मधुमेह आणि त्वचाविकार

विवेक मराठी    14-Feb-2017
Total Views |

त्वचा आणि मधुमेह यांचा काही संबंध असेल असं कुणालाही वाटणार नाही. परंतु एका अभ्यासात असं दिसून आलं की जवळपास 60% मधुमेहींमध्ये त्वचेशी निगडित कुठला ना कुठला आजार असतो. यातल्या काही आजारांशी मधुमेहाचा नातं इतकं घट्ट आहे की ते दिसताक्षणीच डॉक्टर मधुमेहाची तपासणी करून घ्यायचा सल्ला देतात. विशेषत: अशा बहुतेक प्रश्नांमध्ये त्वचेला होणारा जंतुसंसर्ग हे मुख्य कारण असतं. मधुमेहावर केल्या जाणाऱ्या उपचारांमधूनदेखील त्वचेची सुटका होतेच असं नाही. इन्श्युलीन घेऊन घेऊन त्वचेखालची चरबी कमी झाल्याची किंवा इन्श्युलीनच्या सान्निध्यात त्वचेखालची चरबी खूपच वाढल्याची अनेक उदाहरणं आहेत. शिवाय चुकूनमाकून औषधांची ऍलर्जी झालीच, तर त्याचेही भोग त्वचेच्याच नशिबी येतात.

रकरणी त्वचा आणि मधुमेह यांचा काही संबंध असेल असं कुणालाही वाटणार नाही. परंतु एका अभ्यासात असं दिसून आलं की जवळपास 60% मधुमेहींमध्ये त्वचेशी निगडित कुठला ना कुठला आजार असतो.

यातल्या काही आजारांशी मधुमेहाचा नातं इतकं घट्ट आहे की ते दिसताक्षणीच डॉक्टर मधुमेहाची तपासणी करून घ्यायचा सल्ला देतात. विशेषत: अशा बहुतेक प्रश्नांमध्ये त्वचेला होणारा जंतुसंसर्ग हे मुख्य कारण असतं. मधुमेहात रक्तात ग्लुकोज वाढतं. हे ग्लुकोज वेगवेगळया रोगजंतूंना पर्वणी वाटतं. त्यांच्यासाठी आयतं आणि मुबलक खाद्य उपलब्ध होतं. शिवाय मधुमेहामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमजोर पडलेली असते. साहजिकच रोगजंतूंचं फावतं. ते फोफावतात. मधुमेही रुग्णामध्ये गुप्तांगाच्या जागी कंड सुटणं खूप कॉमन आहे. स्त्रियांमध्ये अनेकदा केवळ याच कारणावरून मधुमेहाचं निदान होतं. पुरुषांमध्येदेखील शिस्नाच्या जागेला खाज येणं आणि तिथल्या त्वचेला कातरे पडणं हे मधुमेहाचं हमखास लक्षण मानलं जातं. तुमच्यापैकी कोणालाही यातलं कुठलंही लक्षण दिसत असेल आणि खाणं कमी न करताही तुमचं वजन घटलेलं असेल, तर कृपया त्वरित तुमची साखर तपासून घ्या. हे होतात फंगसमुळे. बहुतेक फंगल इन्फेक्शन्स खूप खाजरे असतात. म्हणून कंड.

एरव्हीसुध्दा मधुमेहात त्वचेला कंड सुटण्याचं प्रमाण जास्त असतं. बहुधा त्याचा संबंध त्वचेच्या कोरडेपणाशी असतो. इथे एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. मधुमेहामुळे येणारी खाज काही ठरावीक जागी असते. संपूर्ण अंगाला खाजवावं लागत असेल, तर त्यामागचं कारण शोधणं गरजेचं आहे. मधुमेहात अशी अंगभर खाज क्वचितच असते. त्वचेचा कोरडेपणा दूर करणारी औषधं वापरून यावर मात करणं शक्य आहे. 

