पाकिस्तानात अतिरेकाचे शह आणि काटशह

विवेक मराठी    28-Feb-2017
Total Views |

 16 तारखेच्या हल्ल्यानंतर झालेल्या प्रतिशोधात सध्याच्या घटकेला अफगाण लोकांना लक्ष्य केले गेले असले, तरी सूफींचे अनुयायी लष्करातूनही आहेत. उद्या सूफीविरोधात वहाबी इस्लाम असा संघर्ष उभा होईल, त्या वेळी एकसंध वाटणारे लष्कर आणि आयएसआय यात फूट पडू शकेल. त्याचप्रमाणे जर सूफी अनुयायांनी आपली पारंपरिक उपासना पध्दती घट्ट धरून ठेवली, तर कट्टर वहाबी विचारसरणीला माघार घ्यावी लागेल. त्यातच सौदी अरेबियाचे आर्थिक पाठबळ मिळेनासे झाले, तर पाकिस्तानला अंतर्गत संघर्षावर मात करता येईल. अन्यथा दोन्हीकडून काफीरच मारले जातील, पण मानवतेच्या दृष्टीने हे हितावह नाही.

भारत आणि पाकिस्तानच नव्हे, तर थेट इराक, तुर्कस्तान आणि मोरक्को या देशांमधून इस्लाममधील सूफी पंथाचे व संतांचे मझारी दर्गे आहेत. तेथे हजारो भाविक दर्शनाला आणि नवस बोलायला, तसेच नवस फेडायला जातात. ही परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. या सूफी संप्रदायाचे वैशिष्टय म्हणजे त्यात हिंदूंमधील पूजेसारखे उपचार होतात. मझारीवर फुलांची चादर पसरणे, धूप दाखविणे, नवस बोलणे व नंतर जे काही कबूल केले असेल ते चढविणे, गाणे-बजावणे आणि तालावर सामूहिक नृत्य करणे अशा परंपरा आहेत. इस्लाममध्ये कुठल्याही प्रकारची मूर्तिपूजा - मूर्तीची असो किंवा थडग्याची असो - निषिध्द आहे. गाणे, वाद्य वाजविणे, नाच करणे हे आध्यात्मिक साधना म्हणून करणे हे अजिबात मान्य नाही. या जगात फक्त अल्ला सोडला, तर इतर कुठल्याही दैवी शक्तीला वरदान अथवा फळ देण्याचा अधिकार नाही. त्या दृष्टीकोनातून पाहिले असता सूफी पध्दतीची साधना ही इस्लामबाह्य ठरते. तसेच परमेश्वराशी ऐक्य होणे - अन् अल हक - मीच स्वत: सत्य, अल्ला आहे याची अनुभूती घेणे ही सूफी आध्यात्मिकतेची अत्युच्च पातळी आहे. वहाबी विचारसरणीत अल्लाच्या समकक्ष होणे ही तर धर्मभ्रष्टतेची - शिर्क - संकल्पना आहे. तसे सांगणाऱ्या कितीतरी सूफींना कडव्या मुस्लीम राजवटींनी ठार केले आहे. असे असले, तरी हिंदू आध्यात्मिक धारणेप्रमाणे हे विश्वच ईश्वराने व्यापले असल्याने अंतिमत: आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य ही मूलभूत मानवी अंत:संवेदना आहे. तीच सूफी अध्यात्माचा आणि तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. साहजिकच फार पूर्वीपासून भारतीय उपखंडात तिचा प्रभाव राहिला आहे. पाकिस्तानात - विशेषत: सिंध प्रांतात सूफींचा प्रकर्षाने प्रभाव असून इस्लामी जगतात प्रसिध्द असलेल्या अनेक सूफी संतांच्या मझारी-थडगे तेथे आहेत.

