नातं - रंगभरल्या नात्यांशी...

विवेक मराठी    21-Feb-2017
Total Views |

 'प्रेम, जिव्हाळा, आपुलकी' ही ज्या नात्यांचा आधार असते, ती सारी अनौपचारिक नाती, तर विशिष्ट कामाकरिता निर्माण झालेली व्यवस्था हा ज्या नात्यांचा आधार असतो, ती औपचारिक नाती. औपचारिक नात्यात भावनिक बंध नसतात. ती तात्कालिक, कामापुरती असतात. म्हणजे बघा हं, आपण प्रवासाला निघतो. बसचा 8-10 तासांचा प्रवास असतो. या दरम्यान बसचा ड्रायव्हर, कंडक्टर, बसमधले सहप्रवासी सगळयांच्यात एक नातं निर्माण होतं. पण ते तेवढया वेळापुरतं असतं. तसंच आपल्या कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ, सहकारी आणि कनिष्ठ या सर्वांसह जो व्यवहार चालतो, तोही या औपचारिक नात्यांद्वारे. पण आपल्या दिवसभराचा विचार केला तर एक तृतीयांश भाग आपण या औपचारिक संबंधांच्या माध्यमातून व्यतीत करतो. त्यामुळे आपल्याला ही नातीदेखील चांगल्या प्रकारे जपता आली पाहिजेत.
आज नानांना साठ वर्षं पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने मंडळी जमली होती. इतक मोठं घर माणसांनी नुसतं फुलून गेलं होतं. कार्यक्रम पार पडला. जेवणं झाली. त्यानंतर काही जणांनी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा बोलून दाखवली. ही तर सर्वांना दुसरी मेजवानी!! प्रत्येक जण नानांबद्दल भरभरून बोलत होता. प्रत्येकाच्या बोलण्यात नानांचा मनमिळाऊ स्वभाव, माणसं जोडण्याची, जोडलेली माणसं राखण्याची हातोटी हे मुद्दे आवर्जून येत होते. आणि खरंच होतं ते... इतकी माणसं, केवळ रक्ताचीच नाही, तर निमित्तानिमित्ताने जोडलेली, सगळया आर्थिक स्तरातली, सगळया जातींची, सगळया मतांची. खूप थोडयांना असं जगन्मित्र होता येतं. नाना त्यातलेच एक. सगळयांकडून शुभेच्छांसह झालेल्या स्तुतिसुमनांना उत्तर द्यायला ते उभे राहिले. म्हणाले, ''मी खरंच आभारी आहे तुम्हा सर्वांचा. तुम्ही माझं जीवन अधिक सुंदर बनवलंय. जो माझ्यासमोर आला तो माझ्या परिघात सामील होत गेला. तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून मी किती श्रीमंत आहे याची जाणीव करून दिली मला.''

चार वाक्यात जगण्याचं तत्त्वज्ञान उलगडून दाखवलं त्यांनी. माणसाची श्रीमंती कशाने मोजायची? 'त्याच्या नावावर असलेल्या स्थावर-जंगम मालमत्तेने' अस उत्तर पटकन दिलं जाईल. पण हे सारं अनित्य आहे. काळाच्या ओघात येईल किंवा जाईल. म्हणूनच अशा अनित्य असणाऱ्या भौतिक संपत्तीपेक्षाही आपण आयुष्यात किती माणसं जोडली, किती टिकवली, अडचणीच्या वेळी किती आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहिली यावरच आपली श्रीमंती ठरते. खरं ना?

एखाद्या लहान मुलाकडे बघा ना... ते किती सहज जगतं नाती. अंगणातल्या चिमणी-कावळयाशीसुध्दा ताई-दादाचं नातं सहज स्वीकारतं ते बाळ. त्यांना आपल्यातला खाऊ देताना हा आपलेपणाचा धागाच तर असतो. असाच एक किस्सा. माझ्या नात्यातला एक गोंडस मुलगा पुष्कराज. ''मला भाजीच्या मळयात ने'' असा हट्ट धरून बसला. मी त्याला घेऊन गेले तर काय... त्याने मला मळयातली ओळख करून दिली. ''ही कोथिंबीरताई, हा मुळेदादा, हे मकेभाऊ, हे कुळीथ काका...'' मला तर हसूच आवरेना. पण मागाहून विचार करताना जाणवलं, माणसाची खरी प्रवृत्ती नाती जोडण्याची. त्या छोटयाच्या बोलण्यातून तीच तर व्यक्त झाली.

