ऑर्गन निर्मितीचा शिलेदार

विवेक मराठी    20-Feb-2017
Total Views |

संगीत रंगभूमी ही खास मराठमोळी संस्कृती. या रंगभूमीवरील कलाकारांनी, वादकांनी ही कला जगाच्या पटलावर पोहोचवली. याच संगीत रंगभूमीची वैशिष्टयपूर्ण ओळख म्हणजे त्यात वाजवला जाणारा ऑर्गन. या ऑर्गनचे 1950नंतरचे आणि भारतातील एकमेव निर्माते म्हणजे उमाशंकर दाते अर्थात बाळ दाते. ऑर्गन निर्मिती या विषयातली त्यांची आवड आणि वाटचाल याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.....

नाटकाची तिसरी घंटा.... धुपाचा मंद दरवळ.... विंगेत पात्रांची लगबग.... हळूहळू पडदा दूर होतो आणि कानावर पडतात ऑर्गनवर वाजणारे नांदीचे सूर....

हे वर्णन आपल्याला एकदम 50 वर्षं मागे घेऊन जातं. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध ते विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा शंभर वर्षांचा काळ संगीत रंगभूमीसाठी सुवर्णकाळ मानला जातो. लेखक, दिग्दर्शक, गायक, नट, वादक आणि प्रेक्षक या सगळयांसाठी तो भारलेला काळ होता. या काळाचा साक्षीदार म्हणजे ऑर्गन. लौकिकार्थाने परदेशी असलेलं हे वाद्य संगीत रंगभूमीत इतकं बेमालूमपणे मिसळलं की पुढे ऑर्गन आणि संगीत नाटक हे अद्वैत समीकरण होऊन बसलं. पुढे अनेक वर्ष गायकांना साथ देण्याचं काम या वाद्याने केलं. आपल्या नाटयसंस्कृतीशी एकरूप झालेला ऑर्गन तयार करण्याचं काम मात्र एकाही भारतीय कंपनीने केलं नाही. राजापूरमधल्या आडिवरे या छोटयाशा गावात राहणाऱ्या उमाशंकर अर्थात बाळ दाते या तरुणाने हे आव्हान घ्यायचं ठरवलं आणि ते समर्थपणे पेललंही.

त्यांच्या या प्रवासाविषयी ते सांगतात, ''खरं सांगायचं तर माझ्या घरात या क्षेत्राची पार्श्वभूमी नाही. 1993 सालापर्यंत माझा कलाक्षेत्राशी, संगीताशी दूरान्वयेही संबंध नव्हता. अभियांत्रिकीला शिकणारा माझा भाऊ हार्मोनिअम शिकत होता, एवढाच आमचा या क्षेत्राशी संबंध. आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात 1994 साली एक जुगलबंदी झाली, त्यात हार्मोनिअम वादक उदय गोखले यांचा सहभाग होता. ती जुगलबंदी ऐकताना स्वतःच्या आनंदासाठी तरी हे वाद्य वाजवायला शिकावं असं मला वाटलं. पण घरातून या गोष्टीला तितकासा पाठिंबा नव्हता. यावर पर्याय म्हणून नाटयसंगीताच्या कॅसेट्स, रेडिओ, गाण्याचे कार्यक्रम ऐकून, नोटेशनची पुस्तकं वाचून एकलव्यासारखा मी हार्मोनिअम शिकायला लागलो. 1999 साली मी रत्नागिरी आकाशवाणीची चाचणी दिली आणि त्यात निवडला गेलो. पुढे मी रेडिओसाठी आठ रेकॉर्डिंग्ज केली. त्याच दरम्यान आकाशवाणीचे संगीतकार आणि चिपळुणातील राजाभाऊ शेंबेकर यांच्याकडून सांगीतिक शिक्षण घेऊ लागलो. त्यानंतर संगीतक्षेत्रातल्या लोकांशी माझा परिचय व्हायला लागला. तोपर्यंत, ट्रॅक्स भाडयाने द्यायचा माझा व्यवसाय होता. 2001 साली केबल टीव्ही नेटवर्कची आणि डीटीएच सर्व्हिसची एजन्सीदेखील घेतली. पण ऑर्गनशी माझा संबंध मात्र योगायोगानेच आला.

