नको रे मना क्रोध हा खेदकारी...

विवेक मराठी    06-Dec-2017
Total Views |

क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. कर्तबगार माणसाला राग शोभून दिसतो असे आपल्याकडे म्हटले जाते, पण माझे मत याविरुध्द आहे. संताप आपल्या सदसद्विवेकबुध्दीला झाकोळतो. संतापाच्या भरात उतावीळपणे निर्णय घेतले जातात किंवा हातून चुकीची कृती घडते. रागीट माणसाला त्याच्या घरातले लोक घाबरतातच, तसेच आसपासचे लोकही चार हात अंतरावर राहतात. त्यामुळे मित्रपरिवार कमी असतो. व्यावसायिकाने तर चुकूनही संतापू नये. दुकानात भांडण म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे असते. म्हणून धंदा करणाऱ्याने 'अति राग, अन् भीक माग' ही म्हण कायम लक्षात ठेवावी.

 मी एकदा एका मित्राच्या दुकानात त्याला भेटायला गेलो होतो. नेमके त्याच वेळी माझा मित्र दुकानातील कामगारांची खरडपट्टी काढत होता. त्याचा चढलेला आवाज आणि आविर्भाव बघून ते कामगार तर चिडीचूप झाले होतेच, तसेच दुकानात आलेल्या तुरळक ग्राहकांनीही खरेदी घाईघाईने आटोपली. मला बघताच माझ्या मित्राचा रागाचा पारा खाली आला. कामात पुन्हा हयगय खपवून घेणार नाही, असा इशारा त्या कर्मचाऱ्यांना देऊन तो माझ्याकडे वळला. आम्ही त्याच्या केबिनमध्ये गप्पा मारत असताना मी कुतूहलाने विचारले, ''अरे, तुला इतके चिडायला काय झाले?'' त्यावर तो म्हणाला, ''अरे! हे नाटक मला अधूनमधून करावे लागते. मऊ  लागले की लोक कोपराने खणतात. हे लोक कामचुकार आहेत. पगार वेळच्या वेळी घेतात, तर कामेही वेळच्या वेळी करायला काय होतंय त्यांना? मी संतापलो की मग मात्र धावपळ करायला लागतात. जाऊ  दे, नेहमीचेच आहे ते.''

मी मित्राला समजावले, ''हे बघ. ही गोष्ट सवयीची होऊ  देऊ नकोस. तुझा संताप सध्या लुटुपुटूचा असला, तरी तो कधी मनात कायमस्वरूपी ठाण मांडेल हे सांगता येणार नाही. तू हाताखालच्या लोकांवर ओरडत असताना दुकानात आलेले ग्राहक घाईगडबडीने निघून गेले, हे तुझ्या लक्षात आले का? ग्राहक बिचकून किंवा नाराज होऊन निघून जाणे ही गोष्ट धंद्यासाठी वाईट असते. एकवेळ कामगार दुसरे मिळू शकतात, पण गिऱ्हाईक तुटले तर पुन्हा मिळवणे तितकेसे सोपे नसते. गुडविल तयार करायलाच आपल्याला वर्षानुवर्षे लागतात. तुला कामचुकारपणाबद्दल कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढायची असेल, तर त्यांना केबिनमध्ये बोलवून समज दे. लोकांपुढे त्यांचा अपमान करू नकोस, तुझी प्रतिमा खराब करू नकोस आणि दुकानातील वातावरणही बिघडवू नकोस. सगळयात महत्त्वाचे म्हणजे संतापामुळे तुझ्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. एकतर आपल्याला मालक म्हणून रोज तणावाला सामोरे जावे लागते. त्यात रागीटपणाची भर पडली, तर उच्च रक्तदाबाचा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या मधुमेह, हृदयरोग अशा रोगांचा धोका निर्माण होतो. वेळीच सावध हो.'' माझ्या मित्राला माझे म्हणणे पटले.