लहानपणी आकाशीच्या चांदोमामाशी, जंगलातल्या न पाहिलेल्या साऱ्या प्राण्यांशी, गोठयातल्या हम्माशी अगदी जिव्हाळयाचे संबंध असतात. गोष्टीतल्या पऱ्या, राजा, राजकुमार नकळत आपले सगे होऊन जातात. मामा-मावश्या, आत्या-काका यांनी आपलं लहानपण समृध्द केलेलं असतं. आजी-आजोबांशी असलेलं 'दुधावरच्या सायीचं नातं' तर किती हवंहवंसं!!

आईच्या कुशीत विसावताना आणि बाबांचा हात धरून चालताना, त्या दोघांसह खेळताना अनुभवलेली सुरक्षितता...

या साऱ्यांनीच तर बालपण सुंदर केलं आपलं. मग आली शाळा. तिने पहिली ओळख करून दिली आपल्याला खऱ्या जगाची. नातं जोडलं आपलं ज्ञानाशी. किती तऱ्हेचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्याशी जोडले गेलो आपण. वर्गातल भांडणं, बाईंचा खाल्लेला मार, पोहोचायला उशीर झाला म्हणून डोक्यावर दप्तर घेऊन घातलेल्या प्रदक्षिणा, मित्राने सगळा डबा खाऊन टाकला तेव्हा पोटात दाटलेली भूक... कशाकशाने या नात्यांना धक्का लावला नाही. रविवारच्या सुट्टीपेक्षा सोमवारच्या भेटीची अधिक ओढ लागायची. खरंच, किती छान होती ती नाती... सहज जुळून आलेली.

मग शाळा सोडताना जाणवलं होतं आपल्याला की, नातं काही फक्त सजीवांशीच नाही जुळत. आपला वर्ग, शाळेचं मैदान, आणि इतकी वर्षं नकळतपणे हृदयस्थ असलेली शाळा माउली -

शाळेतून थोडया मोठया जगात प्रवेश करतो. तारुण्याची लहर धमन्यांतून दौडू लागते. पुस्तकं, प्रयत्नातून मिळवलेलं ज्ञान, चित्रपटातले नायक-नायिका, भन्नाट काहीतरी करण्याची झिंग यांच्याशी तरुणपणात विशेष सलगी होते. कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्याभोवती फिरणारे नवे नातेसंबंध निर्माण होतात.

कॉलेजमधून शिक्षण संपवून अधिक मोठया जगात आपण भरारी घेतो. कोणी उच्च शिक्षणासाठी, तर कोणी नोकरीसाठी बाहेर पडतो. प्रत्येक ठिकाणी माणसं भेटत जातात. काहींच्या छान तारा जुळतात. अधिक परिपक्व नाती या वयात निर्माण होतात.

अनौपचारिक, जिव्हाळयाच्या नात्यांबरोबर औपचारिक नाती जोडण्याचं, जपण्याचं कौशल्य याच काळात शिकलं जातं. ही औपचारिक नाती जितकी चांगली हाताळता येतात, तितकी ती व्यक्ती तिच्या व्यवसाय-नोकरीत अधिकाधिक यशाकडे झेपावते.

आणि याच काळात अनौपचारिक नात्यांच्या जगालाही एक वेगळी झळाळी येते. लग्नाच्या नाजूक बंधाने दोन आयुष्यं एकत्र येतात. या एका नात्यातून अनेक नवी नाती (सासरची मंडळी) आपल्या जगात हक्काने प्रवेशतात.

