आक्रमणापेक्षा प्रथम संरक्षण महत्त्वाचे

विवेक मराठी    27-Dec-2017
Total Views |

'अटॅक इज द बेस्ट डिफेन्स' (आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव) अशी एक म्हण असली, तरी ती बहुधा सगळे मार्ग खुंटल्यावर निर्वाणीचा पर्याय सुचवणारी असावी असे वाटते, कारण प्रत्येकवेळी आक्र मण करणे फायदेशीर ठरत नाही. आधी स्वत:च्या राज्याच्या सरहद्दींचा कडेकोट बंदोबस्त करावा लागतो. शिवाजी महाराजांना कुणी मुत्सद्दयाने नव्हे, तर एका गरीब शेतकरी गृहिणीने हाच मोलाचा धडा शिकवला होता. मीसुध्दा धंद्यात हे तत्त्व सुरुवातीलाच शिकलो.

लहानपणापासून मला शालेय अभ्यासाची तितकीशी आवड नव्हती. त्यापेक्षा मला खेळणे खूप आवडायचे. शिरखेडला ही हौस मनमुराद पुरी झाली. तेथे मी झाडावर चढणे, सूर-पारंब्या, कबड्डी, लपंडाव, पकडापकडी असे खेळ खेळलो. पुढे मुंबईत आल्यावर मला क्रि केटची गोडी लागली. मोकळया हवेत भरपूर खेळण्याचा फायदा असा झाला की माझे शरीर हाडापेराने मजबूत होते. लहानपणी दीर्घ आजारांचा मला क्वचितच त्रास झाला. मी जसा महाविद्यालयात गेलो, तसे हे माझे खेळणे बंद पडले. सकाळी कॉलेज आटोपले की उरलेल्या वेळात मी ठाण्यापर्यंत विविध उपनगरांत जाऊन फिनेल, इन्स्टंट मिक्सेस अशी उत्पादने विकत होतो. दारोदारी विक्र ी करून जी पायपीट होई, तोच व्यायाम इतका जास्त असायचा की सायंकाळी घरी परतताच जेवण करून गाढ झोपी जात असे.

दुबईला गेल्यावरही मला सुरुवातीची काही वर्षे दुकानात दिवसाचे सोळा तास कष्ट करावे लागले. पण जेव्हा दुकान नफ्यात आले आणि त्याची एक शिस्तशीर घडी बसली, तेव्हा मी स्वत:बद्दल विचार करायला मोकळा झालो. शिक्षण, शरीरसंवर्धन अशा मागे पडलेल्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा मी निश्चय केला. माझे शरीर पीळदार होतेच, पण त्याला एखाद्या शरीर संरक्षण विद्येची जोड द्यावी, या विचाराने माझ्या मनात ठाण मांडले. त्या काळात कराटेची क्रेझ होती, शिवाय मार्शल आर्ट्स इंग्लिश चित्रपटांचाही प्रेक्षकांवर प्रभाव होता. त्यामुळे मीसुध्दा कराटे शिकायचे ठरवले. नियमित व्यायामासाठी मी एक जिम जॉईन केली. तेथेच ज्युदो, कराटे अशा शरीर संरक्षण कला शिकवण्याचीही सोय होती. मी त्या विभागाच्या प्रमुखाकडे गेलो आणि कराटे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्या प्रशिक्षकाने माझी चौकशी केली आणि सहज विचारले, ''तुम्ही काय करता?'' मी म्हणालो, ''माझा व्यवसाय आहे.'' त्यावर तो थोडा विचारात पडला आणि मला म्हणाला, ''तुम्हाला एक सुचवले तर कृपया राग मानू नका. तुम्ही कराटेपेक्षा ज्युदो शिकावे असे मला वाटते. कराटे या प्रकारात आक्र मणाला महत्त्व आहे, पण ज्युदोमध्ये प्रतिसर््पध्यावर आक्र मण न करता आपला बचाव उत्तम करायचा असतो आणि ताकदीचा जास्त वापर करण्यापेक्षा समोरच्याचा डाव त्याच्यावर उलटवून नामोहरम करण्याचे डावपेच शिकवले जातात. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची व्यूहरचना करतानाही या तंत्राचा फायदा होईल. लक्षात ठेवा, आक्रमणापेक्षा आधी स्वसंरक्षण महत्त्वाचे असते.'' त्याच्या सूचनेमुळे मी थोडा आश्चर्यचकित झालो, कारण या माणसाला व्यवसायाचा अनुभव नव्हता, तरीही त्याचा आडाखा अचूक होता.

