उरलंसुरलं

विवेक मराठी    01-Feb-2017
Total Views |

उपवासाकडे पाहण्याचा प्रत्येक धर्माचा दृष्टीकोन निरनिराळा असल्याने त्यांना मधुमेह झाल्यावर द्यायचा सल्ला सारखा असणं शक्य नसतं. खाण्यापिण्याचा आणि मधुमेहाचा संबंध लक्षात घेताना आपल्या संस्कृतीला वगळून चालत नाही. ज्या मधुमेहींना अट्टाहासाने उपास करायचे आहेत, त्यांनी उपासापूर्वी आणि नंतर आपलं मूत्रपिंड तपासून घ्यावं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये.
खा
ण्यापिण्याचा आणि मधुमेहाचा संबंध लक्षात घेताना आपल्या संस्कृतीला वगळून चालत नाही. आपण उपासतापासावर विश्वास ठेवणारी माणसं. शिवाय आपला देश कुठल्याही जातिधर्मात भेदभाव न करणारा. त्यामुळे उपासाचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे दिसतात. हिंदू चतुर्मास पाळतात. मुस्लीमधर्मीय वर्षातून एकदा महिनाभर रमझानचा उपास ठेवतात. ख्रिश्चन मंडळी लेन्ट, तर जैन पर्युषणच्या काळात उपास करतात. अर्थात उपवासाकडे पाहण्याचा प्रत्येक धर्माचा दृष्टीकोन निरनिराळा असल्याने त्यांना मधुमेह झाल्यावर द्यायचा सल्ला सारखा असणं शक्य नसतं.

हिंदू उपासाच्या दरम्यान अगदीच काही खात नाहीत असं नव्हे. त्याला निर्जळी एकादशी किंवा करवा चौथ असे अपवाद आहेत. छट पूजा ही उत्तर हिंदुस्तानच्या काही भागातली प्रथादेखील याच प्रकारची आहे. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला धार्मिक उपास म्हणतात तो आणि वैद्यकातला उपास यात फरक आहे. माणूस जेव्हा ज्यात कुठल्यातरी कॅलरीज आहेत असं कोणतंही खाणं सलग चौदा तास खात नाही, तेव्हा वैद्यक त्याला उपास म्हणतं. या अर्थाने अधूनमधून शेंगदाणे किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊन केलेल्या उपासाला वैद्यकात उपास म्हटलं जात नाही. फक्त या मंडळींनी बटाटा, रताळू यासारखे ग्लुकोज तत्काळ वाढवणारे पिठूळ पदार्थ खाऊ नयेत आणि आपली रोजची औषधं नियमितपणे घेत राहावीत. फलाहार करण्याने अथवा कमी पिठूळ पदार्थ खाण्याने फारसा फरक पडत नाही. अर्थात आपल्याकडे अजून तरी या सगळया गोष्टींचा नीट अभ्यास झालेला नाही. व्यक्ती-व्यक्तीतसुध्दा उपास करण्याच्या पध्दती वेगवेगळया असल्याने, एकवाक्यता असलेला अभ्यास करणं अवघड आहे हेही तितकंच खरं. ख्रिस्ती बांधवांच्या लेन्टमध्येदेखील दिवसभरात थोडंबहुत खाणं चालू असतं. त्यामुळं त्यालाही वैद्यकाची उपासाची व्याख्या लागू पडत नाही.

फक्त भारतापुरता विचार केला, तर मुस्लिमांचे उपासदेखील वैद्यकाच्या उपासाच्या व्याख्येत कमीच बसतात. ही मंडळी दिवस मावळल्यावर सगळं खात असल्याने व भारतात जून महिना सोडल्यास चौदा तासांच्या आतच त्यांचं खाणं होत असल्याने त्यांच्या पोषणात फरक पडण्यासारखं काही घडत नाही. त्यांनी केवळ आपल्या औषधात योग्य ते बदल केले की त्यांचं काम भागतं. ज्या देशात उन्हाळयात सूर्य चौदा तासांहून जास्त वेळ आकाशात असतो, तिकडची गोष्ट निराळी. त्या मानाने जैन लोकांचे उपास कडक असतात. केवळ पाणी प्राशन करून केलेल्या उपासांचा मधुमेहाच्या नियंत्रणावर नक्कीच परिणाम होतो.