पुढे दोघांच्या संसारात तिसऱ्या जिवाची चाहूल लागते अन् नात्यांचा प्रवास एक सुंदर वळण घेतो. 'आई-बाबा' हे हवंहवंसं नातं आपण भरभरून जगतो. आणि आपला बालपणापासून जपलेला नात्यांचा 'रंगीबेरंगी ठेवा' त्या छोटया जिवाकडे अलगद दिला जातो... मग पुन्हा चक्र सुरू.... चांदोमामा, चिऊताई, मामा-मावश्या... ही आहे आपली नात्यांची आदर्श पध्दती. पण आज हे असं, इतक सहज सारं घडतंय का? आपणही काही गोष्टीत पश्चिमेच्या धर्तीने चालू लागलोय. कुटुंबापेक्षाही व्यक्ती हा घटक अधिक ठळकपणे परिस्थितीनुसार अधिक महत्त्व पावू लागला. अनेक स्थित्यतरांना सामोरं जाताना 'नाती' मात्र विरळ होताना दिसतात. सहज होणाऱ्या भेटीगाठी, संवाद आता नैमित्तिक झालेत. प्रत्येकाची स्वतंत्र विश्व, प्रत्येकाला हवी असलेली 'स्पेस' यामुळे नाती थोडी दुरावतात, असं वाटतं का आपल्याला?

व्यक्ती-व्यक्तीत वाढत जाणारी ही अदृश्य दरी अनेकांना अस्वस्थ करू लागली आहे. मग यावर उपाय काय? तर, पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याकडे पाहणं. अन् एक पाऊल पुढे टाकणं...

माणसं जोडणं आणि नात्यांची नाजूक वीण गुंफत आयुष्य अधिकाधिक सुंदर बनवणं ही एक कला आहे. ती आत्मसात करतानाच आपण आपल्या जीवनचित्रात एका सुंदर रंगाची भर घालत असतो.

कल्पना करा - आपण एका निर्जन बेटावर एकटे आहोत. सगळी व्यवस्था उत्तम आहे. खान-पान सगळंच छान... किती काळ आपण तिथे राहणं पसंत करू?

अगदी बरोबर... कंटाळा येईपर्यंत! कारण माणसाला माणसांसह राहायला, आपली सुखदु:ख वाटून घ्यायला, राग, रुसवा, प्रेम, सारं काही द्यायला आणि घ्यायला हवी असतात माणसं. त्याच्याशी जोडलेली माणसं... प्रत्येक माणूस आपापल्या परीने नाती जगतो. कारण ती नाती ही त्याची प्राथमिक गरज आहे. अन्न-वस्त्र-निवारा-शिक्षण या साऱ्यांत तो एकटा आहे. पण नाती त्याला वेगवेगळं अस्तित्व देतात.

तर अशी ही नाती. काही नाती ओघाने येतात. त्यात आपल्याला काही निवड नसते. जशी रक्ताची नाती. पण काही नाती आपण कमवायची असतात.... मित्र-मैत्रिणी, जीवनाचा जोडीदार.

'प्रेम, जिव्हाळा, आपुलकी' ही ज्या नात्यांचा आधार असते, ती सारी अनौपचारिक नाती, तर विशिष्ट कामाकरिता निर्माण झालेली व्यवस्था हा ज्या नात्यांचा आधार असतो, ती औपचारिक नाती. औपचारिक नात्यात भावनिक बंध नसतात. ती तात्कालिक, कामापुरती असतात. म्हणजे बघा हं, आपण प्रवासाला निघतो. बसचा 8-10 तासांचा प्रवास असतो. या दरम्यान बसचा ड्रायव्हर, कंडक्टर, बसमधले सहप्रवासी सगळयांच्यात एक नातं निर्माण होतं. पण ते तेवढया वेळापुरतं असतं. तसंच आपल्या कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ, सहकारी आणि कनिष्ठ या सर्वांसह जो व्यवहार चालतो, तोही या औपचारिक नात्यांद्वारे. पण आपल्या दिवसभराचा विचार केला तर एक तृतीयांश भाग आपण या औपचारिक संबंधांच्या माध्यमातून व्यतीत करतो. त्यामुळे आपल्याला ही नातीदेखील चांगल्या प्रकारे जपता आली पाहिजेत.

औपचारिक संबंधात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला स्वत:च्या क्षमतेने, कामाने स्वत:ला सिध्द करावं लागेल. आपण जर आपलं काम व्यवस्थित करत नसू, तर हे संबंध फारसे यशस्वी होणार नाहीत. घरात, मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात जसं आपल्याला गुणदोषांसह स्वीकारतात, तसं इथे स्वीकारलं जात नाही. त्यामुळे स्वत:चे गुण-दोष ओळखून त्यावर जो काम करतो, तो यांत यशस्वी होतो. भावनांच्या आहारी न जाता आपलं मत व्यक्त करणं आणि दुसऱ्यालाही तसंच स्वीकारणं हे कौशल्य आपल्यात आलं, तर आपण नक्कीच हे नातं टिकवू शकतो. याला जोड हवी ती सकारात्मक संवाद कौशल्याची.