सूफी दर्गे अतिरेक्यांचे लक्ष्य

सूफी मतप्रणाली कुराणाच्या विरोधात जात असल्याने तिला धर्मबाह्य ठरवून तिचा बिमोड करण्याचे ध्येय सौदी अरेबियाप्रणीत वहाबी/सलाफी धर्मांधांनी ठेवले. जेथे जेथे सौदी अरेबियाचे पेट्रोडॉलर्स बरसले, तेथे तेथे स्थानिक परंपरांचा बिमोड करून कट्टर वहाबी विचारसरणी पुढे आणण्याचा प्रयत्न होतो आहे. आता स्थिती अशी आहे की, जे अतिरेकी गट सौदी अरेबियाचे वर्चस्व मानायला तयार नाहीत, तेसुध्दा सूफी विचारसरणीच्या विरोधात अतिरेकी हल्ले करतात. पाकिस्तानात सूफी मझारींच्या ठिकाणी अशा तऱ्हेचे हल्ले सातत्याने होत आहेत. तीनच महिन्यांपूर्वी बलुचिस्तानमध्ये हजरत शहानूरानी दर्ग्यावर अतिरेकी हल्ला झाला. त्याच पंचेचाळीस लोक मारले गेले. फेब्रुवारीच्या पूर्वाधात पाकिस्तानात सुमारे दहा अतिरेकी हल्ले होऊन त्यातील महत्त्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल घडवू शकणारा हल्ला दि. 16 फेबु्रवारीला सेहवान येथील लाल शहबाज कलंदरच्या दर्ग्यावर झाला. हा दर्गा फार प्रसिध्द दर्गा आहे.

या शहबाज कलंदरच्या आराधनापर अनेक सूफी रचना प्रसिध्द आहेत. त्यापैकी भारतात अत्यंत लोकप्रिय असलेली 'दमादम मस्त कलंदर' ही रचना दर्ग्याला धरूनच आहे. मराठीत आलेला 'धमाल' हा 'आरडाओरडा करत, मजा लुटत घातलेला गोंधळ' या अर्थाचा शब्द या दर्ग्यात होणाऱ्या सामूहिक नृत्यावरून आला आहे. दर गुरुवारी सायंकाळी दर्ग्यात सामूहिक 'धमाल' नृत्य एक प्रकारच्या आध्यात्मिक साधनेचा भाग म्हणून केले जाते. तीच वेळ साधून दि. 16ला आयसिसच्या एका आत्मघाती अतिरेक्याने बाँब फोडून स्वत:बरोबरच इतर 70 लोकांचा जीव घेतला. त्या बाँबस्फोटात सुमारे दीडशे लोक जखमी झाले. हा हल्ला पुरुषाने केला की महिलेने केला याबाबत शंका असली, तरी हा फार शक्तिशाली स्फोट होता. बऱ्याच पूर्वीपासून त्याची तयारी झाली असली पाहिजे. या स्फोटाने पूर्ण पाकिस्तान हादरले. एकूणच पाकिस्तानी जनता आपले सूफीपण अजून घालवून बसलेली नाही. लाखो लोक श्रध्देने या दर्ग्यांना भेटी देतात. त्यांना त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वावर हा हल्ला झाल्यासारखा वाटला. या दर्ग्याचे वैशिष्टय म्हणजे हा पूर्वी शैवाचा असावा. तेथे 1970च्या दशकापर्यंत एका बाजूस शिवलिंग असल्याचे लोकांच्या आठवणीत आहे.

