गरज संपली, युती तुटली

विवेक मराठी    13-Feb-2017
Total Views |

ही युती 25 वर्षे टिकली. दीर्घकाळ टिकलेली युती असे तिचे वर्णन केले जाते. गरज होती म्हणून ती दीर्घकाळ टिकली. सेना-भाजप युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेले. राजकीय वातावरण बदलत गेले. भाजपा स्वत:च्या ताकदीवर वाढू लागला. युतीची गरज राहिली नाही. राजकारणाचा केंद्रबिंदूदेखील सरकला.

शिवसेना-भाजपा युती का होती? उत्तर असे की, या युतीची त्यांना गरज होती. शिवसेना-भाजप युती का मोडली? उत्तर असे की, युतीची गरज संपली. मला आठवते त्याप्रमाणे 1986 सालापासून देशभर रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाचे वारे वाहू लागले. जनमत तापू लागले. रामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाने हिंदू समाजमानस आंदोलित झाले. स्वातंत्र्यानंतर हिंदू समाजाच्या श्रध्दा, आकांक्षा डावलल्या गेल्या, त्यावर अन्याय झाला, अशी भावना निर्माण झाली. अयोध्येचे आंदोलन हे निमित्तमात्र झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लोकभावनांचा अचूक अंदाज आला आणि शिवसेना हिंदुत्ववादी झाली. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा मागे पडला आणि हिंदूंच्या हक्काचा मुद्दा पुढे आला. हे परिवर्तन स्वाभाविकपणे घडले आणि लोकांनी शिवसेनेला स्वीकारले.

तेव्हा भाजपा गांधीवादी समाजवादाच्या मोहजालात अडकलेला होता. या मोहजालातून त्याला बाहेर यायला कष्ट पडत होते. परंतु अखेर भाजपाला गांधीवादी समाजवाद सोडावा लागला आणि आपल्या मूळ विचारधारेकडे भाजपा आला. भाजपादेखील हिंदुत्ववादी पक्ष म्हणून गणला जाऊ लागला. राजकारणात हिंदुत्ववादी शक्ती तेव्हा प्रभावी नव्हती. या शक्तीला राजकारणात सत्तास्थानी असलेल्यांचा प्रखर विरोध होता. त्या विरोधावर मात करायची असेल, तर हिंदुत्ववादी शक्ती विभाजित राहून चालणार नव्हती, तिचे ध्रुवीकरण होणे आवश्यक होते. या धु्रवीकरणाविषयी अनेक वर्षे संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीतही चर्चा होत असत. शिवसेनेशी युती करावी असे सर्व कार्यकर्त्यांचे मानस होते. निर्णय भाजपाला करायचा होता. त्यांनीही बदलत्या राजकीय वाऱ्यांचा अंदाज घेऊन युती करण्याचा निर्णय घेतला.

ही युती 25 वर्षे टिकली. दीर्घकाळ टिकलेली युती असे तिचे वर्णन केले जाते. गरज होती म्हणून ती दीर्घकाळ टिकली. सेना-भाजपा युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेले. राजकीय वातावरण बदलत गेले. भाजपा स्वत:च्या ताकदीवर वाढू लागला. 2014 साली शिवसेनेशी युती नको असा विचारप्रवाह प्रबळ झाला. आणि युती तुटली. 2014 साली युतीची गरज राहिली नाही. राजकारणाचा केंद्रबिंदूदेखील सरकला. आता हिंदुत्व सांगण्याची गरज राहिली नाही, त्याऐवजी विकास आणि सर्वांचा सहभाग हे दोन विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. भाजपाने हे विषय आपले केले आणि लोकांनी ते स्वीकारले. कालानुरूप शिवसेनेत बदल न झाल्यामुळे शिवसेनेशी संगत नको, असे सर्वांचे मत बनत गेले. मुंबई महानगरपालिकेत युती तुटल्याबद्दल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीदेखील आनंद व्यक्त केला आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनीदेखील आनंद व्यक्त केला.

युती तुटण्याची ही तात्कालिक कारणे झाली. जागावाटपाबद्दल एकमत झाले नाही. जागावाटपासाठी अनेक दिवस वाटाघाटी चालल्या. या सर्वांना तसा काही अर्थ नव्हता, दोघांनाही युती नको असा निर्णय मनोमन केलेलाच होता. युती तोडण्याचे खापर आपल्या डोक्यावर येऊ नये एवढाच प्रश्न होता. म्हणून दोन्ही पक्षांचे नेते वेळकाढूपणा करीत होते. जेव्हा वेळ संपली तेव्हा युती तुटली. त्याची 'ना खंत ना खेद' अशी स्थिती आहे.

