गिरे तो भी....

विवेक मराठी    20-Dec-2017
Total Views |

महाराष्ट्रात सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना महाराष्ट्राबाहेर एनडीएची घटक नसल्यासारखी व्यवहार करत असते. मात्र एनडीएतून बाहेर पडून सत्ता सोडण्याची हिंमत सेनेला होत नाही. भाजपाला विरोध करण्याची एकही संधी सोडायची नाही, असा निर्धार केलेली शिवसेना महाराष्ट्राबाहेर गोव्यात व उत्तर प्रदेशात तोंडावर आपटली. पण त्यातून धडा घेण्याऐवजी पुन्हा नव्या तोऱ्यात गुजरातच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि चाळीस उमेदवार उभे केले. सर्वांना सपाटून मार खावा लागला. पण सेना नेतृत्वाला ना खंत, ना खेद. आपले पानिपत झाले असताना सेना नेतृत्व आणि सेनेचे मुखपत्र ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहे, ती पाहता एवढेच म्हणावे वाटते - 'गिरे तो भी टांग उपर' अशी सेनेची स्थिती झाली आहे.

निवडणुका या जिंकण्यासाठी असतात आणि विजयाचा जल्लोश करायचा असतो. अटीतटीच्या लढाईत आपल्या नेतृत्वाचा कस लावून, कार्यकर्त्यांचा फौजफाटा नियोजनपूर्वक कामाला लावून यशश्री संपादन करायची असते आणि मिळालेल्या यशाचा डिंडोरा पिटायचा असतो. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका पार पडल्या आणि स्वाभाविकपणे विजयी पक्षाचा जल्लोष माध्यमांतून पुढे आला. पण महाराष्ट्रातील माध्यमांत गाजला तो पराजिताचा बोलघेवडेपणा. हाती पक्षाचे मुखपत्र असल्यामुळे कल्पनेच्या उंच भराऱ्या गांजा न खाताही मारता येतात, हे याआधी अनेक वेळा सिध्द करणाऱ्या मुखपत्रातून जी काही लेखणी बहरली आहे, त्याला तोड नाही. आपल्या पराजयापेक्षा भाजपाच्या जागा कमी झाल्या आणि राहुल गांधींची काँग्रेस सावरली याचाच आनंद सेना नेतृत्वाला अधिक झाला आहे. या आनंदाच्या भरात आपले चाळीस शिलेदार कामी आले, याचेही भान हरवून गेले आहे. भाजपाला विरोध करायचा हा एककलमी कार्यक्रम हाती घेतलेल्या सेना नेतृत्वाला मागील काही दिवसांत अनेक साक्षात्कार झाले आहेत. राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, हा त्यापैकीच एक साक्षात्कार होता. तर केवळ चाळीस उमेदवार उभे करून गुजरातची सत्ता आपण ताब्यात घेऊ शकतो, मोदीराज संपवू शकतो हा दुसरा साक्षात्कार होता. याआधी भाजपाला रोखण्यासाठी सेनेने गोव्यावर, उत्तर प्रदेशावर स्वारी केली. तिथे सपाटून मार खाल्ल्यानंतरही महाराष्ट्राबाहेर भाजपाला विरोध करण्याची खुमखुमी कायम होती आणि म्हणूनच पुन्हा गुजरातच्या निवडणुकीत सेनेने भाग घेतला. भाजपाला विरोध करण्यासाठी, काँग्रेसला मदत करण्यासाठी सेनेने आपले चाळीस उमेदवार मैदानात उतरवले. या सर्वांची अनामत रक्कमही जप्त झाली. सेनेला आपल्या उपद्रवमूल्याची क्षमता लक्षात आली आहे. आपण वाघ असल्याचा कितीही दावा केला, तरी मतदार आपले माकड करतात, हे याआधीच्या अनुभवातून सेना शिकली नाही, गुजरात निवडणुकीत मोठया धूमधडाक्यात उतरली आणि चाळीस उमेदवारांची अनामत रक्कम गमावून बसली.

कोणत्याही प्रादेशिक पक्षाने राष्ट्रीय राजकारणात सहभाग घेण्यात, आपला विस्तार करण्यात काहीही चूक नाही. विस्ताराची आकांक्षा प्रादेशिक पक्षांनी कायम मनात ठेवली पाहिजे आणि त्यानुसार पक्षविस्तारासाठी योजनापूर्वक काम केले पाहिजे. पण मोदीद्वेष आणि भाजपाविरोध यांची कावीळ झालेली सेना अशा प्रकारचे कोणतेही प्रयत्न कधी करताना दिसत नाही. मग राष्ट्रीय पातळीवर पक्ष म्हणून सेनेला खरेच विस्तारायचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. सेनेला फक्त महाराष्ट्राच्या आणि त्यातही मुंबईच्या सत्तेची ऊब हवी आहे. आपल्या हातची सत्ता अबाधित राहावी, त्यात दुसऱ्या कोणी हस्तक्षेप करू नये या एकाच ध्येयावर सेनेची वाटचाल चालू आहे. ध्येय संकुचित असल्यामुळे व्यवहारही संकुचित पातळीवरचा होतो आहे आणि म्हणूनच गुजरातमध्ये सेनेचे पानिपत झाल्यावरही मुखपत्रात विद्वेषाचे हुंकार उमटत आहेत. गुजरातमध्ये एवढया जागा लढवूनही अपयशाची चव चाखावी लागणाऱ्या सेनेचे नेतृत्व निकालानंतर पंतप्रधान मोदींना 2019चा इशारा देतात. जणू काही सेनेच्या उमेदवारामुळे गुजरातमध्ये भाजपाच्या जागा घटल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी आणि दूरचित्रवाहिन्यांनी निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्ये आणि प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी सेनेची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नव्हती. पण आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा जणू सेना नेतृत्वाने पण केला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सपाटून मार खाल्ल्यावरही सेनेचे नेतृत्व आपल्या मुखपत्रातून मोदी-भाजपा द्वेषाला वाट मोकळी करून दिली आहे. आपल्या मनातील द्वेषाची मळमळ व्यक्त करताना आपण काय लिहीत आहोत याचेही भान नेतृत्वाला राहिले नाही.

