तामिळनाडूत रंगला राजकीय जल्लीकट्टू!

विवेक मराठी    11-Feb-2017
Total Views |

दि. 5 डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर ओ. पन्नीरसेल्वम हे मुख्यमंत्रिपदाचे काम व्यवस्थित सांभाळू लागले. फेब्रुवारीत मध्येच अचानक अण्णा द्रमुक या पक्षाच्या सरचिटणीसपदी विवेकानंदन कृष्णस्वामी शशिकला यांची निवड करण्यात आली आणि तामिळनाडूच्या राजकारणातील चाप्लुसीने आपले रंग दाखवायला प्रारंभ केला. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाचे सरचिटणीसपद एम.जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता या दोघांनीच भूषवलेले आहे. शशिकला सरचिटणीस झाल्या म्हणजे ते एका मोठया राजकीय डावपेचाचेच अंग होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या निवासस्थानी लाळघोटयांची रांग लागणे हे ओघानेच आले. शशिकला यांनीच मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी गळ त्याच पक्षातल्या काही निवडक राजकारण्यांनी घालायला प्रारंभ केला. त्या तयारच होत्या, किंबहुना त्यासाठी तर सर्व पटाची फेरमांडणी करण्यात आली होती. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी महिलाच हवी हा आग्रह धरण्यात येऊ लागला.

रोबर एक महिन्यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी नवी दिल्लीला प्रयाण केले आणि जल्लीकट्टू या आत्यंतिक क्रूर खेळाला कायदेशीर बनवा, अशी त्यांनी मागणी केली. तो तथाकथित खेळ कायद्यात बसवण्यात आला आणि महिन्याभरातच तो तामिळनाडूच्या राजकीय अंगात इतका भिनला की सगळेच राजकीय नेते बैलांना खो घालत राहिले, बैलांमागे पळत राहिले. हे बैल समविचारी होते की भिन्नविचारी, हा प्रश्नही तिथे गैरलागू ठरला. आता स्पष्टच लिहायचे तर तामिळनाडूत या राजकीय जल्लीकट्टूने उधळलेल्या बैलांनाही लाजवले आहे. तामिळनाडू राज्यात सत्ता कोणाच्या हाती द्यायची यावरून चाललेली धुमश्चक्री संपण्याचे नाव घेत नाही. ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडून राजीनामा घेऊन आपले प्यादे पुढे सरकवायच्या प्रयत्नात जयललितांच्या एकेकाळच्या मैत्रीण शशिकला याच पन्नीरसेल्वमना आडव्या गेल्या आणि राजकारण रंगत गेले.

अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष एम.जी. रामचंद्रन यांच्या पश्चात जयललितांनी वाढवला. 1991 ते 2016 या दरम्यान त्या पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्या अचानक आजारी पडल्या आणि त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. सुरुवातीला इस्पितळातूनच काम पाहणाऱ्या जयललितांनी आपल्याला अधिक वेळ देता येत नाही, असे पाहून पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदासाठी निवडले. आपले वारस या नात्याने आपल्या अत्यंत विश्वासू असलेल्या सहकाऱ्याकडे हे पद देताना त्यांनी काही गोष्टींचा विचार केला असणार, हे उघड आहे. दि. 5 डिसेंबर रोजी जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर ओ. पन्नीरसेल्वम हे मुख्यमंत्रिपदाचे काम व्यवस्थित सांभाळू लागले. फेब्रुवारीत मध्येच अचानक अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या सरचिटणीसपदी विवेकानंदन कृष्णस्वामी शशिकला यांची निवड करण्यात आली आणि तामिळनाडूच्या राजकारणातील चाप्लुसीने आपले रंग दाखवायला प्रारंभ केला. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाचे सरचिटणीसपद एम.जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता या दोघांनीच भूषवलेले आहे. शशिकला सरचिटणीस झाल्या म्हणजे ते एका मोठया राजकीय डावपेचाचेच अंग होते. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या निवासस्थानी लाळघोटयांची रांग लागणे हे ओघानेच आले. शशिकला यांनीच मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, अशी गळ त्याच पक्षातल्या काही निवडक राजकारण्यांनी घालायला प्रारंभ केला. त्या तयारच होत्या, किंबहुना त्यासाठी तर सर्व पटाची फेरमांडणी करण्यात आली होती. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी महिलाच हवी हा आग्रह धरण्यात येऊ  लागला. त्यातूनच ज्यांना त्यांच्याच पक्षाने एकमताने मुख्यमंत्रिपदी विराजमान केले होते, त्यांच्याकडे राजीनामा मागण्यात आला. त्यांनी तो दिला आणि तो आपल्याकडून दबावाने घेण्यात आला असे त्यांनीच नंतर सांगितले. या दरम्यान तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव (महाराष्ट्राच्या राज्यपालांकडेच सध्या हा कार्यभार आहे.) यांनी तो राजीनामा स्वीकारला आणि पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांनाच ते पद सांभाळायला सांगितले. पुढील व्यवस्था कधी, ते त्यांनी स्पष्ट केले नाही. शशिकला यांनी जो एक मुहूर्त घाईघाईने काढला होता, तो विद्यासागर राव यांनी आपण त्या दिवशी चेन्नईत नसल्याचे कारण देऊन उधळून लावला.

