चित्रांगणातील 'शशी' लोपला!

विवेक मराठी    08-Dec-2017   
Total Views |

 

 

बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते शशी कपूर आता आपल्यात नाहीत. त्याचा पडद्यावरचा वावर देखणा होता. फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. पण आज तो पटकन आठवतो तो 'दीवार'मधला रवी वर्मा. त्याची तेवढीच ओळख असू नये. अनेक चित्रपटांत त्याने सुंदर काम केलंय. 'दीवार'मधला तो डायलॉग सोडून द्या, त्यापेक्षा कितीतरी सुंदर काम त्याने त्यात केलंय. लार्जर दॅन लाइफ लिहिलेल्या व्यक्तिरेखेसमोर तो 'दीवार'मध्ये साधेपणाने पण ताकदीने उभा राहिला. भारतीय चित्रपट व रंगमंचाला शक्ती देण्याची त्यांची भूमिका कायम चिरस्मरणात राहील.

 रवा देखणा, हसऱ्या चेहऱ्याचा, नखशिखान्त सभ्य कपूर गेला. पुरुष देखणा आहे की नाही हे ठरवण्याचे काही निकष असतात. कुणी धर्मेन्द्रसारखा ही मॅन असतो, कुणी विनोद खन्नासारखा राजबिंडा असतो, कुणी देवानंद, आमिर खानसारखा चॉकलेट बॉय असतो. शशी कपूर हसऱ्या चेहऱ्याचा सुंदर माणूस होता. अतिशय निर्मळ, निरागस हसायचा तो. त्याच्या हसण्यात छद्मीपणा, कावेबाजपणा नव्हता कधी. हिरो म्हणून अनेक त्रुटी असणारा तो साधारण माणूस होता खरं तर. धिप्पाड म्हणावी अशी शरीरयष्टी नव्हती, लक्षात राहील असा संवादफेकीचा आवाज नव्हता, नाचाचं अंग फार नव्हतं, तरीसुध्दा त्याचा पडद्यावरचा वावर देखणा होता. कुठल्याही स्त्रीच्या स्वप्नातला राजकुमार त्याच्यापेक्षा वेगळा नसावा. देखणा तर राजेश खन्नाही होता, पण याच्याकडे एक खानदानी आब, चारित्र्य होतं. नुसता देखणा तर नवीन निश्चलही होता. बायलेपणाकडे न झुकता सुंदर दिसणं पुरुषाकरता अवघड असतं. शशी कपूर निरागस, देखणा होता. तो उगाच ऍंग्री यंग मॅन, भिकारी, गरीब घरातला वगैरे शोभलाच नसता. कुणीही जीव टाकावा असा सर्वसाधारण गुणी माणूस तो दिसायचा आणि वागायचाही तसाच.

थोरामोठयांच्या घरात जन्माला येणं हा शाप जास्त आणि फायदे कमी असा प्रकार आहे. लोक तुमच्या पूर्वजांना तुमच्यामध्ये शोधतात, तुलना करतात, यशापयश लगेच मोजायला सुरुवात होते, तुमच्यावर बारीक लक्ष असतं. ब्रॅडमनच्या मुलानी ''तू ब्रॅडमनचा मुलगा का?'' या प्रश्नाला कंटाळून काही काळ ब्रॅडसन आडनाव केलं होतं. त्यामुळे स्वत:चं वेगळेपण दाखवून स्थिरस्थावर होणं हे खायचं काम नाही. मुळात मळलेल्या वाटेवरून चालायला सोप्पं असलं, तरी रिस्कीसुध्दा असतं. त्याचे वडील पृथ्वीराज, शरीराप्रमाणेच भारदस्त नाव आणि आब राखून होते नाटक आणि चित्रपटसृष्टीत. काका त्रिलोक कपूर देवांच्या (शंकर स्पेशालिस्ट) भूमिकेत फेमस होता. भाऊ  रणबीर'राज' आणि शमशेरराज उर्फ शम्मी आपापला किल्ला राखून होते. राज कपूर दिग्दर्शकही होता आणि तिघांत जास्त देखणा होता. बलबीरराज उर्फ शशी कपूरचं अवघडच होतं. शम्मीचा धसमुसळेपणा नाही, राजचा (कावेबाज पण) भोळसट चेहरा नाही. तो शेवटी पृथ्वीराजच्या आकाराचा आणि चेहऱ्याचा झाला, पण आधी तो सगळयात स्लिम कपूर होता.  