तरीदेखील मतदारांचा एक वर्ग असा आहे की त्याला आजही वाटते की दोघांचीही युती असायला पाहिजे होती. हिंदुत्ववादी शक्तींनी आपआपसात लढू नये, असे या वर्गाला प्रामाणिकपणे वाटते. म्हणून शिवसेना आणि हिंदुत्त्व याचा थोडा विचार करणे आवश्यक झाले आहे. शिवसेनेच्या दृष्टीने हिंदुत्व हा निवडणूक जिंकण्याचा एक मार्ग झालेला होता. हिंदुत्वाचा असा विचार करता येत नाही. हिंदुत्व ही जीवननिष्ठा आहे, तशी ती वैचारिक निष्ठादेखील आहे. शिवसेनेने ती केवळ सत्तानिष्ठा केली.

या सत्तानिष्ठेमुळे एकेकाळी हिंदुत्वाच्या तोफा असलेले छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विचारधारा हिंदुत्व विचारधारेला पोषक नाही, परंतु हे दोन्ही पक्ष सत्तेवर असतात. सत्ता पाहिजे असल्यास त्या पक्षात जावे लागते. काल आपण काय बोलत होतो, याचा विचार न करता आपल्या वैचारिक निष्ठांना सोडचिठ्ठी देण्यात त्यांना काही वाटले नाही. त्याचा परिणाम लोकांवर चांगला होत नाही. शिवसेनेची प्रतिमादेखील खराब झाली. सत्तेसाठी राबणारा पक्ष अशी या पक्षाची प्रतिमा झाली.

मुंबई आणि ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या हातात दीर्घकाळ राहिल्या. सत्ता भ्रष्ट करते, हा सत्तेचा सिध्दान्त आहे. या दोन्ही महानगरपालिकांतील भ्रष्टाचाराच्या असंख्य कथा उघड झालेल्या आहेत, त्या वाचकांना माहीत आहेत. घरबांधणी, रस्तेबांधणी, हे दोन विषय पैसा मिळविण्याचे विषय झाले. हिंदुत्व म्हणजे भ्रष्टाचार नव्हे. तसे समीकरण होणे, हे विचारधारेच्या दृष्टीने फारच घातक आहे. एक वेळ सत्ता मिळाली नाही तरी चालेल, ती मिळण्यासाठी जेवढी प्रतिक्षा करावी लागेल तेवढी करू; परंतु विचारांशी तडजोड केली जाणार नाही, मूल्यांची तडजोड केली जाणार नाही, अशी टोकाची भूमिका असावी लागते.

ज्या ज्या वेळी भाजपाने हिंदुत्वाच्या भूमिकेपासून फारकत घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्यात काही भेसळ करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा भाजपाला त्याचा जबरदस्त फटका बसलेला आहे. 1984 साली लोकसभेच्या निवडणुकीत गांधीवादी समाजवादाने दोन खासदार निवडून आणले. 2004 साली केंद्रातील सत्ता गेली. लालकृष्ण अडवाणी पाकिस्तानच्या प्रवासाला गेले, त्यांनी जीनांची नको तेवढी स्तुती केली, त्याचा परिणाम त्यांचे अध्यक्षपद जाण्यात झाला. असे होण्याचे कारण असे की, हिंदुत्वाला जीवन वाहिलेली एक मोठी शक्ती भाजपाच्या मागे उभी आहे. भाजपावर तिचा अंकुश असतो. विचारनिष्ठा सोडा, मग त्याचे परिणाम भोगा असे साधे गणित असते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने बाहेरून आलेल्या काही जणांना उमेदवारी दिलेली आहे. ते सर्व भाजपा विचारांशी एकनिष्ठ राहिले, तर चांगलेच आहे; पण ते स्वत:च्या स्वार्थाशी एकनिष्ठ राहिले, तर हिंदुत्वनिष्ठ शक्ती ते सहन करणार नाही आणि त्याचे परिणाम भाजपाला भोगावे लागतील.