मी एकदा सं. सौभद्र बघायला गेलो होतो. माझे गुरू उदय गोखले तेव्हा वाजवायला होते. त्या दिवशी मी प्रत्यक्ष ऑर्गन पाहिला, ऐकला. आणखी एक दोन वेळा ऑर्गन ऐकण्याचा योग आला. हळूहळू माझ्या मनात या वाद्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. जवळपास 2005पर्यंत मी मुंबईपासून गोव्यापर्यंत हार्मोनिअमची अनेक दुकानं पालथी घातली, पण कुठेही मला ऑर्गन मिळाला नाही. याचं कारण विचारलं असता असं कळलं की, रीड बोर्ड नावाचा ऑर्गनचा भाग (जो ऑर्गनचं हृदय मानला जातो) मिळत नसल्यामुळे आपल्याकडे ऑर्गन बनत नाही. दरम्यान, घरच्या घरी ऑर्गनचा अभ्यास सुरू केला होता. 2005 साली मला दादरला मुकुंद आठवले यांच्या ओळखीने एका जुन्या ऑर्गनचा तुटलेला रीड बोर्ड मिळाला. रीड बोर्ड मिळाल्यावर बाकीची बॉडी बनवणं शक्य होतं. त्या बोर्डचा वापर करून मी पाच सप्तकांचा ऑर्गन बनवण्यात यशस्वी झालो. आमच्या जवळच राहणारे वामन मेस्त्री हे हार्मोनिअम बनवत असत. त्यांची मी यासाठी मदत घेतली. खरं तर परदेशात जाऊन ऑर्गनबद्दल तांत्रिक शिक्षण घ्यावं असंही मनात येत होतं, पण आर्थिक समस्या आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे ते काही शक्य झालं नाही. त्यात व्यवसायाने दगा दिला आणि त्याच दरम्यान वडलांचं छत्रंही गमावलं. त्यामुळे त्यांचाच इलेक्टि्रकल मेंटेनन्सचा व्यवसाय आणि किराणामालाचं दुकान पाहू लागलो. 2008 साली प्रसाद गुळवणींकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेऊ लागलो. पण ऑर्गनचं वेड स्वस्थ बसू देत नव्हतं. जी गोष्ट 150 वर्षांपूर्वी तयार होऊ शकते, ती आत्ताच्या काळात अधिक उत्तम पध्दतीने तयार होऊ शकते असं मला वाटत होतं. त्याच काळात गोव्यातल्या एका मित्राच्या एका जुन्या ऑर्गनचा साऊंड बॉक्स मिळाला. त्याच्या साहाय्याने पुन्हा ऑर्गन बनवायच्या धडपडीला सुरुवात झाली. तोपर्यंत सांगीतिक क्षेत्रात थोडाफार ओळखला जाऊ लागल्यामुळे अनेक जण येऊन तो ऑर्गन पाहून गेले. दरम्यान 2010 साली राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरीला लागलो होतो. तोपर्यंत गावात इंटरनेटचा शिरकाव झाला होता. त्याचा वापर करून ऑर्गनची अधिक माहिती वाचत होतो, त्यातून शिकत होतो. या वाद्याशी संबंधित अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मित्रांचा परिचय होत गेला. पुढे 2013 साली मे महिन्यात 'बाळ ऑर्गन ऍंड म्युझिकल्स' या माझ्या वर्कशॉपची सुरुवात झाली. पुढे 2014 साली 8 एप्रिल रोजी तिचं पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्या हस्ते उद्धाटन झालं.

दरम्यान, एका अमेरिकन मित्राकडून 50 ऑर्गन रीड मिळाले होते. ऑर्गनचे मुख्य भाग म्हणजे रीड होल्डर आणि साउंड पॅन. ते बनवण्यासाठी मी स्वतः एक लाकडी मिलिंग मशीन तयार केलं. पहिले पाच ऑर्गन मी त्यावरच बनवले आणि तो प्रयत्न यशस्वीदेखील झाला. मात्र अचूकतेसाठी मी 2014 साली ब्रिजपोर्ट या कंपनीचं एम1टीआर मिलिंग मशीन घेतलं. त्यामुळे कटिंगमध्ये 0.10 मायक्रॉन इतकी अचूकता मिळू लागली. साउंड बॉक्ससाठी पाईन वूड, जर्मन स्प्रूस, कीबोर्डसाठी ऍस्टर, बॉडीसाठी बीच वूड, टीक वूड यासारखी लाकडं मागवली. अन्य धातूंच्या भागांसाठी स्टेनलेस स्टील वापरायला सुरुवात केली. अमेरिकेतून आणखी काही रीड्स मागवली. ऑर्गनच्या मूळ लाकडी भागांना काही ठिकाणी पर्याय म्हणून धातूच्या पट्टया वापरल्या. अनेक वेगवेगळे प्रयोग करत जवळपास 44 ऑर्गन मी आजपर्यंत तयार केले आहेत. काम करता करता एकीकडे सध्या रीड्सवर माझं संशोधन सुरू आहे.