 

 

एकूणच तो सुखी माणूस होता. पण जेफ्री केंडालची शेक्सपिअरिन नाटक कंपनी आणि पृथ्वी थिएटर यांची कलकत्त्यात गाठ पडली आणि शशी कपूर वयाच्या अठराव्या वर्षीच जेफ्रीच्या मुलीच्या - जेनिफरच्या प्रेमात पडला. घराणी झाली की नियम तयार होतात, कायदेकानून असतात. आधी विरोध झाला, पण वहिनी गीताबालीच्या पाठिंब्यावर तो विसाव्या वर्षीच बोहल्यावर चढला. खाण्यापिण्यातली इंग्लिश शिस्त आचरणात आणायला लागल्यामुळे शशी कपूर स्लिम ट्रिम आणि फिट होता. लग्न झाल्यावर सव्वीस वर्षांनी ती कर्करोगानी गेली आणि शशी कपूर खचला. संपूर्ण इंग्लिश चेहरा घेऊन आलेला करण कपूर मॉडेल झाला, मग 'लोहा', जुही चावलाबरोबर 'सल्तनत'मध्ये आला आणि तिथेच संपला. तो आता लंडनमध्ये स्थायिक झालाय आणि नामवंत फोटोग्राफर आहे. कुणाल मात्र भारतीय चेहऱ्याचा होता. त्याचा 'विजेता' वेगळया विषयावरचा आणि करमुक्त असूनही फार चालला नाही. तो रमेश सिप्पीचा जावई आहे आणि जाहिरातीच्या फिल्म्स बनवतो. 'हिरो हिरालाल'मधून नसिरुद्दीनबरोबर आलेली थोडीशी किशोरी शहाणेसारखी दिसणारी संजना कपूर आली आणि गेली लगेच. आईकडून आलेला थेटरचा वारसा ती सांभाळतीये. हाच का तो सडपातळ कपूर असं वाटावं इतका तो नंतर फुगला. व्हीलचेअरवर बसलेला, हवा भरल्यासारखा दिसणारा, पृथ्वीराज कपूरच्या तोंडावळयाचा शशी कपूर दिसायचा मात्र प्रसन्न. तृप्त माणसाच्या चेहऱ्यावर समाधानाचा एक ग्लो असतो, तसा त्याच्या चेहऱ्यावर होता.   

त्याने सगळयात जास्ती काम नंदा (8 चित्रपट), राखी, शर्मिला (्9 चित्रपट), झीनत, हेमा (10 चित्रपट) आणि अमिताभ (12 चित्रपट) यांच्याबरोबर केलंय. त्यातला फक्त 'ईमान धरम' मी पाहिलेला नाही आणि 'अजूबा' बघायची इच्छा नाही. पण तो यशस्वी होता. सभ्य, चारचौघांसारखा गोरागोमटा चेहरा आणि येतंय तेवढं मनापासून करणं एवढया मोजक्या गुणांवर तो टिकून राहिला. संवादफेकीसाठी तगडा आवाज नाही, मारामारीला शोभेल असा तगडा देह नाही, उंची फार नाही, बुटकाही नाही, विनोद उत्तम जमतोय असंही नाही, फक्त नाचासाठी बघायला येतील असंही नाही. पण अमोल पालेकरसारखं काहीतरी सरळमार्गी, आपल्यातला वाटणारं त्याच्यात होतं. 61 सोलो आणि 55 मल्टीस्टारर असं संतुलन साधण्याचं कसब त्याच्यात आणि त्याचा पुतण्या ॠषी कपूरमध्ये होतं. 'आवारा'मध्ये तो राजकपूरचं बालपण होता, 'प्यार हुआ इकरार हुआ'मध्ये तो भावंडांना हाताला धरून घेऊन जाणारा होता. बबिता आणि नीतू या सुनांचा तो हिरो होता. संन्यास घेतल्यावर त्याच्या शब्दाखातर नंदा कुणाल कपूरच्या 'आहिस्ता आहिस्ता'मध्ये आली होती. ती त्याची आणि तो तिचा फेव्हरिट होता.