भाजपाला सल्ला देताना सेनेचे नेते आणि मुखपत्राचे संपादक यांनी आपल्या अग्रलेखात लिहिले, 'सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे.' देशात सिंह कोण आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण माकडे कोण? सेनेच्या नेतृत्वाने याचा खुलासा करायला हवा. राहुल गांधींकडे सेना नेतृत्वाचा रोख असेल, तर त्यांनी 77 जागा मिळवून आपले अस्तित्व तयार केले आहे. मग माकडे कोण? या प्रश्नाचा वेध घेताना असे लक्षात येते की स्वतःची कोणतीही ताकद नसताना, संघटनात्मक बांधणी नसताना केवळ मोदी आणि भाजपा विरोधासाठी गुजरातच्या निवडणुकीत उडी मारणे हे माकडचाळयापेक्षा वेगळे होते काय? सेनेच्या नेतृत्वाला, मुखपत्राच्या संपादकांना अशी विधाने करून काय सिध्द करायचे आहे? आपण काय लिहितो याचा विचार संपादक महोदयांनी करायला हवा, नाहीतर मुखपत्राचे लवकरच मनोरंजनपत्रात रूपांतर होईल. गुजरात निकालानंतर मुखपत्रात 'भाजपा काठावर पास' असा मथळा करून 'राहुल गांधी बाजीगर' अशी द्वेषाची एक पिचकारी टाकली आहे. भाजपाने गुजरात राखले, हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा पाडाव करीत सत्ता संपादित केली, तरीही मुखपत्राच्या मते भाजपा काठावर पास आणि एक राज्य गमावणारे आणि केवळ गुजरातमध्ये पंधरा जागांची वाढ करणारे बाजीगर? या अशा दिव्य विश्लेषणामागे सेनेच्या भाजपाविरोधाचे अधिष्ठान आहे. काही झाले तरी आपण भाजपाला विरोध करायचा, टीका करायची हा सेना नेतृत्वाचा आणि सेनेच्या मुखपत्राचा एककलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाल्यापासूनच सेनेला सत्ता सोडण्याचे डोहाळे लागले आहेत. असल्या सत्तेवर लाथ मारतो, सर्व मंत्र्यांचे राजीनामे माझ्याकडे आहेत, लवकरच आम्ही सत्तेतून बाहेर पडू अशा अनेक घोषणा याआधी सेना नेतृत्वाने करून भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. सेनेच्या युवराजांनी नुकतेच जाहीर केले की या वर्षी सेना सत्तेतून नक्की बाहेर पडेल. सेना नेतृत्वाच्या अशा घोषणा त्यांची सत्तेची लालसा दाखवून देत मतदाराच्या मनोरंजनाचा विषय ठरत आहेत. आपण महाराष्ट्रातील सरकारला आपल्या कह्यात ठेवून किंगमेकर बनू, हे सेना नेतृत्वाचे स्वप्न सत्यात येत नाही आणि सत्ता सोडून विरोधात बसण्याची हिंमत होत नाही. अशा वेळी येणारी अस्वस्थता व्यक्त करण्याचे एकच मार्ग म्हणजे भाजपाद्वेष हा आहे.

गुजरातच्या निवडणुकीत सेनेने हात दाखवून अवलक्षण पदरात पाडून घेतले आहे. केवळ विरोधासाठी विरोध हा विस्ताराचा मार्ग नाही. विरोध कशासाठी आहे याचा विचार मतदार राजा नेहमीच करत असतो आणि योग्य व्यक्तीच्या, पक्षाच्या पाठीशी आपला जनाधार उभा करत असतो. सेनेचा विरोध हा व्यक्तिगत स्वार्थासाठी आहे, त्यामुळे त्याला कसल्याही प्रकारचा जनाधार प्राप्त होऊ शकत नाही. गोव्याच्या, उत्तर प्रदेशच्या आणि आता गुजरातच्या निवडणुकीतून सेनेला याची प्रचिती आली आहे. विस्तारासाठी, सत्तेच्या वारूवर स्वार होण्यासाठी सकारात्मक कृतीचा याणि भविष्यवेधी योजनांचा आधार घ्यावा लागतो, तरच यशाचा वारू भाजपासारखा भरधाव जाऊ शकतो याची नोंद सेना नेतृत्वाने घेतली, तरच भविष्यात काही चित्र पालटेल. नाही तर मग आहेच... 'गिरे तो भी टांग उपर...'

9594961860