तिचं  'राष्ट्रीय स्वयंवर'

विवेक मराठी    27-Dec-2017
Total Views |


 

तिचं नाव असतं सत्ता. तिच्या मायबापाला आम्ही जनता म्हणतो आणि स्वयंवराच्या या सोहळयाला निवडणूक. राजेशाहीने घालून दिलेली स्वयंवराची ही पध्दत आम्ही गेली 65 वर्षं पाळतोय, कारण त्यामुळेच आमची लोकशाही जिवंत आहे...

तर मंडळी, मुळात या देशात लग्न या गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे. त्यामागे धार्मिक, सामाजिक परंपरा आहेत, तशीच प्रचंड मोठी आर्थिक उलाढालसुध्दा आहे. पुरातन काळापासून - अगदी राम-सीतेच्या विवाहापासून ते कालपरवाच्या विराट-अनुष्का विवाहापर्यंत आपण सगळेच विवाहाच्या बाबतीत किती उत्साही असतो ते दिसतं.

तर अगदी तसंच, आज तिच्या लग्नाचा दिवस. गेले पंधरा दिवस तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. धावपळ, गडबड, गोंधळ आणि कार्य तडीस नेण्याची इच्छा. हे सगळं करायचं तिच्यावरच्या प्रेमापोटी. खरं तर तिचं रंगरूप इतकं खास नाही. पण एकदा का हिचं लग्न झालं की आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीचं रंगरूप आणि बरंच काही ही बदलवून टाकते. त्यामुळे हिच्याशी लग्न करायला उत्सुक असणाऱ्यांची संख्या बरीच. या ना त्या मार्गाने तिला 'हासिल'करायचं, इतकंच प्रत्येकाच्या डोक्यात असतं. 'एक अनार और सौ बीमार' असं म्हणा हवं तर. अशा परिस्थितीत काय करायचं हे आमच्या पुराणांमध्ये सांगून ठेवलंय. अशा वेळी एकच उपाय आणि तो म्हणजे 'स्वयंवर'.

सीतेचं स्वयंवर झालं, द्रौपदीला स्वयंवरातून जावं लागलं, मग हिला का नाही?

अर्थात, स्वयंवर म्हणजे काही येरागबाळयाचं काम नाही.

स्वयंवर म्हटलं की एकमेकांना शह-काटशह देणारे धुरंधर आले. नवनव्या युक्त्या-प्रयुक्त्यांनी तिच्यावर आणि तिच्या मायबापांवर मोहिनी घालणारे जादूगार आले. या देशात मुलीचा होकार मिळवायचा असेल तर आधी तिच्या मायबापांनी तुमचा स्वीकार करणे गरजेचं असतं. त्यामुळे स्वयंवर तिचं असलं, तरी तिच्या मायबापांना खूश करण्यावर प्रत्येकाचा भर. गेले पंधरा दिवस फक्त तिचा विचार करणाऱ्या साऱ्याच धुरंधर वीरांसाठी आजचा स्वयंवराचा दिवस म्हणजे फारच महत्त्वाचा.

एका भव्य मंडपात हे सगळे धुरंधर जमलेले. काही जण गुडघ्याला बाशिंग बांधूनच आलेले. काही फारच 'confident'. त्यांना म्हणे घराण्यातूनच परंपरेने स्वयंवर जिंकण्याचं ट्रेनिंग मिळालेलं असतं. काही जण नुसते हौशे 'लग्न पाहावं करून' म्हणून आलेले. काही सच्चे प्रियकर. ह्यांच्याकडे तिच्या मायबापांना देण्यासाठी काही नसतं, पण तत्त्वांची आणि प्रेमाची ताकद असते. काही उपेक्षित, पण मग त्यांना फार काळ थांबवत नाहीत. त्यांचे मंडप राखीव आणि वेगळे असतात म्हणे.

गेले पंधरा दिवस त्यातल्या प्रत्येकाने दौलतजादा केलेली असते. काहींनी तिच्या मायबापांना पैसे, साडी-चोळी, खण-नारळ दिलेला असतो. काहींनी मोबाइल फोन, टी.व्ही. ते अगदी केबल कनेक्शन घेऊन दिलेलं असतं. काहींनी तिच्या मायबापांनाच नव्हे, तर आख्ख्या भावकीत जेवणावळी आणि दारू पाटर्या दिलेल्या असतात. काहींनी भविष्याची सुंदर चित्रं रंगवलेली असतात. काहींनी नुसतेच शब्दाचे खेळ खेळलेले असतात, तर काहींनी स्वयंवराच्या धामधुमीत आपली स्वतःची धन करून घेतलेली असते. प्रथेप्रमाणे सगळं घडतं. फटाक्यांच्या लडी फुटतात, दारूच्या नद्या वाहतात, गुलालाच्या रंगात आसमंत न्हाऊन निघतो. प्रतिसर््पध्यावर मात करत तिला घरी घेऊन जाणारा एकच असतो. तिला जिंकल्याच्या उन्मादात आता तिचं कन्यादान करणाऱ्या तिच्या मायबापांचा सोयीस्कर विसर पडणार असतो.

तिचं नाव असतं सत्ता. तिच्या मायबापांना आम्ही जनता म्हणतो आणि स्वयंवराच्या या सोहळयाला निवडणूक. राजेशाहीने घालून दिलेली स्वयंवराची ही पध्दत आम्ही गेली 65 वर्षं पाळतोय, कारण त्यामुळेच आमची लोकशाही जिवंत आहे... सुदृढ आणि ठणठणीत नसली, तरी. 

9773249697