भारतीय जनता पक्षाचे एक नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे कधीकधी सत्य बोलतात आणि नेमके तेच बोलतात. तामिळनाडूमध्ये चाललेली सत्तास्पर्धा लक्षात घेता डॉ. स्वामी यांचे मत हे ग्राह्य धरले जाईल असे वाटत होते. त्यांच्या मते राव यांनी शशिकला यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ द्यायला हवी होती, भले त्या एक दिवसाच्या मुख्यमंत्री बनल्या तरी त्यांची हौस भागायला हवी होती. तामिळनाडूत त्या पक्षाच्या आमदारांनी ज्याला नेतेपदी निवडले आहे, त्याला वा तिला मुख्यमंत्रिपदाची शपथ राज्यपालांनी देववणे हा त्यांच्या कर्तव्याचा भाग झाला. राज्यपालांच्या कार्यालयाला त्याची माहिती नसेल असे कसे म्हणणार? मग ते थांबले ते कशासाठी? मात्र त्यांचे हे वाट पाहणे न्याय्य आहे, असे 'द हिंदू' या वृत्तपत्राचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचेही म्हणणे आहे. राज्यपालांनी हा निर्णय विधानसभेच्या सभागृहाला सोडवू द्यावा असे त्यांनी म्हटले. तथापि त्या आधी कोणाला तरी मुख्यमंत्री नेमावे लागेल आणि मगच विधानसभेला तो मान्य आहे की नाही हे विचारून घेता येईल. त्यात धोके आहेत. विधिमंडळ पक्षाची निवडणूक कशी चालते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. म्हणजे तिथे घोडेबाजार (किंवा बैलबाजार) चालणार. हा घोळ घातला गेला, याला कारण शशिकला यांच्यावरील भ्रष्टाचाराचे असलेले आरोप. जयललिता आणि शशिकला यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात 1996मध्ये खटला भरण्यात आला होता. हा खटला भरण्यात आला, तेव्हा तो 66 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबद्दल होता. शशिकला या 1980च्या दशकात जयललिता यांच्या जवळ गेल्या. त्या तेव्हा एका व्हिडिओ कंपनीच्या प्रमुख होत्या आणि जयललिता यांच्या काही भाषणांच्या व्हिडिओ चित्रफिती त्यांनी संग्रहित केल्या होत्या, त्या त्यांना दाखवून त्यांनी जयललिता यांच्या निवासस्थानी घुसखोरी केली. त्यानंतर 1991मध्ये 'पोएस गार्डन' या त्यांच्या महालात आपले स्थान पक्के केले. त्यांनी आपला भाचा, भाऊ आणि इतर नातलगांनाही तिथे आणले. हे अगदीच जनतेच्या डोळयांवर आले. शशिकला यांचा भाचा सुधाकरन हा जयललितांचा मानलेला मुलगा बनला. त्यानंतर केव्हातरी शशिकला या आपल्या विरोधातच कारवाई करायला लागल्याचा संशय जयललितांना आला. 2011मध्ये जयललितांनी या शशिकला यांच्यापासून आपली सुटका करवून घेतली. शशिकला आणि त्यांचे नातलग यांना त्यांनी आपल्या बंगल्यातून हाकलून दिले. मात्र तेव्हा या दोघींवर चालू असणारा खटला संपलेला नव्हता. 2014मध्ये बंगळुरूच्या खास न्यायालयात हा खटला चालला. तिथे जयललिता आणि शशिकला यांना दोषी धरण्यात येऊन चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याबरोबरच त्यांना शंभर कोटी रुपयांचा दंडही करण्यात आला. या दोघींसह इतर दोघांनी एकवीस दिवस तुरुंगात काढले. त्यानंतर ते जामिनावर सुटले. जामिनावर सुटलेले सर्वच कैदी निर्दोष असतील असा जरी अनेकांचा समज असला, तरी ते तसे नसतात. कर्नाटक उच्च न्यायालयात या शिक्षेच्या विरोधात केलेल्या अपिलावर न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. कर्नाटक सरकारनेच या खटल्याचा आग्रह धरलेला असल्याने त्यांनी त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलेले आहे, त्याचा निकाल अजून लागायचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीमुक्कामी असणारे राजकारणी वकील आपण जणू सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहोत अशा थाटात ''या खटल्यात हे चौघेही निदोष सुटतील'' असे सांगू