वारस निवडला , पण वारशाचे काय ?

विवेक मराठी    08-Dec-2017
Total Views |

 

राजकीय पक्षाला यश मिळविण्यासाठी सामान्य परिस्थितीत तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट अखिल भारतीय मान्यता असलेला वलयांकित (कॅरिस्मॅटिक) नेता लागतो. दुसरी गोष्ट सर्व लोकांना समजेल अशी विचारधारा असावी लागते आणि तिसरी गोष्ट देशव्यापी संघटन असावे लागते. आज या तिन्ही बाबतीत काँग्रेस पक्ष दुबळा झालेला आहे. राहुल गांधींनी बाललीलात मोडणाऱ्या अनेक घटना पक्षात राहून केलेल्या आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक ठराव त्यांनी सार्वजनिकरित्या फाडून टाकला. अनेक वेळा हास्यास्पद वक्तव्ये केली. कुठल्याही निवडणुकीत त्यांना यश मिळविता आलेले नाही.

 राहुल गांधी यांची काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदी निवड होणे, ही आता काळया दगडावरची रेघ झालेली आहे. हा लेख लिहीत असताना 'राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली' एवढेच वाक्य फक्त घोषित होण्याचे राहिले आहे. ते जेव्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष झाले, तेव्हाच ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणार हेदेखील ठरलेले होते. काँग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे काँग्रेस पक्षात स्पर्धा फक्त क्रमांक दोन किंवा तीन किंवा चार या जागांसाठी असते. पहिल्या जागेसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा होत नाही. पहिली जागा नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तीला वंशपरंपरेने प्राप्त होते. काँग्रेसच्या हायकमांडला ही गोष्ट मान्य आहे. एकमुखी मान्यता असल्यामुळे या परंपरेला कुणीही कसला विरोध करीत नाही.

विरोधाचा सूर विरोधी पक्षातील लोक काढतात. तसे पाहू जाता पक्षाने अध्यक्ष कोणाला करायचे, हा त्या पक्षाचा विषय आहे. अन्य पक्षांनी त्यात लक्ष घालण्याचे काही कारणही नाही आणि कुरबुर करण्याचेही काही कारण नाही. परंतु तसे आपल्याकडे होत नाही, याची काही सैध्दान्तिक कारणे आहेत. काँग्रेस देशातील सगळयात मोठा राजकीय पक्ष आहे. 125वर्षांहून अधिक परंपरा असलेला पक्ष आहे. गेली जवळजवळ 60 वर्षे हा पक्ष केंद्रात सत्तास्थानी होता. राजकीय सत्तेचा वापर कसा करायचा याचे काँग्रेसला उत्तम ज्ञान आहे. आपल्या देशात लोकशाही आहे. 'प्रत्येक व्यक्ती समान आणि प्रत्येक व्यक्तीचे मूल्यदेखील समान' हा लोकशाहीचा सिध्दान्त आहे. या सिध्दान्ताप्रमाणे लोकशाहीत घराणेशाही बसत नाही. 'सर्व माणसे समान, परंतु काही माणसे अधिक समान असतात' असा घराणेशाहीचा सिध्दान्त असतो. तो लोकशाहीच्या पहिल्या तत्त्वाला खाणारा सिध्दान्त आहे.

भारतीय लोकशाहीला घराणेशाहीचा फार मोठा धोका आहे, हे सांगताना डॉ. बाबासाहेब 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेपुढे केलेल्या अखेरच्या भाषणात म्हणतात, ''संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, कोणतीही स्त्री स्वतःच्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही.'' म्हणून घराणेशाहीने पक्षाचा प्रमुख निवडणे लोकशाहीच्या तत्त्वाला हरताळ फासणे आहे. यासाठी लोकशाहीवादी काँग्रेसच्या घराणेशाहीला विरोध करीत असतात.

राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी निवड होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर म्हणाले, ''मोगलांच्या काळात कधी निवडणूक झाली का? जहाँगीरनंतर शहाजहान आला, तेव्हा निवडणूक झाली का? शहाजहाननंतर औरंगजेब बादशहा झाला, त्याचे बादशहा होणे सर्वांनी गृहीतच धरले होते.'' मणीशंकर एका अर्थाने असंबध्द बडबडले आहेत. त्याचा फायदा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या निवडणुकीत टोला हाणला, ''घराणेशाहीचा पक्ष आहे, हे काँग्रेसला मान्य आहे का? आम्हाला औरंगजेबी राज्य नको.'' मोदींनी राहुल गांधी यांना औरंगजेबाच्या पंक्तीला नेऊन बसविल्यामुळे दूरदर्शनच्या काही वाहिन्यांना (फुकट) चर्चेसाठी विषय मिळाला आणि त्यांनी त्याचा लाभ उचलला.

या राजकीय वादविवादात आपल्याला पडण्याचे काही कारण नाही. काँग्रेसची परंपरा फार पूर्वीपासून नेहरू घराण्यातील व्यक्तीला पक्षाच्या अध्यक्षपदी बसविण्याची आहे. मोतीलाल नेहरू 1919 साली पक्षाचे अध्यक्ष होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरू सहा वेळा पक्षाचे अध्यक्ष झाले. इंदिरा गांधी पक्षाच्या तीन वेळा अध्यक्षा होत्या. राजीव गांधीदेखील पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ सीताराम केसरी पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यांची अचानक उचलबांगडी करून सोनिया गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले. 1998पासून त्याच अध्यक्षा आहेत. त्यांना तर राजकारणाचा काहीही अनुभव नव्हता. परंतु काँग्रेस चालविणाऱ्यांची मनःस्थिती अशी होती की, पक्षाच्या क्रमांक एकच्या स्थानावर नेहरू-गांधी घराण्यातील कोणी असल्याशिवाय पक्ष चालूच शकत नाही. बाबासाहेबांनी जो इशारा दिला, त्याचे दर्शन आपल्याला येथे घडते.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी यांच्याकडे पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे का? आज ते 47 वर्षांचे आहेत, म्हणजे प्रौढत्वाकडे झुकत चालले आहेत. काँग्रेसला युवकांशी आणि प्रौढांशी संवाद साधू शकणाऱ्या नेत्याची आवश्यकता आहे. देशात आज काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय आहे. कर्नाटक आणि पंजाब असे दोन मुख्य भाग सोडले, तर देशात काँग्रेसची कुठे सत्ता नाही. लोकसभेत फक्त 44 खासदार आहेत. केंद्रात सत्तेवर यायचे असेल तर स्वबळावर 272 खासदार निवडून आणावे लागतात. 44 खासदारांवरून 272 खासदारांवर जाणे हे सोपे काम नाही, तसेच ते अशक्य काम आहे असेदेखील नाही. 1985 सालच्या निवडणुकीत भाजपाचे फक्त दोन खासदार निवडून आले आणि 2014च्या निवडणुकीत 280हून अधिक खासदार निवडून आले. हा आपल्या देशाचा राजकीय प्रवास पाहिला, तर राजकारणात काहीही होऊ शकते, त्याविषयी निश्चित भाकीत करणे अवघडच नाही तर मूर्खपणाचे ठरते.

राजकीय पक्षाला यश मिळविण्यासाठी सामान्य परिस्थितीत तीन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट अखिल भारतीय मान्यता असलेला वलयांकित (कॅरिस्मॅटिक) नेता लागतो. दुसरी गोष्ट सर्व लोकांना समजेल अशी विचारधारा असावी लागते आणि तिसरी गोष्ट देशव्यापी संघटन असावे लागते. आज या तिन्ही बाबतीत काँग्रेस पक्ष दुबळा झालेला आहे. राहुल गांधींनी बाललीलात मोडणाऱ्या अनेक घटना पक्षात राहून केलेल्या आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक ठराव त्यांनी सार्वजनिकरित्या फाडून टाकला. अनेक वेळा हास्यास्पद वक्तव्ये केली. कुठल्याही निवडणुकीत त्यांना यश मिळविता आलेले नाही. 2014नंतर झालेल्या सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि काँग्रेस आणखी पराभूत होत गेली. ते वलयांकित नेता या सदरात मोडणारे नेते झाले नाहीत.

