भावी विजयाची दोन चाके

विवेक मराठी    22-Dec-2017
Total Views |

रोजगार, शेतकरी आणि शेतीचे प्रश्न, शिक्षण आणि शिक्षणाचे प्रश्न हे हिंदुत्वाप्रमाणे अखिल भारतीय विषय आहेत. गुजरातच्या निवडणुकीने दोन गोष्टी सांगितल्या - भावनिकदृष्टया हिंदुत्व हवेच, परंतु केवळ हिंदुत्वाने पोट भरत नाही. हिंदुत्वाबरोबर विकास असलाच पाहिजे. म्हणजे रोजगार, शेतमालाला भाव, उत्तम शिक्षण आणि युवकांसाठी स्वतःचे जीवन विकसित करण्याच्या अनंत संधी द्यायला पाहिजेत. हिंदुत्व सोडून चालणार नाही आणि विकासाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. भाजपाला विजयी करणारी ही दोन चाके आहेत.

भारतीय जनता पार्टीने सहाव्यांदा गुजरात विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये डाव्या कम्युनिस्ट पक्षाने सात वेळा निवडणुका जिंकून एक विक्रम केलेला आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत गुजरात भाजपाला त्याची बरोबरी करावी लागेल.

निवडणुकांचे निकाल आल्यानंतर त्यावर भरपूर लिहिले गेलेले आहे. सर्वच वर्तमानपत्रांनी आपापल्या रंगाप्रमाणे या निवडणूक निकालाकडे पाहिलेले आहे. त्यावरील भाष्य जरी वाचले, तरी भारतात किती उदंड विचार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. सर्वच लेखांचा आढावा घेण्याचा माझा विचार नाही; परंतु जो लेख वाचला असता मला खूप गंमत वाटली, त्या लेखाचा उल्लेख करतो. फ्री प्रेस जर्नलमध्ये 20 डिसेंबरला एक लेख आलेला आहे. लेखकाचे नाव आहे असीम खान. असीम खान यांनी राहुल गांधींची तुलना महाभारतातील अभिमन्यूशी केली. अभिमन्यू चक्रव्यूहात शिरला, कौरवाच्या अतिरथी-महारथींशी लढला, त्याला विजय मिळविता आला नाही, परंतु कौरवांचे मनोबल त्याने तोडले असा असीम खान यांचा विषय आहे.

असीम खान यांनी महाभारत, अभिमन्यू, कर्ण, दुर्योधन, वगैरेंचे दाखले देऊन जो लेख सजविला आहे, तो वाचताना मजा वाटली. खान लोकांना रामायण-महाभारताची आठवण व्हायला लागली! मोगल, अल्लाउद्दीन खिलजी यांची आठवण झाली नाही, हा गुजरात हिंदुत्वाचा जबरदस्त विजय समजला पाहिजे. तशी राहुल आणि अभिमन्यू यांची तुलना योग्य नाही. अभिमन्यू धर्मयुध्दातील सेनानी होता आणि राहुल गांधी घराणेशाहीच्या युध्दातील सेनानी होते. दोघांच्या कामातील नैतिक मूल्यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

आता या निवडणूक निकालांचे, राजकीय पक्ष ज्याप्रमाणे राजकीय विश्लेषण करतात, तसे न करता आपण वस्तुनिष्ठ विश्लेषण करू या. भाजपाचा विजय झाला, 'जो जिता वही सिकंदर' अशी त्यावर प्रतिक्रिया आली. भाजपाचा विजय 2012च्या तुलनेत घसरलेला आहे. तेव्हा 114 जागा होत्या, त्या 99 झाल्या, 16 जागांची घट झाली. काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्या, त्यात 16 जागा जास्तीच्या आहेत. राहुल गांधी यांनी गुजरात निवडणूक प्रचारामध्ये प्रचंड मेहनत घेतली. केवळ घराण्याचे नाव लावून मते मिळणार नाहीत, हे त्यांच्या फार लवकर लक्षात आले. त्यांच्या मेहनतीला, कोणताही राजकीय विचार न करता आपण दाद दिली पाहिजे.

राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराच्या दरम्यान विचारपूर्वक काही गोष्टी केल्या. त्यांनी मंदिरांना भेटी दिल्या आणि नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही व्यक्तिगत टीका-टिप्पणी केली नाही. हिंदू समाजाच्या भावना दुखावतील असे त्यांनी काहीही केले नाही. प्रत्यक्ष मत मिळविण्यात याचा किती फायदा झाला असेल याची आकडेवारी उपलब्ध नाही. फायदा झालाच नसेल असे मात्र म्हणता येणार नाही. मणिशंकर अय्यर यांचा 'नीच' शब्द आणि कपील सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात, 'रामजन्मभूमीचा खटला 2019नंतर घ्यावा' हा केलेला युक्तिवाद, काँग्रेसचा दुहेरी चेहरा आणणारा झाला. एक सौम्य हिंदुत्वाचा आणि दुसरा हिंदू श्रध्दांना कवडीचीही किंमत न देणारा. मतदानावर याचाही परिणाम नक्कीच झाला असणार.