मधुमेहाशी पक्की जवळीक सांगणारा त्वचेचा असाच एक आजार म्हणजे कार्बन्कल. फक्त हा फंगसशी सुतराम नसलेला प्रश्न. त्यामुळे कंड वगैरे काही नसतो यात. त्वचेत जीवाणू (बॅक्टेरिया) शिरून तिथे इन्फेक्शन करतात. बहुधा पाठीला, मानेच्या मागच्या भागाला आणि मांडीला भरपूर दुखणारा फोड येतो. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? फोड तर मधुमेह नसलेल्या लोकांनादेखील येतो. पण हा कार्बन्कलचा फोड अनेकमुखी असतो. फोडाला एखाद्या चाळणीसारखी कित्येक छिद्रं असतात. प्रचंड दुखतो, बहुतेक वेळा ताप येतो. ग्लुकोजदेखील खूप वाढलेलं असतं. व्यवस्थित उपचार केले की फोड बरा होतो. अर्थात बहुधा शस्त्रक्रिया करावी लागते. फोड बरा झाल्यावर त्या जागी हमखास व्रण राहतो.

इन्फेक्शनच्या बाबतीत एका इन्फेक्शनबद्दल मुद्दाम सांगायला हवं. कारण अनेकदा यावर जे उपाय होतात, ते फंगल इन्फेक्शनच्या दिशेने जाणारे असतात. काखेत चॉकलेटी रंगाचा एक बराच मोठा चट्टा येतो. त्याला खूप जास्त कंड सुटत नाही. याला डॉक्टर एरिथ्रास्मा असं म्हणतात. यावर एरिथ्रोमायसिन नावाचं ऍंटिबायोटिक गुणकारी ठरतं. अर्थातच फंगल इन्फेक्शनसाठी वापरली जाणारी औषधं कृपया वापरू नयेत.

विषय निघालाच आहे, तर एका गोष्टीची कल्पना दिलेली बरी. मधुमेह आणि इन्फेक्शन यांचा एकमेकांमध्ये संबंध गुंतलेला आहे. इन्फेक्शन झालं म्हणजे रुग्णाचं ग्लुकोज वाढतं व ग्लुकोज वाढलं की इन्फेक्शन नियंत्रणात आणणं अवघड असतं. मग कधीकधी ग्लुकोज नियंत्रणात आणायला इन्श्युलीनचा आधार घ्यावा लागतो किंवा थोडी वरच्या दर्जाची ऍंटिबायोटिक्स वापरणं भाग पडतं. 

त्वचा हा शरीरात आत चाललेल्या घडामोडींचा आरसा आहे असं म्हणतात. त्वचेच्या बाबतीत हे शंभर टक्के खरं मानायला हवं. होतं काय की, टाइप टू मधुमेहात इन्श्युलीन रेझिस्टन्स असतो. त्यात शरीरात भरपूर इन्श्युलीन बनतं, फक्त ते रक्तातलं ग्लुकोज ताळयावर आणायचं आपलं काम नीट करत नाही. त्याला प्रत्यवाय म्हणून आपल्या बीटा पेशी अधिकाधिक इन्श्युलीन बनवू लागतात. आता हे जास्तीचं इन्श्युलीन आपलं नेमून दिलेलं काम करण्यात कुचकामी ठरत असलं, तरी त्याचा त्वचेवर होणार परिणाम मात्र जोरात चालू राहतो. इन्श्युलीन मुळातच वाढीला चालना देणारं हॉर्मोन आहे. त्यामुळं ते त्वचेच्या पेशींवर आपली जादू दाखवायला सुरुवात करतं. त्वचेच्या पेशी जास्त बनतात. यामुळे त्वचेचा वरचा थर थोडा जाडसर होतो. त्याचा रंग जरासा काळपट असतो आणि दिसायला त्वचेचा तितका भाग मखमलीच्या एखाद्या कापडाकडे पाहावं तसा भास देणारा असतो. या प्रकाराला डॉक्टर अकँथोसिस नायग्रिकान्स असं म्हणतात. काळपट वर्णामुळे नायग्रिकान्स. त्याचप्रमाणे अगदी इवलेसे मसेदेखील त्वचेवर उगवतात. त्यांना स्किन टॅग्स म्हणतात. बहुदा अकँथोसिस नायग्रिकान्स आणि स्किन टॅग्स गळा, काख आणि जांघा यामध्ये दिसतात.