लागले होते. वास्तविक अजून त्या खटल्याचा निकाल लागायचा आहे. तरीही शशिकला यांना मुख्यमंत्रिपद हवे आहे. हाही न्यायव्यवस्थेवर दबाव टाकायचाच एक भाग आहे. त्या खटल्याचा निकाल कधीही लागू शकेल, हे गृहीत धरून विद्यासागर राव यांनी शशिकला यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ द्याायला विलंब लावला असण्याची शक्यता आहे. या खटल्याचा निकाल काय लागतो हे न पाहताच विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड करणे ही झुंडशाहीच आहे. ती शशिकला यांनीच घडवून आणली यात शंका नाही. सहा वर्षांपूर्वी ज्या 'पोएस गार्डन'मधून शशिकला आणि त्यांच्या परिवाराची हकालपट्टी करण्यात आली होती, ती सर्व अठरा जणांची टोळीही त्या महालात येऊन दाखल झाल्याचा दाखला तामिळनाडूतील प्रसार माध्यमे देत आहेत. जयललिता यांनी शशिकला यांची केवळ महालातूनच हकालपट्टी केली असे नव्हते, तर पक्षातूनही त्यांची हकालपट्टी केली होती. त्यात शशिकला यांचा नवरा एम. नटराजन, टी.टी. दिनकरण यांचाही समावेश होता. सर्व जण आपल्याविरुध्द कारस्थान करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर शशिकला यांनी लेखी पत्र देऊन त्यांची माफी मागितली, तेव्हा जयललिता यांनी त्यांची हकालपट्टी रद्द करून त्यांना पक्षात पुन्हा स्थान दिले. तथापि त्यांना पुन्हा महालात घेतलेले नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
या सगळया धबडग्यात सर्वच राजकारण्यांनी सोयीस्कररित्या एका गोष्टीचा विसर पडू दिला आहे. जयललिता यांनी पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रिपद दिले होते. ते त्यांचे अधिक निष्ठावान सहकारी मानले गेले. जयललिता निर्दोष मुक्त झाल्यावर त्यांनी जयललितांसाठी आपले मुख्यमंत्रिपद सोडून दिले आणि जयललिता पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. त्या आजारी पडल्या आणि काम अगदीच करता येणे अशक्य असल्याचे पाहून त्यांनी पन्नीरसेल्वम यांच्याकडेच पुन्हा एकदा हे पद दिले. नंतर त्या सुखरूप परतल्याच नाहीत. त्यानंतर दुखवटयाचे दिवस पूर्ण होताच, तामिळनाडू अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी पन्नीरसेल्वम यांचीच अधिकृतपणे निवड करण्यात आली. म्हणजे तेव्हा त्यात हस्तक्षेप करावा असे शशिकला यांनाही वाटलेले नव्हते. मग आताच त्यांना ही दुर्बुध्दी का व्हावी? याचे कारण पुन्हा हा खटलाच आहे. एका जल्लीकट्टूसाठी रस्त्यावर कशी गर्दी जमवता येते, ते तामिळनाडूने दाखवून दिले असल्याने त्यांच्या मोहाला अधिक मोहोर फुटला आणि त्यांनी तातडीने पावले टाकली. त्यांच्या दिमतीला सर्व सोमेगोमेही उतरले. पण शशिकला यांचे दुर्दैव असे की या खेपेला जनता पन्नीरसेल्वम यांच्या बाजूने, तर 130 आमदार शशिकला यांच्या दिमतीला असे चित्र निर्माण झाले. केवळ अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे राज्यसभेचे सदस्य डॉ. व्ही. मैत्रीयन आणि माजी मंत्री एस.पी. षण्मुगनाथन यांच्यासह पाच आमदार पन्नीरसेल्वम यांच्या समर्थनार्थ पुढे आले. जे आमदार शशिकला यांच्याबरोबर राहिले, त्या सगळयांना चेन्नईपासून 56 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका आलिशान अशा गोल्डन बे रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवण्यात आले होते. त्यांच्याशी कोणाचाच संपर्क होऊ दिला जात नव्हता. जर शशिकला यांच्याशीच त्यांची बांधिलकी आहे किंवा होती, तर त्यांना असे सर्व समाजापासून वेगळे ठेवण्याचे कारण काय? हा प्रश्न उरतोच. त्या ठिकाणापासून अलीकडे प्रत्येक वाहनाला तपासण्यात येत होते आणि मगच त्यास आत सोडायचे की नाही हे ठरवले जात होते.