 जरा पाठीमागेही लक्ष द्या...

मी एक गोष्ट वाचली होती. ग्रीसचा सम्राट अलेक्झांडर याने भारतावर आक्रमण केले, त्यादरम्यान एका साधूशी त्याची गाठ पडली. अलेक्झांडरने आपल्या विजयासाठी आणि जगज्जेता होण्यासाठी त्या साधूकडे आशीर्वाद मागितला. त्यावर त्या साधूने जवळची चामडयाची एक गुंडाळी बाहेर काढली आणि ती सरळ करून त्यावर पाय ठेवून सम्राटाला उभे राहण्यास सांगितले. अलेक्झांडरने प्रयत्नपूर्वक ती गुंडाळी उलगडली व त्यावर पाय ठेवून उभा राहिला, पण पुढे त्याची पंचाईत व्हायला लागली, कारण पाय उचलून पुढे टाकला की चामडयाच्या दुसऱ्या बाजूची पूर्वासारखी गुंडाळी होऊ  लागली. कितीही केले तरी ते चामडे सरळ पसरलेले राहीना. हे दाखवून तो साधू अलेक्झांडरला म्हणाला, ''तुझी अवस्था अशी होईल. तू आक्र मण करत पुढे जात राहशील आणि पाय पुढे पडताच मागे जिंकलेला प्रदेश शत्रू परत जिंकून घेईल. तुझे राज्य स्थिर राहणे कठीण आहे.'' या गोष्टीचे तात्पर्य काय? तर पुढे जाण्याच्या नादात आपण पाठीमागे लक्ष ठेवायचे विसरतो.

 

 त्या प्रशिक्षकाच्या सल्ल्याचा मनाशी विचार करताना मला शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका प्रसंगाची आठवण झाली. औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटका करून घेत बैराग्याच्या वेषात ते आग््रयावरून आपल्या राज्यात वेगाने परत येत होते. वाटेत सीमेवरील एका खेडयात एका गरीब शेतकऱ्याच्या घरी त्यांना रात्रीचा मुक्काम करावा लागला. शेतकऱ्याच्या पत्नीने स्वयंपाक रांधून पाहुण्यांना पानात आमटी-भात वाढला. राजांनी भाताच्या ढिगावर आमटी ओतून घेतली, तर ती पानभर पसरली. ते बघून ती गृहिणी म्हणाली, ''अरे बाबा! तू अगदी शिवाजीराजासारखाच चूक करतोयस. त्याने राज्याला कुंपण केले नाही, म्हणून शत्रूला आक्र मण करायला मोकळे रान मिळतंय. तूसुध्दा भाताला आळं कर बाबा, नाहीतर कालवण असंच पानभर पसरेल.'' शिवाजीराजांनी त्या माउलीच्या उपदेशातील तथ्यांश जाणला आणि घरी परतल्यावर नंतरची तीन वर्षे मुघलांशी लढाया करण्यापेक्षा स्वत:च्या राज्याचा बंदोबस्त करण्याकडे काटेकोर लक्ष पुरवले. त्याचा फायदा त्यांना झाला. पुढची सगळी वर्षे - म्हणजे राजे हयात असेपर्यंत औरंगजेबाला स्वराज्यात पाय ठेवता आला नाही. आक्र मण करणाऱ्या मुघल सैन्याला प्रत्येक लढाईत पराभूत व्हावे लागले. आक्रमणापेक्षा आधी संरक्षण किती महत्त्वाचे असते, हेच त्यातून सिध्द झाले.