या दोन्ही गोष्टी केवळ इन्श्युलीन रेझिस्टन्सच्या द्योतक आहेत, प्रत्यक्ष मधुमेहाच्या नव्हेत. त्यामुळे तुमच्या त्वचेवर असे चट्टे दिसले म्हणजे तुम्हाला मधुमेह झालाय किंवा होणार आहे अशी अटकळ बांधता येत नाही. तुमच्या बीटा पेशी त्या इन्श्युलीन रेझिस्टन्सवर मात करण्याइतकं इन्श्युलीन बनवायला खंबीर असतील, तर तुम्हाला कदाचित मधुमेह होणारदेखील नाही. पण तुमच्या मानेवर असं काही दिसलं, तर थोडी सावधगिरी बाळगायला आणि मधुमेह होऊ नये म्हणून पावलं उचलायला काय हरकत आहे!

मधुमेहात होणारे अन्य काही त्वचारोग आहेत. पण ते तितक्या मोठया प्रमाणात दिसत नाहीत. नेक्रोबायोसिस लिपोईडिका डायबेटिकोरम या नावावरूनच या त्वचेच्या आजाराचा आणि मधुमेहाचा किती घट्ट संबंध आहे ते स्पष्ट होतं. पुरुषांपेक्षा ती स्त्रियांमध्ये तिपटीने जास्त दिसतात. वयाच्या पस्तिशीत ती का प्रथम उद्भवतात याचा खुलासा अजून झालेला नाही. यातली 80% लीजन्स पायाच्या पुढच्या भागात जिथे हाड हाताला लागतं, तिथे दिसतात. उरलेली 20% शरीराच्या उर्वरित भागात आढळून येतात. तसं या आजाराचं निदान अगदी सोपं आहे. बहुतेक डॉक्टर नुसतं एका नजरेत निदान करतात. अगदीच काही समस्या आली तर बायोप्सी करून निदानावर शिक्कामोर्तब करता येतं.

काही मधुमेहींमध्ये पायाच्या याच भागामध्ये अर्ध्या सें.मी. किंवा त्यापेक्षा जरासे मोठे असे चट्टे दिसतात. त्यांना डायबेटिक डर्मोपॅथी म्हटलं जातं. यात छोटे चट्टे उगवतात. नेक्रोबायोसिस लिपोईडिका डायबेटिकोरमच्या उलट असे छोटे चट्टे पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात. त्या पुरुषांचं वयोमान जरा जास्त - म्हणजे पन्नाशीच्या आसपास असतं. असे चट्टे दिसायला लागले की धोक्याची घंटा वाजायला लागते. कारण या गटातल्या लोकांमध्ये मधुमेहात दिसणारी कॉम्प्लिकेशन्स लवकर झालेली दिसतात. विशेष म्हणजे फक्त चट्टे सोडून यात कुठलीही लक्षणं नसतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. यावर कुठलेही उपचार करण्याची गरज नसली, तरी तुम्ही आपलं मूत्रपिंड, डोळे आणि मज्जातंतू यांच्याशी निगडित प्रश्नांची तपासणी करून घेतली पाहिजे, इतकं नक्की.