शहरी भागात भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळालेले आहे. मतांची टक्केवारीदेखील वाढली, परंतु ग्रामीण भागात मतांची टक्केवारी कमी झाली आणि जागादेखील कमी झाल्या. मतदानात असा फरक का पडला? याचे उत्तर निवडणुकीपूर्वीच्या 'भावना आणि भाकरी' या माझ्या लेखात मी दिलेले आहे. राजदीप सरदेसाई यांच्या एका लेखात हेच उत्तर अशा प्रकारे आहे - अहमदाबाद येथे मी एका वयस्क पटेल दुकानदाराला भेटलो. पटेल युवकांवर गोळीबार करणाऱ्या राज्य सरकारबद्दल त्याच्या मनात राग होता. ''याचा अर्थ तुम्ही काँग्रेसला आणि हार्दिकला मत देणार का?'' त्याने उत्तर दिले, ''आम्ही हार्दिकला पसंत करतो, परंतु आम्ही मनाने हिंदुत्ववादी आहोत.'' हाच प्रश्न एका शेतकऱ्याला मी खेडयात विचारला. तो म्हणाला, ''हिंदुत्वाने पोट भरत नाही.'' एकाच राज्यात मतदारांच्या विचारात असा दोन टोकाचा फरक दिसला.

ग़ुजरातच्या जनतेने भाजपाला सत्ता दिली आणि त्याचबरोबर एक इशारादेखील दिला आहे. इशारा असा आहे की, 'हिंदुत्व भावनिकदृष्टया आम्हाला भावते, आम्ही हिंदुत्वाच्या भावनेने मतदान करू; परंतु ते गृहीत धरू नका, कारण हिंदुत्वाने पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी रोजगार लागतो, शेतमालाला भाव लागतो, चांगली नोकरी मिळण्यासाठी शिक्षण लागते, तंत्रज्ञान युगाच्या शर्यतीत सर्वांच्या बरोबरीने राहण्यासाठी तशा प्रकारचे शिक्षण लागते. हे सर्व देण्याच्या बाबतीत भाजपाने भरपूर काम करायला पाहिजे. ते करण्यासाठी आम्ही एक संधी देत आहोत.' ग़ुजरातच्या जनतेचा हा संदेश आहे.

रोजगार, शेतकरी आणि शेतीचे प्रश्न, शिक्षण आणि शिक्षणाचे प्रश्न हे हिंदुत्वाप्रमाणे अखिल भारतीय विषय आहेत. ग़ुजरातच्या निवडणुकीने दोन गोष्टी सांगतिल्या - भावनिकदृष्टया हिंदुत्व हवेच, परंतु केवळ हिंदुत्वाने पोट भरत नाही. हिंदुत्वाबरोबर विकास असलाच पाहिजे. म्हणजे रोजगार, शेतमालाला भाव, उत्तम शिक्षण आणि युवकांसाठी स्वतःचे जीवन विकसित करण्याच्या अनंत संधी द्यायला पाहिजेत. हिंदुत्व सोडून चालणार नाही आणि विकासाकडे दुर्लक्ष करून भागणार नाही. भाजपाला विजयी करणारी ही दोन चाके आहेत.

गुजरातच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 49.1% मते मिळाली. 2014च्या निवडणुकीत हे प्रमाण 60%चे होते. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ होऊन ती 41% झाली आहे. मतांची टक्केवारी जास्त असूनही भारतीय जनता पार्टीला शंभरीदेखील गाठता आली नाही. आपल्या विरोधात मतांचे धु्रवीकरण होऊ नये म्हणून भाजपाने भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न गुजरातमध्ये शिवसेनेने केला. त्यांचे नाकही गेले आणि अबू्रदेखील गेली आणि अब्रू जाऊनदेखील आम्ही कसे अब्रूदार आहोत यावर भाष्य सुरू आहे. गुजरातमध्ये आपचा पार सुपडा साफ झाला, हे लोकशाहीच्या दृष्टीने चांगले झाले. आप हा अराजकवादी पक्ष आहे. गुजरातच्या जनतेने त्याला कोपऱ्यात बसण्याइतकीदेखील जागा दिली नाही. मायावतीच्या बसपाचीदेखील तीच स्थिती आहे.

