गुजरातचा इशारा

विवेक मराठी    23-Dec-2017
Total Views |

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात आणि हिमाचल या दोन्ही विधानसभांच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या. गुजरातमध्ये भाजपापुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान होते, तर हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पराभूत करून सरकार काबीज करण्याचे. हिमाचल प्रदेशमध्ये आपले सरकार टिकविता येणे अवघड आहे याची काँग्रेसला जाणीव असल्याने तेथील सत्ता टिकविण्याचा फारसा प्रयत्न काँग्रेसने केला नाही. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली सर्व शक्ती गुजरातवर केंद्रित केली. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले. 2019च्या निवडणुकीत भाजपा विरुध्द काँग्रेस अशी जी संभाव्य लढाई होणार आहे, त्याची झलक या निवडणुकीत दिसेल या दृष्टीने सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष या निवडणुकीवर केंद्रित झाले होते.

गेली 22 वर्षे गुजरातवर भाजपाचे राज्य आहे. विश्व हिंदू परिषद, भारतीय किसान संघ यांचाही या राज्यावर प्रभाव होता. त्यामुळे जवळजवळ एक पिढी ही हिंदुत्वाच्या वातावरणात आणि राजकीय प्रभावाखाली वावरलेली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह हे दोघेही गुजरातचेच आहेत. 2002पासून झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढविण्याचा आणि जिंकण्याचा अनुभव त्यांच्यामागे आहे. गुजरातमध्ये प्रांतिक पातळीवर प्रभाव टाकेल असे काँग्रेसपाशी नेतृत्व नाही. शंकरसिंह वाघेला यांना गुजरातच्या नेतृत्वाचा अनुभव होता, पण तेही या निवडणुकीपूर्वी काँग्रेसबाहेर पडले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष गुजरातच्या निवडणुका सहज जिंकेल असे प्रारंभिक चित्र तयार झाले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपाला विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली आणि अमित शाह यांना आपल्या संघटनकौशल्याचे आणि मोदींना आपल्या व्यक्तिगत नेतृत्वाचे सामर्थ्य पणाला लावावे लागले.

कोणताही पक्ष दीर्घकाळ सत्तेवर राहिला, तर वेगवेगळया समाजगटांत असमाधानाची भावना तयार होते. गुजरातमध्ये ज्या वेळी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली, त्या वेळी शहरी भागात व्यापार व उद्योग जगतात नोटाबंदी आणि जीएसटी याबद्दलचा असंतोष, 'पाटीदार' समाजात आरक्षणासाठी झालेले आंदोलन, त्याचबरोबर ओबीसी आणि दलित समाजांतून उभे राहिलेले नवे तरुण नेतृत्व, शेतीमालाला योग्य दर न मिळाल्यामुळे असंतुष्ट बनलेला शेतकरी वर्ग या साऱ्यांचा असंतोष प्रकट होत गेला, तसा राहुल गांधींना समाजाच्या वेगवेगळया भागांत वेगवेगळया वर्गांतून प्रतिसाद मिळू लागला. यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस यांचा आत्मविश्वास वाढला. गुजरातमध्ये काँग्रेसने आजवर ज्या निवडणुका लढल्या, त्या हिंदुत्ववाद विरुध्द सेक्युलॅरिझम या मुद्दयांवर. परंतु या मुद्दयांवर निवडणुका लढवून जिंकणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे, याची काँग्रेसला खात्री झाल्याने आपण हिंदुत्वाच्या विरोधात नाही, हे सिध्द करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. त्यासाठी राहुल गांधींनी एकामागोमाग एक मंदिरांना भेटी दिल्या आणि त्याची पुरेशी प्रसिध्दी केली. श्रीरामजन्मभूमी चळवळीनंतर भारतीय राजकारणात जो बदल झाला आहे, त्याचेच ते निदर्शक होते. त्यामुळे या वेळी गुजरातमधील निवडणूक ही हिंदुत्ववाद विरुध्द सेक्युलॅरिझम या मुद्दयावर झालीच नाही. नोटबंदी, जीएसटी, आरक्षण, दलित आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याभोवती ती फिरत राहिली.

नोटबंदीबाबत प्रसारमाध्यमांतून झालेला प्रचार आणि सर्वसामान्य लोकांवर झालेला परिणाम यांच्यामध्ये दोन धु्रवांचे अंतर आहे. नोटबंदीचा परिणाम थोडयाफार फरकाने सर्वांनाच भोगावा लागला असला, तरी काळा पैसा कमी करण्याच्या दृष्टीने ते उचललेले पाऊल आहे, या मोदींच्या मनात असलेल्या प्रामाणिक इच्छेविषयी सर्वसामान्य माणसांच्या मनात कधीच शंका नव्हती. जीएसटीच्या बाबतीतही अडचणी लक्षात आल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्याची संवेदनशीलता केंद्र सरकारने दाखविली आणि भविष्यकाळात आणखी आवश्यक ते बदल करण्याची तयारी दाखविली. त्यामुळे जीएसटीविरुध्द असलेला असंतोषही मोठया प्रमाणात कमी झाला. हार्दिक पटेल यांच्या पाटीदार समाजाच्या मोठमोठया सभा झाल्या, तरी त्याचा त्या प्रमाणात परिणाम मतदानात दिसला नाही. तसा तो दिसला असता, तर शहरी भागात भाजपाला जे घवघवीत यश मिळाले, तसे मिळाले नसते.

ग्रामीण भागात मात्र काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांत गुजरातेत जे नवीन तरुण नेतृत्व निर्माण झाले, त्यांच्या प्रभावाने भर टाकली आणि ग्रामीण गुजरातने काँग्रेसला साथ दिली. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत राहुल गांधींचा बालिशपणा दिसला होता आणि त्यांना दारुण अपयश आले होते. या निवडणुकीत मात्र त्यांचे वर्तन अधिक जबाबदारीचे झाले आणि गुजरातमध्ये पारंपरिक काँग्रेस नेतृत्वाला बाजूला ठेवून तेथील काँग्रेसबाहेरील नव्या तरुण नेतृत्वाशी जुळवून घेतले. भविष्यकाळात तीच त्यांची योजना असेल. एकेकाळी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत. आज काँग्रेसचे स्थान भाजपाने घेतले आहे. त्यामुळे सर्व भाजपाविरोधी शक्तींना एकत्र आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करतील आणि ते प्रयत्न पुढील काळात अधिक गांभीर्याने घेतले जातील. यातून निर्माण होणारा पर्याय हा अराजक निर्माण करणारा असेल, याचे कारण भाजपाविरोध हा समान धागा सोडला, तर त्या सर्वांच्या विरोधात कोणतीही सुसंगती नाही. परंतु ही संभाव्य स्थिती लक्षात घेऊनच भाजपाला भविष्यात प्रयत्न करावे लागतील. ती लढाई सोपी असणार नाही, असा इशारा गुजरात निवडणुकांनी दिला आहे.