त्वचेत असलेल्या अनेक भागांना रक्तातलं वाढीव ग्लुकोज चिकटतं. याला 'ग्ल्यायकेशन' म्हणतात. त्यामुळे त्वचेचा लवचीकपणा कमी होतो. जेव्हा आपण आपले सांधे वापरतो, तेव्हा त्या सांध्यावरची त्वचादेखील आकुंचित अथवा प्रसारित होणं अपेक्षित असतं. त्वचेचा लवचीकपणा कमी झाल्यास ती सांध्यांच्या हालचालीतला सहजपणा घालवून टाकते. त्या हालचालींमध्ये बाधा आणते. सांधे ढिम्म हलत नाहीत. याला 'लिमिटेड जॉइंट मूव्हमेंट' असं म्हणतात. म्हणजे माणसाने नमस्कार करायला दोन्ही हात जोडले, तर ती बोटं एकमेकांना चपखलपणे चिकटत नाहीत. त्यात थोडीशी जागा राहते. वैद्यकीय परिभाषेत या चिन्हाला प्रेयर साइन असं नाव आहे.

कधीकधी त्वचा किंवा त्याखालचा भाग आखडल्याने त्यात दडलेल्या नसांवर दाब पडतो. हाताच्या मज्जातंतूंवर दाब पडून प्रसंगी बोटं धड सरळदेखील करता येत नाहीत. मूठ वळवणं अथवा उघडणं कठीण होऊन बसतं. डयुपिट्रान्स कॉन्ट्रक्चर नावाचा प्रश्न अशाच गोष्टींमुळे निर्माण होतो.

त्वचेचे काही आजार प्रत्यक्ष मधुमेहाशी निगडित नसले, तरी मधुमेहासोबत येणाऱ्या इतर आजारांची लक्षणं म्हणून मधुमेहींच्या उरावर बसतात. टाइप वन मधुमेह हा एक वेगळा आजार आहे. त्यात स्वत:चं शरीरच स्वत:च्या बीटा पेशींचा शत्रू बनतं. त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नायनाट करतं. म्हणून त्या रुग्णाला मधुमेह होतो. रोगप्रतिकार करणाऱ्या स्वत:च्या पेशींनी स्वत:च्याच शरीराच्या पेशींवर हल्ला करणं याला ऑॅटो इम्युनिटी म्हणतात. असे अनेक ऑॅटो इम्यून आजार आहेत. त्यातले काही म्हणजे पंडुरोग, सोरियासिस, लायकेन प्लानस मधुमेही माणसांची साथसंगत सोडत नाहीत.

मधुमेहात कोलेस्टेरॉल वाढलं नाही असा माणूस विरळा. म्हणजे चरबीची पुटं क्वचित डोळयांच्या आसपास, गुडघ्याच्या पुढच्या किंवा कोपराच्या मागच्या बाजूला आपलं बस्तान बसवतात. पिवळट पांढुरके डाग तयार करतात. झॅन्थेलस्मा, झॅन्थोमा त्यामुळेच बनतात. ते दिसायला विचित्र दिसतं. ''हे काय झालं?'' अशा अनेकांच्या नजरांना रुग्णाला सामोरं जावं लागतं.

मधुमेह सध्या नखांनाही सोडत नाही. नखांच्या आसपास पू होणं, नखं पिवळी पडणं यासारखे प्रकार चालूच असतात.

मधुमेहावर केल्या जाणाऱ्या उपचारांमधूनदेखील त्वचेची सुटका होतेच असं नाही. इन्श्युलीन घेऊन घेऊन त्वचेखालची चरबी कमी झाल्याची किंवा इन्श्युलीनच्या सान्निध्यात त्वचेखालची चरबी खूपच वाढल्याची अनेक उदाहरणं आहेत. शिवाय चुकूनमाकून औषधांची ऍलर्जी झालीच, तर त्याचेही भोग त्वचेच्याच नशिबी येतात. सुदैवाने 'स्टीव्हन जॉन्सन सिन्ड्रोम' नावाचा औषधामुळे होणारा गंभीर आजार मधुमेहाच्या उपचारांमुळे अत्यंत दुर्मीळ आहे, हीच काय ती समाधानाची बाब.

9892245272