'जब जब फूल खिले'मध्ये 'एक था गुल' म्हणणारा, 'ये समा' म्हणणाऱ्या नंदाकडे चोरून बघणारा, 'शर्मिली'मध्ये 'खिलते है गुल यहां' आणि 'ओ मेरी शर्मिली' म्हणणारा, 'दीवार'मध्ये 'कह दूँ तुम्हे', 'फकीरा', 'तोता मैनाकी कहानी', 'चोर मचाये शोर'मध्ये 'ले जायेंगे, ले जायेंगे', 'कन्यादानमध्ये 'लिख्खे जो खत तुझे', 'काला पत्थर'मध्ये 'इक रास्ता है जिंदगी' म्हणणारा शशी कपूर वेगळा आणि 'कलयुग', '36, चौरंगी लेन', 'जुनून', 'विजेता', 'काली घटा', 'उत्सव'चा शशी कपूर वेगळा. पैसा, प्रसिध्दी मिळते, माणूस त्यात खूशही होतो, पण कुठेतरी न्यून जाणवतं. म्हणून पैसे बुडणार हे माहीत असूनही आर के 'जागते रहो' काढतो. शशी कपूरनेसुध्दा 'कलयुग', 'जुनून', 'विजेता', '36, चौरंगी लेन', 'उत्सव' असे वेगळे सिनेमे काढले. 'अजूबा' त्याने काढला आणि दिग्दर्शितही केला होता. जगात सगळयात सोपं काय असेल तर आपल्याला जे करायचं नाही त्यावर पोटतिडिकीने बोलणं, सल्ले देणं. शशी कपूरने यातलं काहीच केलं नाही. ज्याला काही करायचं असतं तो बोलण्यात वेळ दवडत नाही. नाटकाचा प्रेक्षक कमी होत चाललाय. त्यात हिंदी नाटकं किती बघितली जातात, हा मुद्दा आहेच. अशा परिस्थितीत पदराला खार लावून त्याने थिएटर जिवंत ठेवलं, याची नोंद इतिहासात व्हायला हवी.

सभ्यपणा दाखवावा लागत नाही, तो मुळात असतो. चित्रपटांच्या मोहमयी जगात सतत पाय घसरण्याची संधी असतानाही तो घसरू न देणं हे कसब असतं. शशी कपूर उगाच कुठल्या नटीच्या फार अंगचटीला गेला नाही कधी पडद्यावरसुध्दा. त्याची नाचाची एक स्वतंत्र लकब होती. हसताना तो तिरका दात दिसावा म्हणून त्याने कधी आटापिटा केला नाही, उगाच कधी फार गेटअप बदलायच्या भानगडीत तो पडला नाही, समोर कोण आहे याचं कधी दडपण आलं नाही, कुणावर आणलं नाही. हा हसरा माणूस 'विजेता', 'इजाजत', 'बसेरा'मध्ये बघाल. 'बसेरा'ची स्टार कास्ट जबरदस्त होती. राखी, रेखा आणि हा. अत्यंत कुटुंबवत्सल दिसतो तो त्यात, समाधानी एकदम. त्याच्या चेहऱ्यावरचे तणाव बघाल या सिनेमात. दुर्दैवाने, हिट झालेले सिनेमे लोकांच्या लक्षात राहतात. पडद्यावर सहज वावर ज्या काही मोजक्या लोकांना जमला, त्यात शशी कपूर फार वर आहे. त्याने कधीही आचरट विधानं केली नाहीत, वाद घातले नाहीत, लफडी केली नाहीत. नर्मदेतून काढलेला गोटा जसा कोरडा असतो, तसा तो सिनेसृष्टीत अंगाला काहीही चिकटवून न घेता राहिला. कुणाच्या यशाने तो खट्टू झाला नाही, अपयशाने ढासळला नाही.