व्यवसायात यशस्वी व्हायचे, तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावी लागते - म्हणजेच मनावर संयम आणि तोंडावर ताबा, हा मोलाचा धडा मला माझ्या बाबांनी शिकवला. गंमतीची गोष्ट म्हणजे हा कानमंत्र देणारे माझे बाबा स्वत:च तापट स्वभावाचे होते. अंगात मुरलेल्या लष्करी शिस्तीमुळे त्यांना कामे नीटनेटकी आणि वेळेवर करायची सवय होती. ते इतरांकडून तीच अपेक्षा करायचे. मी बेशिस्तीमुळे लहानपणी त्यांच्या हातचे फटके अनेकदा खाल्ले आणि मोठेपणीही कायम त्यांना घाबरून राहिलो. पण बाबांचा स्वभाव शीघ्रकोपी असला, तरी तो कुठे गुंडाळून ठेवायचा याची त्यांना उत्तम जाण होती. घरी ते कडक पालक होते, पण दुकानात मात्र ते व्यवहारी आणि शांत असत. दुबईतील आमच्या दुकानात विविध प्रांतांतील भारतीय येत. बाबा त्यांच्याशी सौजन्याने बोलत आणि गप्पांच्या ओघात त्यांची आवड, कुठल्या गावात काय चांगले मिळते? दर्जेदार उत्पादक कोण? अशी उपयुक्त माहिती मिळवत. कुणी भारतात जात असल्यास त्याला त्याच्या गावातील प्रसिध्द उत्पादने आणायला सांगत. बाबांनी या चातुर्याने अनेक ग्राहक जोडले होते. त्याचाच फायदा मला पुढे झाला.

 

ग्राहक हा नेहमीच राजा असतो!

 
मी आमच्या कर्मचारिवर्गाला आवर्जून सांगतो की ''ग्राहक तुमच्याशी कसाही बोलला, तरी तुम्ही त्याच्याशी नम्रतेनेच बोलले पाहिजे. तो आपल्या संयमाची परीक्षा बघतोय असे समजा हवे तर.'' मी नेहमी अनुभवतो की परदेशातील मोठया स्टोअर्समध्ये उत्पादन नापसंत आहे, अशी ग्राहक तक्रार घेऊन आला तर त्या स्टोअर्समधील विक्रेते हसतमुखाने विचारतात, ''सर, तुम्हाला ही वस्तू बदलून देऊ, याच किमतीची अन्य वस्तू देऊ की तुमचे पैसे परत देऊ?'' या एकाच वाक्यात संभाव्य वादाचा निकाल लागतो. 'ग्राहक हा नेहमी राजा' हे तत्त्व मोठमोठया ब्रँडना उमगते. पण ग्राहक वस्तू परत करायला दुकानात आला, की बरेच दुकानदार 'खरेदी करताना बघून घ्यायला काय झालं होतं? एकदा नेलेली वस्तू बदलून देणार नाही' वगैरे राग आळवायला सुरुवात करतात. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे मालक संतापी असला की कर्मचाऱ्यांतही उर्मटपणा पसरायला वेळ लागत नाही, कारण ते मालकावरचा राग ग्राहकांवर काढू लागतात. त्यातून गिऱ्हाईक तुटते.