आंतरराष्ट्रीय पडसाद

दोन वर्षांपूर्वी आयसिसने पाकिस्तानात पाय रोवल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्याचे नाव घेऊन अनेक अतिरेकी हल्ले पाकिस्तानात झाले. तिकडे सीरिया-इराकमध्ये आयसिस विरोधात अनेक देशांनी आटापाटया खेळत लढाई सुरू केली आणि गेल्या 2-3 महिन्यांपासून आयसिसचे साम्राज्य नष्ट होण्याच्या मार्गावर असताना त्याचे दूरगामी परिणाम दिसू लागले आहेत. या दरम्यान अमेरिकेचा हस्तक्षेप आणि प्रत्यक्ष सहभाग मागे पडून रशिया आणि इराण यांनी अलवाईट बशर अल अस्सादला बळ देत या सर्व साठमारीत स्वत:चे स्थान पक्के केले. त्याला महत्त्वाचे कारण आहे.  आयसिसचा जमिनीवर पाडाव झाला, तरी त्यात सामील असलेले हजारो अतिरेकी मारले जाणार नाहीत. ते आता सीरिया-इराक सोडून जवळच्या इतर देशांमध्ये आश्रय घेतील. रशियाला आता मोठी भीती आहे की, रशियातून आयसिसकडून लढायला गेलेले आणि प्रत्यक्ष लढाईचा अनुभव घेऊन अधिक कडवे, क्रूर, युध्दतंत्रात तरबेज, निर्ढावलेले 4-5 हजार अतिरेकी जेव्हा शेजारच्या मुस्लीम देशांमधून विखरतील, तेव्हा त्याच्यावर नियंत्रण मिळविणे कठीण जाईल. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून त्यांना केवळ आश्रयच मिळेल असे नाही, तर अवैध शस्त्रपुरवठा आणि साधनसामग्री उपलब्ध होईल, ती रशिया, चीन, इराण या देशांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. या आयसिसच्या कडव्यांना त्यांच्याच मार्गाने प्रतिबंध करायचा असेल, तर त्यांच्यासारख्याच असलेल्या तालिबान्यांशी जवळीक साधायला पाहिजे असे धोरण रशिया-चीनने स्वीकारले. त्यासाठी पाकिस्तानातील आणि अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना चुचकारण्याची व त्यांना गळाला लावण्याची चाल रचण्यासाठी प्रथम रशिया, चीन आणि पाकिस्तान यांची बैठक झाली. त्यानंतर 15 फेब्रुवारीला भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांना पुढच्या वाटाघाटींमध्ये सामील करण्यात आले. त्या बैठकीचे संपूर्ण वृत्त बाहेर आले नसले, तरी चीन आणि रशिया यांनी पाकिस्तानला मदत न देण्याची धमकी दिलीच असावी, असा माझा अंदाज आहे.

ट्रंप आल्यापासून तसेही पाकिस्तानचे पारडे अमेरिकत हलके झाले आहे. आतापर्यंत पाकिस्तान चीनच्या बळावर उडया मारत होता. चीनने जर मदतीचा हात आखडता घेतला, तर पाकिस्तानचे भवितव्य खरे नाही. त्याचबरोबर पाकिस्तानातील आणि अफगाणिस्तानातील जे असंतुष्ट गट तालिबान सोडून आयसिसचे पुरस्कर्ते झाले आहेत, त्यांचा पुरता समाचार घेऊन त्यांना ठेचण्याची संधी पाकिस्तानला पाहिजे होतीच. कलंदर दर्ग्यावर झालेला हल्ला हे आयतेच निमित्त पाकिस्तानला मिळाले. हे आयसिस पाठीराखे दोन्ही देशांच्या सीमा भागात जमून असल्याने त्यांच्यावर हल्ला करणे पाकिस्तानला शक्य झाले.

अफगाण लोकांवर रोख

दर्ग्यावर हल्ला झाल्याच्या पाठोपाठ पाकिस्तानी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लष्करी कारवाई सुरू केली. जे कोणी संशयित होते, त्यांना ठार करण्याचे धोरण सरसकट अवलंबिले. हे अतिरेकी जसे निर्दयी आहेत, तोच निर्दयी अतिरेकीपणा दाखवत पाकिस्तानी लष्कर फाटाच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले करू लागले. ते करताना त्यांनी तथाकथित आंतरराष्ट्रीय सीमा उल्लंघून पलीकडे अफगाणिस्तानात असलेल्या आयसिसच्या अतिरेकी तळांवर हल्ले केले. त्यात आयसिसचे अनेक अतिरेकी मारले गेल्याचा दावा केला. ज्या तीनशे संशयितांना पकडण्यात आले, त्यात बहुतांश लोक अफगाण होते. अफगाणिस्तानातून अतिरेकी पाकिस्तानात शिरू नयेत यासाठी तोरखाम आणि चमन या ठाण्यांवरील वाहतूक आणि वाहने व लोकांचे दळणवळण थांबविले. इतकेच नव्हे, तर तोफखाना दळ आणि रणगाडे दळ पश्चिम सीमेवर तैनात केले. एका आठवडयाच्या आत या सर्व भागात युध्दसदृश परिस्थिती निर्माण करून पाकिस्तान रशिया आणि चीन यांना संदेश देऊ इच्छिते की तुमच्याबरोबर आम्ही आयसिसविरोधात कडक धोरण स्वीकारू. हे सीमापार हल्ले करताना पाकिस्तानने आजवर विशेष चर्चेत न आलेल्या जमात-उल-अहरार या संघटनेच्या अतिरेकी प्रशिक्षण स्थळांना लक्ष्य केले. यात मेलेले बहुतांश अफगाण होते. लगेच पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात राजनैतिक स्तरावर आरडाओरड, अतिरेकांना आश्रय देण्याचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप इ. सुरू झाले. त्या सीमा भागातील शेकडो कुटुंबे स्थलांतरित झाली. त्यानंतर लगेच चार दिवसांनी इस्लामाबादजवळच्या चरसद्दा या ठिकाणी अतिरेक्यांनी आत्मघात करण्यापूर्वी त्यांना ठार करण्यात आले.