मी याच विचाराने पुढची काही वर्षे प्रयत्नपूर्वक ज्युदोचे डावपेच शिकलो आणि माझ्या व्यवसायातही त्याचा उपयोग करून घेतला. मी माझ्या कर्मचाऱ्यांना नेहमी सांगायचो, ''आपल्याला विस्तार करताना प्रतिसर््पध्यांवर आक्र मण करायची गरज नाही. त्यापेक्षा आपण आपल्या राज्याचा बंदोबस्त करू या. म्हणजेच दुसऱ्याच्या उत्पादनांशी स्पर्धा करण्यापेक्षा, आक्रमक विस्ताराची विपणन योजना बनवण्यापेक्षा स्वत:ची आणि आपल्या ब्रँडची गुणवत्ता वाढवू या.'' खरोखरच आम्ही ही योजना अंमलात आणली. सर्व कायदेशीर तरतुदींचे कडक पालन करणे, त्याची कागदपत्रे अचूक ठेवणे, उत्पादनांच्या अस्सलतेवर, गुणवत्तेवर व सुरक्षेवर भर देणे या प्रकारांमुळे आमचा 'पिकॉक' ब्रँड आखाती देशांतील घराघरात पोहोचून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरला.


मला या संरक्षण व्यूहरचनेचा फायदा कसा झाला हेही सांगतो. एकदा माझ्या विपणन संघाने माझ्याकडे तक्रार केली की आमच्या वेष्टनांची हुबेहूब कॉपी करून कुणीतरी बनावट उत्पादने बाजारात आणतेय. मी ती उत्पादने मागवून घेतली. बघतो तो नेहमीचाच भुरटया चोरीचा प्रकार. प्रसिध्द ब्रँडच्या नावाच्या अक्षरात पटकन लक्षात येणार नाही असा फेरफार करायचा, बाकी डिझाइन तसेच ठेवायचे आणि त्या पाकिटात दुय्यम दर्जाचा माल भरून कमी किमतीत विकायचा. खाद्य उत्पादनांच्या बाबतीत असा प्रकार मुळीच खपवून घेता येत नाही, कारण आमच्या ब्रँडच्या प्रतिष्ठेबरोबरच ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न होता. त्यामुळे मी त्या प्रकरणाच्या मुळाशी गेलो. जो माणूस हे उपद्वयाप करत होता त्याला इशारा दिला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. धंद्याच्या स्पर्धेत सारे काही क्षम्य असते, अशा बेफिकिरीने त्याने आपली बनावट उत्पादने बाजारात आणणे सुरूच ठेवले.

मी त्याच्यावर आक्र मकपणे चाल करून गेलो नाही. आधी माझ्या ब्रँडच्या सुरक्षिततेचा बंदोबस्त केला. कायदेशीर सल्ला घेतला, कागदपत्रे व्यवस्थित जमा केली आणि त्या माणसाचे कच्चे दुवे हेरून त्याला कोंडीत पकडले आणि मग कोर्टात खेचले. परदेशांमध्ये कायद्याची अंमलबजावणी कडक होते. ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने कोर्टानेही त्याचा लबाडपणा खपवून घेतला नाही. अखेर तो माझ्याकडे गयावया करू लागला, पण आता प्रकरण कोर्टापुढे गेल्याने माझाही नाइलाज झाला. त्या माणसाला प्रचंड दंड भरावा लागलाच, तसेच व्यापारी वर्तुळातही त्याने आपले नाव खराब करून घेतले.

मित्रांनो! मी कधीही इतर ब्रँडशी स्पर्धा करायला जात नाही, याचे कारण हेच आहे. आक्रमणाच्या जोशात माणूस बेफिकीर बनतो आणि त्याच्या हातून चुका होत जातात. दुसऱ्यावर कुरघोडी करायला जाण्यापेक्षा आपल्या व्यवसायात सजग राहावे आणि धोकादायक ठरू शकतील अशा पोकळया बुजवण्याला प्राधान्य द्यावे. समर्थ रामदासांनी व्यावसायिकांना खूप छान उपदेश केला आहे. ते म्हणतात -

जो जो ज्याचा व्यापार। तेथे असावे खबरदार।

दुश्चितपणे तरी पोर। वेढा लावी॥

(आपापल्या व्यवसायात प्रत्येकाने खबरदारी घेतली नाही, तर वेळप्रसंगी लहान मूलही नुकसान घडवू शकते.)

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा anand227111@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकतात.)