शिवसेनेचे तसे नाही. शिवसेना हा घराणेशाहीवर चालणारा पक्ष झालेला आहे. काँग्रेस जसा घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे आणि काँग्रेसच्या प्रमुखपदी नेहरू-गांधी घराण्यातील कोणी तरी लागतो, तसे शिवसेनेच्या प्रमुखपदी ठाकरे घराण्यातील कोणी तरी लागतो. त्या प्रमुखाची जेवढी समज, जेवढी वैचारिक उंची, जेवढे राजकीय ज्ञान, तेवढे त्या पक्षाचे ज्ञान ठरते. राजकीय पक्ष कसा चालवावा, हा त्या त्या पक्षाचा विषय आहे. परंतु तत्त्वतः विचार करता घराणेशाही ही केव्हाही वाईटच. लोकशाही येण्याचे कारण लोकांना राजेशाही नको होती. एक राजघराणे आणि ते आमच्यावर राज्य करणारे कोण? असा प्रश्न निर्माण झाला. लोक सार्वभौम आहेत आणि म्हणून ते ठरवतील की राज्य कोणी करायचे. लोकशाहीत राजकीय पक्ष सत्तेवर जाण्याचे एक साधन असते. हे साधनदेखील लोकशाही पध्दतीनेच चालले पाहिजे. वंशपरंपरेने एकाच घराण्याकडे नेतृत्व ही संकल्पना लोकशाहीला पूरक नाही. भाजपा घराणेशाहीवर चालणारा पक्ष नसला, तरी पक्षातील काही नेते आपलेच घराणे पुढे चालविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या महानगरपालिका निवडणुकीत याचे दर्शन आपल्याला घडते. हा विषय असंख्य हिंदुत्वनिष्ठांच्या पचनी पडणे कठीण आहे, हे येथे नमूद केले पाहिजे.

शिवसेनेची नेमकी विचारधारा कोणती? विकासाच्या त्यांच्या संकल्पना काय आहेत? आत्ताची जी पिढी आहे, तिला जीवनातील सुरक्षा पाहिजे आहे, रोजगार पाहिजे आहे, सन्मान हवा आहे आणि राज्यसत्तेत जागा हवी आहे. कधी नव्हे एवढा आज शेतकरी उघडयावर पडला आहे. सध्या स्वस्त भाज्यांचा मोसम चालू आहे. पाच रुपयात कोथिंबिरीची जुडी मिळते. शेतकऱ्याला काय मिळते? त्याचा उत्पादन खर्च मिळतो का? त्याला असे वाऱ्यावर का सोडण्यात आले आहे? शिवसेनेचे शेती अर्थशास्त्र काय असणार आहे? असे असंख्य प्रश्न पुढे येतात. निव्वळ भावना चेतवून 'मुंबई मराठी माणसाची' असल्या पोकळ घोषणा देऊन निवडणुका जिंकण्याचा कालखंड गेला आहे. मुंबईपुरता जरी विचार करायचा तर सुखद आणि सुरक्षित प्रवास, माफक किमतीत घर, माफक किमतीत भोजन, माफक मूल्यात उत्तम शिक्षण या मुंबईकरांच्या गरजा आहेत. घोषणा देऊन त्या पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी विकासाचे आराखडे पाहिजेत. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि परिणामही दिसले पाहिजेत. आज हिंदुत्वाचा भावनिक मुद्दा मतदारांना आकर्षित करणारा राहिलेला नाही. मराठा तरुण आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. तो जीवनाची सुरक्षा मागतो. या विषयांना जो स्पर्श करील, तो निवडणूक कदाचित जिंकेल.

तशी मुंबईची ही निवडणूक शिवसेनेच्या अस्तित्वाचीच निवडणूक आहे. स्वबळावर शिवसेना सत्तेवर आली, तर ते शिवसेनेचे फार मोठे यश समजले जाईल आणि ती स्वबळावर सत्तेवर आली नाही, तर शिवसेनेत फाटाफुटीला उधाण येईल. राज ठाकरे यांनी शिवसेनेशी युती करण्याचा पाठविलेला प्रस्ताव शिवसेनेने मान्य केला नाही. मनसेच्या दृष्टीनेही ही अस्तित्वाची लढाई आहे. मागच्या वेळेस मनसेने अनेक जणांना निवडून आणले. यंदा ती संख्या गाठणे त्यांनाही कठीण जाणार आहे. मनसे आपल्या कर्तृत्वाने संपली तर शिवसेनेचेच बळ वाढणार आहे. कारण दोघांचाही पाण्याचा हौद एकच आहे. दुसरा प्रतिस्पर्धी गेला तर या हौदावर पहिल्या प्रतिसर््पध्याचाच दावा राहील. भाजपा स्वबळावर निवडणूक लढवीत आहे. पंचवीस वर्षांत तो पहिल्यांदाच हा प्रयोग करीत आहे. निवडून येण्याची शक्यता या निकषावर अनेकांना तिकिटे मिळाली आहेत. ही शक्यता प्रत्यक्षात कशी अवतरेल, हे सांगणे अवघड आहे. तथापि महाराष्ट्राची सत्ता मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानेभक्कम होऊ शकते किंवा दुर्बळही होऊ शकते, इतके महत्त्व या निवडणुकांना आहे.

vivekedit@gmail.com