प्रजासत्ताक दिनानिमित्त संभाजीनगरातून संगीताच्या नादब्रह्म सप्तसुरांनी भारतमातेच्या गुणगानाचा घोष घुमला. 24 घोष पथकांच्या 300 बँड वादकांची ही अनोखी शिस्तबध्द स्वरवंदना देशभक्तीचा नावीन्यपूर्ण अविस्मरणीय आविष्कार प्रकट करणारी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेचे सामूहिक पूजन करण्यात आले.
लग्नाच्या वरातीत बँडच्या तालावर थिरकणाऱ्या - तेही केवळ हिंदी चित्रपटातील प्रेमगीतांच्या तालावर थिरकण्याची सवय लागलेल्या मराठवाडयातील तरुणाईसमोर हा अनोखा पर्याय ठेवण्यात आला. आनंदाची गोष्ट म्हणजे या उपक्रमाला अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला.
संभाजीनगर शहरातील आणि ग्रामीण भागातील 24 ब्रासबँड पथकातील 300 वादकांच्या मांदियाळीने सिडको भागातील राजीव गांधी स्टेडियमवर एकत्रितपणे ही स्वरवंदना साकारली.
साईकृपा, शिवम, गणेश, सरस्वती, झंकार, तुषार, भारत, स्वामी समर्थ, प्रभात, दयासागर या शहरातील प्रख्यात नामवंत ब्रासबँड पथकांनी अतिशय जोशपूर्ण उत्साहात देशभक्तीचा जागर केला. या वेळी संपूर्ण स्टेडियमवर भारतमातेच्या जयजयकार घुमला.
'मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे-मोती'पासून ते 'ये देश है वीर जवानोंका', 'जयोस्तुते', 'भारत वंदे मातरम' अशा भारावून टाकणाऱ्या अनेक रचनांचे दोन तास चाललेले सादरीकरण उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे करणारे होते.
''आपल्या देशासोबत आपले आईचे नाते आहे आणि त्याच भावनेचे प्रकटीकरण करणारी 'भारतमाता की जय' ही घोषणा आहे'' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य मा. मधूभाई कुलकर्णी यांनी सांगितले. भन्ते विशुध्दानंद महाथेरो यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला निश्चितपणे एकात्मतेचे वळण मिळेल असा आशावाद व्यक्त केला. चर्मवाद्याचे ज्येष्ठ अभ्यासक शरद लांडगे यांनी, भारतीय परंपरागत वादनकला ही संपूर्ण विश्वाच्या औत्सुक्याचा आणि अभ्यासाचा विषय असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
मराठवाडयातील ज्येष्ठ कला आणि संगीत अभ्यासक लक्ष्मीकांत धोंड यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुरेख सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीष कुलकर्णी, वेदान्त देशपांडे व प्रकाश पुराणिक यांनी परिश्रम घेतले.
वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या संस्थेकडून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या या स्वरवंदना कार्यक्रमाची दखल घेण्यात आली आहे. या प्रसंगी वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे संचालक पवन सोळंकी यांनी संयोजन समितीला विशेष पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरवले.
संपूर्ण समाजातील विविध परंपरागत ब्रासबँड पथकांना एकत्र करून त्यांचे विविध सूर एका भारतमातेला समर्पित करणाऱ्या या अनोख्या सामाजिक समरसतेच्या उपक्रमाची विशेष नोंद या संस्थेने घेतली आहे.
9423731480