"रुग्णाच्या चेहऱ्यावरचं हास्य मोलाचं" - डॉ. अमित दांदळे

विवेक मराठी    14-Feb-2017
Total Views |

त्वचा हा पंचेंद्रियांपैकी एक महत्त्वाचा असा शरीरातील बाह्य अवयव. त्वचेच्या विकारांविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. चारकोप येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अमित दांदळे आणि डॉ. शीतल दांदळे यांनी त्वचेच्या आणि केसांच्या तक्रारींनी ग्रासलेल्या अनेकांना उपचारांतून दिलासा दिला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक (सायन) हॉस्पिटल येथे त्यांनी सात वर्षं अध्यापनही केलं आहे. त्वचारोगंाविषयी डॉ. अमित दांदळे यांच्याशी साधलेला संवाद....

तुम्ही स्पेशलायझेशनसाठी त्वचारोग हाच विषय का निवडलात? या क्षेत्रात कधीपासून कार्यरत आहात?

मी नागपूरमध्ये लहानाचा मोठा झालो. तेव्हापासून पाहत आलो आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्वचेची काही ना काही तक्रार असतेच. मग घरगुती उपचार करायचे, नाहीतर पुरेशा प्रशिक्षित नसलेल्या डॉक्टर किंवा वैद्यांकडून काहीतरी उपचार करून घ्यायचे, इतपतच त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती. त्यामुळे बऱ्याचदा ते आजार बर न होता आहे तसेच राहत असत. दुसरं म्हणजे त्वचा हा शरीराचा दर्शनी स्वरूपाचा भाग आहे. त्यामुळे त्वचेची तक्रार दूर नाही झाली, तर लोकांना न्यूनगंड येतो हे माझ्या लक्षात येऊ लागलं. म्हणून डॉक्टर झाल्यानंतर स्पेशलायझेशनसाठी त्वचा हा विषय निवडला.

सध्याच्या काळात त्वचाविकारांचं प्रमाण वाढत चाललं आहे, असं आपल्याला वाटतं का? त्याची कारणं कोणती?

त्वचा हा शरीरातला सगळयात मोठा आणि जास्तीत जास्त पसरलेला अवयव आहे. त्यामुळे प्रदूषण, बदललेली जीवनशैली यांचा पहिला परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्याच्या काळात त्वचाविकारांचं स्वरूप वाढल्याचं दिसून येतंय, याचं मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मनात त्याविषयी दिसून येणारी जागरूकता आणि काळजी. त्वचेच्या तक्रारी पूर्वीच्या काळीही होत्याच ना आणि त्याचं बरं होण्याचं प्रमाणही नगण्य होतं. त्वचेच्या तक्रारींवर उपचार होऊ शकतात, हेच मुळात त्यांना माहीत नव्हतं. पण जसजसा काळ बदलला, शिक्षण वाढलं, जनसंपर्क वाढू लागला, तसतशी लोकांच्या मनात त्वचेच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊ लागली. आज आपल्याला चार लोकांत वावरायचं असतं, त्यामुळे आपण बाह्यरूपानेही छानच असायला हवं याची जाणीवही त्यांना झाली आहे. यामुळेच आज अनेक लोक बारीकसारीक तक्रारींसाठी त्वचारोगतज्ज्ञाकडे आवर्जून जातात. त्वचाविकारांचं प्रमाण वाढलेलं नसून लोकांच्या मनात त्याबद्दल जागरूकता वाढली आहे, असं आपण म्हणू शकतो.

आपल्या आरोग्यात त्वचेला अतिशय महत्त्व आहे. त्वचेचं आरोग्य कशावर अवलंबून असतं?

सुस्थित त्वचा हे आपल्या चांगल्या आरोग्याचं लक्षण असतं असं मला वाटतं. आणि त्वचा चांगली असेल तर आपल्याकडे बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं, त्यामुळे त्वचेची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवीच. वाढतं प्रदूषण, बदललेला आहार, बदललेली जीवनशैली यामुळे त्वचेचा पोत बिघडतो हे तर आपल्याला माहीत आहेच. पण बऱ्याच वेळा चुकीच्या सवयीमुळेही आपण त्वचाविकारांना बळी पडतो. काही जण त्वचा स्वच्छ राहावी म्हणून जास्त फेस येणारे आणि त्वचा कोरडी करणारे तीव्र स्वरूपाचे साबण वापरतात. काही जण गोरं होण्यासाठी म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळी मलमं लावतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळयाही घेतात. यातल्या बऱ्याच औषधांमध्ये स्टेरॉईड नावाचा घटक असतो, जो त्वचेवर आणि शरीरांतर्गत अवयवांवर दूरगामी घातक परिणाम करणारा असतो.

 हल्ली सोरायसिसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसते. यामागील कारणे कोणती?