विचारधारेचा मुद्दा घेतला, तर आज काँग्रेसची प्रतिमा 'हिंदू हिताला विरोध करणारा पक्ष' अशी झाली आहे. काँग्रेसने अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण दीर्घकाळ केले. 'राम ही ऐतिहासिक व्यक्ती नव्हे' असे ऍफिडॅव्हिट कोर्टात सादर केले. नरेंद्र मोदी यांना 'मौत के सौदागर' अशी उपमा दिली. दहशतवाद्यांचे अनेक वेळा समर्थन केले. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस पक्ष फक्त मुसलमानांची चिंता करणारा पक्ष आहे, अशी काँग्रेस पक्षाची प्रतिमा झाली. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस 'हिंदू काँग्रेस' होती. महात्मा गांधी कट्टर सनातनी हिंदू होते. त्यांची जीवनशैली हिंदू जीवनशैली होती. महात्मा गांधींनी राजकारण केले, पण सत्ताकारण केले नाही. सत्तेपासून ते अलिप्त राहिले. त्यामुळे त्यांचे स्थान एका सत्पुरुषासारखे झाले. ते जे बोलत तसे चालत. बोलण्यात आणि वागण्यात कसलीच तफावत नसे. दुसऱ्या भाषेत हिंदू जीवनमूल्यांचे ते चालते-बोलते उदाहरण झाले. त्यामुळे खेडयापाडयातील सामान्य हिंदू गांधीजींच्या मागे उभा राहिला. हे हिंदूपण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने हळूहळू सोडले. सोनिया गांधीच्या काळात त्याचा कळस झाला. त्यामुळे देशातील हिंदू मतदार 'क़ाँग्रेस आपली नाही' या मनःस्थितीत गेला.

काँग्रेसला कुठे घेऊन जायचे आहे? याचा राहुल गांधी यांना मार्ग आखावा लागेल. सर्वधर्मसमभाव, सेक्युलॅरिझम इत्यादी शब्द फारच बदनाम झालेले आहेत. भाषा सर्वधर्मसमभावाची करायची आणि बंधने हिंदू धर्मावर लादायची, भाषा सेक्युलॅरिझमची करायची आणि मुसलमान आणि ख्रिश्चन यांना झुकते माप द्यायचे हे लोकांना आता समजू लागले आहे. काँग्रेसचा हरवलेला वारसा - म्हणजे हिंदूपणाचा वारसा काँग्रेस पुन्हा पुनरुज्जीवित करणार की? का मागे वाजविलेले तेच तुणतुणे काँग्रेस वाजवीत बसणार? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

आपला वारसा कोणता? आपण कोण आहोत? आपल्याला कुठे जायचे आहे? याचा शोध राहुल गांधी यांना घ्यावा लागेल. भारताच्या राज्यघटनानिर्मितीचे खऱ्या अर्थाने सर्व श्रेय काँग्रेसचे आहे. पं. नेहरू यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की, आम्ही भारतीय आमची घटना समिती निर्माण करू आणि आमची राज्यघटना निर्माण करू, तुम्ही दिलेली राज्यघटना आम्हाला नको. म्हणून कॅबिनेट मिशन योजना बारगळली आणि 1946 साली घटना समिती अस्तित्वात आली. महिलांना समान अधिकार, मूलभूत अधिकार, वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे सगळे विषय काँग्रेस चळवळीचे भाग होते. तेव्हाची काँग्रेस राष्ट्रीय चळवळ होती, घराणेशाहीची चळवळ नव्हती. राहुल गांधींना त्यांच्याच पक्षातील लोकांनी या वारशाचे स्मरण करून द्यायला पाहिजे.