आता पाहू या जिवाभावाची नाती. काही लाभलेली अन् काही कमवलेली नाती. खरं तर नातं हे दिसत नाही, पण ते दोन व्यक्तींना जोडतं. आणि आपल्या आयुष्यात जितकी जास्त नाती आणि तीही हवीहवीशी वाटणारी असतील, तितके आपण समृध्द होतो. यासाठी असलेली नाती जपणं, नवी नाती जोडणं आणि जोडलेली टिकणवं या त्रिसूत्रीवर आपल्याला काम करावं लागेल.

यासाठी पहिलं कौशल्य आत्मसात करावं लागेल - प्रत्येकात असणाऱ्या चांगलेपणाला शोधणं आणि स्वीकारणं. निराशेने त्रस्त असलेली माया (नाव काल्पनिक) माझ्याकडे आली. बोलता बोलता तिने तिच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाच्या अवगुणांचा पाढा वाचला. तिला मी त्यांचा एक चांगला गुण शोधायला वेळ दिला, पण तिला काही तो सांगताच येईना. म्हणून दुसऱ्यामध्ये चांगलं काय आहे ते जाणीवपूर्वक समजून घ्यावं. आणि त्या गुणाचा दुवा पकडून त्याच्याशी नातं निर्माण करावं, नाहीतर मायासारखा एकाकीपणा अन् त्यातून आलेली निराशा आपल्यालाही हतबल करू शकते.

नात्यांना हवा असतो विश्वास आणि सन्मान. हे देणं प्रत्येक नात्याचा पाया दृढ करतं, प्रत्येक माणसाला वाटत असतं की आपण समोरच्या व्यक्तीवर जो विश्वास ठेवला, तो त्याने जपावा. आपल्या मनातल्या गोष्टी आपण अशाच माणसांना सांगतो, जी माणसं ते त्यांच्यापाशी जपून ठेवतात. मग याच पध्दतीने आपल्यालाही इतरांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला, तो राखता यायला हवा.

एखादी आई वारंवार आपल्या मुलाची उलटतपासणी करील किंवा एखादी पत्नी तिच्या पतीवर संशय घेईल, तर त्यांच्या नात्यातला जो विश्वास आहे, तो डळमळीत होईल. कदाचित या संशयापाठी प्रेमाचा अतिरेक असेल, पण नातं टिकतं ते केवळ प्रेमावर नाही, तर विश्वासपूर्ण प्रेमावर. म्हणून नात्यांमध्ये कोणत्याही संशयाला, शंकेला थारा नको. अर्थात हा विश्वास दोन्ही बाजूंनी असणं आवश्यक आहे.

अनेकदा इतकी जवळीक झाली की दुसऱ्याला त्याचं 'स्वत:चं भावविश्व' आहे, त्याची मतं, आवडीनिवडी आहेत हे आपण विसरतो आणि त्या व्यक्तीला गृहीत धरायला लागतो. एखाद्या आईवडिलांना त्यांची मुलं सहज म्हणतात, ''तुम्ही आमच्यासाठी केलं, त्यात विशेष काय केलं? प्रत्येक आईवडील करतातच मुलांसाठी.'' किंवा खूप वेळा पत्नीला बऱ्याच निर्णयात गृहीत धरलं जातं. पण त्यांना काय वाटतंय याचा विचार केला, तर... आईवडिलांनी अनेक अडचणी झेलून, स्वत:ची हौसमौज बाजूला सारून आपल्याला इथवर आणलं, यासाठी त्यांच्याविषयी मनात आदर असला पाहिजे. नेहमी सगळया निर्णयांना मूर्त रूप देणारी घरातली स्त्री, तिच्या मताला सन्मान असला पाहिजे.

नाती जपण्यासाठी हे कौशल्य आत्मसात केलंच पाहिजे. प्रत्येकांशी बोलताना किंवा त्याच्याबाबत विचार करताना मनात आदर ठेवावा. आपल्या शिक्षकांचा विचार मनात येतो, तेव्हा आपण त्यांचा उल्लेख कसा करतो... विचार करा.