सोरायसिस हा बऱ्याच अंशी आनुवंशिक असतो. सोरायसिस होण्याचं ते मुख्य कारण. पण सोरायसिस वाढण्याची इतर अनेक कारण आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आपलं मानसिक आरोग्य. एखाद्या माणसाला आनुवंशिकतेने सोरायसिस झाला असेल, तर मानसिक ताणाच्या काळात त्याची झपाटयाने वाढ होते. दुसरं कारण थंड वातावरण. तर काही वेळा वेदनाशामक गोळयांच्या अतिसेवनामुळे सोरायसिस वाढतो. सोरायसिस अंगावर कुठेही उठतो आणि कितीही स्वरूपात. काही वेळा तर ज्याला आपण कोंडा म्हणतो, तो सोरायसिसचाच एक प्रकार असू शकतो. पण त्वचारोगतज्ज्ञांकडून व्यवस्थित उपचार आणि पुरेशी काळजी घेतली, तर सोरायसिस पूर्ण बरा होऊ शकतो.

 त्वचा आणि मानसिक आरोग्य याचा संबंध असतो असं म्हणतात. ते कसं?

एकंदरीतच आपली मानसिक स्थिती ही अन्य शरीरांतर्गत अवयवांप्रमाणे त्वचेवरही परिणाम करते. म्हणजे एखादा माणूस काही कारणाने नकारात्मक अशा मानसिक स्थितीत असेल किंवा मनावर कोणता ताण असेल, तर त्याला त्या काळात त्वचेची एखादी तक्रार सतावू शकते. या उलट काही वेळा त्वचाविकारांमुळे मानसिकदृष्टया माणूस ढासळतो. आत्मविश्वास गमावतो, चारचौघांत वावरायचं सोडून देतो. यात मुरुमांमुळे नैराश्य येणाऱ्यांची संख्या अधिक असते. तसंच कोड, कुष्ठरोग, पांढरे चट्टे येणं अशा आजारांमुळेही एखाद्याला नैराश्य येऊ शकतं. आम्ही जेव्हा रुग्णावर उपचार करतो, तेव्हा आम्हाला त्यांच्या मानसिक स्थितीचाही अंदाज घ्यावा लागतो.

सध्याची जीवनशैली, बदललेला आहार, झोपण्याच्या बदललेल्या वेळा, जागरणं यामुळे त्वचेच्या आरोग्यात कसा आणि कोणत्या स्वरूपाचा बदल होतो?

सध्याचा काळ हा अतिशय धावपळीचा आणि ताणाचा आहे. जवळपास प्रत्येक जण कसल्या ना कसल्या ताणाचा बळी आहे. झोपण्याच्या वेळा, खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत. या सगळयाचा परिणाम शरीरातील संप्रेरकांवर होतो. एकीकडे लोक त्वचेच्या बाबतीत जागरूक आहेत, तर दुसरीकडे अनेक जण त्वचेबाबत अतिशय निष्काळजी असतात. त्वचेच्या स्वच्छतेची अजिबातच काळजी घेतली जात नाही. या सगळयामुळे त्वचेचे आरोग्य बिघडतं.

त्वचेच्या बाबतीत शारीरिक स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याबद्दल काय सांगाल?

रोजच्या रोज सौम्य साबणाने आंघोळ ही या बाबतीतली पहिली अपेक्षा. प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगळा असतो. त्याप्रमाणेच आपल्या साबणाची निवड केली जावी. जंतुनाशक म्हणून जाहिरातीत दाखवले जाणारे साबण कोरडी त्वचा असणाऱ्याने वापरले तर त्याची त्वचा अधिकाधिक कोरडीच होत जाईल. काही जण जाहिरातींना बळी पडून तेलकट त्वचा असतानाही स्निग्धता अधिक असणारे साबण वापरतात. त्यांची त्वचा यामुळे अधिक तेलकट बनत जाते. केवळ पोत लक्षात घेऊनच नव्हे, तर ऋतूनुसारही साबण बदलावे लागतात. यासाठी तुम्हाला त्वचारोगतज्ज्ञ मदत करू शकतात. जी गोष्ट त्वचेची, तीच केसांची. आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन आपण शांपू वापरायला हवा. केस शांपूने धुताना डोक्याच्या त्वचेला मसाज होतो, त्यामुळे त्या दिवशी केस गळतात. शांपू वापरल्यामुळे केस गळतात या भ्रमात अनेक जण केसांना शांपू वापरणं सोडून देतात. केस धुवायचे असतील तर शांपू आवर्जून वापरावा. आपण कोणत्या परिसरात राहातो हे लक्षात घेऊन कपडयांची निवड केली जावी. केवळ फॅशन म्हणून कोणतेही कपडे वापरून चालत नाही.

आपल्याकडे सौंदर्य ही संज्ञा त्वचेच्या वर्णापुरती सीमित झाली आहे. आणि ते मिळवण्यासाठी लोक जाहिरातींना भुलून त्वचेवर अनेक प्रयोग करतात. याबद्दल काय सांगाल?

