अभूतपूर्व यश

विवेक मराठी    27-Feb-2017
Total Views |

या निवडणुकीत भाजपा व सेना हेच दोन महत्त्वाचे पक्ष होते. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्वत:चे दुय्यम स्थान स्वीकारले होते. मनसे तर लयास गेलाच होता. तरी मनसेला 7 जागा मिळाल्या आहेत. आता इतर अपक्षांना सोबत घेऊन कुणाचा महापौर बनतो हे बघणे रंजक राहणार आहे. या निकालाचा योग्य अन्वयार्थ जाणून न घेता, ''मुंबईचा महापौरच काय, भावी मुख्यमंत्रीही सेनेचा राहील'' अशी दर्पोक्ती उध्दव ठाकरे यांनी केली आहे. अशा वातावरणात भाजपा-सेना एकत्र येणार काय, हा प्रश्न आहे.


हाराष्ट्रातील मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ज्या निवडणुकीचा उल्लेख केला जातो, त्या नुकत्याच पार पाडल्या. दहा महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळविलेले आहे. या यशामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या व पारदर्शक कारभारावर लोकमान्यतेची मुद्रा उमटली आहे. आता यानंतर फडणवीस सरकारला उर्वरित अडीच वर्षांचा कारभार सुखेनैव करता येणार आहे. या निवडणुकीपूर्वी निश्चलनीकरण, नोटबंदी, शेतकऱ्यांना होणारा त्रास वगैरे प्रश्न निर्माण झाले होते. भाजपा या आघाडीवर पराभूत होत आहे असे चित्र माध्यमांनी व विरोधकांनी निर्माण केले होते, रंगविले होते; पण ते फक्त कल्पनाचित्र होते, हे निकालांनी स्पष्ट केले आहे. निश्चलनीकरणाचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016ला झाला. त्यानंतर नगर परिषदा निवडणुका झाल्या होत्या व तो कौल भाजपाला मिळाला होता; तरीही या निवडणुकीत असे सांगितले जात होते की त्या वेळी शेतकऱ्यांनी साथ दिली होती, पण आता त्यांना जबर फटका बसला आहे, त्यामुळे ते भाजपाला धडा शिकविल्याविना राहणार नाहीत अशाही वल्गना केल्या जात होत्या. पण जि.प. निवडणुकीतही भाजपाला दणदणीत यश मिळाले. या वेळी वर्धा, सांगली, लातूर, गडचिरोली या जिल्हा परिषदाही भाजपाने ताब्यात घेतल्या आहेत. परिणामत: भाजपा आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

भाजपाला 2012मध्ये सर्व महापालिकांत मिळून फक्त 205 जागा होत्या. त्या जागा आता 550 झाल्या आहेत. दहा महापालिकांपैकी फक्त ठाणे मनपात भाजपाला फारसे यश मिळाले नाही. त्या ठिकाणीही 7 जागांवरून भाजपा 23 जागांवर पोहोचला आहे, पण या महापालिकेत सेनेला निर्विवाद यश मिळाले आहे. त्यांना या ठिकाणी सर्वात जास्त व जादुई आकडयापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत, ती संख्या 67 आहे, तर राष्ट्रवादीला 34 जागा मिळाल्या. उल्हासनगर, सोलापूर या ठिकाणी भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. विदर्भातील अकोला, अमरावती या महापालिका भाजपाने स्वबळावर आणल्या आहेत. नागपूरला दहा वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. या वेळी भाजपाने आपल्या यशाने सर्वांचे डोळे दिपविले आहेत. 151 जागांच्या या महापालिकेत भाजपाला 108 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 29, तर राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली आहे. सेनेला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. आमदार प्रकाश गजभिये यांच्या पत्नी पराभूत झाल्या.

