869206101