एवढया सिनेमांत काम करूनही आज तो पटकन आठवतो तो 'दीवार'मधला रवी वर्मा. त्याची तेवढीच ओळख असू नये. अनेक चित्रपटांत त्याने सुंदर काम केलंय. 'दीवार'मधला तो डायलॉग सोडून द्या, त्यापेक्षा कितीतरी सुंदर काम त्याने त्यात केलंय. लार्जर दॅन लाइफ लिहिलेल्या व्यक्तिरेखेसमोर तो 'दीवार'मध्ये साधेपणाने पण ताकदीने उभा राहिला. चेहरा बोलतो त्याचा! गोळी घातल्यावर त्या मुलाच्या हातात सापडलेले पाव बघून झालेला त्याचा चेहरा बघा. त्याला मिळालेलं एकमेव फिल्मफेअर हे (साहाय्यक अभिनेता). अर्थात फिल्मफेअर मिळालं म्हणजे अभिनय येतो असं नाही. इथे 'फिल्मफेअर', 'पद्मश्री'सुध्दा कुणालाही मिळते. 'मृच्छकटिक'वरून काढलेल्या 'उत्सव'मध्ये त्याने केलेली भूमिका तोच निर्माता आहे म्हणून केलेली नाहीये. अमिताभ करणार होता ती, पण 'कुली'च्या अपघातामुळे त्याला ती करावी लागली. त्याच्या शब्दावर अमिताभला 'रोटी, कपडा और मकान' मिळाला होता. शम्मी सोडून बाकी सगळया कपूरांना (पृथ्वीराज, राज आणि शशी) दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. शशी कपूरला निदान मरायच्या आधी बरेच वर्षं दिला, हे त्याचं भाग्य. मरणोत्तर किंवा गलितगात्र अवस्थेत असलेल्या माणसाला देण्यात यांना काय आनंद मिळतो, माहीत नाही. कौतुकाचा, पुरस्काराचा आनंद मिळेल अशा वयात द्यायला हवा ना. 

अतिशय प्रसिध्दीतून विस्मरणात जाण्याचा शाप या लोकांना असतो. एखादाच अमिताभ याही वयात कार्यरत असतो. मध्ये एका मैत्रिणीने किस्सा सांगितला होता. ती ज्या दवाखान्यात गेली होती, तिथे चेकिंगला शशी कपूरही आला होता. व्हीलचेअरवर बसलेला. त्याच्याकडे कुणीही बघत नव्हतं. तिला खूप वाटलं, जवळ जाऊन त्यांचे हात हातात घ्यावेत, दोन शब्द बोलावेत... पण भिडस्तपणामुळे आपण खूपदा काही गोष्टी करत नाही. ती म्हणाली, ''आजारी असूनसुध्दा अत्यंत प्रसन्न पण तटस्थ चेहऱ्याने ते सगळीकडे बघत होते.'' एकेकाळी या  माणसाला हात लावायला, सही घ्यायला, जवळून बघायला चेंगराचेंगरी झाली असती. काळ बदलला की माणसं जुनी होतात. नवीन पिढी ओळखते, पण तेवढी नाळ नाही जुळत. नशिबाने, कर्तृत्वाने ही माणसं असामान्य होतात, तसं जीवन जगतात, पण शेवटाला हे भोग काही सुटत नाहीत. दिलीपकुमार फक्त जिवंत आहे आता, त्याला काहीही आठवत नाही. एकार्थाने सुखी आहे तो. दु:ख नाही कसलंच त्याला, आठवणी नाहीत, राग, लोभ, वासना नाही. नशिबाचे कुठले भोग ही माणसं भोगतात.. ठाऊक नाही. प्रसिध्दीची, यशाची परतफेड असावी ती याच जन्मात केलेली. असो!

पुरस्कार मिळोत न मिळोत, एक सज्जन, सभ्य, देखणा, पाय जमिनीवर असलेला, मर्यादेत रहाणारा, प्रसन्न चेहऱ्याचा माणूस म्हणून आणि समोर कोण का असेना, संयत आवाजात, गुंडाशी बोलत असलो, तरी मोठया भावाशी बोलतोय याची जाण ठेवून चीड दाबलेल्या आवाजात ''भाय, तुम साईन करोगे या नही'' विचारणारा 'रवी वर्मा' म्हणून तो माझ्या लक्षात राहिलाय एवढं खरं. माणूस गेला की वाईट वाटतंच. आपल्या नात्यागोत्यातला नसला, ज्याला कधीही आपण पाहिलेलं नाही त्याच्याबद्दलही असं वाटणं ही कृतज्ञता असते, त्याने दिलेल्या आनंदाची अंशत: परतफेड असते ती. शरीराने सुटलेला हा देखणा कपूर सगळया त्रासातून 'सुटला' हे सत्य.

9823318980