भाजपात खूप गटबाजी आहे, अनेक संघ स्वयंसेवकांनी भाजपा विरोधात बंड पुकारले आहे, भाजपा आता गुंडांचा पक्ष झाला आहे वगैरे वृत्तपत्रांतून व वाहिन्यांवरून कानावर पडत होते. सेनेने तर भ्रष्टाचाराचा आरोपही लावला होता. पण यापैकी कशावरच मतदारांनी विश्वास ठेवला नाही. 108 जागा भाजपाला दिल्या आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर सभा घेतल्या होत्या. महापालिकेतील विरोधी पक्षनेते व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचा पराभव झाला आहे. भाजपातून बंडखोरी केलेल्यांपैकी कुणीही विजयी झाला नाही. अगदी मोमीनपुरासारख्या मुस्लीमबहुल भागातूनही भाजपा विजयी झाला आहे.

अमरावतीलाही मनपा भाजपाच्या ताब्यात नव्हती, पण आता 87पैकी 45 जागा घेत भाजपा सत्तेत येणार आहे. अकोल्यात तीच स्थिती आहे. विदर्भ हा भाजपाचा महत्त्वाचा गड झाला आहे. विदर्भातील जिल्हा परिषदांत अशी स्थिती आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा येथे भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कोकणातील रत्नागिरी जि.प.मध्ये भाजपाला एकही जागा मिळालेली नाही. या ठिकाणी सेनेला 55पैकी 39 जागा मिळाल्या आहेत. असे का झाले? याचा विचार भाजपाला करावा लागणार आहे. अशी स्थिती राज्यात कुठेही नाही.

सोलापुरात भाजपाचा खासदार, आमदार निवडून आला, पण महापौर मात्र कधीच भाजपाचा झाला नव्हता. या वेळी सोलापूरकरांनी भाजपाला ही संधी दिली आहे. माजी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री व राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव ओसरत चालला आहे याचीही द्वाही या निवडणुकीने पसरविली आहे. या वेळी सुशीलकुमारांची कन्या आमदार प्रणिती शिंदे हिचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयास काँग्रेसने केला होता, पण तो फसला असेच म्हणावे लागेल. या ठिकाणी 102पैकी 49 जागा भाजपाला मिळाल्या आहेत. भाजपाने नाशिक मनपातही असेच यश मिळविले आहे. ही महापालिका मनसेच्या ताब्यात होती. ती भाजपाने हिसकावून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर नाशिकला नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती. नाशिकमध्ये शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांचीही सभा झाली. त्यानंतर मनसेचे राज ठाकरे यांनी नाशिकला संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्यापूर्वी भाजपाची बदनामी करणाऱ्या दोन फिती व्हायरल झाल्या होत्या, तरी मतदारांवर त्यांचा प्रभाव पडला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा सर्वाधिक प्रभावी ठरली. शिवाय कुंभमेळयाच्या काळात भाजपाने केलेले कामही नाशिककरांना सुखावून गेले. त्यामुळेच आता नाशकात भाजपाचा महापौर होणार आहे.

उल्हासनगरमध्ये एकेकाळी भाजपाचा वा जनसंघाचा दबदबा होता, पण पप्पू कलानीचा उदय झाला व भाजपाला उतरती कळा लागली होती. या वेळी भाजपाने काही खात्रीपूर्वक पावले टाकून विजय संपादन केला आहे. भाजपा या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष आहे.


पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. त्या ठिकाणी पवारांचा गड उद्ध्वस्त करीत भाजपाने मुसंडी मारली आहे. पिंपरी-चिंचवडमधील भाजपा यशाने अजितदादा पवार हबकले आहेत. पुण्यात भाजपाच्या नगरसेवकांची संख्या शंभरीच्या जवळपास जात आहे. पुण्यात सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसजवळ नेतृत्व नव्हते. भाजपाच्या पालकमंत्र्यांनी - गिरीश बापट यांनी ती पोकळी भरून काढली. या दोन्ही ठिकाणच्या यशासाठी भाजपाचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. मात्र पुणे जि.प. राष्ट्रवादीने कायम राखली आहे.