जिग्ेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर हे दोघेही निवडून आले आहेत. त्यांचा विजय जातवादी राजकारणाचा विजय आहे. जातवादी राजकारण समाजाची विभागणी आणि आपापसात कलह निर्माण करणारी असते. म्हणून त्यांचा विजय हा काळजीचा विषय ठरतो. जातवाद न जागविता, जातींचे आधार न घेता हे दोन युवा नेते निवडून आले असते, तर त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करायला काही हरकत नव्हती.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकात पटेल समाजाने कसे मतदान केले, दलितांनी कसे केले, अन्य मागासवर्गीयांनी कसे केले, याची आकडेवारी हळूहळू पुढे येत चाललेली आहे. परंतु मुसलमानांनी कसे मतदान केले, याबद्दल कुणीही काहीही बोलत अथवा लिहीत नाही. ज्या मतदारसंघात 55% मुसलमान आहेत, त्या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून आलेला आहे. यामुळेच कदाचित तथाकथित पुरोगाम्यांची बोबडी वळली असेल आणि लेखणी मोडलेली असेल. गुजरात निवडणुकीने 'मुस्लीम व्होट बँक पॉलिटिक्स'ला कबरस्तानात नेऊन गाडले, हे मात्र खरे आणि आता मुसलमान मतदारदेखील इतर मतदारांप्रमाणे विचार करून काम करणाऱ्या राजकीय उमेदवाराची निवड करू लागलेला आहे. हाच कल सर्व देशभर राहील. 'सबका साथ, सबका विकास' ही घोषणा अशा प्रकारे व्यवहारात येत चालली आहे.

निवडणूक प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी पटेल, दलित आणि अन्य मागासवर्गीय अशी जातीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांना तीन युवा नेते मिळाले, परंतु गुजरातचे मानस जातवादाच्या वर उठून हिंदुत्ववादी झालेले आहे, हे राहुल गांधींच्या लक्षात आले नाही. निवडणूक राजकारणाचा नियम असा आहे की, एखादी जात अथवा एखादा धर्मगट संघटित होऊन आक्रमक होतो, तेव्हा समाजातील अन्य गट त्याच्या विरोधात आपोआप उभे राहतात, त्यांच्या मनात भय निर्माण होते. याला 'उलटे धु्रवीकरण' असे म्हणतात. गुजरातमध्ये हे घडले.

राहुल गांधींची आणि काँग्रेसची पुढची व्यूहरचना काय असेल? राहुल गांधी आणि त्यांचे सल्लागार एक प्रयत्न जीव तोडून करतील, तो प्रयत्न आहे - नरेंद्र मोदी यांची विजयी वीराची प्रतिमा भंग करण्याचा. गुजरातमध्ये त्यांनी तसा प्रयत्न केला. ते जर सत्तेवर आले असते तर यशस्वी झाले असे म्हणता आले असते. परंतु ते सत्तेवर आलेले नाहीत, तरीही गुजरातमध्ये आम्हीच जिंकलो असा डांगोरा ते जगभर पिटत बसले आहेत. माध्यमांतील त्यांचे आश्रित हीच गोष्ट वारंवार सांगत राहणार आहेत. आर्थिक कारणांमुळे जो असंतोष जनतेत आहे, त्याला जातीय रंग देऊन, जातीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न वेगवेगळया राज्यांत केले जातील. मुस्लीम मतपेटीचा विषय गुजरातमध्ये संपलेला असला, तरी देशात तो संपला आहे असे म्हणता येणार नाही, तोही जागा करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतील. राहुल गांधींच्या मवाळ हिंदुत्वाची तुलना मोदींच्या हिंदुत्वाशी करता येणार नाही. फ्रन्काइस गोटिए हे जन्माने फ्रेंच असलेले लेखक आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगवर 20 डिसेंबरला एक लेख टाकलेला आहे. त्याचा शेवट करताना ते म्हणतात, '2004 साली वाजपेयी आणि त्यांना चुकीचा सल्ला देणारे सुधींद्र कुलकर्णी यांनी जी चूक केली, ती 2019साली केली जाता कामा नये. 2019च्या निवडणुका जिंकण्यासाठी मोदींना संघटित हिंदू मतांची आवश्यकता आहे. आर्थिक सुधारणा, आर्थिक प्रगती, प्रामाणिकपणे केले जाणारे अफाट कष्ट, जीडीपीमध्ये वाढ, विदेशनीतीतील उत्तरोत्तर वाढत जाणारे यश, पाकिस्तानला धडा देण्याची शक्ती आणि तशा कारवाया, या सगळया गोष्टी जरी असल्या तरी हिंदू मनाच्या भाव-भावनांना साद दिल्याशिवाय लोक मतदान करणार नाहीत. शंभर कोटी हिंदू हा जगातील सगळयात शहाणा आणि सहिष्णू समुदाय आहे.'

9869206101

vivekedit@gmail.com