नात्यांच्या ज्योतीला हवी असते संवादाची वात. आजकाल संवाद हरवत चाललाय. सकाळी सगळे घाईघाईने उठून कामावर जातात, संध्याकाळी दमून येतात. मग टी.व्ही.शी थोडया गप्पा होतात. मग जेवण अन् मग झोप. या साऱ्यात बोलणं होतं ते कामापुरतं. त्या व्यतिरिक्त एकमेकांच्या विश्वात सहज प्रवेश करू शकणारा संवाद कुठे होतो? म्हणून प्रत्येक नात्याला त्याचा वेळ दिला गेला, मनमोकळं बोलता आलं, तर ते नातं छान बहरून येईल. आपल्या नातेवाइकांच्या काही गोष्टी आपल्याला पटतात, तर काही नाही पटत. ज्या पटल्या, त्याबद्दल त्यांना मनापासून प्रतिक्रिया द्यावी; पण जे आपल्याला नाही पटलं, ते एकदा सांगावं अन् मग तो विषय त्याच्यावर सोपवावा.

दुसऱ्याचे निर्णय दुसराच घेणार. ते आपल्या मनाप्रमाणे घेतले जावेत असा हट्ट धरू नये. प्रत्येकाला आपल्या हिताचा विचार करण्याची क्षमता आणि स्वातंत्र्य आहे. त्याचा आदर करावा. आपण जर त्या व्यक्तीवर दबाव आणला, जबरदस्ती केली, तर नात्यांत कडवटपणा येतो.

बोलताना दुसरी व्यक्ती आपल्याकडून दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकदा न बोलता आपल्या वागण्यातूनही माणसं दुखावली जातात. जेव्हा आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, तेव्हा असं घडतं. मग कदाचित आपण ''सॉरी'' म्हणत असू, पण मुळातच कुणी दुखावलं जाईल असं वागणं टाळलं, तर...

नाती टिकवायची असतील, तर आणखी एक गोष्ट आपल्या मनाला शिकवायला हवी. 'जुन्याच गोष्टींचा काथ्याकूट न करता बदल स्वीकारावा. तेव्हा 'तसं' वागणारी व्यक्ती आता 'असं' वागू शकते, माणसात नित्य बदल घडतो हे लक्षात घ्यावं. एखाद्या व्यक्तीने पूर्वी चुकीचं वर्तन केलं असेल, तर तेच त्याला सारखं ऐकवू नये. तो बदलला आहे, यावर विश्वास ठेवावा.

नात्यांकडून माफक अपेक्षा असतात. पण जेव्हा अपेक्षांचा अतिरेक होतो तेव्हा नाती दुरावतात. आणि या अपेक्षा एकतर्फी असल्या, तर...? माझ्याकडे आलेली एक केस पाहा ना. तिला नेहमी वाटतं की मला सगळयांनी समजून घ्यावं. मी चुकले तरी मला समजून घ्यावं. पण दुसऱ्याच्या छोटयाशा चुकीला क्षमा करायची तिची तयारी नाही. मग तिच्याबद्दल लोकांचं मत काय होणार?

नाती तुम्हाला भरभरून देतात. पण आपण त्यांना प्रेम, जिव्हाळा दिला पाहिजे. प्रत्येक नात्यासाठी असलेल्या प्रामाणिक भावना व्यक्त केल्या पाहिजेत. इतरांना काय आवडतं, काय नकोसं वाटतं, याचं निरीक्षण करून समजून घेतलं पाहिजे.

आपल्या नातेवाइकांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगी आपण त्यांच्यासह असावं किंवा त्याची दखल घ्यावी. फोन, पत्रं, निरोप अशा कोणत्याही माध्यमातून आपला आनंद वा दु:ख त्यांच्यापर्यंत पोहोचवावं.

