दिवाळी ते दिवाळी व्हाया हॅलोवीन

विवेक मराठी    20-Feb-2017
Total Views |

.... आणि अचानक

त्याला मम्मी-पप्पा

आठवले. ऐन दिवाळीत

उजळून गेलेलं, पण तरीही रिकामं घर आठवलं. त्याने तडक घरी फोन लावला. पलीकडे मम्मी होती. ''काय झालं रे? ही तर नेहमीची वेळ नाही तुझी. आज अचानक फोन?'' याला काय बोलावं ते सुचेना. इतक्यात पप्पाने फोन घेतला हातात. ''काय रे, काही प्रॉब्लेम?'' हा अजूनही शांतच. पप्पा हसला आणि म्हणाला, ''अरे, आमची काळजी नको करूस. इतक्या आवेगाने फोन केला आहेस त्यातूनच कळतंय - दूरदेशी

आहेस खरा, पण अजून दूर

नाही गेलायस

आमच्यापासून.''


या दिवाळीलासुध्दा तो घरी यावा, अशी त्यांची अपेक्षा नव्हतीच मुळी. त्याला तिकडे पाठवलं तेव्हा ज्या बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात, त्यातलीच ही एक तडजोड होती. त्याच्या आयुष्यातले पुढचे अनेक दिवाळसण सुखात जावे, म्हणून आपल्या आयुष्यातले काही दिवाळसण त्याच्याशिवाय साजरे करण्याला त्यांची हरकत नव्हतीच. शिवाय आता इतकं काही अंतर जाणवत नाही. स्काइप, व्हॉट्स ऍप, फेसबुक सगळं बुडाशी असतं. पूर्वी रोज गप्पा व्हायच्या, आता पंधरा दिवसांनी होतात. त्याला तिकडे जाऊन आत्ताशी कुठे तीन वर्षं झालीयेत. स्थिरस्थावर झाला की आपणच जायचं तिकडे. पहिल्या फेरीत अमेरिका बघून घ्यायची. मग तोच इकडे येईल, तेव्हा लग्न उरकून घ्यायचं. नंतर सुनेच्या डिलिव्हरीला पुन्हा काही महिने जायचं. नंतर मग दर दोन वर्षांनी इकडून तिकडे, तिकडून इकडे करत राहायचं. भविष्याचं इतकं चोख प्लॅनिंग त्या अमेरिकन्सनासुध्दा जमणार नाही. लोक म्हणतात, एकटेपणा येतो. कशाला येईल? आपणही स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यायला हवं. मुलं जवळच हवीत हा हट्ट कशाला? भले दिवाळीत जमणार नाही. पण जेव्हा भेटू, तेव्हा दिवाळसण करू. 'चिरंजीव येती घरा, तोचि दिवाळी दसरा!' स्वत:शीच हसता हसता अचानक भरून का आलं, ते मात्र त्यांना कळलं नाही.

चला, नेहमीची वेळ झाली. त्याने लॅपटॉप उघडून स्काइप सुरू केलं. आज दिवाळी, म्हणजे आख्खं 'गृहदर्शन' घडणार. दारातल्या रांगोळीपासून ते गॅलरीतल्या कंदिलापर्यंत. मग आपणही इकडच्या गंमतीजमती सांगायच्या. गेली तीन वर्षं दिवाळी अशीच साजरी होते. M.S. झालं. आता Ph.D. करायला घेतलीये, म्हणजे सवय करून घ्यावीच लागणार. सणासुदीच्या दिवसात घरी जावंसं वाटलंच, तरी तिकिटांच्या किमती आणि Advisor या दोन गोष्टी पाय खेचून धरतात. FedExच्या कृपेने फराळ वेळेत पोहोचतो. सोबत सगळे भारतीयच आहेत. मग पणत्यांची आरास, कंदील, सजावट... इतकंच काय, दिवाळी पहाटचे कार्यक्रमसुध्दा होतात. सगळं निवांत मजेत असतं. तरीही काहीतरी missing वाटत राहतं. ते काय, ते त्याला कळत नाही आणि तो समजून घेण्याच्या फंदात पडत नाही. चांगलं अर्धा तास तो मम्मी-पप्पांशी बोलला. त्यांचे आनंदी चेहरे त्याला नवीन उत्साह देऊन जातात.

'This year we are celebrating halloween with granny.' याला मेसेज आला. काय गंमत आहे - ह्यांची 'सर्वपित्री' आणि आपली दिवाळी अशी पुढेमागे. तेवढंच आणखी एक सेलिब्रेशन. विश्वाचे नागरिक असण्याचा फायदा.

ग्रॅनीचा उत्साह ओसंडून वाहत होता. शेवटचा भोपळा कोरून झाला. छोटीशी बाहुली त्याच्या बाजूला उभी राहिली. आता छोटीशी पार्टी आणि मग डिनर. आख्खा दिवस ग्रॅॅनीची धावपळ चाललेली. या सगळयांच्या बरोबरीने. ग्रॅनी म्हणजे याच्या मित्राची 'host mother'. साठीचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व. उत्साह, आस्था, प्रेम आणि असोशी यांचं जिवंत उदाहरण. ग्रॅनीसोबत सगळयांनाच धमाल यायची. गोष्टी, किस्से आणि गप्पा. दोन मुलं नोकरी निमित्ताने बाहेर आणि मुलगी लग्न होऊन सासरी गेलेली. ग्रॅॅनी एकटी निवांत राहायची. आपल्या प्रेमळ स्वभावाने ती या सगळयाच मुलांच्या जिव्हाळयाचा विषय झाली होती.

""Yo granny, let's click a pic'' म्हणत त्याने छानशी पोझ दिली. ग्रॅॅनीच्या हसण्याने आख्खी फ्रेम भरून गेली. त्याने फोटो ग्रॅनीला दाखवला. ती खूश झाली. कुठल्याशा कृतार्थतेने तिने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, ''Such a sweet pic, my boy.'' त्याने फोटो पुन्हा पाहिला. तिचं हसणं फोटोभर पसरलेलं, पण म्हणून पापणीआडचा इवलासा थेंब लपत नव्हता. त्याच्या मनात विचार आला, काय वाटत असेल ग्रॅनीला असं एकटं राहताना...? मुलांसोबत निवांत गप्पा माराव्यात, नातवंडांसोबत भोपळा carve करावा, असं तिलाही वाटत असणारच की.... आणि अचानक त्याला मम्मी-पप्पा आठवले. ऐन दिवाळीत उजळून गेलेलं, पण तरीही रिकामं घर आठवलं. त्याने तडक घरी फोन लावला. पलीकडे मम्मी होती. ''काय झालं रे? ही तर नेहमीची वेळ नाही तुझी. आज अचानक फोन?'' याला काय बोलावं ते सुचेना. इतक्यात पप्पाने फोन घेतला हातात. ''काय रे, काही प्रॉब्लेम?'' हा अजूनही शांतच. पप्पा हसला आणि म्हणाला, ''अरे, आमची काळजी नको करूस. इतक्या आवेगाने फोन केला आहेस त्यातूनच कळतंय - दूरदेशी आहेस खरा, पण अजून दूर नाही गेलायस आमच्यापासून.''

त्याला क्षणार्धात हायसं वाटलं. तो ग्रॅनीकडे गेला. तिला नमस्कार केला आणि म्हणाला, ''दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!''

9773249697