मधुमेह आणि पचनसंस्थेचे प्रश्न

विवेक मराठी    07-Dec-2017
Total Views |

मधुमेह झाल्यावर अनेक जणांना आपलं पोट फुगल्यासारखं वाटतं. मधुमेह शरीरातल्या मज्जासंस्थेवर घाला घालतो. याला पचनसंस्थेशी संबंधित संदेश वाहून नेणारे मज्जातंतूदेखील अपवाद नाहीत. पोटातल्या इंद्रियांशी जोडलेली मज्जासंस्था जठराच्या आणि आतडयांच्या आकुंचन-प्रसरण प्रक्रियेला व पाचक द्रवांना नियंत्रित करत असते. याशिवाय पचनसंस्थेशी निगडित कित्येक हॉर्मोन्स एकमेकांशी आणि मेंदूतल्या काही भागांशी संपर्क करण्याचं, एकंदर पचनाच्या कामात सुसूत्रता आणण्याचं काम चोख बजावत असतात. मधुमेहात यातल्या जवळपास प्रत्येक यंत्रणेवर घाला घातला जातो.

 धुमेहाचा पचनाशी थेट संबंध आहे हे कुणीही कुणालाही सांगायला नको. परंतु मधुमेहात पचनसंस्थेचे निर्माण होणारे प्रश्न सहसा कुणाच्याही लक्षात येत नाहीत किंवा कुणी ते लक्षात घेत नाही, ही खरे तर गंमत वाटावी अशी गोष्ट आहे. कारण खाण्याचा आणि अन्नपचनाचा रक्तातल्या ग्लुकोज वाढण्याशीही थेट संबंध आहे. त्यामुळे पोटाच्या गडबडीचं आणि मधुमेहाचं नातं पटकन ध्यानात यायला काहीच हरकत नव्हती. म्हणून या गोष्टीची कमाल वाटणं साहजिक आहे. पण गंमत वाटण्याचं कारण नाही. एका अभ्यासानुसार जवळपास 75% मधुमेही पेशंटमध्ये पचनसंस्थेशी संबंधित कुठलं ना कुठलं लक्षण दिसतं. त्यात 60% लोकांना बध्दकोष्ठ, एक तृतीयांश मंडळींमध्ये मळमळ, पोटदुखी, पोटफुगी किंवा पातळ शौचास होतं.

आपण पोटाच्या वरच्या भागापासून सुरुवात करू. मधुमेह झाल्यावर अनेक जणांना आपलं पोट फुगल्यासारखं वाटतं. मधुमेह शरीरातल्या मज्जासंस्थेवर घाला घालतो. याला पचनसंस्थेशी संबंधित संदेश वाहून नेणारे मज्जातंतूदेखील अपवाद नाहीत. पोटातल्या इंद्रियांशी जोडलेली मज्जासंस्था जठराच्या आणि आतडयांच्या आकुंचन-प्रसरण प्रक्रियेला व पाचक द्रवांना नियंत्रित करत असते. याशिवाय पचनसंस्थेशी निगडित कित्येक हॉर्मोन्स एकमेकांशी आणि मेंदूतल्या काही भागांशी संपर्क साधण्याचं, एकंदर पचनाच्या कामात सुसूत्रता आणण्याचं काम चोख बजावत असतात. म्हणजे आतडयांचे मज्जातंतू, पाचक रस, आकुंचन-प्रसरण क्रिया, हॉर्मोन्स, आतडयांचा रक्तपुरवठा अशा अनेक गोष्टींचं कडबोळं नीट जमवूनच आपली पचनसंस्था रोजचा व्यवहार करत असते. त्यातली कुठलीही यंत्रणा बिघडली तरी पचन नीट होणार नाही, हे सत्य असतं. मधुमेहात यातल्या जवळपास प्रत्येक यंत्रणेवर घाला घातला जातो.

तोंडातून आलेलं अन्न अल्प काळासाठी साठवायचं, त्यात द्रव ओतायचा, सगळं अन्न व्यवस्थित घुसळून त्याचा द्रवरूप लगदा बनवायचा व थोडया थोडया अंतराने त्या लगद्याचा थोडा थोडा भाग पचनाच्या पुढील प्रक्रियेसाठी आतडयांमध्ये पाठवायचा, हे जठराचं प्रमुख काम असतं. अन्न साठवलं जावं या उद्देशाने जठराचा आकार एखाद्या पखालीच्या पिशवीसारखा असतो. पोटातलं ऍसिड एकाच वेळी अन्नातून आलेले काही रोगजंतू मारण्याचं आणि त्याचबरोबर आपल्या ऍसिडच्या गुणधर्माचा वापर करून मोठया घासातले अन्न तुकडे बारीक करण्याचं काम करत असतं. जठराच्या अन्ननलिकेकडच्या टोकाला एक व आतडयांकडच्या टोकाला दुसरी अशा दोन झडपा असतात. अन्ननलिकेकडची झडप जठरात आलेलं अन्न पुन्हा उलटं जाऊ नये यासाठी असते. ही झडप व्यवस्थित बंद होत नसली की अन्न व त्यासोबत जठरात अन्नात मिसळलेलं ऍसिड दोन्ही पुन्हा अन्ननलिकेत प्रवेश करतात. मग रुग्णाच्या छातीत जळजळू लागतं. छातीत मध्यभागी कसंतरी होतं.