या सर्व निवडणुकांत सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती ती मुंबई महापालिकेची. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे व ती सत्ता कायम राहावी यासाठी शिवसेना फार कासावीस झाली होती. खरे म्हणजे मुंबई व ठाणे यात भाजपाने अगदी सुरुवातीपासून सेनेला मोठा बंधू मानले होते. त्यामुळे भाजपाला नेहमीच कमी जागा मिळत. पक्षाची व्यवस्था, संघटनाही फारशी प्रभावी नव्हती. अशा स्थितीत सेनेने मुंबई महापालिकेत भाजपाला अतिशय डिवचण्याचा प्रकार केला. भाजपाला फक्त 60 जागा (एकूण जागा 227) देऊ केल्या होत्या. सेनेने युती तोडली, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खा. किरीट सोमय्या यांनी भाजपावरील आरोपांच्या शिवराळपणातही आपला संयम कायम राखला व भाजपाला एकूण 82 जागा मिळवून दिल्या. सेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपा व सेना हेच दोन महत्त्वाचे पक्ष होते. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी स्वत:च दुय्यम स्थान स्वीकारले होते. मनसे तर गळपटली होती. तरी मनसेला 7 जागा मिळाल्या आहेत. आता इतर अपक्षांना सोबत घेऊन कुणाचा महापौर बनतो हे बघणे रंजक राहणार आहे. या निकालाचा योग्य अन्वयार्थ जाणून न घेता, ''मुंबईचा महापौरच काय, भावी मुख्यमंत्रीही सेनेचा राहील'' अशी दर्पोक्ती उध्दव ठाकरे यांनी केली आहे. अशा वातावरणात भाजपा-सेना एकत्र येणार काय, हा प्रश्न आहे.

मुंबईच्या या निकालाचा परिणाम असा झाला की, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईत खा. राहुल शेवाळे यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत, तर आशिष शेलार यांचे बंधूही पराभूत झाले आहेत. खा. किरीट सोमय्या यांचे पुत्र विजयी झाले आहेत.

जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता असे दिसते की, नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग कायम राखला आहे; तर सांगली ही राष्ट्रवादीची महत्त्वाची जि.प. होती, पण यात जयंत पाटील ती कायम राखू शकले नाहीत. या ठिकाणी भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे. या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव विजयी होऊ शकले नाहीत. त्यांच्या उमेदवारीमुळे स्वाभिमानी पक्षात फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता ती जि.प. मिळाल्यामुळे हा वादही संपायला हरकत नाही.

लातूर हा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जिल्हा. पण विलासरावांनंतर त्यांच्या पुत्राला - अमितला हा जिल्हा राखता आला नाही. या ठिकाणी भाजपा विजयी झाली आहे. जळगावातही भाजपाला असेच यश मिळाले आहे. जळगाव जि.प.मध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना यश संपादन करता आले नाही. या ठिकाणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली आहे. पंकजा मुंडे यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.

या सर्व यशात एक बात स्पष्ट झाली आहे की, या निवडणुकीने संपूर्ण राज्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आपले स्थान गमवावे लागले आहे. आज त्या पक्षांची फार मोठी पडझड झाली आहे. भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. मनसेचे पार पानिपत झाले आहे.

या निवडणुकीतून आणखीही एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे जेव्हा भाजपा-सेना युती न करता विभिन्नपणाने लढतात, तेव्हा दोघांच्याही जागा वाढतात व विरोधी पक्षांची स्पेसही कमी होते. महाराष्ट्रात जवळजवळ सर्वत्र काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा पराभव झाला आहे. नाही म्हणायला मराठवाडयातील नांदेड व हिंगोली या जि.प. काँग्रेसने कशाबशा राखल्या आहेत. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कसेबसे काठावर पास झाले आहेत, तर भाजपाने नागपूरसह अनेक ठिकाणी इतिहास घडविला आहे.

एकूणच विकासकामे व पारदर्शकता यावर लोकमानसाची राजमुद्रा महाराष्ट्राने उमटविली आहे. भाजपा हा फक्त शहरी पक्ष न राहता आता ग्रामीण महाराष्ट्रात, तसेच साखर सम्राटांच्या क्षेत्रातही भाजपा रुजू लागला आहे. कमळ फुलू लागले आहे.

  8888397727