तामिळनाडूचे रणांगण

विवेक मराठी    18-Feb-2017
Total Views |

गेल्या आठवडयात आमच्या मुखपृष्ठ कथेत जी अटकळ व्यक्त करण्यात आली होती, त्याप्रमाणेच ए.आय.ए.डी.एम.के.च्या नवनियुक्त सरचिटणीस व्ही.के. शशिकला या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जवळपास 4 वर्षांसाठी गजाआड गेल्या आहेत. राजकीय नेत्यासाठी 4 वर्षांचा तुरुंगवास हा काही लहान कालखंड नव्हे. जनतेच्या विस्मरणात जाण्यासाठी तो पुरेसा आहे. मात्र, व्ही.के. शशिकला यांच्या महत्त्वाकांक्षेचा वारू या शिक्षेनंतरही थांबण्याचं नाव घेत नाही, असं सध्याचं वास्तव आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात त्यांची अण्णा पक्षाच्या सरचिटणीसपदी झालेली (की करवून घेतलेली?) नियुक्ती ही भविष्यातल्या आणखी अनेक धक्कादायक घटनांची नांदी ठरू शकते.


ज्या मुख्यमंत्रिपदामुळे जयललितांना तामिळनाडूच्या जनमानसात 'अम्मा'चं स्थान मिळालं, ते पद हस्तगत करण्याची स्वप्नं शशिकलांना पडू लागली. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्या जयललितांच्या मृत्यूनंतर फासे टाकू लागल्या. स्वत:ला सरचिटणीसपदी नियुक्त करवून घेणं ही त्यातली पहिली पायरी होती. या नियुक्तीमुळे मुख्यमंत्रिपद आवाक्यात आलं असं वाटत असतानाच अगदी अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी असलेल्या पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांच्याविरुध्द बंडाचं निशाण रोवलं. त्यांनी पाताळयंत्री अशा शशिकला यांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस केलं.

एकदा सरचिटणीसपद हस्तगत केल्यावर ए.आय.ए.डी.एम.के.चे आमदार विधिमंडळ नेता म्हणून पर्यायाने मुख्यमंत्री म्हणून शशिकला यांची निवड करतील असा अंदाज असतानाच 1996पासून त्यांच्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुध्द सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या केसचा निकाल लागला आणि हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा सोनेरी घास न्यायालयाने हिरावून घेतला. या निकालाने त्यांच्या नशिबी तुरुंगवास आला आणि जयललितांचा मृत्यू झाल्यामुळे गुन्हेगारी शिक्षेतून त्यांची सुटका झाली असली, तरी सुमारे 100 कोटींची दंडाची रक्कम त्यांच्या नावे असलेल्या संपत्तीतून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या झटक्याने हार मानण्याएवढया शशिकला या कच्च्या गुरूच्या चेल्या नाहीत, हे त्यांच्या नंतरच्या चालींमुळे स्पष्ट झालं आहे. जयललिता यांची सावली अशी ओळख असलेल्या शशिकला यांनी राजकारणावर पुरेशी मांड ठोकली आहे, हे दिसून येतं. पन्नीरसेल्वम हे जयललितांचे चेले, तर पलनिस्वामी हे शशिकला यांचे, हीच त्या दोघांची राजकीय ओळख आणि बहुधा कुवतही. आता प्यादं म्हणून आपल्या या चेल्याचाच वापर करत, तुरुंगातून राजकीय खेळी खेळण्यासाठी शशिकला सज्ज झाल्या आहेत.