पोट आणि छाती हे दोन भाग वेगळे करणारा जो आडवा पडदा - ज्याला वैद्यक डायाफ्राग्म म्हणतात, त्याला - छेदल्याशिवाय वर असलेलं तोंड आणि पोटात असलेलं जठर यांचा मेळ साधला जाणार कसा? अन्ननलिका तोंडात आलेलं अन्न पोटात असणाऱ्या जठरापर्यंत पोहोचवणार कसं? आडव्या पडद्यातला छेद व अन्ननलिकेकडच्या टोकाला असलेली झडप दोन्ही सदान्कदा बंद असतात. केवळ घास खाली उतरण्यापुरती ती उघडते. म्हणूनच जेवल्यानंतर आपण आडवे झालो, तरी जठरातलं अन्न पुन्हा घरंगळत वर येत नाही. अन्न घुसळलं जात असताना जठरातं प्रेशर वाढलं, तरीही ते पोटातच राहतं.

काही लोकांमध्ये जठराचा थोडासा भाग छातीत घुसलेला असतो. याला वैद्यकीय भाषेत 'हायाटस हर्निया' म्हणतात. अशा लोकांमध्ये पोट तुडुंब भरल्यावर आणि जेवल्यावर ताबडतोब आडवं झाल्यावर अन्नाचा काही भाग जठराच्या छातीत असलेल्या भागात राहतो. त्यांच्या छातीत जळजळ होते.

काही कारणाने अन्ननलिकेकडच्या टोकाला असलेली झडप व्यवस्थित बंद झाली नाही, तरीही असाच त्रास होतो. मधुमेहात ही झडप कित्येकदा कमकुवत होते. नीट बंद होत नाही. ही झडप अंशत: उघडी राहिली की त्यातून जठरातलं ऍसिड नको तिथे, म्हणजे अन्ननलिकेत येतं. मधुमेहात छातीत जळजळण्याचं, मळमळण्याचं ते एक महत्त्वाचं कारण असतं.

मधुमेह नियंत्रणाखाली नसला, रक्तातलं ग्लुकोज खूप वाढलेलं असलं की कित्येकदा अशा प्रकारची लक्षणं दिसतात. त्या वेळी नुसती ऍसिडिटी कमी करण्याची औषधं घेऊन काम भागत नाही. प्रसंगी इन्श्युलीन वापरूनदेखील रक्तातलं ग्लुकोज नियंत्रणात आणावं लागतं. ग्लुकोज योग्य पातळीवर आल्यानंतर बहुधा ही लक्षणंसुध्दा नाहीशी होतात. वाढलेलं ग्लुकोज आणि झडपेचं असं उघडझाप होणं याचा नेमका कोणता संबंध आहे, हे कोडं अजून व्यवस्थित उलगडलेलं नाही. कदाचित ग्लुकोजच्या भाऊगर्दीत मज्जातंतूचं काम नीट होत नसावं. त्यामुळे ही लक्षणं दिसत असावीत. पण एक गोष्ट नक्की की जेव्हा अशी लक्षणं दिसतील, तेव्हा केवळ ऍसिडिटी असं समजून त्यावर उपचार घेऊन काम भागत नाही. झडपांच्या उघडझाप करण्याच्या शक्तीला आणि त्याचबरोबर आतडयांच्या आकुंचन-प्रसरणाला जोम देणारी प्रो-कायनेटिक औषधं घेणं केव्हाही चांगलं ठरतं.

इथे एक मुद्दा मांडायलाच हवा. पोटफुगीच्या लक्षणांबरोबर पोटदुखी असली की वेगळा विचार करणं आवश्यक आहे. कारण मधुमेहात आतडयांच्या आकुंचन-प्रसरणाच्या कामात जेव्हा कमतरता जाणवते, तेव्हा पोट दुखण्याचं कारण नसतं. प्रत्यक्ष पोट दुखायला लागलं म्हणजे त्यामागे मधुमेहाव्यतिरिक्त दुसरं कोणतं तरी कारण आहे असं समजायला हरकत नाही. मग ते कारण शोधणं आणि त्यावर उपाय करून घेणं याला प्राधान्य द्यायला हवं. बहुधा स्वादुपिंड किंवा पित्ताशय यामध्ये ते कारण दडलेलं असतं. परंतु पोट आणि छातीतल्या इतर इंद्रियांकडे कानाडोळा करून भागणार नाही.