आपल्याकडे हार्मोनिअमची प्रतिकृती लवकर तयार झाली. लोक पटकन शिकले. पण ऑर्गनची प्रतिकृती मात्र यंत्राशिवाय शक्य नव्हती. त्यामुळे पुढे अनेक वर्षं संगीत नाटक मंडळी परदेशातून ऑर्गन मागवत असत. 1950नंतर मात्र जगभरात ऑर्गनची निर्मिती बंद झाली. पुढे ज्यांच्याकडे आहेत ते आपले जुनेच ऑर्गन वापरत राहिले.'' बाळ दाते सांगत होते. 1950नंतर आजमितीस बाळ दाते हे जगभरातले एकमेव आणि भारतातले पहिले ऑर्गन निर्माते आहेत. ऑर्गनमधून उमटणाऱ्या सुरांची वैशिष्टयंही ते सांगत होते. ते म्हणाले, ''ऑर्गन म्हणजे शंभर टक्के इंजीनिअरिंग काम. पेटीमध्ये आपण हाताने भाता ओढतो आणि तयार झालेला हवेचा दाब पट्टया दाबल्यानंतर त्यामधून बाहेर पडताना सुरांची निर्मिती करतो. मात्र, याच्या उलट कृती ऑर्गनमध्ये घडते. ऑर्गनचा भाता ओढल्यावर आतमध्ये हवेची पोकळी तयार होते आणि पट्टी दाबल्यावर तिच्या फटीतून आत जाणारी हवा सूर निर्माण करते. याच कारणामुळे ऑर्गनचे सूर हे अधिक कोमल असतात. नाटयसंगीतात ऑर्गन वापरण्याचं आणखी एक कारण म्हणजे कोमल असणारा हा आवाज दूरपर्यंत सुस्पष्टपणे ऐकू जातो. माईक नसण्याच्या त्या काळात तेव्हा या यंत्रणेचा खूपच फायदा होत असावा.''

आडिवऱ्यासारख्या कोकणातल्या खेडयात राहून हे सगळं काम कठीण जात नाही का? अशा वेळी पुण्यामुंबईकडे जावं असं वाटत नाही का? असं विचारल्यावर दाते म्हणाले, ''खरं सांगायचं तर ही अडचण मला कधीच वाटली नाही. आज मी सगळा कच्चा माल परदेशातून इकडे मागवतो. कारण ऑर्गनसाठी लागणारं सामान भारतात मिळत नाही. देशापरदेशातले अनेक जण मुद्दाम माझं वर्कशॉप बघायला आडिवऱ्यात येतात. आणि पुण्या-मुंबईकडचे मित्र शक्य ती सगळी मदत करतात, त्यामुळे फार काही अडत नाही. त्यामुळे गाव सोडून शहरात जावं असं मला कधी वाटलं नाही.

पूर्वीच्या काळी पाच सप्तकांचे ऑर्गन बनवले जात असत. मीही माझा पहिला ऑर्गन पाच सप्तकांचाच तयार केला होता. पण काळ बदलला. वादकांना वाजवायला आणि ने-आण करायला अडचणीचं ठरू लागलं, तसा मागणीप्रमाणे चार सप्तकांचा, साडेतीन सप्तकांचा असा ऑर्गन बनवून देऊ लागलो. माझा मित्र असणारा ज्येष्ठ वादक आणि संगीत संयोजक आदित्य ओक याला अमेरिकेत जायचं होतं. साधारण चार सप्तकांच्या एका ऑर्गनचं वजन असतं 35-40 किलो. एवढं वजन घेऊन जाणं त्याला शक्य नव्हतं. म्हणून मी थोडे बदल करून त्याला 18 किलोचा साडेतीन सप्तकांचा ऑर्गन बनवून दिला. कमी वजनाच्या या ऑर्गनची त्यानंतर अनेक ठिकाणांहून मागणी सुरू झाली.''

व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक मित्रांची आपल्याला मदत झाल्याचं ते सांगतात. ''सुरुवातीला माझं वर्कशॉप म्हणजे छोटीशी खोली होती. मी नेमकं काय करतो हे अनेकांना माहीत नव्हतं. मुंबईतला हार्मोनिअम वादक अमित पाध्ये हा मूळचा आडिवऱ्याचा. मी ऑर्गन बनवतो आणि दुरुस्तही करतो ही माहिती त्याच्याकडून आदित्य ओकला आणि संगीतक्षेत्रातल्या अन्य मंडळींना समजली. मग मात्र मागणी आणि कामाचा पसारा वाढायला लागला. माझ्या यशात अशा अनेक मित्रांचं श्रेय मोलाचं आहे. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो या क्षेत्रातल्या अध्वर्यूंचा. पं. विश्वनाथ कान्हेरे यांनी माझ्या वर्कशॉपचं उद्धाटन केलं. पंडित तुळशीदास बोरकर इथे येऊन मी बनवलेले ऑर्गन पाहून गेले. अशा अनेक ज्येष्ठांच्या सूचनांचा आणि आशीर्वादाचा मला माझ्या व्यवसायात खूप उपयोग झाला. ''