मुख्यमंत्रिपदाचा पलनिस्वामी यांना अभिषेक झाला असला, तरी अजून विश्वासदर्शक ठरावाची अग्निपरीक्षा बाकी आहे. पक्षाचे 130 आमदार शशिकला यांच्याबरोबर, म्हणजेच पलनिस्वामींबरोबर आहेत असं सध्याचं चित्र आहे. ते काही शशिकला यांचे निष्ठावंत नाहीत, तर मुदतपूर्व निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता नाही आणि पुन्हा आपण निवडून येऊच याची शाश्वतीही. तेव्हा मिळालेल्या खुर्चीला चिकटून राहण्यासाठी, तुलनेने वरचढ अशा शशिकला यांच्या बाजूने ते उभे आहेत. या सर्व 'तथाकथित' समर्थकांना जिथे एकत्र कोंडून घातलं आहे, तिथून लवकरच त्यांची सुटका होईल असं म्हटलं जातंय. पन्नीरसेल्वम यांच्या बाजूने पक्षाचे जेमतेम 5-6 आमदार आहेत, तरी 'अम्मांचं राज्य' पुन्हा आणण्यासाठी ते ही विषम लढाई लढण्याची हिंमत दाखवणार आहेत. तसे प्रयत्नही त्यांनी सुरू केले आहेत. पैकी एक म्हणजे, शशिकला यांची सरचिटणीसपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्याबाबत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना केलेली विनंती. ए.आय.ए.डी.एम.के. पक्षात एखाद्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती होण्याआधी त्या व्यक्तीने पक्षाचं सलग 5 वर्षं सदस्य असणं अनिवार्य असतं, या नियमाकडे अंगुलिनिर्देश करत पन्नीरसेल्वम ही विनंती करत आहेत. कारण मागील सलग 5 वर्षं शशिकला पक्षाच्या सदस्य नव्हत्या. डिसेंबर 2011 ते मार्च 2012 या कालावधीत पक्षातून त्यांची हकालपट्टी झालेली होती, याकडे पन्नीरसेल्वम निवडणूक आयोगाचे लक्ष वेधत आहेत. या मुद्दयावर त्यांची सरशी होते का, ते कळेलच; पण आतापर्यंत ज्या पन्नीरसेल्वम यांचं उपद्रवमूल्य शून्य आहे अशा समजात शशिकला वावरत होत्या, त्या पन्नीरसेल्वम यांच्या महत्त्वाकांक्षेला नवे धुमारे फुटले असल्याने, शशिकलांना वाटतो तेवढा हा खेळ सोपा उरलेला नाही. निवडणूक आयुक्तांकडे मागितलेली दाद ही त्याची एक झलक आहे.

''माझ्यासाठी ही साधीसुधी लढाई नाही, तर हे धर्मयुध्द आहे'' अशी घोषणा करत सर्वशक्तीनिशी त्यांनी शशिकला यांच्याशी दोन हात करण्याचं ठरवलं आहे. पन्नीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या पायाशी वाहिलेली निष्ठा आणि जयललिता यांच्या जिवंतपणी त्यांनी त्या निष्ठेचं केलेलं काटेकोर पालन याची तामिळनाडूची जनता साक्षी आहे. त्यांना अम्मांचं राज्य पुन्हा आणायचं आहे, यावर जनतेचा विश्वास बसायला त्यांचा पूर्वेतिहास पुरेसा आहे.

अम्मांचं राज्य पुन्हा आणण्यासाठी पन्नीरसेल्वम यांची धडपड आहे हे एकदा त्या जनतेच्या गळी उतरलं की काहीही चमत्कार घडू शकतो. अम्माची अतिशय जवळची मैत्रीण म्हणून ज्या शशिकलाला लोकांनी आजवर मान दिला, ते आज मान देण्याच्या  मानसिकतेत नाहीत. शिवाय जयललितांच्या मृत्यूभोवती असलेलं संशयाचं धुकं आणि त्या संदर्भात शशिकला यांच्यावर रोखली गेलेली संशयाची सुई यामुळेही शशिकला तामिळी जनतेच्या मनातून उतरल्या आहेत. ज्या पक्षाच्या सरचिटणीसपदी त्या आहेत, त्या पक्षातही उघडपणे त्यांच्या विरोधात असणारे काही कमी नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावल्यानंतर एआयएडीएमकेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व जनतेने केलेला उघड जल्लोश पुरेसा बोलका आहे. तूर्तास पलनिस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्याची खेळी यशस्वी झाली असली आणि वरकरणी ती नियमांच्या चौकटीत झाल्यासारखेही दिसत असले, तरी एवढयाने शशिकला यांनी आश्वस्त होण्यासारखी परिस्थिती नाही. त्यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद हे स्वप्नच राहण्याची शक्यता अधिक.

दोन अम्मांचे दोन निष्ठावंत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र राजकीय सरशी होण्यासाठी केवळ निष्ठेचं पाठबळ पुरेसं नाही, तर राजकीय चातुर्य, लोकाश्रय आणि कायद्याचा आधार यांचीही गरज आहे. सकृतदर्शनी पलनिस्वामी यांची नियुक्ती नियमाला धरून आहे, तिच्यावर सभागृहात शिक्कामोर्तब होतं की काही नवी समीकरणं तामिळनाडूच्या राजकारणात जुळून येतात, ते पाहायचं...