संस्कृती व धर्म यातील संघर्ष

पाकिस्तानात वहाबी आणि सुफी यातील चाललेला संघर्ष हा धर्म आणि संस्कृती यातील संघर्ष आहे. एकेश्वरवादी - सेमेटिक धर्मात कुठल्याही प्रकारची प्रतीकपूजा मान्य नाही. दर्गे, मझार इ. ठिकाणे त्यात निषिध्द ठरतात. त्या दृष्टीने पाहता ते मान्य नसणे हे स्वाभाविक असू शकते. त्याच वेळी समाजमानस हे प्रतीकांशिवाय राहू शकत नाही. जनसाधारणाला संगीत आणि कला यांशिवाय जगता येत नाही. म्हणून हजारो वर्षांपासून अध्यात्मसाधनेला प्रतीकपूजेबरोबरच कला, गायन, नृत्य इ.ची जोड दिली गेली. हा संस्कृतीचा भाग झाला. निर्गुणापेक्षा सगुण भक्ती अधिक सोपी असते. इस्लाममध्ये आता हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये प्रथम हिंदू, नंतर ख्रिश्चन यांच्या विरोधात अतिरेकी कारवाया सुरू करून सुन्नी वहाबींनी कडवे जनमत तयार केले. त्यानंतर क्रमांक लागला तो सुमारे 20% लोकसंख्या असलेल्या शिया, अहमदिया व इतर मुस्लीम पंथांतील लोकांचा. त्याच्या पुढची आताची स्थिती ही सुन्नी पंथांतर्गतच असलेल्या सूफी पंथाच्या अनुयायांविरोधात अतिरेकी कारवाया करण्याचे सत्र या कडव्या वहाबी-सलाफींनी सौदी अरेबियाकडून मिळणाऱ्या पेट्रोडॉलर्सच्या भरवशावर आरंभले आहे. यामुळे आता अंतर्गत धार्मिक संघर्षाला तोंड फुटले आहे. आतापर्यंत सुन्नीबहुल असलेले लष्कर या अतिरेक्यांकडे दुर्लक्ष्य करत होते. 16 तारखेच्या हल्ल्यानंतर झालेल्या प्रतिहल्ल्यात सध्याच्या घटकेला अफगाण लोकांना लक्ष्य केले गेले असले, तरी सूफींचे अनुयायी लष्करातूनही आहेत. उद्या सूफीविरोधात वहाबी इस्लाम असा संघर्ष उभा होईल, त्या वेळी एकसंध वाटणारे लष्कर आणि आयएसआय यात फूट पडू शकेल. त्याचप्रमाणे जर सूफी अनुयायांनी आपली पारंपरिक उपासना पध्दती घट्ट धरून ठेवली, तर कट्टर वहाबी विचारसरणीला माघार घ्यावी लागेल. त्यातच सौदी अरेबियाचे आर्थिक पाठबळ मिळेनासे झाले, तर पाकिस्तानला अंतर्गत संघर्षावर मात करता येईल. अन्यथा दोन्हीकडून काफीरच मारले जातील, पण मानवतेच्या दृष्टीने हे हितावह नाही.

9975559155