अनियंत्रित मधुमेहाला काबूत आणण्यासाठी जी औषधं वापरली जातात, त्यानेही कधी कधी पोटफुगी होते. सध्या तरी औषधांच्या ज्या गटामुळे असं होतं, त्या गटाची तीन औषधं बाजारात उपलब्ध आहेत. या गटातल्या औषधांना एकत्रितपणे 'आल्फा ग्लुकोसायडेज इन्हिबिटर' असं म्हणतात. यांची काम करण्याची, म्हणजे रक्तातलं ग्लुकोज कमी करण्याची पध्दत हीच पोटफुगीला आमंत्रण देते. आपलं अन्न पचतं कसं हे जाणून घेतल्याशिवाय ही औषधं पोटफुगी कशी करतात यावर प्रकाश पडणार नाही.

आपण जे काही खातो, त्यात असलेले अन्नघटक एकापासून दुसरा वेगळा करणं म्हणजे अन्नपचन. उदाहरणार्थ, आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले. या पिष्टमय पदार्थात मूळ घटक असतो ग्लुकोजसारखी एकल शर्करा. अशा एकेक एकल शर्करेची साखळी तयार झाली की त्याचा पिष्टमय पदार्थ बनतो. पचनसंस्थेत जेव्हा अन्न पचत असतं, तेव्हा अगदी साधं काम चालू असतं. लांबच लांब साखळीतली एकेक कडी वेगवेगळी केली जात असते. प्रत्येक कडी म्हणजे ग्लुकोजच असेल असं नाही, परंतु जास्तीत जास्त वेळेला ती ग्लुकोज असते.

अशी एकेक कडी वेगळी काढली असताना त्या कामात अल्फा ग्लुकोसायडेज नावाचं एन्झाइम महत्त्वाची मदत करत असतं. याच एन्झाइमच्या कामात अडथळा निर्माण केला तर! साहजिकच पिष्टमय पदार्थांपासून बाजूला काढली जाणारी एकल शर्करा तशीच राहील. वेगळया शब्दात सांगायचं झालं तर अन्नाचं पूर्ण पचन होणार नाही. ते तसंच मलाद्वारे बाहेर टाकून देण्यासाठी मोठया आतडयाकडे पाठवलं जाईल. अन्न पूर्ण पचलंच नाही, तर त्यातलं ग्लुकोज रक्तात येणार कसं? अन्नाचं अपूर्ण पचन करायला भाग पाडत, त्या मार्गाने रक्तातल्या ग्लुकोजला वाढू न देत, अल्फा ग्लुकोसायडेज इन्हिबिटर गटाची औषधं आपलं काम करत असतात.

आता कुणीही म्हणेल - उत्तम आहे की! आपल्याला रक्तातलं ग्लुकोज कमी करायचंय, मग अन्न पचलं नाही तर त्यात बिघडलं कुठे? पण प्रश्न असा असतो की माणसाला न पचलेलं अन्न जेव्हा मोठया आतडयात येतं, तेव्हा तिथे वस्तीला असणाऱ्या कीटाणूंचं आयतंच फावतं. हे बॅक्टेरिया सर्वच माणसांच्या आतडयात असतात. तिथे वस्ती करून ते आपल्या अन्न पचनात मदत करत असतात. या कीटाणूंच्या ताटात अतिरिक्त अन्न पडल्यावर ते त्यावर ताव मारतात. फक्त खाल्लेल्या अन्नाचा थोडासा गॅसदेखील बनवतात. अतिरिक्त अन्न म्हणजे जास्तीचा गॅस. आता लक्षात आलं असेल की अल्फा ग्लुकोसायडेज इन्हिबिटर गटाच्या औषधांनी पोटफुगी का होते ते. यानंतर मधुमेहात तुम्हाला पोटफुगीचा त्रास होत असेल, तेव्हा तुम्ही एक केलं पाहिजे - आपण घेत असलेल्या औषधांमध्ये अल्फा ग्लुकोसायडेज इन्हिबिटर गटाच्या अकारबोज, व्होगलिबोज किंवा मिग्लिटोल यापैकी कुठलंच तुम्ही घेत नाही ना, याची खात्री करून घेतली पाहिजे. 

9892245272