आज देशापरदेशातून अनेक ठिकाणहून दाते यांना ऑर्गनची मागणी असते. काही जण आपल्याकडे असलेले दुर्मीळ ऑर्गन दुरुस्तही करून घेतात. याबाबत त्यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, ''चेंबूरच्या नीला टेंबे यांचा अचानक मला फोन आला. 2005 साली मुंबईत झालेल्या प्रलयंकारी पावसामुळे अनेकांचं नुकसान झालं. नीला टेंबे यांनाही या पावसाचा फटका बसला. त्यांच्या घरात असणारा जुना ऑर्गन पावसाच्या पाण्यात बुडाला आणि खराब झाला. जवळपास दहा वर्षं तो तसाच पडून होता. पण एका चॅनेलवर माझी मुलाखत पाहिली आणि त्यांनी बराच शोध घेऊन माझा नंबर मिळवला. त्यांना तो ऑर्गन दुरुस्त करून हवा होता. पाच-साडेपाच फूट उंचीचा तो ऑर्गन मी प्रयत्नपूर्वक जसा होता तसा त्यांना बनवून दिला.

आज देशापरदेशात अनेक ठिकाणांहून ऑर्गनची मागणी होतेय. काही जण आवर्जून ऑर्गन वाजवायला शिकतायत, हे चित्र सुखावणारं आहे. मधल्या काळात संगीत नाटकांना अवकळा आली होती. काही मोजकी नावं सोडल्यास अनेक जण या संस्कृतीपासून दूर जात होते. पण सध्याच्या काळात सुरू झालेल्या राज्य संगीत नाटय स्पर्धांमुळे तरुणाईदेखील या नाटकांकडे ओढली जाऊ लागली असून याच कारणामुळे ऑर्गन या वाद्यालाही चांगले दिवस येऊ लागले आहेत. अगदी 20-22 वर्षांची मुलंही ऑर्गनकडे आकर्षित होत आहेत. खरं सांगायचं तर त्यांना ऑर्गनमधली मजा कळू लागली आहे. फक्त केवळ पेटीला पर्याय म्हणजे ऑर्गन नाही, त्याची वादनाची वेगळी शैली आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी ऑर्गनचा शैलीबध्द अभ्यास करायला हवा.''

या आगळयावेगळया कामाबद्दल बाळ दाते यांना लोकमान्य सेवा संघ या संस्थेकडून ज्येष्ठ गायक नट रामदास कामत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. 'दुनियादारी फाउंडेशन'कडून स्वराधीश सुधीर फडके पुरस्कार, चित्पावन उद्योजक मंचाचा उद्योगश्री पुरस्कार, एनसीपीए-आयटीसी संगीत रिसर्च अकादमी-म्युझिक फोरम आणि संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बेस्ट इन्स्ट्रुमेंट ऑफ द इयर पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. यासह अनेक आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये त्यांच्यावर लिहून आलं आहे. नुकताच 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या ऑर्गन निर्मितीच्या प्रवासावर भाष्य करणारा कार्यक्रमही ठाण्यात सादर झाला.

ऑर्गनसारखं दुर्मीळ वाद्य काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर असताना बाळ दाते यांनी त्याच्या पुरुत्थानाचा वसा घेतला आहे. तो पूर्ण करण्यासाठी अनेक हात त्यांना मदतही करतायत. एक सांगीतिक संस्कृतीलयाला जात आहे, तिला वाचवणं हाच एक यामागचा प्रामाणिक हेतू आहे.

 संगीत नाटकांत ऑर्गनचा वापर होण्याबाबत दाते यांनी अतिशय रंजक इतिहास सांगितला. ब्रिटिशांच्या काळात चर्चेसमध्ये वाजवण्यासाठी ऑर्गन भारतात आले. ऑर्गन हे बऱ्यापैकी मोठे असल्याने वापरायला सोयीस्कर म्हणून हार्मोनिअम भारतात आल्या, रुळल्या. संगीत नाटकांमध्ये पूर्वी हार्मोनिअमचा वापर होत होता. एकदा गोव्यात बालगंधर्वांचा प्रयोग असताना त्यांची पेटी अचानक बंद पडली. रात्री प्रयोगापर्यंत ती दुरुस्त होणं कठीण होतं. तिकडच्या प्रयोग आयोजकांनी गोव्यातल्या चर्चमधला ऑर्गन बालगंधर्वांना दिला आणि सध्या याच्यावर वेळ भागवा असं सांगितलं. योगायोगाने हाती आलेलं हे वाद्य बालगंधर्वांना इतकं आवडलं की त्यांनी पुढे हार्मोनिअम गंधर्व नाटक मंडळीतून बाहेर पडली आणि ऑर्गनयुग सुरू झालं. त्यासाठी खास परदेशातून ऑर्गन मागवण्यात आले.

mrudula.rajwade@gmail.com

9920450065