 

पक्ष संघटनेचा विचार करता आज देशात काँग्रेसची अवस्था विकलांग संघटनेची आहे. दीर्घकाळ सत्तेवर राहिल्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणजे सत्तेवर जाण्याचे एक यंत्र झाले आहे. ज्याला सत्तेत जायचे आहे तो काँग्रेसमध्ये जाई. तो कोणत्या का विचारधारेचा असेना, काँग्रेसमध्ये त्याला जागा मिळत असे. काँग्रेस ही एक 'छत्री पार्टी' झाली. एका छत्रीत जसे अनेक लोक मावतात, तसे काँग्रेसचे रूप झाले. पक्षाची बांधणी सत्तातुरांच्या माध्यमातून करता येत नाही. पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज लागते. निष्ठा विकत घेता येत नाही, माणसे विकत घेता येतात. निष्ठा विचाराने आणि आदर्शाने निर्माण होते. पक्षाची विचारधारा जगणारे नेते कार्यकर्त्यांच्या डोळयापुढे असावे लागतात. सत्तेच्या शर्यतीत पळणारे शागिर्द निर्माण करू शकतात, ''यस सर, होय साहेब'' म्हणणारे फौज निर्माण करू शकतात, ते निष्ठावान कार्यकर्ते उभे करू शकत नाहीत. सत्ता गेली की असे शागिर्द अदृश्य होतात. तो नेता एकाकी फिरत राहतो. काँग्रेसमध्ये सध्या अनेकांची अशी स्थिती आहे.

यासाठी राहुल गांधी यांना 'काँग्रेस म्हणजे सत्तेवर जाणारी मशीनरी, एक यंत्र' या प्रतिमेतून काँग्रेस म्हणजे मूल्याधारित पक्ष, विचारावर आधारित पक्ष, कुणाचेही लांगूलचालन न करणारा पक्ष या प्रतिमेत न्यावा लागेल. गुजरातमधील त्यांची राजकीय रणनीती पाहता ते या मार्गाने निघाले आहेत असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल. पटेल, मागासवर्गीय, मुसलमान, आदिवासी यांच्या अस्मिता जागवून त्यांची मोट बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु यातील प्रत्येक घटक कधी पलटी खाईल, हे सांगता येत नाही. अशा प्रकारचे राजकारण कदाचित तात्कालिक अल्पयश देईल, परंतु दीर्घकालीन ते घाटयाचे राजकारण असते. अशा राजकारणातून पक्ष उभा राहत नाही, जातीय अस्मिता उभ्या राहतात, ज्या राष्ट्रीय ऐक्याला घातक असतात.

शेवटी ज्या घराणेशाहीचा मुद्दा वारंवार चर्चिला जातो, त्याकडे येऊन या लेखाचा समारोप करतो. मूल्य म्हणून घराणेशाही चांगली नसली, तरी भारतीयांचा स्वभाव बघता तो भारतीयांचा एक स्थायिभाव आहे. औद्योगिक क्षेत्रातही आपल्याकडे घराणेशाही असते, कलेच्या क्षेत्रात - विशेषतः गायनाच्या क्षेत्रात घराणेशाहीच असते, सिनेक्षेत्रातदेखील घराणेशाही असते. या घराणेशाहीचे लोकांना काही वाटत नाही. एखाद्या क्षेत्राचा वारस कोण? असा प्रश्न निर्माण झाला असता, आज हा जो कुणी आहे त्याचा मुलगा किंवा मुलगी वारस म्हणून स्वीकारली जाते. ही राजकीय घराणेशाही जवळजवळ सर्वच पक्षांत आहे. काँग्रेसमध्ये नेहरू-गांधी घराण्याची घराणेशाही असावी की नसावी हे अखेर काँग्रेसमधील लोकांनीच ठरवावे. घराणेशाहीचा एक सनातन नियम असा आहे की, वारस जर नालायक निघाला तर त्या घराण्याचा नैसर्गिक नाश होतो. अब्बासीद खिलाफत, ऑटोमन खिलाफत, मोगलशाही, एवढेच काय तर पेशवाईदेखील नालायक वारस पुढे आल्यामुळे नाश पावली. राहुल गांधी यांना आपण लायक आहोत की नालायक आहोत हे ठरविण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे.

9869206101