 शशिकला या स्वत:ला 'चिन्नम्मा' म्हणवून घेतात आणि त्या मागासवर्गीय असल्याने त्यांच्या वाटेला कोणी जायचे कारण नाही असेही बजावले जात होते. आपल्या समाजात जात किती भक्कम स्थान मिळवून आहे, त्याचे हेही एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी किंवा जे. जयललिता यांनी जातीसाठी भ्रष्टाचार केला असे कोणीही म्हटलेले नाही. जयललिता इस्पितळामध्ये दाखल झाल्या, तेव्हा त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून यज्ञ आदी विधी करण्यात आले होते, हा खरे तर द्राविडी विचारसरणीचाच पराभव होय. पण त्याचाही विचार कोणी केलेला नाही. इस्पितळामध्ये दाखल होत असताना जयललिता यांनी पन्नीरसेल्वम यांच्याकडे काही काळापुरते तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद दिले, तेव्हाही त्यांची जात विचारात घेतली गेली नव्हती.

आता अचानक शशिकला यांची महत्त्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनी पक्षावर किंवा पक्षाने शशिकला यांच्यावर दबाव आणून शशिकला यांना पक्षाने मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेण्याची गळ घातली. जणू काही आपला त्या पदासाठीच जन्म आहे असे वाटून घेऊन त्यांनी त्यासाठी तयारी केली. हे सर्व सांगण्याचे कारण असे की अचानक शशिकला यांना पक्षाने आपल्या नेतेपदी निवडले आणि पन्नीरसेल्वम यांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. त्या वेळी असे ठरले की, पन्नीरसेल्वम यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारून शशिकला यांना मदत करावी. खुद्द पन्नीरसेल्वम त्यासाठी तयार झाले. पण मग त्यांच्या लक्षात आले की, आपण जर मुख्यमंत्रिपदी जनतेच्या पाठिंब्यावर कायम राहिलो, तर काय बिघडणार आहे? बत्तीस जिल्हे अवर्षणग्रस्त असलेल्या तामिळनाडूला त्यांचा अनुभव उपयोगी पडेल, ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. जल्लीकट्टूसाठी अगदी रेटून प्रयत्न करणारे पन्नीरसेल्वम यांनी समाजात आधीच आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र आपण दबावाखाली राजीनामा दिला, तो मागे घेतो हा त्यांचा पवित्रा योग्य नव्हता. तो फेटाळला गेला. शशिकला यांची अवस्था 'दिसो लागे शिक्षा' अशी झाली आणि  त्यांनी आपल्या अटकेच्या विरोधात कायदेशीर अडथळे निर्माण व्हावेत या दृष्टीने मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचा निर्णय केला. वास्तविक त्यांना जर न्यायालयाने शिक्षा ठोठावली, तर त्यांना ती भोगायला लावण्यापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही. हा लेख प्रसिध्द होण्यापूर्वीही कदाचित या खटल्याचा निकाल लागलेला असेल. त्या वेळी कदाचित शशिकला यांना सर्व कटकारस्थानांमधून मिळालेले त्यांचे ते पदही कदाचित सोडावे लागेल.

9822553076