तोच खेळ पुन्हा नव्याने

विवेक मराठी    10-Feb-2017
Total Views |


यललिता यांच्या निधनानंतर लगेच उफाळून येईल अशी अटकळ असणारा सत्तासंघर्ष तामिळनाडूत सध्या पाहायला मिळतो आहे. शशिकला आणि पन्नीरसेल्वम असे दोन गट 'आपल्याकडे बहुमत आहे, आपणच जयललिताअम्माचे खरे वारसदार आहोत' असा दावा करत आहेत आणि त्यांनी राज्यपालासमोर ते सिध्द करण्याची तयारी चालवली आहे. रामास्वामी पेरियार यांनी दक्षिणेतील अस्मिता जागवत आपण द्रविड आहोत, आर्य आक्रमक होते, त्यांच्या परंपरा, विचार, प्रतीके नाकारायला हवीत असा नारा दिला व एक चळवळ उभी केली, ती म्हणजे द्रविड चळवळ. रामास्वामी पेरियार यांच्या जस्टिस पार्टीमधून बाहेर पडून सी.एन. अण्णादुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघमची (डीएमकेची) स्थापना केली आणि तामिळनाडूची सत्ताही संपादित केली. त्यांच्या निधनानंतर एम. करुणानिधी पक्षाचे सर्वेसर्वा झाले आणि येथून सत्तासंघर्षाची लागण झाली. द्रविड मुन्नेत्र कळघममधून बाहेर पडून एम.जी. रामचंद्रन यांनी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एडीएमके) हा पक्ष स्थापन केला. त्यांनी काँग्रेसशी संधान बांधून एम. करुणानिधींना सत्तेबाहेर हाकलले, तुरुंगाची हवा खायला लावली. डीएमकेकडून सत्ता एडीएमकेकडे आली. द्रविड चळवळीच्या प्रसार आणि प्रचारासाठी सिनेसृष्टीत काम करणारे एम. करुणानिधी आणि एम.जी. रामचंद्रन हे दोन मित्र सत्तेच्या राजकारणात एकमेकांचे हाडवैरी झाले. रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण यावरून वाद उत्पन्न झाला आणि रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी आणि जयललिता यांच्यात संघर्ष सुरू झाला. पक्षांतर्गत शह-काटशह खेळत जयललिता पक्षाच्या सर्वाधिकारी बनल्या. आता त्यांच्या निधनानंतर पुन्हा तोच खेळ पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. एडीएमके आणि डीएमके यांच्यातील सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत एकाधिकारशाही यामुळे मागील काही दशके तामिळनाडू चर्चेत राहिला आहे.

ज्या तत्त्वासाठी द्रविड चळवळ उदयास आली होती, त्या तत्त्वापासून तामिळनाडूतील हे दोन्ही पक्ष कोसो दूर गेले आहेत असे म्हणण्यापेक्षा ते तत्त्व आज काळाच्या कसोटीवर टिकू शकत नाही असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. दक्षिण भारतातील समतेची चळवळ म्हणजे ब्राह्मणेतरांची चळवळ होती. या चळवळीने आणि विचाराने तामिळनाडूच्या जनजीवनावर आणि सर्व क्षेत्रांवर प्रभाव निर्माण केला होता. पण आज हा विचार केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिला आहे. गेली कित्येक वर्षे डीएमके आणि एडीएमके हे दोन्ही पक्ष आलटून पालटून सत्ता उपभोगत होते आणि आपल्या सत्ता काळात आपल्या विरोधकावर सूड उगवत होते. जयललितांनी करुणानिधींना अटक केली, तर करुणानिधी सत्तेवर आल्यावर त्यांनी जयललितांना अटक केली. आपसातील वैराला सत्तेच्या आधाराने अधिक ठळक केले. ज्या विचाराच्या अधिष्ठानावर या दोन्ही पक्षांची उभारणी झाली, तो विचार आता नामशेष झाला असून केवळ पक्षीय राजकारणासाठी विचार सोबत आहे असे दाखवत सत्तरीच्या दशकापासून व्यक्तिकेंद्रित वाटचाल चालू आहे.

अण्णादुराईंनंतर करुणानिधी आणि रामचंद्रन यांच्यात संघर्ष झाला. रामचंद्रन यांच्यानंतर जानकी आणि जयललिता यांच्यात संघर्ष झाला. करुणानिधी नेतृत्व करत असलेल्या पक्षातही अशा प्रकारचा सुप्त संघर्ष अस्तित्वात आहे. त्यामुळे करुणानिधी आपला उत्तराधिकारी अजून घोषित करू शकले नाहीत. जयललिता यांना जेव्हा मुख्यमंत्रिपदावरून बाजूला व्हावे लागले होते, तेव्हा पन्नीरसेल्वम यांनी आपल्या खुर्चीत जयललिता यांचा फोटो ठेवून आपली निष्ठा व्यक्त करत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम केले. व्यक्तिकेंद्रिततेचा हा कळस होता.

तामिळनाडूतील हा सत्तासंघर्ष कोणत्या थराला जाईल हे वेगळे सांगायला नको. एका विशिष्ट समाजाचा, विचारधारेचा द्वेष करण्यासाठी निर्माण झालेली चळवळ सुरुवातीपासूनच व्यक्तिगत स्वार्थ आणि सत्ताकांक्षा यांनी बरबटलेली होती. आपणच जयललिता यांच्या निकटवर्ती आणि उत्तराधिकारी असल्याचा शशिकला आज दावा करत आहेत. पन्नीरसेल्वम यांचाही तसाच दावा आहे. या दोघांपैकी ज्याच्याकडे जास्त संख्याबळ असेल, तो तामिळनाडूचा मुख्यमंत्री होईल. आपल्या राजकारणासाठी जयललिता यांनी रामचंद्रन यांच्या नावाचा, प्रभावाचा वापर केला आणि सत्तेचा सोपान पार केला. त्या सत्तास्थानी येताच स्वतःचे प्रस्थ विकसित करत 'अम्मा' तामिळनाडूची लोकदेवता झाली. पुढच्या काळात सत्तेवर येणारा मुख्यमंत्री जयललितांच्या प्रतिमेचा आणि प्रभावाचा उपयोग करून घेईल. एकूणच व्यक्तिपूजेची आणि व्यक्तिवादी राजकारणाची ही परिसीमा आहे. विचाराधारित राजकारणाकडून व्यक्तिकेंद्रिततेकडे होणारा हा प्रवास तामिळनाडूत पुन्हा पुन्हा खेळला जातो. आज एडीएमकेमध्ये जो सत्तासंघर्ष चालू आहे, तो पाहता शशिकला काय किंवा पन्नीरसेल्वम काय.. कोणीही सत्तेचा बाजार जिंकले, तरी तत्त्वाची पायमल्लीच होणार आहे. सत्तेच्या घोडयावर कुणी स्वार व्हायचे हा प्रश्न असला, तरी तो संख्याबळ आणि पक्षातील प्रभाव यावर अवलंबून आहे असे म्हणण्यापेक्षा तो मनी- आणि मसल पॉवर यांच्यावर अवलंबून आहे. कारण सत्ताबदल आणि सत्तासंघर्ष याच बळांवर खेळले गेले आहेत.