आपण जेव्हा आजारी पडतो, तेव्हा आपली इतरांकडून काय अपेक्षा असते? इतरांनी आपली काळजी घ्यावी, शांतता असावी, आपला त्रास समजून घ्यावा हीच ना? हे केव्हा शक्य होईल, जेव्हा ते आजारी नसतानादेखील आपल्या जागी स्वत:ला ठेवून समजून घेतील. यालाच म्हणतात तद्नुभूती (Empathy). नात्यांना या तद्नुभूतीची साथ मिळाली, तर गोष्टी फार सोप्या होतात. आपण इतरांना प्रश्न करण्याआधी स्वत: त्या जागी जाऊन विचार केला, तर आपले बरेच प्रश्न आधीच सुटतात आणि जे उरतात, ते समोरच्या व्यक्तीच्या फायद्याचे ठरतात. स्वत:चा चश्मा काढून इतरांच्या नजरेने बघायला शिकणं हे कौशल्य आत्मसात करावं लागेल.

आता पाहू काही सोप्या टिप्स, ज्या देतील नात्याची अनमोल भेट...

* जात, आर्थिक स्थिती, राजकीय पक्षाला पाठबळ, शैक्षणिक, दर्जा यांच्या चौकटीतून आपली नाती बाहेर काढू या.

* माणसाला माणूस म्हणून पाहू या.

* नात्यांमध्ये सहजता आणू या.

* आपल्या साऱ्या नातेवाइकांची छान यादी बनवून, त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याशी संपर्क साधू या.

* प्रवासात, आजूबाजूला भेटणाऱ्या माणसांशी ओळख काढू या.

* कुटुंबाला देण्याचा वेळ ठरवून घेऊ या.

* व्हॉट्स ऍप, फेसबुक यांवरील संवादाच्या नादात वैयक्तिक संपर्क हरवत चाललाय का, याचा विचार करू या.

* आपल्याकडे येणारे लाईटमन, पोस्टमन, सिलिंडरमन या साऱ्यांशी आपुलकीने, सन्मानाने बोलू या.

* नात्यांमध्ये हट्ट येणार नाही, याची काळजी घेऊ या.

* प्रत्येक नात्याला वेगळं स्थान आहे. सगळयांना एकाच तराजून तोलण्याचा मोह टाळू या.

* आपली चूक झाली, तर स्वत:हून मोकळेपणे मान्य करू या.

* टी.व्ही.वरील नात्यांची चिरफाड करणाऱ्या मालिका पाहणं सोडून देऊ या.

* दुसऱ्याला समजून घेऊ या.

* आपले परिचित, लांबच्या नात्यातले जे लोक आहेत, त्यांना सहज क्षेमकुशल विचारण्यासाठी पत्रं, फोन किंवा भेटीतून संवाद साधू या.

* गैरसमजापोटी वा मीपणामुळे चांगली माणसं आणि सुंदर नाती आपल्याकडून निसटणार नाहीत, याची काळजी घेऊ या.

* आपलेपणाचे चार शब्द महागडया वस्तूंच्या भेटींपेक्षा जास्त आनंद देतात. नात्यात शिरणारा कोरडेपणा काढू या.

* शेजाऱ्यांशी, परिसरातल्या लोकांशी परिचय करून घेऊ या.

* नात्यांना सुगंधी करते ती क्षमाशीलता. जुन्या घटना लक्षात ठेवून नाती दुरावत जातात. म्हणून दुसऱ्याला क्षमा करून किंवा क्षमा मागून नव्याने सुरुवात करू या.

* प्रत्येकातला वेगळेपणा स्वीकारू या. त्याला आपलंसं करू या.

खरं तर ही यादी खूप मोठी होईल. आपण प्रत्येक जण त्यात आपली भर घालत जाऊ. खूप माणसं जोडत, जपत हा आयुष्याचा प्रवास आनंददायी होऊन जाईल.

आपल्या आजूबाजूला 'नानांसारखी' अनेक माणसं दिसतील. त्यांना पाहत, त्यांच्याकडून शिकत आपली 'खरी संपत्ती' वृध्दिंगत करता येईल.

फुलांवर बागडणाऱ्या फूलपाखरांकडे पाहा ना... जितक्या अधिक रंगांची शिंपण त्याच्या पंखांवर असतं, तितकं त्याचं सौंदर्य खुलतं.

नात्यांच्या अनोख्या रंगांचा ठेवा जपत आपणही आपलं जीवन अधिक सुंदर करू या.

समुपदेशक

9823879716, 9273609555, 02351-204045

suchitarb82@gmail.com