उपास करणाऱ्या मुस्लीम मंडळींच्या बाबतीत एक प्रश्न नक्कीच उद्भवू शकतो. ते उपासादरम्यान पाणीदेखील तोंडात घेत नाहीत. या गोष्टींचा मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. ज्यांना आधीच मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासलेलं आहे, त्यांनी निर्जळी उपास करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसंच टाइप वन मधुमेह्यांना हाच सल्ला लागू पडतो. तरीही ज्यांना अट्टाहासाने उपास करायचे आहेत, त्यांनी उपासापूर्वी आणि नंतर आपलं मूत्रपिंड तपासून घ्यावं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये. आपला देश उष्ण आहे. इथे घाम खूप येतो. त्याद्वारे शरीरातलं पाणी बाहेर फेकलं जातं. अशामुळे आधीच मूत्रपिंडाला पाण्याची कमतरता जाणवत असते, त्यावर आणखी अन्याय नको. जे लोक भर उन्हात कष्टाची, अंगमेहनतीची कामं करतात, त्यांनी हे कटाक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे. कोणीही असो, उपासाची आणि तुमच्या तब्येतीच्या प्रश्नांची अधिक गुंतागुंत होऊ देऊ नका. उपासाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना भेटा, हे आवर्जून सांगायला हवं.

बऱ्याचदा आजारी पडल्यावर तोंडची चव जाते. काही खाववत नाही. कधीकधी वांत्या सुरू होतात. पोटात काही टिकत नाही. अशा वेळी बहुधा औषधं न घेण्याचा विचार लोक करतात. कधीकधी हे खूप धोक्याचं ठरू शकतं. किंबहुना वैद्यक 'सिक डे'च्या दिवशी कसं वागायचं हे रुग्णाला नीट समजावून सांगायचा आग्रह धरतं. कारण कोणीही आजारी झालं की त्यांच्या शरीरात विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन तयार होतात. याना स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. ही रसायनं रक्तातलं ग्लुकोज वाढवत असतात. म्हणजे न खाल्याने तुमचं ग्लुकोज कमी होईल, ही भीती चुकीची ठरते.

औषधं थांबवल्याने ग्लुकोज अधिक अनियंत्रित होऊ शकतं. अशा वेळी लवकरात लवकर डॉक्टर गाठा, त्यांचा सल्ला घ्या. तोंडी खाणं सुरू ठेवा. वांत्या कमीत कमी वेळात थांबतील अशी व्यवस्था करा. किमान द्रवरूप खाणं चालू ठेवा. विशेषत: इन्श्युलीन घेणाऱ्यांनी याची खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे. त्यांच्या शरीरात इन्श्युलीनची कमतरता असल्याने त्यांना बाहेरून इन्श्युलीन दिलं जात असतं. त्यांनी कुठल्याही कारणाने इन्श्युलीन बंद केलं, तर त्यांना डायबेटिक किटो ऍसिडोसिस नावाचा बराच गंभीर प्रश्न होण्याची भीती असते. टाइप टू मधुमेहात मोठा आजार झाला, तर उलटतोंडी औषधं बंद करून इन्श्युलीन देणं पसंत करतात, हे खूप बोलकं आहे.

मधुमेह आहे म्हणून तुम्ही-आम्ही बाहेर खाण्याचं थांबवणार नाही. कधी ना कधी आपण हॉटेलमध्ये जाणारच. किमान लग्न-मुंज यासारख्या मंगल प्रसंगी हजेरी लावणार. अशा वेळी थोडी काळजी घेणं चांगलं. तुमचं ग्लुकोज वाढणार नाही आणि समाजापासून वेगळं पाडण्याचं कारणही उरत नाही. बहुधा ज्या गोष्टी आपण खातो, ते बनताना त्यात कुठले पदार्थ घातले आहेत, ते आपल्याला माहीत असतं. पण आताच्या काळात जगभरच्या वेगवेगळया प्रांतांतल्या खाण्याची रेस्टॉरंट किमान मोठया शहरात उघडली आहेत. तिथे असलेल्या मेनूबद्दल आपण अनभिज्ञ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिथे असलेल्या शेफशी किंवा वेटरशी चर्चा करूनही तुमचा प्रश्न सुटला नाही, तुम्हाला त्या पदार्थाच्या आत घातलेल्या घटक द्रव्यांची कल्पना आली नाही, तर असा पदार्थ खाण्याचं टाळलेलं बरं. साधेसोपे मार्ग अवलंबून, पदार्थांची निवड नीट करून आपलं बाहेर खाणं ग्लुकोजची चिंता ना करता आपण सहज एन्जॉय करू शकतो. तेलकट सॅलड ड्रेसिंगऐवजी लिंबू पिळणं, मैद्याच्या रोटीऐवजी गव्हाच्या चपात्या किंवा मिस्सी रोटी खाणं, चायनीज कॉर्न फ्लोअर घातलेलं जाडसर सूप पिण्यापेक्षा पाणचट क्लिअर सूप मटकावणं, तळलेल्या अथवा तेलाने ओथंबलेल्या ग्रेव्हीच्या जागी ओव्हनमध्ये वा तंदुरीत भाजलेले उकडलेले पदार्थ खाणं याला कुठलेच डॉक्टर अटकाव करणार नाहीत.