  एकदा मी बाबांबरोबर मुंबईत मस्जिद बंदर येथे मसाले खरेदीसाठी गेलो होतो. तेथून परत यायला आम्हाला उशीर झाला. भुकेची जाणीव झाल्याने आम्ही एका हॉटेलमध्ये शिरलो. भोजनाची थाळी मिळण्याची वेळ जवळपास संपत आली होती, पण आमची ऑॅर्डर घेतली गेली. आम्ही वाट बघत असताना जवळच्या टेबलवरील एका माणसाचे वेटरशी भांडण सुरू झाले. घडले होते ते असे, की त्या ग्राहकाला जेवणातील पापड आवडले होते आणि त्याने आणखी पापडांची मागणी केली, पण हॉटेलमधील पापड संपल्याचे कारण सांगून वेटरने नकार दिला. त्यातून वादाची ठिणगी पडली. ''एकवेळ जास्तीचे पैसे घ्या, पण मला पापड हवाच'' असा त्या ग्राहकाने हट्ट धरला, तर 'तुम्हाला याआधीच जास्त पापड दिले आहेत, आता जेवणाची वेळ आणि पापड संपले आहेत'' असा पवित्रा वेटरने घेतला. हॉटेलचा मालकही त्या भांडणात उतरला आणि सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद हातघाईवर येण्याची चिन्हे दिसू लागली. या सगळया गडबडीत बाबा मध्येच उठून बाहेर कधी गेले, ते मलाही कळले नाही. पाचच मिनिटांनी ते परत आले आणि त्यांनी हॉटेल मालकाला एका बाजूला घेऊन त्याच्या हातात पापडाचे एक पाकीट ठेवले आणि प्रथम ग्राहकाचे समाधान करण्यास सुचवले. पापड मिळाल्यावर त्या ग्राहकाचा राग निवळला आणि तो शांतपणे जेवू लागला.

आमचे जेवण झाल्यावर आम्ही बिल देण्यासाठी काउंटरवर गेलो, तेव्हा मालकाने बाबांचे आभार मानले. त्यावर बाबा त्याला म्हणाले, ''हे बघा मालक, मीसुध्दा तुमच्यासारखाच एक व्यावसायिक आहे. कृपा करून आजच्यासारखा प्रसंग पुन्हा कधीही घडू देऊ  नका. धंद्याच्या ठिकाणी भांडण होणे अंतिमत: मालकाला महागात पडते. तुमचा वाद तर मारामारीच्या दिशेने जात होता. बाब किरकोळ पापडाची होती. ग्राहक तुम्हाला जादा पैसे द्यायला तयार असताना तुम्ही कारण नसताना आडमुठी भूमिका का घेतलीत? पापड संपले तर शेजारच्या दुकानातून पापडाचे पाकीट मागवून घ्यायचे. जो तुम्हाला पैसे देतो, त्याच्याशी भांडून काय मिळणार? चूक तुमची आहे. जेवणाची जी वेळ बोर्डवर नमूद केली आहे, त्यादरम्यान मेनूतील एकही पदार्थ संपल्याची सबब तुम्हाला ग्राहकाला सांगता येणार नाही. पहिल्या ग्राहकाला जे वाढाल तेच शेवटच्या ग्राहकापर्यंत कायम ठेवा. एखादी गोष्ट संपत आल्याचे तुमच्या कुकच्या लक्षात आले, तर 'भोजन संपले' असा बोर्ड वेळीच लावा.''

आम्ही तेथून बाहेर पडल्यावर बाबा मला म्हणाले, ''जय! तूही लक्षात ठेव. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कुणाचाही आवाज चढणार नाही, याची नेहमी काळजी घे. काही ग्राहक कटकट करणारे असतात. त्यांच्याशी हुज्जत घालत बसू नकोस. 'दुकानात भांडण म्हणजे मालकाचे नुकसान' हे माझे वाक्य कायम लक्षात ठेव.''

क्रोधाबाबत एक छान सुभाषित लक्षात ठेवा.

क्रोधो हि शत्रु: प्रथमो नराणां देहस्थितो देहविनाशनाय।

यथा स्थितो काष्ठगतो हि वह्नि: स एव वह्नि: दहते शरीरम्॥

(अर्थ - संताप हा माणसाचा पहिला शत्रू आहे. लाकडामध्ये अग्नी सुप्तपणे असतो आणि पेट घेताच तो त्या लाकडालाच जाळून टाकतो. तसेच संताप हा आपल्यात सुप्तपणे असतो. त्याला हवा मिळताच तो भडकतो आणि शरीराचाच विनाश घडवतो.)

 vivekedit@gmail.com