दुर्दैवाने हे खरं आहे. भारतीयांना असणाऱ्या गोरेपणाच्या आकर्षणाचा अनेक कंपन्या फायदा घेतात. मग निरनिराळया संकल्पनांच्या आधारे त्यांच्या आकर्षक जाहिराती केल्या जातात आणि आपण नेमके त्यालाच बळी पडतो. पण एखादं उत्पादन आपल्या त्वचेला मानवेल की नाही, याचा विचार आपण करत नाही. ऋतू, वातावरण, त्वचेचा पोत, अनुवंशिकतेने आलेला रंग या सगळया गोष्टींचा विचार या बाबतीत करावा लागतो. याबाबत शक्य असल्यास त्वचारोगतज्ज्ञाचा सल्ला घेणं श्रेयस्कर.

व्यायाम व योग यांमुळे त्वचेचं आरोग्य सुधारण्यास कशा प्रकारे मदत होते?

व्यायामामुळे शरीरात चांगली संप्रेरकं स्रवतात. त्यामुळे आपोआपच त्वचेला तजेला येतो. योग हे ताणाचं, मनाचं व्यवस्थापन करतं. त्यामुळे त्वचाविकार असणाऱ्यांना आम्ही योग करण्याचा सल्ला देतो. मानसिक त्रासामुळे त्वचेचे जे विकार वाढतात, ते लवकर बरे व्हावे यासाठी रुग्णांनी अवश्य व्यायाम आणि योग करावा.

तुमच्या क्लिनिकमध्ये केसांवर आणि त्वचेवर लेझर ट्रीटमेंट केली जाते. त्याबद्दल काय सांगाल?

केस गळत असतील किंवा कोणता त्वचाविकार झाला असेल तर त्यावर घरगुती उपचार करायचे किंवा त्वचारोगतज्ज्ञांकडून औषधं आणायची, इतपतच उपचार सीमित होते. केसाचं प्रत्यारोपण ही विज्ञानाची कमाल आहे, तर त्वचेवर केली जाणारी लेझर ट्रीटमेंट आज अनेकांसाठी वरदान ठरत आहे. अनेकांच्या त्वचेवर अनावश्यक लव येते. स्त्रियांच्या बाबतीत ही मोठी समस्या ठरते. अशा वेळी हे केस लेझर ट्रीटमेंटने काढून टाकता येतात. डायोड लेझर म्हणून आमच्याकडे विशेष लेझर आहे. या लेझरच्या साहाय्याने आम्ही हे केस काढून टाकतो. यामुळे पुन्हा केस येण्याचं प्रमाणही घटतं. वांगाचे ठिपके असतील, एखाद्या जखमेचा व्रण राहिला असेल किंवा चेहऱ्यावर खड्डे असतील, त्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळया स्वरूपाचे लेझर आमच्याकडे उपलब्ध आहेत. काही जण निस्तेज त्वचा तजेलदार करण्यासाठीही लेझर ट्रीटमेंट घेतात आणि त्याचा त्यांना उपयोगही होतो. फक्त लेझर ट्रीटमेंट घेणाऱ्यांनी उन्हापासून सांभाळणारं सनस्क्रीन लोशन आवर्जून वापरायला हवं. खरं तर प्रत्येकानेच ते वापरायला हवं. साधारणपणे भारतीय प्रकृतीला 20-25 एसपीएफचं सनस्क्रीन लोशन पुरतं.

टक्कल पडलेले अनेक जण आमच्याकडे येऊन केस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून घेतात. डोक्याच्या ज्या भागात केस जास्त असतील, तिथून ते काढून केस नसणाऱ्या भागात प्रत्यारोपित केले जातात. आणि या शस्त्रक्रियेनंतर केसांची पूर्वीप्रमाणे वाढ होऊ लागते. यांसह आमच्या क्लिनिकमध्ये केसांसाठी रोलर थेरपी आणि PRP (Platelet Rich Plasma) याही ट्रीटमेंट केल्या जातात.

तुमच्या पत्नीही त्वचारोगतज्ज्ञ आहेत. एकत्र काम करण्याचा तुमचा अनुभव कसा असतो?

दोघेही त्वचारोगतज्ज्ञ असलो, तरी एखाद्या केसबाबत दोघांची वेगळी मतं असू शकतात. एकाच क्षेत्रातले असल्याने त्याबाबत आम्ही चर्चा करतो आणि त्यातला योग्य तो पर्याय निवडतो. त्याचा रुग्णाला उपयोग होतो.

या क्षेत्रातले तुम्हाला आलेले काही वैशिष्टयपूर्ण अनुभव सांगू शकाल?

एक मुलगा माझ्याकडे आला होता. त्याचा पूर्ण चेहरा मुरुमांनी भरला होता. सर्वसामान्यपणे तरुणांना जेवढी मुरुमं येतात, त्यापेक्षा याचं प्रमाण फारच जास्त होतं. ते इतकं वाढलं होतं, की त्याने घराबाहेर पडण बंद केलं होतं. त्याचं मन नकारात्मकतेने भरलं होतं. सलग तीन महिने त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो पूर्ण बरा झाला. त्या वेळी त्याचा वाढलेला आत्मविश्वास आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखर बघण्यासारखा होता. या अशा केसेस आम्हालाही समाधान मिळवून देतात. आम्हाला कृतकृत्य वाटतं.

मुलाखत - मृदुला राजवाडे