काही लोकांना आपलं रोजचं आयुष्य एका विशिष्ट चाकोरीत जगणं कठीण असतं. त्यांच्या कामाच्या निमित्ताने त्यांना बराच प्रवास करावा लागतो. काहींना रोज बदलणाऱ्या पाळया असतात. जेवणाच्या वेळा पाळणं अवघड होतं. त्यांनी आपल्या डॉक्टरांशी याविषयी मनमोकळेपणे बोलावं. आपल्या जीवनशैलीशी जुळवून घेता येईल अशी औषधं आणि आहाराची योजना ते सुचवतील. खायला वेळ नसेल, तर ब्राउन ब्रेडचं सँडविच, खाखरा, भाजलेले चणे, फळं, कुरमुरे असे सहजी तोंडात टाकता येणारे पदार्थ सोबत बाळगणं कठीण नक्कीच नाही.

आताच्या काळात आपण भरपूर प्रवास करतो. स्वत: गाडी चालवत असताना तुमचं ग्लुकोज कमी होता नये, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून खाण्यासारखं काहीतरी हाताशी असावं. ते गाडीत मागच्या डिकीमध्ये ठेवता उपयोगी नाही. जवळ बाळगलं पाहिजे. विमान प्रवास आताशा दुर्मीळ राहिलेला नाही. देशातल्या देशात व कधीकधी परदेशात दोनेक तासात तुम्ही तुमच्या ईप्सित स्थळी पोहोचणार असल्यास तुमच्या नेहमीच्या उपचारात फारसा बदल करण्याची गरज उरत नाही. पण लांबचा अनेक तासांचा प्रवास असेल, तेव्हा विमान कंपनीकडे मधुमेही माणसांसाठी असलेलं जेवण देण्याचा आग्रह धरता येईल. पुरेसा अवधी दिला की ते आपली मागणी पुरवतात. पूर्वेच्या दिशेला असलेल्या देशांमध्ये निघालात, तर दिवस छोटा होत असल्याने जवळ बाळगण्याचे न्याहारीचे पदार्थ फारसे लागणार नाहीत. परंतु उलटया - म्हणजे पाश्चिमात्य देशांकडे निघाला असाल, तर मात्र जरा जास्त न्याहारी सोबत नेणं जरुरीचं आहे, इन्श्युलीनचा डोसदेखील वाढणार आहे, हे लक्षात असू द्या.

दारूबद्दल थोडं सांगायला हवं. मधुमेही मंडळींनी दारू बहुतकरून टाळायला हवी. ज्यांना तिचं व्यसन जडलंय, त्यांनी ती सोडण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. गरोदर स्त्रीने तिच्यापासून मैलभर लांब राहायला हवं, कारण एका पेगनेदेखील पोटातलं बाळ अपंग व्हायची भीती असते. इतरांना प्यायचीच असेल, तर त्यांनी दारूच्या कॅलरीज आपल्या जेवणात मोजल्या पाहिजेत आणि 15 ग्रॅमपेक्षा जास्त अल्कोहोल घेता नये. वैद्यकाच्या दृष्टीने 1 ड्रिंक म्हणजे 12 औंस बियर, 5 औंस वाईन किंवा दीड औंस हार्ड ड्रिंक होय.

सगळयात शेवटी शुगर सब्स्टिटयूटबद्दल. आपली गोड खाण्याची हौस पूर्ण करून घ्यायला मधुमेहींना त्यांच्या चहात घालायला हे वापरतात. थोडया प्रमाणात वापरलंत तर त्यात काहीच अडचण नाही. त्यामुळे कॅन्सर वगैरे होतो ही चुकीची कल्पना आहे. डाएट म्हणून प्यायल्या जाणाऱ्या अनेक पेयांमध्ये ती असतात. सध्या सुक्रालोज नावाचं एक उत्पादन उपलब्ध आहे, ते फारच छान आहे. गरम तसंच थंड पदार्थात ते वापरता येतं. म्हणजे त्याने तुम्ही आइसक्रीम बनवा की खीर, पदार्थाची चव बदलत नाही. तुम्ही साखर वापरली नाही, याची तुम्हाला कल्पनादेखील येत नाही. 

9892245272